निंजाकार्ट
शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारावर त्यांना खुली बाजारपेठ, शेतमालाला योग्य दर व २४ तासात मोबदला मिळवून देणाऱ्या या भन्नाट ऍग्रीटेक स्टार्टअप ‘निंजाकार्ट’ बद्दल आज जाणून घेऊया.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले कृषी क्षेत्र, आणि या कृषी क्षेत्रावर आपल्या उदरनिर्वाहाकर्ता अवलंबून असलेला शेतकरी. या एकशे तीस कोटी जनतेच्या देशाचा पोशिंदा. आणि त्याच्यावरच अनेकदा उपासमारीची वेळ येते. नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेला आणि त्यात भर पडते ती म्हणजे इतर सर्व खर्चांची जसे दलाली, हमाली, कटोती, वाहतुकीची. आणि या सर्व खर्चात वाढ होते ती म्हणजे हाताळणी करताना किंवा वाहतुकीमध्ये होणाऱ्या नुकसानाची. संयुक्त राष्ट्र म्हणजेच यूएन यांनी केलेल्या एका सर्वेमध्ये असं निदर्शनास आलंय की भारतात शेतीमालाची साधारण 25 ते 40 टक्के नुकसानही या वाहतुकीमध्ये होत असते. या सर्व प्रक्रियेमध्ये जितका जास्त वेळ जाईल तितकीच त्या भाजीपाला व फळांची गुणवत्ता घसरते आणि मिळणारा भाव अजूनच कमी होऊ लागतो. यासोबतच आपल्याकडे शीत वाहतुकीची (कोल्ड स्टोरेज व ट्रान्सपोर्ट) फारशी व्यवस्था नसल्यामुळे किंवा महाग असल्यामुळे देखील शेतकऱ्यांना नुकसानाला तोंड द्यावे लागते.
या मुलभूत प्रश्नावर उत्तर शोधून काढलंय थिरुकुमारण नागराजन याने. एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला येऊन इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर आयआयएम मधून एमबीए करून थिरू याने एबीबी या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये दोन वर्ष काम केले. पुढे ॲक्सिस बँकेमध्ये मोठे लोन प्रकरण पास करणाऱ्या डिपार्टमेंट मध्ये दीड वर्ष नोकरी केली. यादरम्यान स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असं त्याला सतत वाटत होतं आणि तसेच समविचारी मित्र देखील त्याला वेळोवेळी भेटत होते. म्हणून ऑक्टोबर 2011 मध्ये आपली नोकरी सोडून त्याने अविष्कार नावाची एक इन्वेस्टमेंट फर्म सुरु केली. यासोबतच एजुराफ्ट नावाचीही एक नवी स्टार्टअप इतर काही मित्रांसोबत त्यांनी सुरू केली. अविष्कार हे प्रोजेक्ट जून 2012 मध्येच बंद करावे लागले. आणि पुढे एजू राफ्ट ही देखील ऑगस्ट 2013 मध्ये बंद पडली. यानंतर पुन्हा शॉट व टॅक्सी फोर शोर असेही दोन स्टार्टअप त्यांचे 2013 ते 2015 या कालावधीमध्ये सुरूही झाले आणि बंदही.
असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अशा अनेक पायऱ्या चढून येऊन 2015 मध्ये थिरू आणि त्याचे मित्र वासुदेवन चिनतंबी, आशुतोष विक्रम, कार्तिक स्वामी आणि शरद बाबू यांना आपल्या यशाचा मार्ग गवसला. 2015 अखेरीस त्यांनी एका इकॉमर्स पोर्टल ची संकल्पना मांडली. यात ग्राहकांना घरपोच किराणा पुरवणे हा उद्देश होता. यादृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. एक चांगल्या प्रतीचे ॲप त्यांनी स्वतःचे डेव्हलप केले. या ॲपवरून ग्राहक आपल्याला हवा तो किराणा आपल्या हव्या त्या नजीकच्या किराणा दुकानातून ऑर्डर करू शकत होता. व ती ऑर्डर यांच्या डिलिव्हरी बॉय अवघ्या काही तासातच पूर्ण करेल. पण प्रत्यक्षात जेव्हा ह्या कामासाठी प्रयत्न सुरू केले तेव्हा असं लक्षात आलं की किराणा मालाची अनेक वरायटी आहे. व अनेक किराणा दुकानदार यांना त्या सर्व किराणा मालाचे स्टॉक ठेवणे व योग्य त्या बॉय कडे ते देऊन ती ऑर्डर पूर्ण करणे हे फार कठीण होत होते. आणि म्हणून त्यांनी किराणामाल पुरविण्याचा विचार तूर्तास ड्रॉप केला.
