शिक्षणसेवक ते पोलिस उपअधिक्षक : एक यशस्वी प्रवास
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळविले आहे. त्यातीलच एक आहेत दत्ता तोटेवाड. शेतमजुराचा मुलगा, शिक्षणसेवक ते पोलिस उपअधिक्षक असा भरारी घेणारा त्यांचा यशोप्रवास आहे. त्यांच्या कार्याची ही ओळख…
अभ्यासात सातत्य, कठोर परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थिती यावर मात करून शेतमजुराचा मुलगा आज पोलिस उपअधिक्षक झाला आहे. शिक्षणसेवक ते पोलीस उपअधिक्षक असा यशस्वी प्रवास ग्रामीण भागातील ज्या तरुणाने केलाय त्या तरुणाचे नाव आहे दत्ता लक्ष्मणराव तोटेवाड. विशेष म्हणजे तोटेवाड यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन करून कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता केवळ स्वयं अध्ययनावर भर देऊन यश मिळवले आहे.
अर्धापूर तालुक्यातील लहान येथे तोटेवाड कुटुंबीय शेतमजुरी व दुधाचा व्यवसाय करून जीवन चरितार्थ चालवतात. लक्ष्मण तोटेवाड यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. घरच्या जेमतेम आर्थिक परिस्थितीमुळे दोघांचेही शिक्षण अर्धवटच राहिले. यामुळे किमान आपल्या दत्ता या मुलाचे तरी शिक्षण पूर्ण व्हावे, अशी लक्ष्मण तोटेवाड यांची इच्छा होती. दैनंदिन खर्च कमी करून, लक्ष्मण तोतेवाड यांनी मुलाच्या शिक्षणासाठी पैसा खर्च केला. तोटेवाड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लहान येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत झाले. त्यांना दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले व तालुक्यातून ते प्रथम आले.
दहावीनंतर शिरूर येथे बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. बारावीतही चांगले गुण मिळाले. त्यांचे मित्र अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाकडे वळले; पण त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे या शाखांकडे जाता आले नाही. कुटुंबाला आर्थिक मदत होईल व आपल्यालाही आपल्या पायावर उभे राहता येईल, असा अभ्यासक्रम निवडण्याला त्यांनी प्राधान्य दिले. बराच विचार करून अखेर त्यांनी डी.एड.ला प्रवेश घेण्याचे ठरवले. त्यांची डी.एड.साठी निवड झाली. येथेही त्यांनी नैपुण्य मिळवले आणि तब्बल ७८ टक्के गुण घेऊन ते प्रथम आले.
तोटेवाड यांना लहानपणापासूनच अधिकारी होण्याची इच्छा होती. डी.एड. झाल्यावरही त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. नंतर शिक्षणसेवक पदासाठी अर्ज भरला. अनुसूचित जमाती प्रवर्गातून त्यांची शिक्षणसेवक पदासाठी निवड झाली. भोकर तालुक्यातील मांगदरी येथे त्यांची नियुक्ती झाली. तेथे त्यांनी मुख्याध्यापक म्हणूनही काम केले. अध्यापन करीत असतानाच अध्ययन ही मात्र सुरूच होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए.चे पदवी शिक्षण पूर्ण करता-करता त्यांनी एमपीएससीच्या अभ्यासाला सुरूवात केली. तीन वर्षे अभ्यास केल्यावर पहिला अटेम्प्ट दिला. मुख्य परीक्षेसाठी विषय होते भूगोल आणि लोक प्रशासन. पहिले दोन वर्षे मुख्य परीक्षेचा अभ्यास केला आणि तिसर्या वर्षी पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. आयोगातर्फे २००९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सहायक संचालक म्हणून त्यांची निवड झाली.
दरम्यानच्या काळात मुळ पदावर रुजू झाले. नंतर २०१० मध्ये मुख्य परीक्षेसाठी पुण्यात पेपर चालू असताना २००९ चा निकाल हाती आला आणि त्यांची सहायक संचालक म्हणून निवड झाली. यानंतर २०१० चे पेपर दिले. डि.वाय.एस.पी. होण्याचे स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हते. अखेर २०१० च्या परिक्षेचा निकाल लागला. त्यातही बाजी मारली. अवघ्या चार जागा असल्याने प्रथम प्राधान्य डि.वाय.एस.पी. पदाला देऊन अखेर यश मिळवले.
‘नोकरीसाठी मला रोज दोन कि.मी. पायी जावे लागत असे. तीन वर्षात एकाही उन्हाळ्यात मी घरी गेलो नाही. या कष्टाचं फळ म्हणजे पहिल्या प्रयत्नात माझे क्लास वन ऑफीसर म्हणून सिलेक्शन झाले आणि दुसर्या प्रयत्नात मी महाराष्ट्रात एमपीएससीमध्ये डीवायएसपी पदासाठी चौथ्या क्रमांकावर सिलेक्ट झालो. योग्य दिशेने केलेले प्रयत्न हे यशाच्या खूप जवळ घेऊन जातात’, असे दत्ता तोटेवाड सांगतात.
कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत सहज यश मिळविता येते. ‘ यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही, पण वाटतं तितकं कठीणही नाही. निश्चित ध्येय , अपार कष्ट करण्याची तयारी, आत्मविश्वास, स्वयं अध्ययन, ग्रुप चर्चा एकाग्रपणे आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे निश्चितच या परीक्षांत यश मिळतं हेच तोटेवाड यांनी दाखवून दले आहे. दत्ता तोटेवाड यांच्या जिद्दी वृत्तीला सलाम …..!