केरळमधला भाजपाचा चेहरा डॉ.इ. श्रीधरन्
सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची धामधम सुरू आहे. यातील केरळची निवडणूक सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण, या निवडणुकीत भाजपने मेट्रो मॅन श्रीधरन यांना रिंगणात उतरवले असून त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही घोषित केले आहे. श्रीधरन यांच्या कारकीर्दीवर टाकलेली ही एक नजर…

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत)
ई मेल – pdilip_nsk@yahoo.com
केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. पिनारी विजयन, ओमान चेंडी, अॅन्टनी वगैरे नेहमीची नेते मंडळी आहेतच. खुद्द राहुल गांधी तिथे मासेमारी आणि जोरबैठका काढत आहेत. ह्या सगळ्या कोलाहलात अठ्ठयांशी वर्षाच्या मेट्रोमॅन म्हणून ख्याती मिळवलेल्या डॉ. ईलेट्टुवलपल्ली श्रीधरन यांचे नाव घेतले जायला सुरुवात झाली आणि ह्या निवडणुकीला एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले.
एक अत्यंत यशस्वी, प्रामाणिक आणि कल्पक इंजिनियर म्हणून आजवर त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे नक्की. पण भाजपामध्ये प्रवेश करून ह्यापुढची आपली इनिंग राजकारणात असणार आहे हे त्यांनी जाहीर केले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
समाजातल्या दुरावस्थेला दोष न देता बदल घडवून आणण्यासाठी विधायक मार्ग वापरीत एखाद्या विषय निवडून त्या कामात स्वतःला गाडून घेऊन विधायक काम उभे करणारी काही मनसे आपल्यात असतात. ह्या मार्गात संघर्ष असतोच. बहुतेक वेळा तो कठीण असतो. या प्रकारचा संघर्ष करणाऱ्या माणसांमध्ये कोकण रेल्वे आणि दिल्लीचे रुप पालटून टाकणाऱ्या मेट्रो रेल्वेचे निर्माते डॉ .ईलेट्टुवलपल्ली श्रीधरन यांचाही समावेश करावाच लागेल. या माणसाने प्रदीर्घ काळ शिल्लक राहील असा आपला ठसा आपल्या कामाने समाजावर उमटवलेला आहे. आजवरच्या सत्यंत यशस्वी कारकिर्दीनंतर वयाच्या अठ्ठयांशीव्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
केरळच्या पल्लक्कड जिल्ह्यातल्या पालघाट येथल्या श्रीधरन् यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला तो प्रामुख्याने केरळच्या बाहेरच. १९३२ साली जन्मलेल्या श्रीधरन् यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि १९५३ मध्ये केरळमध्येच एका पॉलिटेकनिकमध्ये सिव्हील इंजिनीयरिंगचे अध्यापक म्हणून आपल्या नोकरीची सुरुवात केली. पण तिथे ते फारसे रमले नाहीत.
वर्षभरातच त्यांनी मुंबईला पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी स्वीकारली. तिथूनही वर्षभरात ते बाहेर पडले आणि १९८५ साली दक्षिण रेल्वेत असिस्टंट इंजिनीयर म्हणून भारतीय रेल्वे सेवेत दाखल झाले. १९९० मध्ये रेल्वेतून रितसर सेवानिवृत्ती घेण्यापूर्वी त्यांनी अनेक पदांवर काम केले होते. अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. दक्षिण भारतातल्या अनेक शहरांमधील रेल्वे लाईन्स टाकणे, अस्तित्वात असणाऱ्या रेल्वे लाईन्सचे विस्तारीकरण करणे, एकेरी लाईन्सचे दुहेरी लाईन्समध्ये रुपांतर करणे यासारखी अनेक कामे त्यांच्या अधिपत्याखाली यशस्वीपणाने पूर्ण झाली. याच काळात अनेक कठीण पूलांची कामे झाली, अनेक ठिकाणी घाट वा बोगदेही तयार झाले.
श्रीधरन् यांच्या तांत्रिक ज्ञानाची आणि व्यवस्थापन कौशल्याची परीक्षा होण्याचे अनेक प्रसंग आले. तामिळनाडच्या पम्बन बेटावरचे रामेश्वर आणि भारताचा किनारा यांना जोडणाऱ्या पम्बन रेल्वे पुलाचे काम ४५ दिवसांमध्ये पूर्ण केल्याबद्दल त्यांना पंतप्रधानांचे गौरवचिन्हही दिले गेले. हा भारतातला समुद्रावरचा पहिला पूल आहे. भारतातच नव्हे तर जगात समुद्रावरचे जे मोठे पूल मानले जातात त्यात ह्या पुलाचा समावेश केला जातो.
