आज आपण खऱ्या अर्थाने भन्नाट अशाच एका स्टार्टअपची यशोगाथा जाणून घेणार आहोत. जुळ्या भावांनी देशाच्या विकासात योगदान द्यावं आणि मोठा उद्योग स्थापन करावा, असा हा यशोप्रवास आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्याविषयी आपण जाणून घेऊ या…
मुंबईत एका सुखवस्तू कुटुंबात गौरांग व देवांग ही जुळी मुलं १९८२ साली जन्माला आली. शहा कुटुंब तसे मुळचे व्यवसायिक. ऑइल व गॅस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सल्लागार म्हणून यांचे वडील कार्यरत असत. मुंबईतील एका चांगल्या शाळेमध्ये या दोन्ही मुलांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळालं. मुळातच हुशार असलेल्या दोघेजण याना स्कॉलरशिप वर हायस्कूलचे शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तिथे ही त्यांनी आपली हुशारी चांगलीच गाजवली व पुढे स्कॉलरशिप वरच अमेरिकेतील मूरे स्कूल ऑफ इंजीनियरिंग येथे अभियांत्रिकी साठी आणि नंतर व्हॉर्टन स्कूल ऑफ मॅनेजमेंट ला दोघांनाही प्रवेश मिळाले.
आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर त्यांनी अभियांत्रिकी व नंतर एमबीए मध्ये देखील विशेष प्राविण्य मिळवले. अतिउच्च प्रकारचे शिक्षण दोघांनीही घेतल्यानंतर गौरांग ला मॅकेन्झी अँड कंपनी मध्ये तर देवांगला डॉयचे बँकेत उत्तम प्रकारची नोकरी लागली. सर्व काही अगदी स्वप्नवत वाटावं इतका सुरळीत सुरू होतं. उत्तम पगार उत्तम पद सर्व सुख सुविधा या सगळ्याच्या मध्ये हे दोघं जुळे भावंड आनंदी तर होते पण समाधानी नव्हते. आपल्या देशांमध्ये जाऊन काहीतरी स्वतःच उभा करायचं ही सुप्त इच्छा दोघांच्याही मनात होती.
आणि याच इच्छेला जोड मिळाली ती घरच्यांच्या आग्रहाची. घरी सर्व काही सुखवस्तू असताना तुम्ही असं परदेशात जाऊन दुसऱ्या करता नोकरी करावी हे काही घरच्यांना पटत नव्हतं. म्हणूनच दोघांनीही आपापल्या नोकरीचा राजीनामा दिला व मायदेशी परतले. भारतात परत आल्यानंतर आपला पिढीजात व्यवसाय तो म्हणजे अनेक ऑइल व गॅस कंपन्यांना सल्लागार म्हणून सर्व प्रकारची मदत करायची व त्या बदल्यात योग्य तो मोबदला घ्यायचा.
गौरंग व देवांग दोघांनाही चांगल्या प्रकारचे शिक्षण प्राप्त झाल्यामुळे त्यांनी फार पटकन या व्यवसायाचा ताबा घेतला. अगदी सहजतेने त्यांनी अनेक गोष्टी हळूहळू बदलण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक कंपन्यांचा अभ्यास करताना त्यांच्या असं लक्षात आलं की, मटेरियल मध्ये मुख्यतः तीन प्रकारचे मटेरियल असतात. पहिली कॅटेगरी म्हणजे अति मौल्यवान मटेरियल की जे तुम्हाला सांभाळून वापरावे लागते व अतिशय गरज असेल तेव्हाच ते मागवावे लागते. बी प्रकारचे मटेरियल म्हणजे मध्यम किमतीचा व अधून-मधून लागणारे मटेरियल. व सी प्रकारचे मटेरियल म्हणजे सतत लागत राहणारे. परंतु त्याची किंमत अतिशय कमी असणारे.
सल्लागार म्हणून काम पाहत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक कंपनीमध्ये काम पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्याचं प्रमुख कारण म्हणजे मटेरियल सप्लायर कडून कंपनी पर्यंत मटेरियल वेळेत येत नाही. ह्यात जे सी प्रकारचे मटेरिअल आहे ते रोजच लागत असते. नट, स्क्रू, हात व पाय मोजे, केमिकल, कुलंट व सर्व गोष्टी ज्या उत्पादनाला पूरक व एकदाच लागणाऱ्या अशा वस्तू ह्या प्रकारात मोडतात. एकंदरीत या वस्तू कंपनीतील मशीनच्या मेन्टेनन्ससाठी किंवा रिपेअरींगसाठी लागत असतात.
हे मटेरिअल विकत घेण्यासाठी कंपन्यांना फार कष्ट पडतात कारण ह्या वस्तूंचे मोठे सप्लायर क्वचितच आहेत. त्यामुळे ह्या वस्तू मिळवण्यासाठी लहान-सहान दुकानदारांकडून या वस्तू घ्याव्या लागतात. पण त्यातही एक मोठी अडचण ही असते की प्रत्येक दुकानदाराकडे असलेला माल हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. सर्वच सी प्रकारातील वस्तू एकाच ठिकाणी मिळतील असं होत नाही आणि त्यामुळे कमी महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी देखील फार वेळ पैसा व यंत्रणा खर्च होते.
