नाशिक : एक शैक्षणिक हब
मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी वाटचाल करणारे नाशिक आता ‘एज्युकेशन हब’ म्हणून नावारूपाला येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ही राज्य स्तरावरची दोन विद्यापीठे तसेच पुणे विद्यापीठाचे कॅम्पस यामुळे नाशिकच्या विकासात मोठी भर पडत आहे. वाहतूक, दळणवळण, पोषक हवामान, निसर्गरम्य वातावरण यांसारख्या बाबींमुळे खासगी शिक्षण संस्थांनीही नाशिक आणि परिसरात आपले भव्यदिव्य कॅम्पस उभारलेत. अगदी निवासी शाळेपासून तर व्यावसायिक महाविद्यालयापर्यंतची सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा असलेल्या शहराच्या या बदलात शिक्षण क्षेत्रही भरारी घेत असल्याने या वाटचालीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे योगदानही तेवढेच मोठे आहे. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठीत शिक्षणाच्या संधी या विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या आहेत.
मुंबई पुण्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून नाशिककडे पहिले जात आहे. विकासाचा सुवर्णकोन साधत हे शहर आता आधुनिक महानगर बनू पाहत आहे. दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा, द्राक्षे, वाईन आणि कांदा केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित असलेली नाशिकची ओळख आता कात टाकू लागलीय. पारंपरिक, तंत्रशिक्षण, मुक्त आणि दूरस्थ तसेच वैद्यकीय शिक्षण हे सर्व प्रवाह नाशिकला एकाच छताखाली आहेत. पारंपरिक शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिक्षण प्रवाहात सामील करून घेण्याची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. अशा वेळी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून आणि पदवीधर होऊन आत्मसन्मान उंचावण्याची एक महत्त्वपूर्ण सुविधा दूरशिक्षण प्रणालीवर आधारित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आजवर महाराष्ट्रातील तब्बल पन्नास लाख इच्छुक शिक्षणार्थ्यांना करून दिली, हे सामाजिक योगदान कोणालाही नाकारता येणार नाही.
या विद्यापीठाने पाहिजे त्याला, पाहिजे तेव्हा, पाहिजे तेथे हवे ते शिक्षण देण्याची सुविधा निर्माण करून दिली आहे. समाजातील वंचित घटकांना विविध कारणांमुळे आपले पदवी शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न अर्धवट राहिल्याने, त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाची संधी देण्यासाठी मुक्त विद्यापीठाने अनेक शिक्षणक्रम सुरू केले आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील जवळपास शंभराहून अधिक निरनिराळे शिक्षणक्रमांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यात प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा विविध प्रकारच्या शिक्षणक्रमांचा समावेश आहे. शिक्षणाची गरज ओळखून विविध अभ्यासक्रम या विद्यापीठाने सुरू केले. विशेष करून व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांच्या गरजा ओळखून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. प्रवेशप्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर करण्यावर विद्यापीठाने भर दिला आहे.
विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात अद्ययावत, सुसज्ज अशा ग्रंथालयाची उभारणी केली असून येथील ग्रंथालयात जवळपास ५० हजार पुस्तके उपलब्ध असून सुमारे ६ हजारांहून अधिक (जर्नल्स) एफ्स्को डेटाबेस, डेलनेट डेटाबेस आणि भारत सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे आणि गुजरातच्या इम्फ्लीबनेट केंद्राच्या साहाय्याने सुमारे ५००० इलेक्ट्रॉनिकचा जनरल डेटाबेस तसेच यशवंतराव चव्हाण संग्रहाचेही जतन करण्यात आले आहे.
शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाज घटकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सुयोग्य असे शैक्षणिक तंत्रज्ञान केवळ मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने नव्हे तर, अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा, अध्ययन पद्धतीत वापर करून टिकाऊ स्वरूपाचे शिक्षण देऊन शैक्षणिक क्रांती केली. याचमुळे ‘कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग’ या जागतिक संघटनेने ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार या एकदा नव्हे तर दोन वेळा या विद्यापीठाला प्रदान केला आहे. ही बाब राज्यासाठी, विद्यापीठासाठी आणि नाशिकसाठीही अभिमानाची अशीच म्हणावी लागेल. या विद्यापीठातून पदवी शिक्षणक्रम पूर्ण करून २०१० पासून एमपीएससी / यूपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाचे स्थान व उत्तम कामगिरी करणारे असंख्य विद्यार्थी असून त्यांनी केवळ स्वयं-अध्ययनावर भर देऊन मुक्त आणि दूरशिक्षण पद्धतीचे प्रभावीपण सिद्ध केले आहे. भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत तथा ‘सावरपाडा एक्सप्रेस’ हिच्या खडतर वाटचालीचा प्रवास मांडणारा प्रेरणादायी पाठाचा समावेश बालभारतीच्या इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात झाल्याने मुक्त शिक्षणाचे अधिष्ठान अधिक मजबूत झाले आहे.
