सत्यासाठी खर्चले एक तप!
‘सत्याचा पाठपुरावा करण्याची वाट कितीही खडतर असली तरीही या वाटेचा अंत निराशेने होत नाही,’ असा आशावादी संदेश नागपूरच्या एका प्राध्यापकाच्या तब्बल तपभर चाललेल्या लढ्याने दिला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पीएच.डी.साठी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाकडे पाठपुरावा करणाऱ्या प्रा. धनंजय कदम यांना या परवानगीसाठी लढा उभारावा लागला आहे. अखेरीला त्यांच्या मांडणीतील सत्य स्वीकारुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने मुक्त विद्यापीठाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम समकक्ष असल्याचे मान्य केले, हेच या लढ्याचे फलित म्हणावे लागेल.
जून १९९९ महिन्यात नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण पारंगत हा अभ्यासक्रम प्रा.धनंजय कदम यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणाचा आणखी एक मार्ग गवसल्याचा आनंद त्यांना झाला. अन् या टप्प्यानंतर सध्याच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज म्हणजे तत्कालीन नागपूर विद्यापीठात पीएच.डी.च्या परवानगीसाठी प्रा. कदम यांनी अर्ज केला. बुध्दीचा कस लावून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता पीएच.डी.च्या माध्यमातून संशोधन कार्याला सुरुवात कशी करता येईल, याचे नियोजन प्रा. धनंजय करीत होते. यादृष्टीने संशोधनाची दिशा ठरविण्यासाठी काही संदर्भांचे संकलनही त्यांनी सुरु केले होते. मुक्त विद्यापीठामुळे मनात नवा आशावाद पेरला गेला असताना एक दिवस तत्कालीन नागपूर विद्यापीठाचे पीएच.डी.परवानगीबाबतचे एक पत्र येऊन धडकले. उत्साही मनाने या पत्रावरील ओळींवरुन त्यांची नजर फिरु लागली अन् जिथे आशावादाने मुळं रुजवावीत तिथेच निराशावादाची पायाभरणी झाली अन् ‘आपली पदवी आमच्या विद्यापीठाशी समकक्ष नाही,’ अशा उत्तराने प्रा.धनंजय यांना धक्का बसला.
नागपूर विद्यापीठाचा हा निर्णय मान्य नव्हता. परिणामी मी त्या विद्यापीठातील तत्कालीन संचालकांशी पत्रव्यवहार करीत माझी व्यथा मांडली. पण् आठवडाभरातच मला आलेल्या त्यांच्या उत्तरात समकक्षतेच्या कागदपत्रांसह त्यांनी उत्तर कळविले होते. हे उत्तरही माझ्यासारख्या पीएच.डी.साठी इच्छुक अनेक विद्यार्थ्यांसाठी नकारात्मकच होते.
याच कागदपत्रांचा संदर्भ घेत प्रा.धनंजय यांनी नागपूर विद्यापीठाकडे पाठपुरावा सुरु ठेवला. दरम्यानच्या काळात विद्यापीठीय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरील त्यांचा विश्वास डळमळीत होऊ लागल्याने त्यांनी शासनाकडेही दाद मागण्याचे ठरविले अन् सरकार दरबारी त्यांच्या खेट्या अन् पत्रव्यवहारांना सुरुवात झाली. या प्रवासात त्यांची थोडी थोडकी नव्हे तर तब्बल सात वर्षे बरबाद झाली. अखेरीला संशोधनाच्या उत्साहावर पाणी फेरले जाऊ नये यासाठी प्रा.धनंजय यांनी मुक्त विद्यापीठातून शिक्षण संप्रेषण या विषयाला पीएच.डी. ला सुरुवात केली. तत्कालीन प्रशासनाकडेही त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. दरम्यानच्या कालावधीत दोन सादरीकरण झाले. या कालावधीत प्रशासनातील अनेक पदांवर वेळोवेळी बदल होत गेले पण पदवीच्या समकक्षतेबाबतचा त्यांचा मुद्दा ‘जैसे थे’ च राहीला होता.
सन् १९९९ मध्ये सुरु झालेल्या त्यांच्या पदवी समकक्षतेसाठीच्या चिवट लढ्याला आता दशक पूर्ण झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विकास सकपाळ हे विराजमान झाले होते. विद्यापीठीय प्रणालीवरचा प्रा.कदम यांचा विश्वास डळमळीत होत असला तरीही विद्यापीठाच्या नव्या नेत्वृत्वाने त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या होत्या. दशकभरापासूनच्या मागणीचे इतिवृत्त प्रा.कदम यांनी तत्कालीन कुलगुरु सकपाळ यांच्यासमोर प्रभावीपणे मांडले. त्यांच्या प्रतिसादाने प्रा.कदम यांच्या मनातील आशावाद जागृत झाला अन् माझ्या प्रयत्नांनी पुन्हा उभारी धरली. मात्र, प्रशासकीय अडसरामुळे हा लढा पुढे सरकत नव्हता.
या स्थितीने कुणीही निराश व्हावे, असाच हा टप्पा होता. लढा थांबविण्याचा विचारही अनेकदा प्रा.कदम यांच्या मनात डोकावत होता. कुटूंब अन् हितचिंतकांनाही त्यांचा हा लढा फलदायी होण्याची जराही आशा वाटत नव्हती. निर्ढावलेल्या व्यवस्थेविषयीचे त्यांचे मत पक्के होते. मात्र, या मताला अपवाद होते ते फक्त प्रा.धनंजय कदम. कारण, हा लढा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता. तर, मुक्त विद्यापीठाच्या संघर्षशील प्रत्येक विद्यार्थ्याचे भवितव्य या लढ्याच्या फलश्रुतीत असल्याची जाणीव त्यांना बळ देऊन गेली.
…अन् मिळाली मान्यता !
लढ्याच्या पुढच्या टप्प्याला आणखी व्यापक स्वरुप देण्याचा चंग त्यांनी बांधला अन् प्रसिध्दीमाध्यमांची सकारात्मक साथ त्यांना मिळत गेली. अखेरच्या टप्प्यात मुंबईला कुलपती कार्यालयाकडे न्यायासाठी पाठपुरावा सुरु केला. सातत्याने होणारे पत्रव्यवहार, माहितीच्या अधिकाराचा उपयोग, कुलपतींशी वेळोवेळी चर्चा करुन वस्तुस्थिती त्यांच्या नजरेला आणून देण्याचे प्रयत्न हा चिकाटीचा मार्ग अखेरीला फळाला आला अन् कुलपतींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला तत्काळ समकक्षता देण्याबाबतच्या सूचना केल्या.
एका विद्यापीठातील पदवीच्या दुसऱ्या विद्यापीठातील समकक्षतेसाठीचा लढा एवढा किचकट असू शकतो, याची कल्पनाही वरवर कुणाला येणार नाही. मात्र, विद्यार्थी हितातून शिक्षणाचे हित अन् शिक्षण हितातून समाजाचे हित साधू पाहणारी अन् प्रयत्नांवर विश्वास ठेवणारी माणसे समाजासाठी प्रेरक ठरतात, असाच संदेश प्रा.धनंजयकदम यांची यशोगाथा देते, हे नाकारुन चालेल तरी कसे. त्यांच्या लढ्यामुळे मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळाला आहे, ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठीही अभिमानाची बाब आहे.