सुशांत फडणीस
कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण सुशांत फडणीस. लहानपणापासूनच शाळेची फारशी आवड नाही. अनेकदा गैरहजेरी बद्दल मुख्याध्यापकांनी वडिलांना बोलावून समज दिली. लक्ष सदैव मित्रांमध्ये व खेळण्यांमध्ये असायचे. वडिलांचा लहानसा व्यवसाय असल्याकारणाने घरच्यांना नेहमीच वाटे की सुशांतने खूप शिकावे व चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावे. पण वडिलांना व्यवसाय करताना पाहून सुशांतला नेहमीच व्यवसायाबद्दल आकर्षण राहिलं. त्याच्या व्यावसायिक वाटचालीचा हा अनोखा आलेख….
कसंबसं शालेय शिक्षण पूर्ण करून सुशांतचा महाविद्यालयात प्रवेश झाला. कॉलेजला गेल्यानंतर मित्रांची साथ आणि व्यवसायाबद्दलची आवड ह्या दोन्ही गोष्टी अधिक वृद्धिंगत होऊ लागल्या. याच मित्रांच्या सोबत त्याने सुरुवातीला व्यवसायाचे छोटे छोटे प्रयोग करण्यास सुरुवात केली. दिवाळीच्या काळात फटाके विकणे, गणेशमूर्तींचे स्टॉल लावणे असे अनेक छोटे-मोठे व्यवसाय केले. सर्व मित्र याद्वारे एकत्र येत. अशाच लहान-सहान व्यवसायामधून त्यांनी थोडं भांडवल जमवलं.
व्यवसाय करण्यासाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे तीन घटक म्हणजे कष्ट, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि भांडवल. या तीनपैकी कष्ट करण्याची तयारी आणि इच्छाशक्ती ही सुशांत आणि त्याच्या मित्रांकडे होती. आपल्याला करण्या योग्य असा कुठला व्यवसाय आहे, यावर त्यांनी अभ्यास केला. याद्वारे त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या भागात होणारा शेतमाल हा उत्तम दर्जाचा असून त्याला जर योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचलं तर तो नक्कीच आपल्याला चांगले उत्पन्न मिळवून देईल. याची सुरुवात करण्यासाठी त्यांनी स्वीट कॉर्न म्हणजेच मका या पिकाची निवड केली.
या सर्वांमध्ये सुशांत हा अग्रेसर असायचा. आपल्या घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन त्यांनी आपला पहिला मोठा व्यापार करायचं ठरवलं होतं. त्याकरता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गावोगाव फिरून सर्वात चांगल्या प्रतीचा व सगळ्यात स्वस्त मका कुठे मिळेल, याचा पूर्ण तपास केला. तो खरेदी करून पुण्याच्या बाजारपेठेत घेऊन गेले.
पुण्याच्या बाजारपेठेत मात्र त्यांचा फार मोठा भ्रमनिरास झाला. याचं मोठं कारण म्हणजे त्यांनी पुरवठा बाजूने पूर्ण अभ्यास केला होता. पण मागणीच्या बाजूचा अभ्यास करायला मात्र ते कमी पडले होते. त्यांनी प्रवास भाड्यासह साडेतीन रुपये किलो या दराने मिळालेला मका पुण्याच्या बाजारपेठेत दीड रुपये किलोने विक्री झाला. त्याही पुढे जाऊन त्याची घटवाई, तोलाई, मापाई, हमाली, दलाली हे सर्व खर्च जाऊन त्यांना अखेरीस किलोमागे केवळ २५ पैसे उरले. पहिल्याच व्यवहारात त्यांचं सर्वच भांडवल गेलं. पण आजही सुशांत त्यास नुकसान न म्हणता गुंतवणूकच म्हणतो. याचं कारण म्हणजे या व्यवहारामुळे त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मागणी नसताना देखील पुरवठा केला तर काय होऊ शकतो, याचा चांगलाच प्रत्यय त्यांना आला. पुढे पुन्हा त्यांचे काही छोटे-मोठे व्यवसाय सुरू झाले आणि या व्यवसायातून पुन्हा भांडवल गोळा करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.
एकदा आपल्या एका मित्राच्या शेतातील कांदा विकण्यासाठी त्याच्यासोबत सुशांतला मुंबईला येण्याचा प्रसंग आला. आयुष्यात प्रथमच त्याने मुंबई शहर व तेथील बाजारपेठ पाहिली. त्याच्याच शब्दात सांगायचं तर जेव्हा लोकं रात्री झोपून सकाळी उठतात तोपर्यंत त्या बाजारामध्ये पाचशे कोटी रुपयांहून अधिकचा व्यवहार झालेला असतो. बाजाराच्या व तिथल्या व्यवहारांच्या वातावरणाने सारेच भारावून जातात. सुशांतने तिथे आपल्यासाठी संधी शोधायला सुरुवात केली. बाजारपेठेत व्यापारी कसे काम करतात, तिथे कुठल्या प्रकारचे व्यवहार होतात, कुठल्या मालाला कशी मागणी आहे, ती मागणी कशी ठरते, एखाद्या वस्तूचा भाव कसा ठरवला जातो या सगळ्या गोष्टींचा तो बारकाईने अभ्यास करू लागला.
