काश्मीरच्या इतिहासाचे साक्षीदार डॉ. करणसिंग
अतिशय प्रसन्न व देखणे व्यक्तिमत्व, मृदु आणि विद्वतापूर्ण संभाषण आणि देशाच्या राजकारणात तब्बल सात दशके सातत्याने असलेला वावर अशी अनेक वैशिष्ट्ये असणारे काश्मीरचे राजपुत्र आणि पहिले सदर-ए-रियासत डॉ. करणसिंग यांनी नुकतीच वयाची नव्वदी गाठली. काश्मीर हा सगळ्याच भारतीयांच्या दृष्टीने एक विलक्षण जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयातल्या सगळ्या घडामोडींचे केवळ साक्षीदारच नव्हे तर त्यात सहभागी असणारे महत्वाचे घटक म्हणून आज करणसिंग ह्यांचेच नाव घ्यावे लागेल.

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत)
ई मेल – [email protected]
काश्मीरचे शेवटचे डोग्रा राजे महाराजा हरीसिंग यांचे एकुलते एक चिरंजीव असणाऱ्या करणसिंग यांचे सगळे जीवन विलक्षण नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. त्यांचा जन्म फ्रान्समधील कॅन्स इथला. शिक्षण त्या काळातल्या उच्च वर्गीयांच्या डून स्कूलमध्ये झाले. त्यानंतर प्रथम बी.ए. जम्मू-काश्मीर युनिव्हर्सिटी, श्रीनगर येथून पदवी आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समध्ये एम.ए. चे शिक्षण घेतले.
काश्मीर सारख्या संवेदनाशील राज्याचे राजपुत्र असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात करणसिंग यांच्यावर अनेक बंधने येणे सहाजिकच होते. त्यांचे बहुतेक शिक्षण घरी येणाऱ्या शिक्षकांकडूनच झाले. इतर सामान्य मुलांप्रमाणे वर्गातल्या मित्रमंडळींमध्ये खेळणं वगैरे हे सामान्य आयुष्य त्यांच्या वाट्याला आले नाही.
करणसिंग अवघे सोळा वर्षाचे असतांना भारताला स्वातंत्र्य मिळाले. काश्मीर स्वतंत्र रहावे अशी महाराजा हरीसिंग यांची इच्छा होती पण त्यावेळी जनपरिषदेचे नेते आणि काश्मीरच्या लोकांचे नेते शेख अब्दुल्ला यांना भारतात यायचे होते. पाकिस्तानने पाठवलेले सशस्त्र बंडवाले श्रीनगरच्या वेशीवर पोहोचले त्यावेळी हरीसिंगांनी भारताशी विलिनीकरणाचा करार केला.
महाराजा हरीसिंग पायउतार झाले आणि सोळा सतरा वर्षाचे करणसिंग यांनी काश्मीरच्या घटनात्मक प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली. ते सदर-ए-रियासत झाले. शेख अब्दुल्ला यांच्याकडे सत्तेची खरी सूत्रे आली. एका अर्थाने ते एक शापित राजपुत्रच ठरले. त्यानंतरच्या सात दशकात अगदी अलीकडच्या ३७० वे कलम रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत अनेक स्थित्यंतरे आली.

करणसिंग हे ह्यासगळ्या बदलांचे साक्षीदार आहेत. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेत ते नेहमीच सहभागी होते किंवा त्यांची ह्या सगळ्यात काही महत्त्वाची भूमिका होती असे नाही. पण ह्या घडामोडी त्यांच्या डोळ्यासमोर घडल्या आहेत.
१९५२ पर्यंत ते जम्मू-काश्मीरचे प्रिन्स एजंट होते. त्यानंतर २१ व्या वर्षी करणसिंग यांनी १९६५ पर्यंत जम्मू-काश्मीर राज्याचे पहिले प्रमुख म्हणून काम केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किशोरवयीन करणसिंग यांना जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली होती. पुढे १९६७ मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला आणि त्यावेळी ते सरकारमधील सर्वात कमी वयाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री झाले.
पर्यटन आणि नागरी विमान उड्डाण, तसेच कुटुंब कल्याण अशा खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांची नसबंदीची मोहिम करणसिंग यांच्या खात्याशी संबंधित होती. ती मोहिम प्रचंड बदनाम झाली पण त्या वादळात करणसिंग आपल्या ऋजु स्वभावामुळे लोकक्षोभापासून दूर राहिले होते.
अनेक वर्षे ते संसदेच्या दोन्ही सभागृहांचे – कधी लोकसभेचे तर कधी राज्यसभेचे सदस्य होते. इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या कामाशी ते जवळून संबंधित आहेत . ते त्या संस्थेचे आजीवन सदस्य तर आहेतच पण अनेक वर्षे त्यांनी त्याचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे.
बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केलेले आहे. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि एनआयआयटी विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय अमेरिकेतले भारताचे राजदूत म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे. विशेषतः रशिया-अमेरिकेमधले शीतयुद्ध अगदी बहरात असतांना त्यांनी भारताची बाजू अमेरिकन सरकारसमोर यशस्वीपणे ठेवण्याचे कठीण काम सहजपणाने केले होते.










