स्वच्छता कर्मचाऱ्याचा परदेश दौरा
आपल्या वाट्याला आलेली कोणतीही परिस्थिती इतकी वाईट नसते की, जी आपल्या इच्छाशक्तीला दडपून टाकू शकेल. सकारात्मक दृष्टीकोन, योग्य दिशेने प्रयत्न आणि नवी स्वप्न पाहून ती सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करण्याची त्रिसूत्री अवलंबली तर काहीच अशक्य नसल्याचे उदाहरण मुंबई महापालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याने दिले आहे. मुंबई पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका तरूणाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षण घेताना उच्च शिक्षणासाठी थेट दक्षिण अफ्रिका गाठली आहे.
माणसांचा समुद्र म्हणून तुलना केल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये आजमितीस असंख्य स्वच्छता कामगार योगदान देतात. त्यांच्या अविरत परिश्रम आणि मेहनतीमुळे माणसांचा सागर असणारे हे शहर राहण्या योग्य बनते. पण आपल्यातील सुप्त क्षमतांची जाणीव अनेकदा या कर्मचाऱ्यांना अजिबात नसते. पण सुनील यादव नामक मुंबई महापालिकेचा स्वच्छता कर्मचारी याला काही वर्षांसाठी अपवाद ठरला.
वडिलांच्या मृत्यूपश्चात मुंबईसारख्या सागरात आता उर्वरीत कुटुंबाची गुजराण कशी करायची, असा यक्षप्रश्न सुनील यादव यांच्यासमोरदेखील उभा होता. सफाई कर्मचारी म्हणून मुंबई पालिकेत सेवा देणाऱ्या वडिलांच्या जागी नोकरीस लागण्यासाठी त्याने धडपड सुरू केली. अनुकंपा तत्वावर त्याला नोकरीत सामावून घेतले गेले तरीही त्याचे शिक्षणावरील प्रेम कायम होते. सफाईच्या कामातील मर्यादा ठावूक असल्याने उच्च शिक्षण घेऊन आणखी काही वेगळे बनण्याचे स्वप्न सुनील यांना स्वस्थ बसू देत नव्हते. याच भावनेतून त्याने नोकरीला लागल्यानंतर दहावीचे राहिलेले विषय देऊन महत्त्वाचा टप्पा ओलांडला. यानंतर कालांतराने त्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्या शैक्षणिक स्वप्नास नवीन मोहोर फुटला. केवळ पदवीवर न थांबता त्यांनी पदव्युत्तर शिक्षणास प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी काही दिवसांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेत प्रवेश घेऊन हुशारीची चुणूक दाखविली. परिस्थिततीनुरूप सुनील यांनी त्यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्याचे काम स्वीकारले असले तरीही आपल्यातील विद्यार्थ्याला त्यांनी कायम जागते ठेवले होते. याच्याच परिणामी एम.फिल, बी.कॉम, बीए (जर्नालिझम), डीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू , एम.ए.(ग्लोबलायझेशन ॲण्ड लेबर) इथवरचे शिक्षणदेखील पूर्ण केले आहे. मुंबईत हक्काचे घर नसताना पालिकेतील नोकरीच्या बळावर ते भाडेतत्वावरील घरात राहीले. पालिकेतील नोकरीतून प्रपंच चालणे कठीण असतानाच्या काळात त्यांनी भाषांतराची अतिरीक्त कामे स्विकारत पत्नीलाही शिक्षणाची प्रेरणा दिली. पत्नीलाही उच्च शिक्षणाची प्रेरणा देत कायद्याचे शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली.
या जिद्दीच्या बळावर त्यांची निवड ‘स्टुडंट एक्सचेंज’ कार्यक्रमांतर्गत दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यासाठी झाली. त्या देशात जाऊन तेथील खासगी सुरक्षा रक्षकांच्या कार्यपध्दतीचा तुलनात्मक अभ्यास सुनील तीन महिन्यांसाठी करणार होते. मात्र , एक सफाई कर्मचारी मोठ्या शैक्षणिक दौऱ्यासाठी परदेशदौरा करण्याची ही मुंबई महापालिकेच्या इतिहासातील कदाचित पहिलीच वेळ असावी. अफ्रिकेतील निवासाचा कालावधी मोठा असल्याकारणाने त्याने रजेसाठी महापालिकेकडे अर्ज केला. पण हा कालावधी असल्याने त्याच्या वाट्याला अखेर नकारच आला. रजेसाठी हा नकार आल्यानंतर एका हाती उपजिवीकेचे साधन तर दुसऱ्या हाती मोठे स्वप्न अशी स्थिती सुनिल यांची होती. या स्थितीने हतबल झाल्यानंतर या स्वप्नावर पाणी फेरले जाण्याची स्थिती नक्कीच ओढावली होती. यामुळे या काळात सुनिल यांची नाराजीही मोठी वाढली होती. पण चमत्कार घडावा तशी पुढील सुत्रे हालत गेली ती थेट केंद्र सरकारकडून.
मुंबई महापालिकेतील एक सफाई कर्मचारी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न बघतो आहे आणि त्याला बीएमसीकडून मात्र रजेच्या कारणाहून या स्वप्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचे वृत्त त्यावेळी एका इंग्रजी दैनिकात प्रकाशित झाले. विशेष म्हणजे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यालयाने या कहाणीची दखल घेत सुनीलपर्यंत केंद्रातील प्रशासन पोहचले. पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतल्यानंतरही मुंबई महापालिकेचे प्रशासनदेखील खडबडून जागे झाले अन् मुंबईत सफाई कामगाराचे काम करणाऱ्या सुनील यांच्या विमानाने दक्षिण अफ्रिकेच्या दिशेने झेप घेतली. यानंतरही पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न यादव यांनी पाहिले. सुनील यांच्या या कामगिरीपासून प्रेरित होऊन नंतरच्या टप्प्यात अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
आयुष्यात अनेकदा प्रतिकूल परिस्थिती उभी ठाकते. पण जिद्दीने लढत राहणे गरजेचे असते. तळागाळातील स्तरावर काम करताना शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षणातून तुमच्या आयुष्यात नक्कीच परिवर्तन होऊ शकते. मोठी स्वप्ने बघा, ती पूर्ण करण्यासाठी चांगले प्रयत्न करा , शिक्षण कधीही अर्ध्यांवर सोडू नका, असे यादव आवर्जून सांगतात.