निरंतर शिक्षणाचा ज्ञानदीप : (कै.) डॉ. आर. कृष्णकुमार
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वाटचालीमध्ये संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले, डॉ. उत्तमराव भोईटे, प्राचार्य अशोक प्रधान, डॉ. बी. पी. साबळे, डॉ. राजन वेळूकर, डॉ. आर. कृष्णकुमार, डॉ. माणिकराव साळुंखे आणि विद्यमान कुलगुरू प्राध्यापक वायुनंदन यांसारख्या ज्ञानतपस्वी कुलगुरूंचा लाभलेला कार्यकाळ विद्यापीठाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरला आणि ठरतो आहे. ज्ञानाची कवाडे समाजासाठी खुली करतानाच ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यासाठी या कुलगुरूंनी घेतलेले त्या त्या वेळेचे निर्णय निश्चितच अधोरेखित करणारे असे आहेत. मात्र, यात विशेषत: अल्पसंख्यांक समाजासाठी शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगळं काम केलं ते दिवंगत कुलगुरू डॉ. आर कृष्णकुमार यांनी.
एक उत्तम प्रशासक, शिस्तप्रिय, समाजाच्या विकासासाठी असलेली दूरदृष्टी, तळागाळातील माणसांचा केलेला विचार, काम करण्याची पद्धत, प्रचंड इच्छाशक्ती, अनेकदा रात्री १० वाजेपर्यंत कार्यालयातील कामकाज आणि सातत्याने नाविन्याचा वेध घेणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर आर. कृष्णकुमार. त्यांच्यासोबत जवळून काम केल्याने एक वेगळाच अनुभव आला. शिवाय अनेक गोष्टी शिकायलाही मिळाल्या.
डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या अथक प्रयत्नांतून मालेगाव येथील हजारो यंत्रमाग कामगारांसाठी ज्ञानाची कवाडे खुली झाली. त्यांच्याच अथक प्रयत्नांतून यशवंतराव चव्हाण मालक कामगार युनियनची स्थापना होवून कामगारांच्या जीवनात प्रकाशाची बीजे पेरली गेली आणि सुमारे पाच हजारांहून अधिक कामगारांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
त्यांच्या अथक प्रयत्नांतून आणि सहकार्याने येथील हजारो कामगारांना शिक्षणाचीद्वारे खुली झाली आणि याच प्रयत्नांतून यशवंतराव चव्हाण मालक कामगार युनियनची स्थापना होवून कामगारांच्या जीवनात प्रकाशाची बीजे पेरली गेली. यंत्रमाग क्षेत्रात महाराष्ट्रात सुमारे दोन लाखांहून अधिक कारागीर काम करीत आहेत. प्रामुख्याने मालेगाव, भिवंडी, मुंब्रा, अमरावती, कामठी आणि इचलकरंजी या गावामध्ये केंद्रीत झालेले आहेत. या कारागिरांची शैक्षणिक पात्रता कमी असून बहुतेकांनी शालांत परीक्षांही उत्तीर्ण केलेली नाही. मात्र पिढ्यानपिढ्या या क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांच्याकडे कामाची कौशल्ये विकसित झालेली आहेत.
समाजाने किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेने त्यांच्या या कौशल्याला मान्यता दिलेली नसल्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही प्रमाणपत्रे नाहीत. त्यामुळे त्यांना अतिशय अल्प वेतनावर काम करावे लागते. यामुळे ना पुढील शिक्षण घेता येते ना कोणत्या बँकेतून कर्ज मिळत. या सर्व परिस्थितीचा विचार करून डॉ. आर. कृष्णकुमार यांनी समाजातील या वंचित घटकांच्या कौशल्यांची नोंद घेऊन त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत बजावली आहे. यंत्रमाग संचालन तंत्रकौशल्य मुल्यांकन कार्यक्रम हा भारतातील एकमेव वेगळ्या प्रकारचा उपक्रम असून यंत्रमाग कारागिरांना अवगत असलेले ज्ञान व त्यांच्या अनुभवाच्या आधारे मुल्यांकन प्रमाणपत्र वाटपाद्वारे त्यांच्या ज्ञानाला प्रमाणित करण्याचा स्तुस्त्य उपक्रम सुरु केला होता.