या प्रक्रियेत त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली आणि ती म्हणजे ज्यांच्याकडे आपला माल बाजारपेठेपर्यंत पुरवण्यासाठी ची कुठलीही रचनात्मक सुविधा नाही अशा शेतकऱ्यांसाठी काम करण्याची. याकरता त्यांनी बाजाराचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांचा मुख्य उद्देश हा भाजीपाला व फळे हे कमीत कमी वेळेमध्ये बाजारपेठेपर्यंत सुखरूप पोहोचवणे, जेणेकरून शेतकऱ्याचं कमीत कमी नुकसान होईल. बेंगलोर शहरांमध्ये त्यांनी आपल्या अभ्यासास प्रारंभ केला. फळं व भाज्या यांचा मंडई मधील लिलाव हा रात्रीच्या वेळेस होत असे. म्हणून सलग ६ महिने दररोज रात्री आठ ते सकाळी दहा पर्यंत हे सर्वजण मंडई मधील एकूण एक प्रक्रिया समजावून घेत होते. गाड्यांच्या लागणाऱ्या रांगा, हमालांना द्यावयाची हमाली, व्यापाऱ्यांकडून व दलालांकडून होणारी पिळवणूक, मालाची अयोग्य हाताळणी व त्यातून होणारे नुकसान, शेतकऱ्याला मिळणारा तुटपुंजा मोबदला या सगळ्याचा ते बारकाईने अभ्यास करत होते. तब्बल सहा महिने हा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांनी या व्यवसायात आपण नक्कीच शेतकर्यांचा फायदा करून देऊन स्वतः देखील नफ्यात येऊ शकतो असं भाकीत मांडलं.
शेतकऱ्यांच्या या भल्यामोठ्या प्रश्नाला एकमेव उत्तर होतं आणि ते म्हणजे शेतीमाल हा थेट शहरांमधील विक्रेत्यांपर्यंत जर पोहोचला तर शेतकऱ्याला योग्य तो मोबदला देखील मिळेल. आणि चांगल्या प्रतीचा माल ग्राहकापर्यंत पोहोचल्यामुळे ते देखील समाधानी राहतील.
संकल्पना यशस्वी होऊ शकते असे लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित कामाला सुरुवात केली. ”निंजा कार्ट’ असे नामकरण ह्या व्यवसायाला करण्यात आले. योग्य असं स्वतःच ऍप डेव्हलप करत असतानाच त्यांनी बेंगलोर शहरानजीकच्या शेतकऱ्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. गावागावांमध्ये जाऊन सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यायला व त्यांना आपली संकल्पना पटवून सांगायला त्यांचा फार वेळ गेला. कारण शेतकऱ्याला मंडई बाहेर आपला माल कोणाला विकणे हे एखाद्या गुन्हा करण्याप्रमाणेच वाटत होते. सुरुवातीला काही शेतकरी यांच्या सोबत काम करण्यास तयार झाले.
शेतकऱ्याला केवळ चांगली वाहतूक प्रणाली उपलब्ध करून देणं इतकंच यामध्ये नव्हतं. तरी या सोबतच शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळवून देणे व त्यासाठी संपूर्ण यंत्रणा ही ट्रान्सपरंट असणं फार महत्त्वाचं होतं. ह्या ॲप मध्ये शेतकऱ्याला आपला माल निंजा कार्ट कडे दिल्यानंतर तू कुठल्या स्टेज पर्यंत पोहोचला आहे याची संपूर्ण माहिती मिळावी याकरिता आरएफ आयडी वापरून ट्रेकिंग सिस्टीम तयार करण्यात आली. प्रत्येक दहा गावांमध्ये एक कलेक्शन सेंटर स्थापन करण्यात आले. आपल्या शेतातील उत्पन्न हे सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये कलेक्शन सेंटर येथे आणून द्यावे. कलेक्शन सेंटर मध्ये आलेला माल निंजा कार्ट च्या गाड्यांमध्ये त्या भागातील फुल्फिलमेंट सेंटरमध्ये पोचवले जातात. शेतकऱ्याने भाजीपाला जमा केल्या नंतर लगेच त्याची एंट्री ह्या ॲप मध्ये करण्यात येते. शेतकऱ्याच्या मोबाईलवर देखील हे ॲप इन्स्टॉल आहे. कुठल्या प्रकारचा भाजीपाला किती प्रमाणात व काय दराने शेतकऱ्याकडून घेण्यात आला हे सर्व शेतकऱ्याला व मॅनेजरला आपापल्या ॲपवर सहज बघता येते. हा भाजीपाला शेतकऱ्याने कलेक्शन सेंटर मध्ये जमा केल्यानंतर 24 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी थांबून राहावे लागत नाही.