आज सर्व क्षेत्रांत प्रगती साधून बदल करून शिक्षणक्रम, अभ्यासकेंद्रे, मार्गदर्शक प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने विद्यापीठाने आपले अनोखे स्थान मिळविले आहे. अभ्यासकेंद्रे, पाठ्यपुस्तकांचा दर्जा, मूल्यमापन, गुणवत्ता, ई-लर्निंगची उपलब्धता, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण, व्यवहारातील पारदर्शकता, समाजातील विशेष वंचित घटकांसाठी विशेष शिक्षणक्रम आणि शिक्षण प्रक्रियेला साहाय्यभूत अशी कार्यक्षम व्यवस्था उभारली आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तात्यासाहेब शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, वसंतराव कानेटकर, लक्ष्मीबाई टिळक यांसारख्या दिग्गजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या शहराला वेगळी ओळख निर्माण झाली. एकेकाळी उत्तर महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचे पहिले केंद्र म्हणून एच.पी.टी. महाविद्यालय ओळखले जात. आज या शहरात विविध शिक्षण संस्थांच्या रूपाने मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मंडळांचे शिक्षणक्रम राबविणाऱ्या शाळा, कॉलेजेस आहेत. विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करतानाच त्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जातोय. येथून शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी अन्य शहरांत शिक्षण घेणारेही असंख्य विद्यार्थी आहेत. मात्र यात मुक्त शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण करून देण्यात या विद्यापीठाने सामाजिक दृष्टिकोनातून निभावत असलेली भूमिका महत्त्वाची आहे.
ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांनी तर ‘चिरंतन ज्ञानाची साधना’ हे विद्यापीठ गीत लिहून विद्यापीठाची उंची वाढवली. तात्यासाहेबांच्या साहित्याने जगभर गगनभरारी घेतलीय. विद्यापीठाने तात्यांच्या नावाने कुसुमाग्रज अध्यासन स्थापन करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. याशिवाय त्यांच्या गाजलेल्या विशाखा काव्यसंग्रहाच्या नावे राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो, तसेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अमराठी साहित्यिकासही दरवर्षी ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. कुसुमाग्रजांप्रमाणेच दलित साहित्य चळवळीत मोठे योगदान देणारे बाबूराव बागूल यांच्या नावानेही राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विद्यापीठ स्थापनेपासूनच मोठे सामाजिक योगदान देत आहे हे आवर्जून नमूद करावे लागेल.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जेदार अभ्यासक्रम देणारी कॉलेजेस, उपक्रमशील शाळा, शारीरिक अथवा मानसिक अपंगत्व आल्याने शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर आलेल्या विशेष मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा, ऑफ बीट करिअरच्या संधीही येथे उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना वेगळी दिशा मिळत आहे. तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या रूपाने नाशिकला ज्ञानपीठ मिळाले. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन गेल्या ३१ वर्षांपासून ज्ञानदानाची भूमिका पार पाडणाऱ्या ज्ञानगंगोत्रीच्या माध्यमातून नाशिक शहर ज्ञानपीठ बनू शकेल.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जेदार अभ्यासक्रम देणारी कॉलेजेस, उपक्रमशील शाळा, शारीरिक अथवा मानसिक अपंगत्व आल्याने शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर आलेल्या विशेष मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा, ऑफ बीट करिअरच्या संधीही येथे उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना वेगळी दिशा मिळत आहे. तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या रूपाने नाशिकला ज्ञानपीठ मिळाले. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन गेल्या ३१ वर्षांपासून ज्ञानदानाची भूमिका पार पाडणाऱ्या ज्ञानगंगोत्रीच्या माध्यमातून नाशिक शहर ज्ञानपीठ बनू शकेल.
नाशिक शहराला मुळातच शैक्षणिक पाया आहे. येथे अनेकविध क्षमता असल्याने शैक्षणिक विकासात नाशिक ग्रुमिंग होत आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वोत्तम शैक्षणिक हब म्हणून नाशिकची ओळख होईल असा मला विश्वास वाटतोय.