शेतकरी ते कृषी उद्योजक
कोणत्या परिस्थितीत जन्म घ्यावा, हे आपल्या हाती नसते पण वाट्याला आलेले आयुष्य सकारात्मकपणे जगून परिस्थितीत अपेक्षित बदल कसा घडवावा हे नक्कीच आपल्या हाती असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथील ॲग्री सर्च (इंडिया) कंपनीचे संस्थापक संचालक पंडित निवृत्ती खांदवे. पंडित खांदवे यांनी आजवर जिद्द आणि मेहनतीच्या बळावर केलेली वाटचाल निश्चितच प्रेरणा देणारी आहे. सामान्य शेतकरी ते यशस्वी कृषी उद्योजक असा त्यांचा स्फूर्तीदायक प्रवास अनुभवण्याजोगा असाच आहे.
पिंपळनारे (दिंडोरी जि. नाशिक) गावातील खांदवे कुटूंब हे एकत्र कुटूंब पद्धतीतील एक आदर्श कुटूंब. वारकरी संप्रदायाच्या संस्काराने कुटूंबातील प्रत्येक सदस्याचा आदर राखत आणि आपसातील प्रेमभाव जपत या कुटूंबातील गतपिढ्यांनी शेतीचा मुख्य व्यवसाय सांभाळताना, काळाच्या गरजेनुसार प्रसंगी इतरांच्या शेतातही मोल मजुरीची कामे करून पुढील पिढ्यांना श्रमसंस्काराचे शिक्षण दिले. वडिल आणि त्यांच्या पाच भावांच्या समन्वयातून आपसातील जबाबदाऱ्या निश्चित केल्यानंतर, या कुटूंबाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
ॲग्री सर्च (इंडिया) चे संस्थापक संचालक पंडित निवृत्ती खांदवे यांनी पिंपळनारे येथील स्थानिक शाळेमध्ये मराठी शाळेतून इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तत्कालीन अभ्यासक्रम रचनेत इयत्ता सातवी ही बोर्डाची परीक्षा होती. यानंतर गावातील हायस्कूलमध्येच इयत्ता आठवीत प्रवेश घेऊन सन १९७४-७५ साली अकरावी बोर्डाच्या परीक्षेत देखील चांगले यश मिळविले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने नाशिकमध्ये केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेतला. ग्रामीण भागातून व मराठी शाळेची पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्णत: इंग्रजी माध्यमातील शिक्षण अनेकदा दडपण वाढविणारे होते. त्यामुळे सहाजिकच शिकवणी लावणे ही त्यावेळची गरज होती. त्यामुळे मेनरोड परिसरातच शिकवणी, चहापाणी-जेवणाची व्यवस्था आणि विद्यार्थी दशेत असणारी वृत्तपत्र वाचनाची गरजही येथे पूर्ण व्हायची.
एके दिवशी वृत्तपत्र चाळताना खांदवे यांच्या दृष्टीस भारतीय हवाई दलाची एक जाहिरात पडली. हवाई दलातील संधीच्या औत्सुक्यापोटी अर्ज भरल्यानंतर काही महिन्यांनी हवाई दलाकडून खरोखर कॉल आल्यानंतर, आनंद गगनात मावेना. त्या मुलाखतीच्या निमित्ताने १९७६ च्या दिवाळीत पहिल्यांदा मुंबई पाहिली. फेब्रुवारी १९७७ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्याचे पत्र मिळाले आणि १९ फेब्रुवारी १९७७ रोजी बंगळुरू येथे पहिल्या प्रशिक्षणाची सुरूवात झाली. दीड वर्षाच्या प्रशिक्षणाच्या कालावधीतमध्ये बंगळुरू आणि डुंडीगळ (हैदराबाद) येथे अतिशय खडतर स्वरूपाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एअर ट्राफिक कंट्रोल विभागात ‘ऑपरेशनल ऑपरेटर’ या पदावर खांदवे कार्यरत झाले. नोकरीतील या अनुभवाने आयुष्याला एक शिस्त, प्रामाणिकपणा, अचूकता आदी गुणांची देणगी दिल्याचे ते सांगतात.
या नोकरी निमित्ताने देशातील विविध राज्यात भ्रमंती झाल्याने देशातील भिन्न संस्कृती-चालीरितींचे दर्शन घडत गेले. हा अनुभवदेखील जीवन समृद्ध करणारा असल्याचे ते सांगतात. या नोकरीतील सुमारे १५ वर्षांचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर नियम व कायद्यांचे पालन करून ते पुन्हा नाशिकमध्ये स्थिर झाले.
भारतीय हवाई दलातून निवृत्ती स्वीकारण्याअगोदर उर्वरीत आयुष्यात कारखानदार होण्याचे स्वप्न खांदवे यांनी उराशी बाळगले होते. पण सुरूवातीच्या टप्प्यात कोणत्या क्षेत्रातील कारखान्याची पायाभरणी करावी याबद्दल अस्पष्टता होती. काही महिने चाचपणी केल्यानंतर ६ जून १९९२ रोजी जळगांवातील लीड्स केम ग्रुप ॲग्रोकेमीकल्स या कंपनीत नोकरीची सुरूवात केली. या काळात कंपनीने कृषी विभाग गोव्याला स्थलांतरीत केला. या निमित्ताने कंपनीच्या कार्यकारी संचालकांसमवेत सातत्याने गोव्यास भेटी होत असत. या भेटींदरम्यान शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय अभ्यास होण्याची गरज जाणवली.
