सावरपाडा एक्सप्रेस कविता
आदिवासी आणि दुर्गम भागातील एक मुलगी नाशकात येते आणि धावू लागते. पाहता पाहता ती सावरपाडा एक्सप्रेस म्हणूनही नावाजते. तिचा हा प्रवास खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. पण, या काळात तिचे शिक्षण थांबले नाही. य. च. म. मुक्त विद्यापीठाने ज्ञानगंगा तिच्यापर्यंत पोहचवली.
- संतोष साबळे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
महिला धावपटू म्हणून कविता राऊतचं करिअर सुरू झालं ते नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी सावरपाडा या छोट्याशा पाड्यातून. शालेय शिक्षणाच्या टप्प्यानंतर खेळातलं करिअर आणि शिक्षणाची सांगड कशी घालायची असा प्रश्न कविता समोर उभा ठाकला होता. मात्र, नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळं हा प्रश्न सुटला. क्रीडा क्षेत्रात करिअर करतानाच मुक्त शिक्षण सुरु ठेवण्यास तिला मोठी मदत झाली. अॅथलेटिक्समध्ये करिअर करण्याची खूणगाठ मनाशी बांधल्यानं कवितानं जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलं. तिच्या या प्रवासात मुक्त विद्यापीठाचा सिंहाचा वाटा आहे. या विद्यापीठातील शिक्षणामुळेच तिला बी.ए.चे पदवी शिक्षण घेतानाच जास्तीत जास्त वेळ धावण्याच्या सरावास देता आला. यामुळे क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी तिला मोठी मदत झाली.
हरसूलसारख्या आदिवासी, डोंगरदऱ्यांनी वाढलेल्या सावरपाडासारख्या लहानश्या खेड्यात तिचं बालपण गेलं. जिथं पायी चालणं कठीण तिथं गाडी जाण्याच्या प्रश्नच उदभवत नाही. अशा कठीण ठिकाणी पाऊलवाटेने दुर्गम वाटा तुडवत पिण्याच्या पाण्यासाठी ती मैलोन्मैल भटकंती करायची. पायात ना चप्पल, ना बूट. अशा परिस्थितीत सापडेल ती वाट तुडवत ती धावू लागली. यातच तिला दिशा गवसली आणि आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून सावरपाडा एक्सप्रेस अर्थात कविता राऊतचा उदय झाला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रोप्य आणि कास्य पदकांची कमाई करीत कविता राऊतनं भारताचं नाव उंच शिखरावर नेलं. तिनं केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे २०११ मध्ये भव्य स्वागत समारंभ आयोजित करून, तिचा यथोचित सन्मान केला. क्रीडा क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या कविताला खेळाबरोबरच शिक्षणही तितकंच महत्त्वाचं वाटलं. क्रीडा क्षेत्रात चांगले यश मिळविले तरीही, खेळाडूला उच्च स्थानावर जाण्यासाठी शैक्षणिक पातळी चांगले गाठणे अत्यंत आवश्यक असते. म्हणूनच शैक्षणिक पात्रतेलाही तिनं तेवढंच महत्त्व दिलं.
कविताला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळायला लागत असल्यानं तिचा खेळाचा सराव चालू असतानाच, तिला उच्चशिक्षण देण्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते देण्याचा निर्णय मी घेतला. सन २०१२ मध्ये दहावी शिकलेल्या कविताचा विद्यापीठाच्या पूर्वतयारी शिक्षण क्रमासाठी प्रवेश घेतला. तेव्हा विद्यापीठात नुकतेच नवीन अभ्यासकेंद्र सुरु करण्यात आलं होतं. विद्यापीठातील माझे मित्र चंद्रकांत पवार तेव्हा या अभ्यास केंद्राचे समन्वयक होते. या प्रवेशाच्यावेळी कविता लंडन ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी उटीला गेली होती. विद्यापीठाचा प्रवेश फार्म भरण्यासाठी तिला अडचण येत होती. हे लक्षात घेऊन मीच तो फॉर्म भरून अखेर तीचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं. तिचं पदवी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण होईपर्यंत ते सांभाळलं. नंतरच्या काळात ती निरनिराळ्या स्पर्धांच्या कचाट्यात सापडल्यानं, तिला अनेकदा विद्यापीठाची परीक्षा देणे शक्य झालं नाही. अर्थात यादरम्यान उटी-बंगळुरू येथेच तिचा मुक्काम असल्याने तिचे फार्म भरणे, प्रवेश शुल्क भरणे या सर्व गोष्टी पालक या नात्याने पूर्ण केल्या.
