मोठ्या शहरांमधील नोकरदारांना वाहतुकीचा सक्षम आणि प्रभावी पर्याय देणाऱ्या शटल या अनोख्या भारतीय स्टार्टअपची ही यशकथा… अनेकांना प्रेरणा देणारी आणि बरेच काही सांगणारी….
मुंबई, पुणे, बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरीला जाणाऱ्या सर्वांसाठीच सगळ्यात जीवावर येणारा प्रकार म्हणजे प्रवास. किमान २५-३० किलोमीटरचा प्रवास करायचा आणि तोही गच्च ट्रॅफिकच्या रस्त्यावरून. म्हणजे दिवसातील किमान दीड ते दोन तास रस्त्यातच घालवावे लागतात. अशा ट्रॅफिकमधून स्वतःची गाडी चालवत घेऊन जाणं म्हणजे अतिशय थकवणारा प्रकार. प्रायव्हेट टॅक्सी करून जायचं तर खिशाला चटका. मग अशा वेळेला पर्याय उरतो तो एकच बसमध्ये धक्के खात उभ्याने प्रवास करणे. गर्दीने गच्च भरलेल्या त्या बसमधून घामाच्या धारा निथळत असताना उभे राहून प्रवास करून ऑफिसला गेल्यावर काम करण्यासाठी कुठली ऊर्जा शिल्लक राहणार? आणि या सर्व ट्रॅफिक व असंख्य गाड्यांमुळेनिर्माण होणाऱ्या कार्बन-डाय-ऑक्साईड मुळे प्रदूषण व भारताच्या कार्बन फूटप्रिंट मध्ये भरच पडत आहे. पण मोठ्या शहरांमधील नोकरदार वर्गाकडे पर्याय नसतो आणि या प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणे, केवळ सहन करणे हा एकमेव मार्ग त्यांच्यासमोर असतो. पण या सर्व नोकरदार वर्गाला दिलासा देणारा असा एक सहज सुलभ मार्ग अमित सिंग आणि दिपांशू मालवीय यांनी शोधून काढलाय ‘शटल’ या भन्नाट स्टार्टअप च्या रूपानं.
जबाँग या ई-कॉमर्स कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनिअर असलेला अमित सिंग व मेटलर्जी मध्ये इंजिनीअरिंग केलेला दीपांशु मालवीय हे दोघे आयआयटीयन्स कार्यरत होते. सगळं काही सुखवस्तू आणि सुरळीत सुरू असताना दोघांनाही स्वतःचं काही करावं ही ऊर्मी शांत बसू देत नव्हती. याच इच्छेला पूर्ण करण्यासाठी त्यातील एकाने सुरुवातीला नोकरी सोडली आणि दोघांनी मिळून एक मोबाईल कन्टेन्ट डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म सुरू केला. काहीसा फेसबुक व इन्स्टाग्राम यांच्याशी मिळताजुळता असलेला हा प्लॅटफॉर्म मात्र फार काळ टिकू शकला नाही.
त्यांनी लगेचच आपले दुसरे व्हेंचर म्हणजे दोन शहरातील कॅब-टॅक्सी सुरु केली. हे काम सुरू असताना शहराबाहेर वाहतुकीपेक्षा त्याच शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर आहे, असे लक्षात आले. म्हणून त्यांनी या दृष्टीने अभ्यास करण्यास सुरुवात केली. अनेक नोकरदार व्यक्तींच्या सर्व्हे केल्यानंतर त्यांना या व्यवसायामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे आणि ते कशा पद्धतीने पूर्ण होऊ शकतो याचा अंदाज येऊ लागला. नोकरदारांच्या प्रवासाची ही गरज पुरवण्यासाठी त्यांनी आधी कार्सचा विचार केला होता. पण तो पर्याय ग्राहकाला महाग वाटू शकतो व त्यामुळे कमी लोक आकर्षित होतील असं त्यांच्या लक्षात आलं.
सुरूवातीला पायलट स्टडी म्हणून त्यांनी दोन इनोव्हा कार बुक केल्या. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर या प्रवासा करता त्यांनी जाहिरात करण्यास सुरुवात केली. अवघ्या दोनच दिवसात त्यांच्या गाड्यांच्या दिवसाला १२ ट्रिप बुक झाल्या होत्या. यावरूनच त्यांना या व्यवसायातील यश याचा अंदाज आला. त्यांनी लगेचच बस कॉन्ट्रॅक्टरशी बोलणं सुरू केलं.