कंपनीचे गोव्याचे युनीट यशस्वी झाल्याने आत्मविश्वास वाढला होता. यामुळे १९९८-९९ च्या दरम्यान नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पंडित खांदवे यांनी ‘कृषी अधिष्ठान’ अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमातील कृषीची गोडी वाढविणारे घटक, शिकविण्याच्या चांगल्या पद्धती आणि प्रात्यक्षिकांमुळे सन २००४ रोजी त्यांनी बी.एस्सी. (हॉर्टीकल्चर) पदवी पूर्ण केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाच्या या पदवीने आयुष्यातील नवीन ध्येय नक्कीच दिले.
ही पदवी पूर्ण झाल्यानंतर शेतीशास्त्रातील ज्ञान व अनुभव असणाऱ्या आप्तेष्टांनी एकत्र येत फेब्रुवारी २००० मध्ये ॲग्री सर्च (इंडिया) प्रा. लि. या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. सुरूवातीस एका छोट्याशा खोलीतून कंपनीच्या कामकाजास सुरूवात झाली. कृषी उत्पादनाच्या पॅकींग, मार्केटींग, तांत्रिक आणि वाहतूकीपासून सर्व बाजू भागधारकांनीच सांभाळल्यानंतर या प्रयोगाला शेतकऱ्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जाणवू लागले. दोन वर्षात उत्पादनांमध्ये व प्रतिसादात चांगली भर पडल्याने अंबड एमआयडीसीमध्ये एका युनीटमधील एक भाग भाडेतत्वावर घेऊन कामास सुरूवात झाली. यानंतर नाशिकसह धुळे आणि जळगांव भागातदेखील वितरण व मार्केटींग सुरू केले.
व्यवसायात मिळणाऱ्या यशाचा कौल विचारात घेत पिंपळनारे, दिंडोरीतील वडिलोपार्जित जागा कंपनीच्या नावे करून नवीन बांधकामास सुरूवात केली. प्रसंगी राहत्या घराच्या आधारावर बँकेकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून घेतले. २००५ पासून नवीन वास्तूत नव्या प्रकल्पाला सुरूवात झाली. पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य विविध फॉर्मसमध्ये व निरनिराळ्या ग्रेडनुसार फॉर्म्युलेट करण्याची सुविधा सुरू केली. या उपक्रमास शेतकऱ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला. सुरूवातीस इनॉरगॅनिक मध्ये काम केले. कंपनीच्या सेवेस वाढता प्रतिसाद पाहता दर एक किंवा दोन वर्षाला सातत्याने कार्यक्षेत्राचा विस्तार करावा लागला. हा विस्तार महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून अन्य राज्यांत थेट जाऊन पोहचला आहे. कंनीची सर्व उत्पादने ही स्प्रे ड्रायिंग तंत्राने बनविली जातात. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि कर्नाटकसह बाह्य देशांमध्ये केनिया आणि अमेरीकेतही या उत्पादनांचे मार्केटींग केले जाते आहे.
सद्यस्थितीत कंपनीकडे प्रॉडक्शन आणि मार्केटींग विभागासह सुमारे २५० कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीच्या यशाचे श्रेय खांदवे हे कंपनीशी संबंधित प्रत्येक घटकाला देतात. या यशाचा मंत्र ‘टीमवर्क’ असल्याचे ते सांगतात. शेतकरी आणि विक्रेत्यांनी आमच्यावर टाकलेला मोठा विश्वास हा देखील कंपनीच्या यशासाठी तितकाच महत्वाचा असल्याचेही ते आवर्जून सांगतात.
कृषी विषयाची सर्वप्रथम आवड निर्माण करून देतानाच त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. पंडित खांदवे कंपनीची तांत्रिक जबाबदारी स्वतः संभाळत असून, कंपनीच्या सुरक्षारक्षकापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांकडे एक कुटुंब म्हणून पाहतात. विशेष म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची कला त्यांना चांगली अवगत आहे.
मुक्त विद्यापीठाचा कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांच्यामुळे कृषी शिक्षण घेण्यास त्यांना प्रेरणा मिळाली. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर शेती व्यवसायाकडे वळविण्याकडे त्यांना पी. एम. कोठावदे आणि पी. व्ही. चौधरी यांनी प्रोत्साहित केलं. डॉ. प्रकाश अतकरे, डॉ. एस.डी. सूर्यवंशी प्रा. प्रशांत बोडके, रावसाहेब पाटील, प्रा. कै. कारभारी सोनवणे, हेमराज राजपूत, माधुरी सोनवणे, राजाराम पाटील, सोमनाथ जाधव, निखिल ताम्हणकर आणि राजेश बर्वे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले.
आपल्या आयुष्यातील उमेदीचे तब्बल पंधरा वर्षे भारतीय वायुदलाला दिले असले तरी, आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलो याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगतात. आपल्या यशाचे श्रेय ते आई वडील आणि आंतरिक प्रेरणा देणाऱ्या पत्नीला देतात.
एका वेगळ्या ध्येयाच्या या दीर्घ वाटचालीमध्ये पारदर्शकता, प्रामाणिकपणा, चिकाटी, चुकांमधून शिकण्याची तयारी, तत्परता, नियोजनबध्दता या गुणांच्या जोडीलाच शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्याचा अभ्यास गरजेचा आहे. कुटूंब आणि स्वत:ला ही या वाटचालीत वेळ काढणे अगत्याचे ठरते, असे सांगतानाच आयुष्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने बघा आणि आव्हाने पेलण्यासाठी कायम सज्ज रहा, हे खांदवे आवर्जून सांगतात. शून्यातून विश्व निर्माण केलेले खांदवे कृषी क्षेत्रातील पंडित म्हटल्यास वावगे ठरू नये.