समृध्द शेती अन् सुदृढ समाजासाठी ‘माऊली’ ची खटपट
कोरोना महामारीच्या काळात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जितक्या घटकांचे समाजासाठी विशेष योगदान राहिले. त्यामध्ये शेतकरी या घटकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आपत्कालीन परिस्थितीतही समाजाचा अन्नदाता बनणाऱ्या या बळीराजासाठी काहीतरी करावे, अशा धडपडीतून राजकुमार गोपालराम यादव यांनी माऊली प्रा.लि. कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या या कंपनीच्या उत्पादनांना विविध जिल्ह्यांसह परराज्यांमधूनदेखील मागणी वाढते आहे. त्यांची ही यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे….
शेतीमध्ये वाढलेला रसायनांचा वापर आणि त्याचे जमिन व कृषीमालाच्या उत्पादनावर दिसून येणारे अनेक प्रतिकूल परिणाम पाहता अलिकडे सेंद्रीय शेतीवर अनेक जण भर देताहेत. शेती विषयातील आवडीमुळे राजकुमार गोपालराम यादव या तरूणानेही वाणिज्य शाखेतील पदवीनंतर इतर नोकरी-व्यवसायाच्या मागे न लागता कृषीसेवेत स्वत:स झोकून देण्याचा संकल्प केला. त्यासाठी गरज होती ती कृषी विषयक शिक्षणाची. यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कृषी पदवीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेत शेती अन् मातीतले प्रश्न समजून घेण्यास सुरूवात केली. शेतीच्या बहुतांश प्रश्नांचे उत्तर राजकुमार यांना सेंद्रीय शेती पध्दतीत सापडत गेले. या प्रयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी याच व्यवसायात उतरलो तर छंदाचे रूपांतर व्यवसायात होऊन योग्य समन्वय साधला जाईल, या अपेक्षेने त्यांनी ‘माऊली प्रा.लि.’ या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.
रासायनिक खतांचा वाढता उपयोग, परिणामी दिवसेंदिवस खालावत जाणारी जमिनीची प्रत, रसायनांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल अशा प्रमुख समस्यांवर आपली सेवा काय उपाय देऊ शकते , हा विचार यादव यांच्या मनात वारंवार येत होता. यावर पूर्वमशागतीपासून तर पिक काढणीपर्यंत आवश्यक त्या सर्व प्रकारची सेंद्रीय-जैविक औषधे एकाच ठिकाणी माऊली कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. पण केवळ व्यवसायास सुरूवात करून विक्री वाढविणे इतके मर्यादित आव्हान या विषयात नव्हते. पूर्णत: जैविक औषधांच्या विक्री व्यवसायात पडण्यापेक्षाही सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे मोठे आव्हान या सुरूवातीच्या टप्प्यात राजकुमार यांच्या समोर उभे होते.
कारण, या व्यवसायातील स्पर्धा, भांडवल उभारणीसोबतच शेतकऱ्यांची मानसिकता, रासायनीक शेतीचा असणारा पगडा, जैविक औषधांबाबतचे गैरसमज, अपूर्ण माहिती या वस्तूस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये या विषयाबाबत जनजागृती करण्याची गरज विषेशत: जाणवली. परिणामी , सुरूवातीच्या काळात उपलब्ध भांडवलात छोट्या प्रमाणावर जैविक औषधांची खरेदी करून गावोगावी-खेडोपाठी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.