दरम्यानच्या काळात या विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदाची सूत्रे डॉ. दिनेश भोंडे यांच्याकडे होती. डॉ. भोंडे सरांना कविताबद्दल सर्व माहिती दिल्यानंतर सरांनीही कविता राऊतची ही अडचण लक्षात घेऊन, तिला जिथे सराव करत होती त्या ठिकाणाहूनच ऑन डिमांड परीक्षा देण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सरावासाठी असलेले वेळेचे बंधन यातून तिला ऑनलाईन परीक्षा देणेही कठीण झालं होतं. अशातच तिच्या पायाला गंभीर जखम झाली. अखेर लंडन ऑलिम्पिकचे कामगिरी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात परतल्यानंतर तिला परीक्षा देता आल्या. अनेकदा तर परीक्षा केंद्रापर्यंत तिचा नंबर शोधून तिला परीक्षेसाठी सोडवायला सुद्धा मी गेलो होतो. त्यातही मला आनंदच वाटला.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही तिनं उत्तम लढत दिली होती. एकंदर ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक विजेदर सिंग यांनी कविताचं क्रीडाविषयक पालकत्व स्वीकारून तिला उच्च स्थानावर पोहोचविले. तर तिचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारून तिला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची बी.ए. पदवी पूर्ण करून देण्याचं भाग्य मला लाभलं. विशेष म्हणजे तिचं व्यस्त शेड्यूल असल्यानं तिचं पदवी प्रमाणपत्रसुद्धा तिला माझ्या हातानंच बहाल केलं.
विद्यापीठाच्या स्थापनेस २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या तसेच समाजाचा विविध क्षेत्रात महत्त्वाचे स्थान भूषविणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची यशोगाथा लिहिण्याचं काम हाती घेतलं होतं. त्यात सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊतवर लेख लिहिला. २०१४ मध्ये विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या निवडक ५४ विद्यार्थ्यांची यशोगाथा लिहिलेलं पुस्तक यशोगाथा या नावाने मी संपादित केलं. २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यापीठाच्या सर्व माजी कुलगुरूंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
पुढे २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या यशोगाथा पुस्तकातील कविता राऊतच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या लेखाचा इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात समावेश केला. बालभारतीचे मराठी भाषा समितीतील सदस्य इरगोंडा पाटील यांनी यावेळी अनेकदा माझ्याशी संपर्क साधून कविताच्या जीवनाबद्दल, प्रवासाबद्दल माहिती जाणून घेतली. अखेर विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून २०१५ मध्ये बालभारतीच्या इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या धड्याचा सामावेश झाला. ही बाब विद्यापीठासाठी, माझ्यासाठी, कविता राऊतसाठी तसेच क्रीडा क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या कवितासारख्या लाखो मुलींसाठी अभिमानाची होती. कविता राऊतच्या पाठाचा बालभारतीच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्यानं, विद्यमान राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठास भेट दिली असता कविताचा आणि माझा यथोचित गौरव केला. हा सन्मान माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण असाच म्हणावा लागेल. महाराष्ट्रातल्या सुमारे २५ लाख विद्यार्थ्यांना हा धडा शिकविला जात असल्याचा आनंदही काही वेगळाच आहे. जो शब्दात मांडणं कठीण आहे.
कविता सध्या ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशनच्या (ओएनजीसी) मानव संसाधन विभागात सिनिअर एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे. कविताच्या ऑलिम्पिकमधील नेत्रदीपक कामगिरीची दखल राज्य शासनानं सुद्धा घेतलीय. २००८ मध्ये शिवछत्रपती पुरस्कारानं तर २९ ऑगस्ट २०१२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कानं तिला गौरविण्यात आलं होतं. कविताच्या जीवन प्रवासाची खरी नायिका ती स्वतःच आहे, असं मला वाटतं. असो, एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कविताचा जीवनप्रवास राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतोय. तिच्या या प्रवासात काही आनंदाचे क्षण मलाही लाभले याचाही मला मोठा अभिमान आहे.
(लेखकाशी संपर्क – 9403774694)
महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करणारी सावरपाडा एक्सप्रेस ला प्रसिध्दी दिल्या बद्दल गौतम संचेती यांचे अभी नंदन . तसेच अजूनही काही खेळाडू असतील तर त्यांचे बद्दल ही माहिती द्यावी. जेणे करून महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला त्यांचे पासुन प्रेरणा मिळेल.
कविता राऊत यांचा आदर्श घ्यायला हवा. संतोष सर धन्यवाद..