दिवसातील १२-१२ तास घाम गाळणाऱ्या कामगारांना आर्थिक मोबदला अत्यंत कमी मिळत असल्याने कामगारांना स्वतःचा, तसेच आपल्या कुटुंबाचा विकास साधता येणे कठीण झाले होते. अनेकांना इच्छा असूनही केवळ पैसे नसल्या कारणाने शिक्षण घेता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या जीवनातील अंधःकार दूर करण्यासाठी मुक्त विद्यापीठाने टाकलेले पाऊल यंत्रमाग कामगारांच्या विचारांना दिशा आणि प्रेरणा देणारे ठरला.
येथील कामगारांत मोठ्या क्षमता असून केवळ शिक्षणापासून ते वंचित राहिल्याने त्यांना जीवनातील प्रगती साध्य करता आली नाही. या वर्गासाठी मुक्त विद्यापीठाने शिक्षणाचे पंख देऊन त्यांना आकाशात उडण्याची संधी दिली. कामगारांनीही या संधीचे सोने करून दाखविले. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी १३०० तर १० जानेवारी २०१४ रोजी ३२०० कारागिरांना तंत्रकौशल्य मुल्यांकन प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम घेऊन कौशल्य प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पंधरा वर्षांपासून तर ८० वर्षीय वयापर्यंतचे १३०० यंत्रमाग कामगार एखाद्या विद्यापीठात एका दिवशी प्रवेश घेतात ही बाब केवळ राज्यापुरतीच नव्हे तर जागतिक स्तरावर इतिहास नोंदविणारी ठरली. यंत्रमाग कामगारांना हा सोनेरी क्षण अनुभवत एक महत्त्वाचा दुवा ठरला तो म्हणजे मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अतिक भाई शेख यांच्या रूपाने.
मालेगाव येथे यंत्रमाग कामगारांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात कुलगुरू डॉ. कृष्णकुमार यांनी या कामगारांच्या शैक्षणिक विकासासाठी उचललेले पाऊल वाखाणण्याजोगे ठरले. या पार्श्वभूमीवर बोलताना तेथील मौलवीने काढलेले उदगार आजही मला आठवतात ते कुलगुरूंना म्हणाले होते.‘कल आप इस दुनिया में रहेंगे या ना रहेंगे, आप हमेशा हमारे दिल मे रहेंगे, आपका काम अमर रहेगा’. आणि या कार्यक्रमानंतर काही दिवसांतच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मौलवी ते शब्द अंगावर शहारे आणणारे ठरले.
ज्ञान मिळविणारे सक्षम तर ज्ञान मिळविण्याची क्षमता नसलेले वंचित राहणार असल्याने भविष्यात शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा मूलमंत्र देणारे डॉ. आर. कृष्णकुमार यांचे २१ जानेवारी २०१४ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. वंचितांच्या भविष्यरेषा प्रकाशमान करणारे एक दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. मात्र येथील कामगारांच्या हृदयात ते आजही घर करून आहेत. डॉ. कृष्णकुमार यांच्या आठवणीने प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावून जातात.
निश्चयाचा महामेरू तुम्ही, वंचित घटकांचा आधार,
प्रवाहित झाली ज्ञानगंगोत्री, सरला युगा-युगांचा आधार …!
स्वतंत्र वृत्ती, विधायक प्रवृत्ती, केली खुली ज्ञानाची कवाडे,
कर्तृत्वाची मशाल घेऊन, जोडले मानवतेशी नाते….!
संयमाच्या संस्कृतीचा ज्ञानदीप, हृदयी अखंड तेवत ठेविला,
‘यश विद्येचे’ रोप कालचे, तोचि आज ज्ञानवृक्ष जाहला …!
