भूषणावह
माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि तो नित्य काहीतरी शिकत असतो. पण, बराच वेळा पोटापाण्यासाठी धावतांना शिक्षणाची साथ इच्छा नसतानाही अर्ध्यावरच सोडावी लागते. या सर्व गोष्टी बदलून गेल्या त्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे. मागेल त्याला, म्हणाल तिथे आणि पाहिजे तेव्हा शिक्षण. शिक्षणाची ही अनोखी मुक्त वाट यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने समाजातील विविध घटकांसाठी खुली करून दिली. आरजे भूषण मटकरी याची शैक्षणिक वाटचाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमामुळे अनेकांना पैलू पाडून त्यांना लखाखते हिरे बनविले आहे. रेडिओ मिर्चीचा रेडिओ डॉकी आरजे भूषण हा त्यापैकीच एक. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ पसायदानातील ही उक्ती सत्यात आणणारे जणू हे विद्यापीठ आहे. लाखो लोकांना याचा फायदा झाला, त्यातीलच मी एक विद्यार्थी, असे भूषण सांगतो.
२००७ मध्ये नाशिक शहरात खासगी रेडिओ वाहिनीचा प्रारंभ झाला. त्यात भूषणला संधी मिळाली. ‘गुडमॉर्निंग…… नाशिक.’ अशी साद त्याने दिली पण त्याचे पत्रकारितेचे कुठलेही शिक्षण झाले नव्हते. त्याचवेळी त्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी. ए. मास कम्युनिकेशन अन्ड जर्नालिझम या अभ्यासक्रमाला त्याने प्रवेश घेतला. श्रीकांत सोनवणे सरांना जाऊन तो भेटलो. त्यांनी अतिशय चांगले मार्गदर्शन केले. त्याची अडचण होती ती, सकाळी होणाऱ्या वर्गाला उपस्थित राहता न येणे. कारण त्याचा शो सकाळी असायचा. पण, त्याला सहकार्याची ग्वाही मिळाली. त्यामुळेच भूषणने अभ्यास घरी पूर्ण करुन काम करता-करता शिक्षण घेतले. त्याला या अभ्यासक्रमाचा मला त्याच्या नोकरीत प्रचंड मोठा फायदा झाला, तसे भूषणनेच सांगितले आहे.
पत्रकारीतेतले अतिशय महत्वाचे बारकावे, एखादा विषय कसा निवडावा, तो कसा हाताळावा, मुलाखत घेताना प्रश्न कोणते असावे, प्रश्नांचा क्रम कसा लावावा, या सर्व गोष्टी भूषणला मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमातून कळाल्या. मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणाचा वापर करून रेडीओ मिर्चीमध्येच भूषणने तब्बल ३ हजाराहून अधिक जणांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, आशा भोसले, गुलाम अली खान, कैलास खेर, शरद पवार, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील,मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पोलिस महासंचालक डी . शिवानंदन आदींचा समावेश आहे. त्यामुळेच रेडीओ मिर्चीतर्फे दिला जाणारा ‘फ्लेम थ्रोवर’ या पुरस्काराचा मानकरीही भूषण ठरला. या बरोबरच सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूड्स संस्थेतर्फे दिला जाणारा यंग अचिवर्स ऑफ द इयर हा बहुमानही भूषणने मिळवला. याशिवाय इंडिया रेडीओ फोरम तर्फे देण्यात येणारा इंडियन एक्सलन्स इन रेडीओ २०१३ चा ‘आर.जे ऑफ दि इयर’ (मराठी) हा संपूर्ण भारतातून देण्यात येणारा मराठीतला सर्वोत्कृष्ट आर. जे. हा पुरस्कारही भूषणला मिळाला. यावर पुन्हा शाबासकीची थाप म्हणून मुक्त विद्यापीठाने भूषणचा जाहीर सत्कारही केला. मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन यथोचित गौरव केला. अशाप्रकारे विद्यापीठाच्या सहकार्याने त्याच्या जीवनात घडलेला प्रवास अतिशय सुखद असल्याचे भूषण नेहमी सांगतो. झी मराठीच्या राम राम महाराष्ट्र या कार्यक्रमाचे वर्षभर निवेदन करण्याची संधीही भूषणला मिळाली. त्यासाठीही त्याला मुक्त विद्यापीठातील शिक्षण महत्त्वाचे ठरले.
पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी बी.ए . मास कम्युनिकेशन अन्ड जर्नालिझम हा अभ्यासक्रम जरूर अभ्यासावा. तज्ज्ञांनी बनवलेला आणि अतिशय उपयोगी असा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके अतिशय सर्वोत्तम दर्जाची आहेत. प्रगती आणि शिक्षणाच्या मुक्त वाटा या विद्यापीठाने सामन्यांसाठी खुल्या केल्याने नोकरी, व्यवसायामुळे ज्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अर्धवट रहाते अशांना ते पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिलीय. मुक्त शिक्षणाचा हा ज्ञानयज्ञ सतत तेवत आहे. मुक्त विद्यापीठातून शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या भूषणची ही कामगिरी नाशिककरांसाठीच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रासाठी भूषणावह अशीच आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील तो एकमेव उदाहरण नाही असे अनेक आहेत. त्यामुळे वंचितांपर्यंत पोहचणारी मुक्त ज्ञानगंगा अनेकांची तहान भागवते आहे, हे यातून स्पष्ट होत आहे.