कांदा विक्रीच्या व्यवहारामुळे त्याचा झालेला मुंबई दौरा हा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. यानंतर देखील तो अनेकदा मुंबईला जाऊ लागला आणि अभ्यास करु लागला. प्रयत्नपूर्वक तेथील व्यापाऱ्यांशी त्याने संपर्क निर्माण केला. त्याचे हे सातत्य आणि प्रयत्नशीलपणा पाहून एका व्यापाऱ्याने त्याला सहजच मिरचीची ऑर्डर दिली. अपेक्षित असलेल्या मिरचीचा प्रकार आणि वजन लक्षात घेऊन तो जेव्हा आपल्या गावाकडे परतला तेव्हा मात्र त्याच्या असं लक्षात आलं की, ही मिरची आपल्या गावाकडे काय पण जवळच्या परिसरात देखील कुठेही मिळत नाही. पण आलेल्या संधीचं सोनं करायचं व त्याकरता वाटेल तितके कष्ट करायचे, या भूमिकेत येऊन त्याने भारतभर या मिरचीचा तपास केला.
दक्षिण भारतात की मिरची उपलब्ध आहे, असं त्याला समजल्यानंतर तो स्वतः दक्षिण भारतात जाऊन अपेक्षित असलेली मिरची, अपेक्षित असलेल्या वजनाप्रमाणे तो घेऊन आला. त्याने मुंबईतील त्या व्यापाऱ्याची ऑर्डर वेळेत पूर्ण केली. या व्यवहारात त्याला नफा जरी थोडा झाला असला तरी यातून शिकायला खूप गोष्टी मिळाल्या. ऑर्डर पूर्ण केल्यानंतर व्यापाऱ्याचा देखील विश्वास सुशांतवर बसला. त्यामुळे त्यांनी आता लगेच पुढची डाळींबांची ऑर्डर दिली. हे डाळींब एक्सपोर्ट करण्यासाठी म्हणून त्या व्यापाऱ्याला हवे होते. सुशांतसाठी हे काम फारसे अवघड नव्हतं. कारण त्याच्या गावापासून जवळच असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळींबाचं उत्तम प्रतीचे उत्पादन घेतात हे त्याच्या लक्षात आलं. त्याने स्वतः गावोगावी जाऊन उत्तम प्रतीचे डाळींब स्वतः निवडून घेऊन पॅकिंग करून ते व्यापाऱ्याला पाठवले या व्यवहारात त्याला फायदा देखील जास्त झाला. त्यासोबतच त्याला एक दृष्टी मिळाली. ती म्हणजे शेतीमालाचा एक्सपोर्ट देखील होऊ शकतो. पुढे जाऊन त्याने शेतीमाल निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर तरतुदी, शेतमालाची गुणवत्ता, त्याला उपलब्ध असलेली बाजारपेठ व निर्यात करण्यासाठीच्या साधनांचा पूर्ण अभ्यास केला.
मुंबईच्या बाजारपेठेत अनेक ऑर्डर पूर्ण करत असताना २००२ साली त्याने मुंबईतच आपले एक सेल्स ऑफिस स्थापन केले. २००२ ते २००६ या काळात त्याने पडेल ते काम केलं. म्हणजे स्वतः फळांचा भरणा, पॅकिंग, स्वच्छ करणे, निवडणे आदी कामे केली. दिवसातील १६ ते १८ तास तो नियमितपणेही सर्व काम करत असे. याच काळात त्याचा कामगारांपासून मोठ्यापर्यंत संपर्क आला. हे सर्व जण चांगल्या परिचयाचे झाले. दुसरा मोठा फायदा म्हणजे या व्यवसायातील प्रत्येक पातळीवरील प्रत्येक कामांमधील खडानखडा माहिती व अनुभव त्याला आला.
शेतीमालाचा व्यापार करणं हे तितकं सोपं नसतं. याचे प्रमुख कारण म्हणजे भाजी व फळे ही नाशवंत आहेत. त्यामुळे तुमच्या कामाला जितकी गती असेल, तुम्ही जितक्या झपाट्याने शेतीमाल हा ग्राहकापर्यंत पोहोचवता तितके तुम्ही फायद्यात असाल. कारण जितकी दिरंगाई तितकी मालाची गुणवत्ता घसरते. त्यातून उत्पन्नही कमी होते. सुशांत म्हणतो की भाजी तुमच्याशी असं म्हणत असते “आज तुम्ही मला खा, नाहीतर उद्या मी तुम्हाला खाईल”. म्हणजे ती तुमचा फायदाच खात नाही तर तुमची गुंतवणूक देखील खाऊ शकते.