विविध हंगामात पिकांवर येणाऱ्या संभाव्य रोग-किडी, पिक संरक्षणार्थ उपाय योजना आदी माहिती देऊन जैविक औषधांची विक्री करण्यावर भर दिला. या शेतकरी जागरामुळे अनेकांनी उत्पादनांमध्ये वाढ झाल्याचा सकारात्मक अनुभवदेखील अनेकांना आला. यामुळे नकळत बहुसंख्य शेतकरी आमच्याशी नंतरच्या काळात जोडले गेले. ‘समृध्द शेती’, ‘शेतकऱ्यांचे समाधान’ आणि ‘पर्यावरण रक्षण’ या त्रिसूत्रीवर भर देत सुरू झालेल्या माऊली ऑरगॅनिक प्रा. लि. च्या आज दिंडोरीसह कळवण, सटाणा, गिरणारा या ठिकाणी शाखा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे ३५ डिलर्सदेखील माऊली कंपनीशी जोडले गेले आहेत. आता जिल्ह्यासह परराज्यांमधूनदेखील उत्पादनांना मागणी वाढते आहे. प्रामुख्याने गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेशातील शेतकरी व डीलर्स या मागणी-पुरवठा साखळीत जोडले जात आहेत. भविष्यामध्ये जिल्हा व राज्यासह देशभरात शाखा सुरू करण्याचा मानस आहे.
कृषी क्षेत्रातील भविष्यातली विविध आव्हाने बघता जमिनीची सुपिकता वाढविणे हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. यामुळे ‘ॲझेटोबॅक्टर’, ‘ॲझोस्पीरिलीयम’, ‘रायझोबियम’, ‘स्फुरदाचे जीवाणू’, ‘पलाश विरघळविणारे जीवाणू’, ‘जैविक बुरशी नाशके’ आदी निविष्ठा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महत्वाची बाब म्हणजे माऊली ऑरगॅनिक प्रा. लि. मधील सर्व निविष्ठांचा उपयोग प्रथमत: संचालक स्वत:च्या नियंत्रणाखाली व स्वत:च्या शेतावर करतात. या प्रयोगाची परिणामकारकता अभ्यासल्यानंतरच त्यांच्याकडून शिफारस केली जात असल्याने हा सल्ला फायदेशीरदेखील ठरतो. शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन देखील विनामूल्य मार्गदर्शन केले जाते.
वंचित घटकांना ज्या प्रकारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून बळ देऊ केले, त्याप्रमाणे कृषी मार्गदर्शनातही विद्यापीठाच्या योगदानाची बरोबरी सहजासहजी कुणी करू शकत नाही. कृषी विज्ञान केंद्राच्या स्थापनेसोबतच अनेक शेतरकऱ्यांना कृषीसाक्षर करण्यातही विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. विद्यापीठाच्या प्रेरणेने या व्यवसायात प्रवेश केल्यानंतर असंख्य शेतकऱ्यांना आमच्याजवळील कृषी ज्ञानाच्या ठेव्याचा उपयोग होत असल्याचे वेगळे समाधानदेखील या व्यवसायातून प्राप्त होते. माऊली ऑरगॅनिकच्या वाटचालीचे श्रेय हे आई-वडिल, पूर्ण परिवार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, भागीदार, शेतकरी आणि डिलर्ससह सर्व हितचिंतकांना जाते.
दिवसेंदिवस शेती व्यवसायातील आव्हाने वाढत आहेत. कृषीमालाच्या बाबतीत झालेल्या ज्ञानाच्या प्रसारामुळे आता ग्राहकदेखील अतिशय जागृत झाला आहे. आरोग्याच्या रक्षणासाठी सेंद्रीय उत्पादनांकडेही ग्राहकांचा कल दिसून येतो. परिणामी, गुणवत्तापूर्ण सेंद्रीय उत्पादनांच्या मागणीचा भविष्यातील आलेख हा वाढतच जाणार आहे. जमिनीची सुरक्षितता, कृषीमालाची गुणवत्ता आणि ग्राहकहित यासारख्या मुल्यांच्या जपवणूकीसाठी सेंद्रीय शेतीला पर्याय नाही.
सेंद्रीय शेती ही शाश्वत शेती आहे, असे अनुभवाने म्हणता येईल. शाश्वत सेवेकडे वळण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीबाबतच्या मूळ संकल्पना समजून घ्याव्यात, व्यक्त होऊन मनातील शंकांचे निरसन करून घ्यावे अन् समृध्द शेती-सुदृढ समाजाच्या उभारणीसाठी योगदान देण्यासाठी पुढाकार घेण्याची ही वेळ आहे….