पॅडीने जपलेली माणुसकी
निमित्त तसे युवक महोत्सवाचे. पण यानिमित्ताने पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडीने माणुसकीचे जे दर्शन घडविले ते त्याचे मोठेपणच प्रदर्शित करणारे होते. अशी माणसे दुर्मिळ आहेत. पॅडीच्या या माणुसकीचे अंतरंग उलगडणारी ही आठवण…
युवक महोत्सव म्हटलं की, सर्वांनाच वेध लागतात ते सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रेलचेलीचे. नाटक, एकांकिका, माईम, नृत्य, समूहगीत, रांगोळी, लोकनृत्य, लोकगीते, भावगीते, अशा सप्तरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांची उधळण या निमित्ताने होत असते. विद्यार्थी काम करता करता शिक्षण घेत असले तरीही, त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी इतर विद्यापीठांप्रमाणेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने एक सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्यासाठी अनेक वर्षांपासून युवक महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक वाटचाल होते आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाच्या वतीने महाराष्ट्रातल्या विभागीय केंद्रांवर पहिल्या फेरीमध्ये विविध कला प्रकारांत विद्यार्थी सहभागी होतात. त्यातून निवडलेले विभागीय स्तरावरील विद्यार्थी केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होत असतात. अर्थात हा केंद्रीय युवक महोत्सव विद्यापीठाच्या मुख्यालयात (ज्ञानगंगोत्रीत) पार पडतो.
केंद्रीय युवक महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी, दरवर्षी नामवंत अभिनेत्यास आमंत्रित केले जाते. २०१३ ची गोष्ट. नोव्हेंबरची थंडी. प्रमुख पाहुणा आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती. चर्चेअंती पॅडी अर्थात पंढरीनाथ कांबळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आणण्याचे निश्चित झाले. त्यांच्याशी अनेकदा बोलणे झाले. विद्यापीठाची कार्यपद्धती, येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी, या सर्व गोष्टींची कल्पना अभिनेते कांबळे यांना देण्यात आली. यावर पॅडीने क्षणाचाही विलंब न लावता प्रमुख पाहुणे म्हणून येण्यास संमती दर्शविली.
ठरल्याप्रमाणे आपले मुंबईतील शूटिंग आटपून रात्री बारा वाजता नाशिक गाठले. रात्री उशीर झाल्यामुळे मलाही पॅडीला घेऊन, स्वतः विद्यापीठात राहण्यासाठी यावे लागले. नाशिकमध्ये राहून अतिथींना घेऊन तिथे स्वतः राहण्याची, माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ होती. अनुभव खूपच आनंददायी होता. मंद गारवा, बोचरा वारा, पानांची सळसळ आणि शुद्ध हवा…. एक अविस्मरणीय अनुभव घेतला.
सकाळी आटोपल्यानंतर पॅडीने कुठलाही बडेजाव न मिरवता विद्यापीठाच्या परिसराला भेटी दिल्या. तिथल्या निसर्गाचा आनंद लुटला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुलांशी मोठ्या आपुलकीने संवाद साधला. सेल्फी दिल्या. अतिशय कष्टातून, सामान्य परिस्थितीतून अभिनय क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून स्वतंत्र ठसा उमटिणाऱ्या पॅडीने सर्वांच्याच हृदयात घर केलं होतं.
मी आजवर अनेक केंद्रीय युवक महोत्सवासाठी, अनेक अभिनेत्यांना आणलं, मात्र यात पॅडी कांबळे यांनी दिलेला बंधुत्वाचा, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह आणि विद्यापीठाच्या प्रेमाचा नम्रपणे स्वीकार करत, सर्वांच्याच हृदयाला स्पर्श करून गेला. दुपारच्या सत्रामध्ये मुलांबरोबरच जेवणाचा आस्वाद घेऊन हा अवलिया मुंबईच्या दिशेने रवाना झाला. पॅडीने मुलांना केलेले मार्गदर्शन अनमोल असेच ठरले. तो म्हणाला होता, “क्षेत्र कोणतेही निवडा त्यात, यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. अभिनय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अभिनयात तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही किती कसदार अभिनय करता याची पारख आधी होत असते. तुम्ही तुमच्या कामातून प्रतिबिंबित व्हा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा, तसेच आपले काम पाहून दुसऱ्याला हुरूप आला पाहिजे”.
मी लहानपणी चुटकुले सांगायचो, किस्से रंगवून सांगायचो ही माझी आवड, माझा छंदच माझे करिअर झाले. परंतु ते करताना मेहनतही खूप घेतली. निरीक्षण शक्ती सक्षम करून अभिनय जिवंत करण्याचा प्रयत्न मी आजही करत आहे. आज मला मिळालेले यश हे प्रेक्षकांनी दिलेल्या कौतुकाची पावती आहे. त्यामुळे या समाजाला माझे देणे आहे हे कायम मनात ठेवून काम करत राहतो. प्रसिद्धी, पैसा या आकर्षणांना भुलून अभिनय क्षेत्रात येऊ नका. असा अतिशय महत्त्वाचा संदेश त्याने त्यावेळी दिला होता.
एखाद्या सेलिब्रिटीला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवायचं ठरलं की, त्याचा बडेजाव, नाटकं, मागेपुढे करणे, जीजी करणे, असेच हवे, तसेच हवे अशा नानाविध प्रकारच्या अटी लादल्या जातात. मात्र या सर्वांना तिलांजली देत, अतिशय साधेपणाने आपुलकीच्या भावनेतून पॅडी कांबळे याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात येऊन या युवक महोत्सवाची शान वाढवली याचा मला अभिमान वाटतो. जमिनीवर राहून रसिकांवर, माणसांवर प्रेम करणाऱ्या आणि ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ याचीच प्रचिती पॅडीने दिली. अशा चतुरस्र अभिनेत्याच्या माणुसकीला खरोखरंच सलाम….!