डॉ. आर. कृष्णकुमार यांनी आपले अवघे आयुष्यच शिक्षणक्षेत्रासाठी वेचले. कायम विद्यापीठाचे हित जपणे हेच ध्येय समोर ठेवून काम केले. स्वतः पलीकडे जाऊन सातत्याने दुसऱ्यांचा विचार करणारे मेरुमणी एक प्रकारे लोकाचार्य झाले. आपण शिक्षक आहोत याची त्यांनी कायम जाणीव ठेवली. चांगुलपणाचे संतुलन कसे राखावे याचा समतोल राखण्यात डॉ. कृष्णकुमार अग्रेसर होते. समाजातील विशेष वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले. कौशल्याधिष्टित शिक्षणक्रम सुरू करण्यासाठी आग्रही असणारे डॉ. कृष्णकुमार यांच्या कर्तृत्वामुळे मुक्त विद्यापीठाची क्षितीजे निश्चितच रुंदावली आहेत.
४ मार्च २०१० रोजी कुलगुरु पदाचा स्वीकारलेल्या यांनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात व्यवसायाभिमुख शिक्षणक्रमांना प्राधान्य दिले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी अनेक अभिनव शिक्षणक्रम सुरू करण्यात आलेत. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निरंतर शिक्षण विद्याशाखेमार्फत या शैक्षणिक वर्षापासून ‘जल व्यवस्थापन’ प्रमाणपत्र शिक्षणक्रम, विद्यापीठाच्या आरोग्य विद्याशाखेमार्फत फार्मास्युटिकल कंपन्यांना उपयुक्त असे १०० टक्के नोकरीची हमी देण्यासाठी सिपला कंपनीशी करार करून ‘डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सायन्स’, तर वोक्हार्टसोबत करार करून ‘डिप्लोमा इन फार्मा मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅकेजिंग’ शिक्षणक्रम, बी.एड. विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम नव्याने सुरू करण्यात आले आहेत. याबरोबरच रिक्षा, टॅक्सीचालक हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले असल्याने त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून उच्च शिक्षण देऊन समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी बी.ए. (रोड ट्रान्सपोर्टेशन), शिर्डी संस्थान कर्मचाऱ्यांसाठी बी.ए. (मंदिर व्यवस्थापन), उद्योग जगताच्या आधुनिक गरजांसाठी सायबर सिक्युरिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, प्रॉडक्शन आणि ऑपरेशन मॅनेजमेंट, मुंबई डबेवाले, लष्करी जवानांसाठी पूर्वतयारी आणि बी.ए., यंत्रमाग कामगार व चर्मकार बांधवांच्या कौशल्याला समाजमान्यता देण्यासाठी विशेष प्रयत्न, घरोघरी गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बी.ए. ग्राहकसेवा, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी बी.ए. (पोलीस अॅडमिनीस्ट्रेशन) आणि एम.बी.ए. (पब्लिक पॉलिसी अँड मॅनेजमेंट), नेव्हल डॉकयार्ड कर्मचाऱ्यांसाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका, सलून व्यवसाय पदविका, बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग्ज सायन्स) आणि एम.पी.एस.सी. / यू.पी.एस.सी.च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या दृष्टीने बी.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) व एम.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) असे विविध शिक्षणक्रम नव्याने विकसित करून सुरू केले. विशेष म्हणजे अनेक शिक्षणक्रम मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांतूनही उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनादेखील सीए फर्मच्या साहाय्याने ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत नवा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी डॉ. कृष्णकुमार यांची भूमिका महत्वाची ठरली.
‘करिअर ३६०’ चा मिळाला सन्मान
देशभरातील १९८ विद्यापीठे आणि दूरशिक्षण संस्थांचे सर्वेक्षण ‘करिअर ३६०’ मासिकाच्या वतीने करण्यात आले. देशात राज्य पातळीवर काम करणाऱ्या सर्व मुक्त शिक्षण संस्थांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास सन २०१० पासून २०१३ पर्यंत सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाचे स्थान टिकवून ठेवण्यात डॉ. कृष्णकुमार यांना यश मिळाले.