सुशांतने याच काळात जनसंपर्क वाढविला. त्याचा व्यवसायात मोठा फायदा झाला. भांडवल कमी असलं तरीही तुमचा संपर्क व तुमच्या ओळखी जास्त असतील तर तुम्हाला सहज ऑर्डर्स मिळतात. अशाच एका ओळखीतून सुशांतला पहिली एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली. याच जोरावर २००६ साली त्यांनी आपल्या “व्हाईट ग्लोब” या एक्सपोर्ट कंपनीची स्थापना केली. आणि या मराठमोळ्या तरुणाचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाला.
२००२ ते २००६ या काळात आणि मुंबईच्या बाजारात काम करत असताना अनेक अडचणींना त्याला तोंड द्यावे लागले. व्यवसायात नवीन असल्याने प्रस्थापित व्यावसायिकांकडून फार त्रास सहन करावा लागला. अगदी दमदाटी पर्यंत देखील सहन करावं लागलं. पण सुशांत म्हणतो यात कोल्हापूरचा असल्याचा फायदा त्याला नक्कीच झाला. लहानपणापासूनच कोल्हापूरच्या तालमीमध्ये कुस्तीचे धडे घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या भांडणांना तो कधीही घाबरला नाही. उलट धैर्याने प्रत्येक प्रसंगाला तोंड दिले.
२००६ मध्ये निर्यात सुरू केल्यानंतर त्याला उत्तम यश मिळू लागले. दोहा व सिंगापूर येथे त्याने निर्यात सुरू केला. आणि एकापाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या ऑर्डर्स त्याला मिळत होत्या. २००७ मध्ये त्यांनी स्वबळावर एक कार देखील विकत घेतली. ती आपल्या घरच्यांना पाठवली. यामुळे घरच्यांचा सुशांतवर अधिकच विश्वास बसला. आता ते खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले. २००८ पर्यंत उत्तम पद्धतीने सेट झालेला त्याचा व्यवसाय अचानक एका फटक्यात पुन्हा शून्यावर आला. दुबईतील एका व्यापाऱ्याकडून फसवणूक झाली व घेतलेल्या मालाचे पैसे आलेच नाहीत.
आता मात्र नव्याने सर्व काही उभं करावं लागणार होतं. त्याने पुन्हा जोमाने सर्व कामाला सुरुवात केली. आता त्याच्या विकासाची गती ही आधी पेक्षा कैक पटीने जास्त होती. आता त्याला बाजारपेठेचा पूर्ण अंदाज आला होता. दुबई, सिंगापूर, दोहा यासोबतच इराण-इराक या देशांमध्ये देखील त्याने आपला व्यवसाय वाढवला. २०१२ मध्ये तर त्याने आपलं एक ऑफिस हे दुबईमध्ये देखील सुरू केलं. दुबई जवळील देशांमध्ये सर्व व्यवहार हा त्या ऑफिस मधून चालवायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय व्यवहार देखील करत असताना त्याचं तत्त्व मात्र एकच प्रत्येक माणसाशी संबंध बांधायचा आणि तो टिकवायचा. याच जोरावर त्याला आपल्या पुढील ऑर्डर सतत मिळत होत्या.
आंतरराष्ट्रीय व्यवसायात तो स्वतःला प्रस्थापित करत असतानाच २०१३ मध्ये त्याला सलग दोन फटके पुन्हा बसले. दुबईतील एका व्यापाऱ्याने बुडवलेले ७० लाख रुपये व दुसरे म्हणजे इराकमधील एका व्यापार्याने बुडवलेले २ कोटी ७० लाख रुपये. हा फटका त्याला जमीनदोस्त करणारा होता. पण अशा परिस्थितीतूनही त्याला सावरण्यासाठी धैर्य दिले ते कुटुंब, जवळचे नातेवाईक व त्याचे मित्र यांनी. या सर्वांची साथ जर नसती तर सुशांत हा व्यवसायातून कधीच संपला असता.
आता तिसऱ्यांदा उभं रहाणं हे जितकं अवघड होतं, तितकच ते ऊर्जात्मक देखील होतं. फीनिक्स पक्षाने जशी राखेतून उंच भरारी घेतली तशीच २०१३ मध्ये सुशांतने. व्यवसायात प्राप्त झालेले संपूर्ण ज्ञान, निर्माण झालेले व्यावहारिक संबंध, आप्तेष्ट व नातेवाईक या सगळ्यांच्या जोरावर त्याने पुन्हा तोच व्यवसाय जोमाने सुरू केला. आणि म्हणता म्हणता त्याची उलाढाल काही कोटींपर्यंत गेली. २०१६ सालचे त्याचे टर्नओवर हे ३२ कोटी रुपयांचे होते. हेच २०२१ येईपर्यंत २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. कष्ट घेण्याची तयारी, धैर्य व संबंध बांधण्याची हातोटी या कौशल्याच्या जोरावर १२०० रुपयांपासून सुरू केलेला सुशांत फडणीसचा हा व्यवसाय आज शेकडो कोटींपर्यंत पर्यंत पोहोचला आहे. तोही कुठल्याही प्रकारचे कर्ज अथवा कोणाची ही गुंतवणूक न स्वीकारता हे विशेष.