अनेक बड्या कंपन्यांच्या या गहन प्रश्नावर ती उत्तर शोधण्याचं या शहा भावंडांनी ठरवलं. आपण जर या सर्व मोठ्या उत्पादकांना लागणारे किरकोळ किंमतीच्या पण मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या मटेरियलचा एकत्रित सप्लाय एकाच ठिकाणी करू शकलो तर याने या कंपन्यांचा फार मोठा प्रश्न मार्गी लागू शकेल व यातून नक्कीच एक मोठा व्यवसाय उभा राहू शकेल. त्यादृष्टीने त्यांनी प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली. प्रथमतः त्यांनी सर्व बड्या कंपन्यांशी संपर्क साधला व या कॅटेगरीतील कुठले कुठले मटेरियल त्यांना लागत असतात याची एक मोठी यादी तयार केली. ही यादी हाती लागल्यानंतर आता ह्या वस्तू पुरवणारे कोण कोण सप्लायर आहेत त्या सर्वांचा तपास करण्यास त्यांनी सुरुवात केली. हे करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की या वस्तू बनवणाऱ्या मोठ्या कंपन्या क्वचितच आहेत किंबहुना घरगुती स्वरूपामध्ये किंवा लघुउद्योगांना मध्येच या सर्व वस्तू मोठ्या प्रमाणात बनवल्या जात आहेत.
आता अशा या सर्व प्रकारच्या उत्पादकांची व विक्रेत्यांची यादी त्यांनी तयार केली. त्यांची पुढील पायरी होती ती म्हणजे या सर्व उत्पादकांची स्वतः संपर्क साधणे. यासाठी त्यांनी मुंबई शहराची प्रथमतः निवड केली याचा प्रमुख कारण म्हणजे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हटली जाते व त्यामुळे बहुतांश कंपन्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसशी संपर्क साधण्यासाठी हे उपयुक्त ठरले.
मोठ्या कंपन्यांना लागणाऱ्या मालाची यादी त्यांचं प्रमाण तो माल तयार करणाऱ्या उत्पादकांची यादी व विक्रेत्यांची यादी या सगळ्या गोष्टीचा एक मोठा डेटाबेस त्यांच्याकडे तयार झाला. प्रत्येक लहान उत्पादकाची उत्पादन क्षमता यांनी जाणून घेतली होती. आता वेळ आली होती ती प्रत्यक्ष व्यवसाय करण्याची.
यासाठी २०१६ मध्ये त्यांनी स्वतःची बल्क एमआरओ नावाची कंपनी स्थापन केली. स्वतःला एमआरओ मटेरियल ऍग्रीगेटर म्हणून त्यांनी स्वतःची ओळख मोठ्या कंपन्यांना द्यायला सुरुवात केली. एमआरओ चा अर्थ मेंटेनन्स रिपेअर आणि ऑपरेशन असा होतो. म्हणजेच मेंटेनन्स साठी किंवा रिपेरिंग साठी किंवा दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या किरकोळ मालाचे विक्रेते.
सुरुवातीला काही जवळच्या कंपन्यांकडून त्यांनी या मालाची ऑर्डर स्वीकारली. आणि ही ऑर्डर किरकोळ विक्रेत्यांकडून व लघु उद्योजकांकडून पूर्ण करवून घेतली. लघु उद्योजकांना व विक्रेत्यांना मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे च्या मटेरियलची किंमत ही कमी आकारण्यात आली होती. व या सोबतच मोठ्या कंपन्यांना एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळणार त्यामुळे थोडी किंमत जास्त द्यायला देखील कंपन्या मागे पुढे पाहत नव्हत्या. खरेदी किंमत व विक्री किंमत यातील असलेली तफावत म्हणजे बल्क एमआरओ नफा होय.
मोठ्या कंपन्यांना सर्व किरकोळ माल एकाच ठिकाणी मिळण्याचे साधन म्हणून बल्क एम आर ओ नावारूपाला येऊ लागलं. मोठ्या कंपन्यांसाठी किरकोळ खरेदी चा मोठा प्रश्न या बल्क एमआरओ मुळे सोडवला जात आहे. आज बल्क एम आर ओ चे भारतात प्रमुख २५० कंपन्या ग्राहक असून ह्यासोबतच जागतिक ४० कंपन्या देखील ह्यांच्या कडुन खरेदी करत आहेत. लहान मोठे ५००० हून अधिक विक्रेते जोडले गेले असून आज तब्बल १५ लाखाहून अधिक वस्तूंचा पुरवठा बल्क एम आर ओ मार्फत होत आहे.
मोठ्या इंडस्ट्री मध्ये अतिशय कमी कालावधी मध्ये ही कंपनी फारच लोकप्रिय झाली आहे. आणि याचं प्रमुख कारण कारण म्हणजे कंपन्यांच्या ई आर पी शी यांनी यांचे सॉफ्टवेअर मिळवून घेतले आहे. त्यामुळे अगदी सहजरीत्या खरेदी वा विक्री केलेल्या मालाचे जी एस टी पॅड इंवोईस तयार करता येतात. आज या कंपनीचा विस्तार भारतासह 8 देशांमध्ये पसरला आहे. कंपनीला ९ गुंतवणूकदारांकडून ७२० कोटी रुपयांहून अधिक अशी गुंतवणूक प्राप्त झाली आहे. आपल्या पहिल्या व्यवहारा पासूनच फायद्यात असलेल्या या कंपनीची घोडदौड अतिशय वेगाने सुरू आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये दर वर्षी तिपटीने कंपनीची उलाढाल वाढत आहे. कंपनीचा बहूतांश व्यवसाय हा त्यांच्या ॲप व वेबसाईट वरूनच होत आहे. आज कंपनीकडे अडीचशेहून अधिक लोक कार्यरत असून त्यातील एकही व्यक्ती कंपनी सोडून गेलेला नाही हे विशेष.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!