२०१५ मध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यास सुरुवात केली. आणि त्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद देखील ग्राहकांकडून मिळत गेला. सुरुवातीला दिल्लीमधील एकाच रूटवर सुरुवात करून नंतर हळू हळू रूट वाढविण्यास प्रारंभ झाला. यात त्यांना असं लक्षात आलं की, कमी अंतरासाठी प्रवास करणाऱ्या लोकांना टॅक्सीने प्रवास करणं फार महाग होत नाही तर सोयीचं वाटतं. पण लांबवर प्रवास करणाऱ्या म्हणजे किमान दहा किलोमीटर पुढे प्रवास करणाऱ्या सर्वांना शटलची बसच फायदेशीर ठरत होती.
गरजेवर आधारित त्यांनी आपल्या बसची संख्या वाढवण्यास सुरुवात केली. बसेसचा नियमित मेंटेनन्स, ड्रायव्हरची मेडिकल चाचणी, सर्व कागदपत्रांची चाचणी हे दोघं जातीने करत. सर्व बसेसमध्ये एअर कंडिशन, आरामदायी खुर्च्या, स्वच्छ व नीटनेटकेक्या ठेवण्याला प्राधान्य दिले. ग्राहकांना यात मासिक पास देखील सुविधा देण्यात येते. फर्स्ट कम फर्स्ट सर्व या नियमाप्रमाणे ग्राहकांना स्वतःची सीट निवडण्याचा देखील अधिकार मिळतो. या सर्व सुविधा शटलच्या ॲप वरून तुम्ही उपभोगू शकता. या ॲप वरून तुमच्या ऑफिस टाइमिंग प्रमाणे ट्रीप बुक करणे, पेमेंट करणे, सीट निवडणे, ट्रीप कॅन्सल करणे, बसचा रस्ता ट्रॅक करणे आदी करु शकता.
२०१७ मध्ये दिल्ली शहरात महानगरपालिकेच्या बस शटलशी स्पर्धा करत असल्यामुळे काही कायदेशीर कारवाईला शटलला तोंड द्यावे लागले. कॉन्ट्रॅक्ट केलेल्या बसेस शहर वाहतुकीसाठी वापरू नयेत, असा अध्यादेश दिल्लीत काढण्यात आला होता. या कायदेशीर लढाईमध्ये शटलला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. परंतु आपली जिद्द व चिकाटी न सोडता त्यांनी पुन्हा आपला बिझनेस उभा केला.
कंपनीच्या बिझनेस मॉडेलचा विचार केला तर प्रत्येक ग्राहकाला एका किलोमीटरचे तीन रुपये अशा हिशोबाने आपले प्रवास भाडे द्यावे लागते. यातील दोन रुपये प्रति किलो मीटर या दराने बस कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात. म्हणजे प्रति किलोमीटर प्रति व्यक्ती एक रुपया या कंपनीला मिळतो. आज दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे अशा सात महानगरांमध्ये शटलची बस सेवा सुरू आहे.
आज शटलच्या भारत भरामध्ये २ हजाराहून अधिक बसेस धावताहेत. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्यवसाय करत असताना ग्राहकाला उत्तम सुविधा पुरविण्याचा एकमेव ध्यास शटलमध्ये घेतला जातो. शटलच्या सुरक्षेबद्दल बोलायचं झालं तर एकूण प्रवाशांपैकी ३८ ते ४० टक्के या महिला प्रवासी आहेत. अतिशय विश्वासाने त्या शटलने प्रवास करतात. शटलच्या या उत्तम कामगिरीसाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये फिक्की रोड सेफ्टी अवॉर्ड व जून २०१८ मध्ये सस्टेनेबल मोबिलिटी या श्रेणीमध्ये इंटरनॅशनल एशडेन अवॉर्ड लंडन येथे प्रदान करण्यात आला.
२०२० अखेर १६०० कोटी रुपयांहून अधिकचे मूल्यांकन असलेल्या शटल या कंपनीला अनेक गुंतवणूकदारांची पसंती लाभलेली आहे. यात ॲमेझॉन, सीक्यूया, टोयोटा व एसएमबीसी बँक जपान अशा जागतिक गुंतवणूकदारांचा देखील समावेश आहे. शटल आता केवळ बस सुविधाच नव्हे तर त्यात अधिक सेवा देण्याच्या तयारीत आहे. अनेक ग्राहकांना घरी जाऊन स्वयंपाक करणे किंवा जेवणासाठी पुन्हा बाहेर निघणे हे शक्य होत नाही. म्हणून खास ग्राहकांच्या आग्रहास्तव बसमध्येच जेवण कसे पुरवता येईल, यावर काम सुरू आहे. यासोबतच दैनंदिन आवश्यक वस्तू जसे दूध, अंडी, ब्रेड या वस्तूदेखील बसमध्येच विकत घेण्याची सुविधा पुरविण्याचा शटलचा मानस आहे. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा पुरवून त्यांची संतुष्टी हेच एकमेव उद्दीष्ट आहे. त्यादृष्टीने शटलला नक्कीच उत्तम भविष्य असेल यात शंका नाही.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!