शहरातील भाजी विक्रेत्यांच्या, हॉटेलच्या व दुकानदारांच्या मागण्या त्यांनी या ॲप वर टाकाव्यात. एकूण प्रमाण लक्षात घेऊन कुठल्या भागात कुठला भाजीपाला पाठवायचा आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये तो भाजीपाला भरला जातो व रात्री दोन वाजेपर्यंत तो शहरातील डिस्ट्रीब्यूशन सेंटर येथे येतो. तिथून सकाळी सहा वाजेपर्यंत हा भाजीपाला त्या दुकानदाराच्या दाराशी पोहोचलेला असतो.
या सर्व प्रणालीमध्ये बारा तासात शेतकरी ते ग्राहक भाज्या व फळे कसे पोहोचवता येतील यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले जाते. यासाठी शक्य तिथे आणि शक्य त्या पद्धतीने त्यांनी वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. जसे ड्रायव्हर्स कडे असलेल्या ह्या ॲप मध्ये सगळ्यात छोटा मार्ग कुठला व कुठल्या रस्त्याने गेल्यावर कमीत कमी वेळेत पोहोचता येईल याची देखील सूचना ड्रायव्हर्सना मिळत असते. रस्त्यात असलेल्या अनेक दुकानांमध्ये भाजीचे कॅरेट उतरवल्यानंतर ते रिकामे होईपर्यंत तिथे थांबण्याची आवश्यकता नाही तर रिकामे झालेले कॅरेट हे परतीच्या प्रवासात गोळा केले जातात जेणेकरून ते रिकामे करून घेण्यासाठी लागणारा वेळ वाचवता येतो.
2016 मध्ये व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला वर्षाअखेरपर्यंत दिवसाला दीडशे टन भाज्या व फळे पुरवण्यात निंजा कार्ट ला यश मिळाले होते. आता व्यवसायाची व्याप्ती वाढावी असे वाटत असताना आर्थिक बाजू कुठेतरी कमकुवत पडत होती. तोच झोप स्मार्ट व इतर काही गुंतवणूकदारांकडून त्यांना तीन दशलक्ष डॉलर्स म्हणजे साधारण वीस कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली. या गुंतवणुकीच्या आधारे त्यांनी आपला विस्तार इतर शहरांमध्ये न्यायचं निर्णय घेतला. 2017 मध्ये बेंगलोर सह चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, गुरुग्राम या शहरांमध्ये त्यांनी आपला विस्तार वाढवला. जसा शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा विश्वास यांच्यावर बसत होता त्याच्यासोबत गुंतवणूकदारांच्या विश्वासाला देखील ते पात्र ठरत होते. जागतिक गुंतवणूकदारांनी पैकी टायगर ग्लोबल व वॉल मार्ट अशा गुंतवणूकदारांनी देखील निंजा कार्ट मध्ये 37 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आपल्याकडे आलेली प्रत्येक गुंतवणूक ही निंजा कार्टने आपला व्यवसाय उत्तम करणे व त्याचा विस्तार वाढवणे या करता योग्य पद्धतीने वापरली आहे. आज निंजा कार्टचा मुंबई व पुणे सह भारतातील 12 प्रमुख शहरांमध्ये व्यवसाय उत्तम रीतीने सुरू आहे. आज दिवसाला २००० टन भाज्या व फळे निन्जाकार्ट खेड्याकडून शहराकडे पुरवत आहे.
निंजा कार्ट च्या कॉफौंडर सोबत त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी 37 लोकांची टीम ही सुरुवातीपासून आजवर तशीच टिकून आहे. 500 हून अधिक वाहतूक करणाऱ्या गाड्यांसोबत 1200 कलेक्शन सेंटर्स व 20000 किरकोळ विक्रेते असा मोठा पसारा सांभाळण्या करिता सुमारे ४००० लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे.
कोविड काळात एक पाऊल पुढे टाकत निंजा कार्ट यांनी ग्राहकांना घरपोच भाजीपाला व फळे पुरविण्याची सुविधा देण्यास देखील प्रारंभ केला आहे. लवकरच इतर शहरांमध्ये देखील विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे. आपला व्यवसाय करत असतांना हजारो शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर शोधल्याचे समाधान देखील ह्या निंजा कार्ट च्या फौंडर्स ला आहे व ह्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.