विद्यार्थांना त्यांच्या गरजेनुसार पूरक ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी ‘यशवाणी वेब रेडीओ’ सुरु करून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर केला. याबरोबरच ग्रामीण आदिवासी भागातील लोकांना आरोग्यविषयक प्राथमिक ज्ञान, वाचन-लिखाणाचे धडे देण्याबरोबरच शेतीविषयक माहिती मिळावी या उद्देशाने डॉ. कृष्णकुमार यांनी पुढाकार घेऊन ‘यश निर्माण’ प्रकल्पांतर्गत आदिवासी भागातील बोंबिलटेक, सावरगाव, लाडची, चिंतामणवाडी ही चार खेडे दत्तक घेतली आणि येथील गावकऱ्यांना साक्षर करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल व बदलत्या काळाशी ते सहजपणे जुळवून घेऊ शकतील या दृष्टिकोनातून त्यांनी मोलाचे योगदान दिले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विद्यापीठाच्या कामकाजातही व्हावा यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.
नाशिक जिल्ह्यातील बराचसा आदिवासी भाग हा पूर्णपणे दुर्लक्षित आहे. परंतु तिथल्या युवकांना शिकण्याची इच्छा असूनही भौतिक सुविधांमुळे ते जैसे थे च राहतात. अशा युवकांसाठी डॉ. कृष्णकुमार यांनी ‘यश स्वावलंबन योजना’ आखली. ज्यांचे शिक्षण दहावी, बारावीपर्यंतच झाले आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था विद्यापीठातच करून त्यांना कृषीशी संलग्न शिक्षण दिले जात होते. त्यांना विशिष्ट मानधनही देण्यात आले. ज्यातील काही हिस्सा थेट बँकेत जमा होत असत. या उपक्रमा अंतर्गत आदिवासी भागातील ३२ मुलांना इथे शिक्षण देण्यात आले. शहरी व ग्रामीण भागातील अल्पसंख्याकांच्या समुदायातील तरुणांमध्ये कौशल्य आहे, परंतु शिक्षणाअभावी त्यांचा विकास होत नाही, अशा वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्तर उंचवण्यासाठी विद्यापीठ कौशल्याधिष्टित शिक्षणक्रम लवकरच सुरू करण्याचा त्यांचा मनोदय होता.
चर्मकार, नाभिक, वृत्तपत्र विक्रेते, घरकामगार महिला, अंध-अपंग विद्यार्थी आदींना समाजात प्रतिष्ठा मिळावी, शिक्षणाद्वारे त्यांचा आर्थिकस्तर उंचावा म्हणून ते रात्रंदिवस झटले. अतिशय शिस्तबद्ध, सचोटीने काम करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलीय. केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर, कौशल्याधिष्ठीत शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. स्वातंत्र्यानंतर हातमाग कामगारांना खरा सन्मान जर कोणी दिला असेल तर तो मुक्त विद्यापीठाद्वारे डॉ. कृष्णकुमार यांनी. त्यांच्या क्षेत्रात तर ते उत्तमच होते, परंतु इतर क्षेत्राचीही बारकाईने माहिती करून घेण्यास नेहमी उत्सुक असणारे, एक उत्तम प्रशासक, तळागाळातील समाजाप्रती विस्तारवादी दृष्टीकोन वेगळे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणार नाही हे निश्चित.
समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून राष्ट्र बळकट करण्याचे स्वप्न पाहिलेल्या डॉ. कृष्णकुमार यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि प्रशासनातील काम दीपस्तंभाप्रमाणे होते. आज ते हयात नसले तरी त्यांनी बघितलेल्या सशक्त ज्ञानगंगोत्रीचे स्वप्न पुढे नेण्यासाठी विद्यापीठातील प्रत्येक घटक यापुढेही कटीबद्ध राहील यात शंका नाही.