इन्नर अवर्स
नैराश्य, तणाव, भीती, अस्थिरता, अस्वस्थता या आणि अशा अनेक लहान मोठ्या मानसिक व्याधींना आजच्या स्पर्धेच्या युगातील प्रत्येक व्यक्ती तोंड देत आहे. पण या सर्व गोष्टींना स्पर्धेच्या जगाचा एक अविभाज्य घटक समजून आज याकडे कानाडोळा केला जात आहे. भारतात तर या गोष्टींवर केवळ मित्रमंडळींबरोबर किंवा क्वचित प्रसंगी घरच्यांबरोबर चर्चा करणे हा एकमेव उपचार समजला जातोय. पण अशा सर्व प्रश्नांना व व्याधींना ऑनलाइन उपचार पद्धती उपलब्ध करुन देऊन त्यातून अनेक कोटी रुपयांचा व्यवसाय निर्माण केला आहे डॉक्टर अमित मलिक यांनी. जाणून घेऊ या त्यांच्या या भन्नाट सामाजिक स्टार्टअप बद्दल….
प्रगती व उत्कर्षाच्या दिशेने धाव घेत असताना आज मनुष्य आपल्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतोय. तर तिथे मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं तर दूरच राहिलं. सुमारे २० कोटी लोकसंख्या ही कुठल्या ना कुठल्या मानसिक व्याधीने त्रासलेली आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व लोक कुठल्याही प्रकारच्या मानसोपचार यापासून खूप दूर आहेत. दहा पैकी केवळ एका व्यक्तीला योग्य तो मानसोपचार सल्ला अथवा मार्गदर्शन प्राप्त होते. या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या आरामाच्या जिंदगीला सोडून देऊन चक्क समाजोपयोगी स्टार्टअप सुरू केली आहे डॉक्टर अमित मलिक यांनी.
दिल्लीमध्ये जन्माला आलेल्या आणि आपले शालेय शिक्षण दिल्लीतच पूर्ण केलेल्या अमित मलिक यांना भारतातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथून एमबीबीएस पदवी २००६ मध्ये संपादन करून दिल्लीतील एका समाजसेवी संस्थेसाठी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. इथे काम करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की कुठल्यातरी एका अवयवावर काम करण्यापेक्षा संपूर्ण मानवाच्या शरीरावर काम करायचं असेल व संपूर्ण शरीर सुदृढ करायचं असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीचे मन सुदृढ आणि स्वस्थ असणे गरजेचे आहे. म्हणून त्यांनी यापुढे सायकॅट्रिचा अभ्यास करण्याचे ठरवले.
उत्तम शिक्षण आपल्याला मिळावं म्हणून त्यांनी जगभरातील नामांकित सायकॅट्रिक महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज भरले आणि लवकरच त्यांचा नंबर नॉटिंगहॅम युके इथे लागला. २०१२ मध्ये सायकॅट्रिक व सायकोथेरपी यात पदव्युत्तर शिक्षण संपादन करून त्यांनी लंडनमध्येच आपली प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली. पाश्चिमात्य देशांमध्ये मानसोपचार याला फार महत्त्व दिले आहे. प्रत्येक शाळा महाविद्यालय व प्रत्येक औद्योगिक संस्थेमध्ये एक विशेष मानसोपचार विभाग असतो. ज्यात कंपनीत काम करणार्या प्रत्येक कामगाराला व शाळा व महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या मानसिक परिस्थितीवर आधारित असा योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे अमित मलिक यांना तिथे प्रॅक्टिस करण्यासाठी अनेक केसेस हाताळायला मिळाल्यात.