रस्ता आणि रेल्वे अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी तयार केलेला हा पूल म्हणजे इंजिनीयरिंगच्या क्षेत्रातले एक महत्वाचे पाऊल आहे असे आजही मानले जाते. रेल्वेच्या सेवेत असतांनाच मध्यंतरी काही काळ त्यांनी कोचीन शिपयार्डमध्येही प्रतीसेवेवर काम केले होते. ते कोचीन शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक असतांनाच राणी पद्मावती हे त्या डॉकमधले पहिले जहाज बांधले गेले. नंतरच्या काळात ते पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वे बोर्डाचे सदस्यही झाले.
१९९०मध्ये रेल्वेच्या नोकरीतून ते रितसर सेवानिवृत्त झाले . पण त्यामुळे त्यांचे काम थांबले नाही. खरे तर त्यानंतरच त्यांच खरे कार्य सुरु झाले. १९८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांच्या मंत्रीमंडळात जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री झाले आणि कोकण रेल्वेच्या कल्पनेला मूर्त स्वरुप येण्याचा योग आला. त्यावेळचे सरकारचे आर्थिक सल्लागार डॉ . बिमल जालान यांच्या सल्यानुसार सरकारने कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि रेल्वेकडे उपलब्ध असणाऱ्या बांधकामाच्या तज्ञांमधून श्रीधरन् यांची त्या कॉर्पोरेशनच्या प्रमुख पदावर निवड केली गेली.
आपला सेवानिवृत्तीच्या काळात श्रीधरन् यांनी आलेली ही संधी स्वीकारली आणि त्यांच्या जीवनातल्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. कोकणातली भौगोलिक परिस्थिती, तिथले डोंगर, भुसभुशीत मुरमाड माती, खाड्या ह्या सगळ्यांनी या प्रदेशात रेल्वे मार्गाचे काम करणे हे एक आव्हान होते. या मार्गात देशातला सर्वात मोठा बोगदा करावा लागला, सर्वात उंचीवर असणारा रेल्वेवरचा पूल बांधला गेला.
रेल्वेच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आश्चर्यकारक ठरणारा रेल्वेमार्ग श्रीधरन् यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला इतकेच नव्हे तर निर्धारित वेळेपूर्वी तयार झाला. ह्या अदभुत कामाचे श्रेय श्रीधरन् यांनाच द्यावे लागेल. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने नंतरच्या काळात काश्मिरमधल्या रेल्वे मार्गाच्या उभारणीचे अधिक कठीण काम हाती घेऊन आपल्या कार्यशक्तीचा परिचय लोकांना दिला.
पुढे १९९७ मध्ये दिल्लीमध्ये मेट्रो रेल्वे उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. पुन्हा ह्या अवघड कामाची जबाबदारी श्रीधरन् यांच्याकडे सोपवली गेली. दिल्लीत मेट्रोची निर्मिती करणे हीसुद्धा एक अतीशय अवघड गोष्ट होती. वाहनांनी भरलेले सतत वाहणारे रस्ते, बेशिस्त जनता, राजधानीचे शहर असल्यामुळे होणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कार्यक्रम,वाढता दहशतवाद आणि सुरक्षेची समस्या ह्या सारखे सतत त्रास देणारे प्रश्न होते. पण श्रीधरन यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले.
कुठे जमिनीखालून एक वा दोन मजली बोगदे करून त्यातून तर कधी पिलर्सवर उभ्या असणाऱ्या पुलावरुन दिल्लीतल्या मेट्रोने आज त्या शहराचे रंगरूपच पालटून टाकलेले आहे . कोकण रेल्वेने देशामधल्या रेल्वे वाहतुकीमध्ये एक नवा अध्याय सुरु झाला तर महानगरांमधल्या प्रवासी वाहतुकीच्या प्रश्नावर दिल्ली मेट्रो हे एक प्रभावी उत्तर मानले गेले.
दिल्ली मेट्रोची उभारणीसुद्धा वेळेपूर्वी, अपेक्षित खर्चाच्या मर्यादांमध्ये आणि अतीशय दर्जेदार झाली आहे. ह्या गोष्टी केवळ श्रीधरन याच्यामुळेच शक्य झाल्या आहेत. श्रीधरन यांना आजवर अनेक गौरव प्राप्त झालेले आहेत अनेक पारितोषिके मिळाली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाचे मॅन ऑफ द इयर,पद्मश्री, पद्मभूषण या किताबांच्या बरोबरच अनेक विद्यापीठांमधून त्यांना सन्माननीय डॉक्टरेटही मिळाली आहे.
