सीरमवाले पूनावाला
सिरम संस्थेने संपूर्ण भारतवासियांना गोड बातमी दिली आहे. यापुढील काळात या संस्थेचे महत्त्व आणखीनच अधोरेखित होईल. याचनिमित्ताने या संस्थेचे संस्थापक पूनावाला यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत…
अखेरीस कोरोनाची लस आली आहे. आपल्या सर्वांसाठीच ही एक अत्यंत चांगली बातमी आहे, असे म्हणावे लागेल. गेल्या वर्षीच्या मार्च अखेरीस कोरोनाच्या महामारीमध्ये रुतलेला गाडा ही लस निघाल्यामुळे पुन्हा चालायला लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. या महामारीच्या विरोधातल्या लढाईचे एक बिनीचे योद्धे म्हणून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या पूनावाला यांचे नाव आघाडीवर आहे.
ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझेनिका यांनी शोधलेली लस उत्पादित करण्याची मोठी कामगिरी सीरमने केल्यामुळे पूनावाला हे नाव जागतिक स्तरावर लोकांच्या समोर आले आहे. तसे पूनावाला ह्या क्षेत्रात नवे नाहीत. औषधनिर्मिती व आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर उल्लेखनीय काम करणारे सायरस पूनावाला देशातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक आहेत , परंतु ही त्यांची खरी ओळख नाही. रेबीज, गोवर, क्षयरोग, रुबेला, धनुर्वात, डांग्या खोकला, गालगुंड, हिपेटायटीस यांसारख्या अनेक जीवघेण्या रोगांवरील प्रतिबंधक लसींचे उत्पादन करणारे आणि गरिबांनाही परवडतील या दरात ते उपलब्ध करून देणारे उद्योगपती ही त्यांची खरी ओळख आहे.
‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ ही उक्ती कृतीतून आणत पूनावाला गेल्या पाच दशकांपासून आरोग्यसेवेला हातभार लावत आले आहेत. त्यांनी पुण्यात १९६६ मध्ये सुरू केलेली ‘सीरम इन्स्टिट्यूट’ ही उद्योगसंस्था जागतिक पातळीवरील अग्रगण्य संस्था आहे. या कंपनीची उलाढाल अब्जावधी रुपयांतील असून, विविध रोगांवर संशोधन करून परिणामकारक लस तिथे विकसित केली जाते. त्यापैकी काही लशी तर सामान्यांना परवडेल अशा म्हणजे चक्क पाच रुपये दरांत विकल्या जातात. भारतासह विविध देशांमधील सरकार, जागतिक आरोग्य संघटना किंवा युनिसेफ यासारख्या संस्थांना ‘सीरम’कडून लस पुरविल्या जातात.
औषधनिर्मितीच्या क्षेत्रातील बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्या बेफाट नफेखोरी करीत असताना ‘सीरम’ने स्वीकारलेले धोरण मानवी आरोग्यासाठी अतिशय मोलाचे आहे. भारतच नव्हे, तर जगभरातील १७० हून अधिक देशांत, जीवघेण्या आजारांवरील प्रतिबंधक लस स्वस्तात पुरविणाऱ्या सायरस पूनावाला यांना ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या देशातील वैद्यक संशोधन क्षेत्रातील परिषदेने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे. पूनावाला यांच्यासारख्या व्यक्ती कोट्यावधी लोकांच्या जीवनात मोठा फरक घडवून आणतात,’ हे बिल गेट्स यांचे ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करतानाचे वक्तव्य पूनावालांच्या कार्याचे समर्पक वर्णन करणारे आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत आदर पूनावाला क्लिन सिटी मूव्हमेंट आणि पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे स्वच्छ आणि हरित पुण्यासाठी एक महत्वाचा प्रकल्प राबवला जातो आहे. विशेष म्हणजे, हे सगळं कोणतीही जाहिरातबाजी वा सेवेचं प्रदर्शन न करता केले जाते आहे. ऐंशीच्या घरातले सायरस आणि चाळीशीच्या घरातले अदर या दोघांनी कोरोनावरच्या लसीच्या उत्पादनामुळे आज सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतलेले आहे, हे नक्की. अदर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण करून सीरममध्ये कामाला सुरुवात केली त्यास आता वीस वर्षे झाली आहेत. जवळपास दहा वर्षे ते सीरमचे सीईओ आहेत. आज जगातल्या जवळपास दीडशे देशांमध्ये सीरमच्या विविध आजारवरच्या लसी पोहोचल्या आहेत.
एक यशस्वी व्यावसायिक म्हणून केवळ भारतातलेच नाही तर जगातले अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फॉर्च्युन या नियतकालिकाने चाळीशीच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या जगातल्या सर्वोत्तम उद्योगपतींच्या यादीत अदर यांचा बऱ्याच वरच्या क्रमांकाने समावेश केलेला आहे, हे महत्वाचे मानावे लागेल. सारे जग कोरोनाच्या महामारीने त्रस्त झालेले असतांना लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जागतिक पातळीवरची लसीची मागणी भागवण्यासाठी अदर पूनावाला सज्ज झालेले आहेत.
आपल्याकडे जगातल्या सर्व प्राणिमात्रांचे दुःख आणि पीडा कमी व्हावी इतक्याच सदहेतूने आपले काम करण्याला भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेत परमोच्च स्थान दिलेले आहे. “कामये दुःखतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम्॥” अशी मागणी करण्याची परंपरा आहे. अदर पूनावाला यांनी देखील याच उद्देशाने कोरोनाच्या लढ्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. जगाच्या इतिहासात त्यांची ही कामगिरी सुवर्णाक्षराने लिहिली जाईल, हे नक्की.