प्रॅक्टिस करत असताना त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. आपल्या समोर येणाऱ्या अनेक केसच्या आधारावर त्यांनी या विषयाशी संबंधित पुस्तके देखील प्रकाशित केली. आज इंग्लंड मध्ये अमित मित्तल यांची पुस्तकं अभ्यासक्रमात देखील शिकविले जातात. युरोपमधील काही बड्या कंपन्यांच्या सायकॅट्रिक बोर्डवर देखील अनेक पदक डॉक्टर अमित यांनी भूषवली आहेत. रॉयल कॉलेज ऑफ सायकॅट्रिक या महाविद्यालयात देखील त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. २०१४ मध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत असताना त्यांच्या बॉसने स्वतः येऊन माझ्या रिटायरमेंट नंतर माझे पद तू स्वीकारावे अशी ऑफर दिली पण आपल्या मायदेशी भारतात जाऊन भारतीय लोकांसाठी काहीतरी करावं या विचाराने प्रेरित होऊन डॉक्टर अमित यांनी ती ऑफर नाकारली. कारण जर ही ऑफर स्वीकारली असती तर पाच वर्षाची बांधिलकी त्यामध्ये राहणार होती.
पुढे डॉक्टर अमित भारतात आले. आणि भारतात सुरुवातीला एका इन्व्हेस्टमेंट बँक कंपनी मध्ये इन्शुरन्स विभागात त्यांनी नोकरी स्वीकारली. या नोकरीमुळे त्यांना भारतातील मेडिकल क्षेत्रामध्ये आपले नेटवर्क निर्माण करण्याची मोठी संधी मिळाली. अनेक सायकॅट्रिक, महाविद्यालये, अप्रेंटिस, इतर डॉक्टर्स या सर्वांशी त्यांचा चांगला परिचय झाला व या सगळ्याच्या जोरावर २०१६ साली त्यांनी आपली स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
“इनरअवर्स” नावाने डॉ अमित मलिक यांनी आपल्या कंपनीची स्थापना केली. कंपनी स्थापन करण्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ज्या प्रकारच्या मानसोपचार सेवा पाश्चात्त्य देशांमध्ये सहज उपलब्ध होतात तशाच प्रकारे उत्तम मानसोपचार सेवा भारतीय नागरिकांना देखील अतिशय सुलभपणे, सहजतेने व स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात. कंपनीच्या नावाकडे आपण जर बारकाईने बघितलं तर “इनर अवर्स” याचा अर्थ आहे आत मध्ये म्हणजे स्वतःशीच संवाद साधतांना घालवलेला एक तास. या नावाचा अर्थ आपल्याला तेव्हाच उलगडतो जेव्हा आपण या कंपनीचे कार्यप्रणाली पाहतो.
कंपनीने सुरवातीला १८ सायकॅट्रिस्टची टीम कंपनीशी जोडली. कंपनीने आपले स्वतःचे एक वेब पोर्टल व अँप डिझाईन करवून घेतले. या वेबसाईट वरून किंवा ॲप वरून भारतातील कुठलाही व्यक्ती केव्हाही आपले अकाउंट क्रिएट करू शकतो. कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही क्षणी जेव्हा असं वाटेल की मला कुठल्या तरी मानसिक मदतीची सल्ल्याची आवश्यकता आहे त्यांनी या ॲप वर यावं व योग्य ती सेवा योग्य सल्ला व मार्गदर्शन हवं तिथून आपल्या बजेट प्रमाणे सहज व त्वरीत मिळवावं.
एखादी व्यक्ती लॉगीन झाल्यानंतर त्या व्यक्तीला काही प्रमुख लक्षण विचारले जातात व त्या सोबत त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा व कामाच्या स्वरूपाचा व असलेल्या नातेसंबंधांचा अंदाज काही विशिष्ट प्रश्नांना द्वारे कम्प्यूटर मध्ये घेतला जातो. या प्रश्नांच्या उत्तरांचा आधारावर आलेली व्यक्ती नैराश्य उदासीनता भीती दडपण किंवा इतर कुठल्या मानसिक त्रासाने ग्रासलेली आहे याचा साधारण अंदाज लावून योग्य त्या मानसोपचार तज्ञ शी जोडणी करून दिले जाते.
