व्यवस्थापन गुरु डॉ. शेजवलकर
आज लोकप्रिय असणारी कॉमर्स विद्याशाखा साठसत्तर वर्षांपूर्वी फारशी कुणाला माहिती नव्हती. अर्थशास्त्राची एक उपशाखा म्हणून तिचा अभ्यास केला जात असे .. ही विद्याशाखा विकसित व्हावी यासाठी आणि त्यानंतरच्या काळात त्यातूनच व्यवस्थापन शिक्षणाचे नवे दालन विकसित व्हावे यासाठी ज्यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले अशा शिक्षणतज्ञामध्ये डॉ. प्रभाकर चिंतामण पी. सी. शेजवलकर यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्याला दिलेला हा उजाळा…
उच्च शिक्षणाच्या आणि विशेषतः वाणिज्य आणि व्यवस्थापन शिक्षणाच्या क्षेत्रात गेली जवळपास सात दशकांची कामगिरी असणारे डॉ. शेजवलकर सर नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. आजच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्याच नव्हे तर देशामधल्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या विकासात डॉ. शेजवलकर स्थान अत्यंत महत्वाचे होते. स्वतः अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या डॉ. शेजवलकर यांनी सुरुवातीचा अल्पकाळ मुंबईत काम केले पण पुणे ही सर्वार्थाने त्यांची कर्मभूमी ठरली.
पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बीएमसीसी कॉमर्स कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन केले. पण सत्तरच्या दशकात काळाची पाऊले ओळखून त्यांनी पुणे विद्यापीठात व्यवस्थापन ह्या विषयाचे पद्धतशीर शिक्षण देण्यासाठी मॅनेजमेंट इंस्टिट्यूटची स्थापना केली. त्याच्याच काही काळ अगोदर अशीच एक इंस्टिट्यूट नाशिकला देखील स्थापन झालेली होती. पुण्याच्या इंस्टिट्यूटमध्ये शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातल्या तज्ञ आणि अनुभवी मान्यवरांचा एक अभिनव संयोग घडवला होता.
विद्यापीठाच्या नियमांमुळे ह्या शिक्षणात आवश्यक असणारी लवचिकता मिळणे कठीण जाते आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली संस्था विद्यापीठापासून अलग करण्याचे धाडस देखील दाखवले होते. आज पुणे शहरातच नव्हे तर इतरत्रदेखील व्यवस्थापन ह्या शाखेचे शिक्षण खूपच रूढ झालेले आहे. ते विकसित करण्याचे श्रेय डॉ. शेजवलकर दिले पाहिजे. सत्तरच्या दशकानंतर आपल्याकडे जो व्यावसायिक क्षेत्राचा विकास झाला त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मिळाले नसते तर ही वाढ होणे शक्य नव्हते. डॉ. शेजवलकर यांचे कार्य ह्या संदर्भात खूपच मूलभूत स्वरूपाचे होते.
शरद पवार हे डॉ. शेजवलकर यांचे विद्यार्थी. केवळ पुण्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासामध्ये आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाच्या विकासासाठी डॉ. शेजवलकर यांचे योगदान महत्वाचे आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या गुरूला आदरांजली वाहिली आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन ह्या विषयांप्रमाणेच मराठी भाषेवर देखील डॉ. शेजवलकर यांचे प्रेम होते.
आज वाणिज्य शाखेत थेट पीएचडी पर्यंत मराठी माध्यम घेता येते ते डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांमुळे. त्यांनी खऱ्या व्यासंगातून, ज्ञान सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे लोकहिताचे व्रत अंगीकारले आणि म्हणूनच त्यांचे शिकवणे, त्यांचे विचार व ते स्वतः लोकांच्या थेट काळजाला जाऊन भिडले. शिक्षकत्व ही केवळ नोकरी नाही तर व्रत आहे ह्या तत्वावर त्यांचे सगळे जीवन आधारलेले होते. त्यांनी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवलेच पण त्या पलीकडे जात शिक्षकांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या आहेत.
वाणिज्य आणि व्यवस्थापनाबरोबरच साहित्य, अध्यात्म आणि कला क्षेत्रातदेखील डॉ. शेजवलकर यांनी आपला ठसा उमटवला होता. वाणिज्य आणि व्यवस्थापन विषयक लेखनाशिवाय व्यक्तिचित्रण, उद्योजकांच्या यशोगाथा, अध्यात्मिक विषयांवरदेखील त्यांनी सातत्याने लेखन केले होते. ते उत्तम वक्ते होते. अनेकविध विषयांवर अतिशय सोप्या आणि मार्मिक शब्दांमध्ये ते बोलत असत त्यामुळेच त्यांची व्याख्याने बोजड न होता रसाळ आणि खुसखुशीत होत असत. मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते.
मसापच्या कारभाराबद्दलची त्यांची मते ते स्पष्टपणाने मांडत असत. एकूणच स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेणे आणि संयत शब्दांमध्ये ती खुलेपणाने मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, सिंबोईसीस , टीमवि अशा अनेक संस्थांशी त्यांचा दीर्घ काळ संबंध होता. पुणे स्टॉक एक्स्चेंज, मराठा चेंबर अशा अनेक संस्थांच्या कामात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली होती. अनेक संस्थांच्या कार्याला आकार देण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. शेजवलकरांना अनेक विषयांची खोलवर जाण होती. त्यावर त्यांचा अभ्यास असायचा आणि त्यांच्याशी बोलताना त्यांच्यामधील गुणांची, रसिकतेची दर वेळी नव्याने ओळख व्हायची. बदलत्या काळासोबत राहत सतत कार्यमग्न राहणारे डॉ. शेजवलकर वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत सक्रिय होते.
कोणताही माणूस एका रात्रीत मोठा होत नाही. व्यवस्थापन कौशल्याबरोबर अपार मेहनत करण्याची तयारी हवी. सुसंवाद साधण्याचे आणि विचार करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास माणूस यशस्वी होतो. हे तत्व डॉ. शेजवलकर यांनी आपल्या उदहरणाने सिद्ध केले होते.