साधारण एक तास त्या व्यक्तीचा कौन्सिलिंग व उपचार दिले जातात. त्या व्यक्तीच्या तासाचा नंतरच्या प्रतिक्रिया वर पुढील अपॉइंटमेंट ची आवश्यकता व तारीख ठरवली जाते. आज भारतात प्रत्येक १० मानसिक रोगींमागे केवळ एकाच व्यक्तीला योग्य तो उपचार व सल्ला मिळू शकतो. त्यास कारण अनेक असू शकतील पण तफावत कमी करण्यासाठी कधीही केव्हाही कोणालाही कुठूनही मानसोपचार व समुपदेशनाची सुविधा डॉक्टर मलिक यांच्या इनरअवर ह्या कंपनीमुळे उपलब्ध होत आहे.
या कंपनीचे सुविधा घेत असताना तुम्ही पैसे द्यायला हवेत असेही नाही. तुमची प्राथमिक तपासणी करून घेण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व बोट च्या आधारावर तुमच्याशी चॅटिंग केली जाते. यातून फार गंभीर केस नसल्यास त्या व्यक्तीला बोट म्हणजेच कम्प्युटर कडूनच काही काळ समुपदेशन व उपचार पद्धती समजावली जाते. हे करण्यासाठी मात्र त्या ग्राहकाकडून एकही रुपया आकारला जात नाही. मात्र जर गांभीर्य जास्त असेल तर मात्र योग्य त्या सायकॅट्रिक कडे ती केस वळविण्यात येते. त्यावेळी देखील ग्राहक स्वतः आपली फी ची मर्यादा ठरवू शकतो. साधारणपणे ५०० ते १५०० रुपये इतका खर्च सरासरी प्रतितास येतो.
संशोधन असे सांगते की मानसोपचार हा तुम्ही ऑनलाईन घेतला किंवा प्रत्यक्ष सायक्याट्रिक समोर बसून घेतलात तरी त्याच्या परिणामकारकता मध्ये बदल होत नाही. उलट पूर्वी वेळेच्या अभावी पैशाच्या अभावी किंवा लोकलज्जे च्या कारणामुळे अनेक जण या उपचार पद्धती पासून दूर राहत होते. परंतु आज उत्तम प्रतीचा मानसोपचार ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्यामुळे कोणालाही न समजता तुम्ही सहज अशाप्रकारे मानसोपचार करून घेऊ शकता व त्याचा योग्य फायदा स्वतःला व आपल्या परिवाराला करून देऊ शकता.
१८ लोकांच्या टीमसह २०१६ मध्ये सुरू केलेल्या या कंपनीमध्ये आज २००हून अधिक जण कार्यरत आहेत व दररोज ८०० ते १००० केसेस या कंपनीकडे येत आहेत. उपचाराचे समुपदेशन करून घेण्यासाठी तुमच्याकडे फोन कॉल किंवा चॅट बॉक्स किंवा व्हिडिओ कॉल असे तिन्ही मार्ग खुले असतात. उपचार करून घेण्यासाठी तुम्हाला किती अनुभवी डॉक्टर असावा तुम्ही किती फी देऊ इच्छिता या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः ठरवायचे असतात.
२०१६ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीला अकरा बड्या गुंतवणूकदारांकडून चारशे कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक टप्प्याटप्प्याने प्राप्त झाली आहे व या सर्व गुंतवणूक याचा उपयोग कंपनीने आपले मार्केट वाढविण्यासाठीच केला आहे व करत आहे. सद्यस्थितीला कंपनी अनेक बड्या औद्योगिक कंपन्या महाविद्यालय व शाळा यांच्याशी टायप करत असून प्रत्येक कर्मचार्याला व प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य तो मानसोपचार व समुपदेशन प्राप्त व्हावं व त्यासोबतच कंपनीच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ व्हावी या उद्देशाने कंपनीने हे पाऊल उचलले आहे व बहुतांशी त्यात यशस्वी देखील होत आहे. अनेक मानसिक रोग व्याधी पिडा यांनी ग्रासलेल्या प्रत्येक भारतीयाला उत्तम मानसिक आरोग्य प्राप्त करवून द्यावं या हेतूने सुरू केलेल्या या सामाजिक स्टार्ट अप ला आपल्या सामाजिक कार्या करता अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे.