तुटपुंजा पगार, पगाराची तारीख निश्चित नसणे, किंवा पगार न पुरणे या सर्वच प्रश्नांवर उत्तर शोधून ‘कारवा’ हा भन्नाट व्यवसाय सुरू केलाय खुशबू माहेश्वरी हिने. काय आहे हे स्टार्टअप आणि त्याची वैशिष्ट्ये…. जाणून घेऊ या…
आपल्या शालेय जीवनात असतांना खुशबू माहेश्वरीने एक प्रसंग पहिला होता. त्या प्रसंगाचा तिच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की, भविष्यात जेव्हा तिला व्यवसाय करण्याची संधी मिळाली तेव्हा तिने त्याच विषयाला हात घातला.
खुशबू एकदा एका दवाखान्यात काही कारणाने गेली असता तिच्या समोर एक कुटुंब डॉक्टर व इतर स्टाफच्या विनवण्या करताना तिने पाहिलं. त्या कुटुंबातील एका व्यक्तीचा काही उपचार करायचा होता. पण केवळ पैसे उपलब्ध नसल्याने तो होत नव्हता. त्यासाठी बाकी सर्व सदस्य एकच विनवणी करत होते की, केवळ काही दिवस थांबा. पगार होता क्षणी आम्ही पैसे भरू. आणि हा प्रश्न होता केवळ ३ हजार २०० रुपयांचा. या प्रसंगावरून खुशबूच्या मनात पगार, त्याचे महत्त्व व त्याचे वेळेवर होणे किती गरजेचे आहे हे लक्षात आले. वय जरी कमी असलं तरी हा प्रसंग तिच्या मनात घर करून गेला.
पुढे तिने आयआयटी मधून पदवी प्राप्त करून मग हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून एमबीए पूर्ण केले. केवळ एक वर्ष परदेशात नोकरी करून ती पुन्हा भारतात परतली. या वेळी तिला इनमोबी या स्टार्टअप मध्ये काम करण्याची संधी मिळाली. इथे २ वर्ष काम करून मग तिने स्वतः चा फॅशन टेक्नॉलॉजीचा व्यवसाय सुरु केला. २०१५ मध्ये सुरू केलेला हा व्यवसाय फार काळ टिकू शकला नाही आणि लवकरच तो बंद देखील करावा लागला.
यामुळे ती घाबरून शांत बसली नाही. तर तिने चटकन एका इनक्यूबेटर कंपनीत नोकरी जॉईन केली. ही कंपनी अनेक नवीन स्टार्टअप ना वित्त व इतर सहकार्य करण्याचे काम करत होती. यात काम करत असताना तिच्या लक्षात आलं की बहुतांशी लोक हे दुसरा व्यवसाय का सुरू करतात याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या असलेल्या नोकरीमध्ये त्यांचं भागत नाही म्हणून. किंबहुना पगार जरी व्यवस्थित असला तरी देखील पगार हा महिनाअखेरच्या आतच संपलेला असतो व त्यामुळे पुन्हा लोकांना आर्थिक तणावाला तोंड द्यावं लागतं.
या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी तिचं विचार चक्र आता सुरू झालं आणि हे विचार चक्र सुरु असतानाच तिला आपल्या बालपणी पाहिलेला तो प्रसंग आठवला ज्यात लोक केवळ पगार झालेला नाही म्हणून आपले आर्थिक नियोजन व कामे पूर्ण करू शकत नाहीत. आणि यातूनच तिला सुचली एक भन्नाट कल्पना आपल्या नव्या व्यवसायाची. ही नवी कल्पना होती एका फायनान्स टेक कंपनीची. ज्यामुळे अनेक मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यमवर्गीय नोकरदार लोकांना वेळेच्या आधीच आपला पगार प्राप्त होणार.
पहिल्या तारखेला आपण कामावर जातो ते महिन्याच्या ३० किंवा ३१ तारखेपर्यंत नियमितपणे काम करतो आणि त्यानंतरच महिन्याभराचा एकत्रित पगार एक तारीख, पाच तारीख, सात तारीख किंवा दहा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला जमा होत असतो. म्हणजे एक तारखेला केलेल्या कामाचा पगार तब्बल एक महिन्याहून अधिक दिवसांनी आपल्या बँकेत जमा होतो. आणि या पगाराची जर तुम्हाला पगाराच्या तारखे पूर्वी कधी गरज भासली तर ती मात्र पुरवता येत नाही. दर वर्षी भारतात ६ लाख कोटी रुपये हे केवळ कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या लेट फी मधून किंवा बँकेतील मिनिमम बॅलन्स राखू न शकल्यामुळे भरलेल्या दंडातून जमा होतात. यावरूनच असलेल्या पगाराचा तुटपुंजे पणा लक्षात येतो. हीच गरज लक्षात घेऊन खुशबू चा नवा व्यवसाय हा या मोठ्या प्रश्नाचे उत्तर आहे.
“कारवा” म्हणजे तुमच्या प्रवासातील साथीदार, तुमचे जोडीदार. याच नावाने आपल्या नवीन फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कंपनीची सुरुवात खुशबुने आपल्या आयआयटी मधील जुनियर असलेल्या गोयल यांच्या सोबत केली. कारवा या नावातून त्यांना लोकांना आम्ही तुमचे सुख, दुःखातील सोबती आहोत असंच सुचवायचं आहे.
आता या व्यवसायाचे स्वरूप थोडक्यात समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीला महिना संपण्यापूर्वीच जर पैशाची आवश्यकता भासली तर कुठेही कर्ज मागायची आवश्यकता नाही. त्या व्यक्तीने केवळ कंपनीच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज पाठवावा. आपली गरज कळवावी. त्यात मागितलेली इतर माहिती जसं तुमच्या कंपनीचे नाव, तुमच्या मागील दोन महिन्यांच्या पेमेंट स्लिप, आधार कार्ड, पॅनकार्ड याचा फोटो इतकी माहिती पुरवली, की अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये तुम्हाला तुमच्याच पगारातील ॲडव्हान्स ही कंपनी पुरवते.
तुमचा पगार, कामाचे स्वरूप व उपलब्ध करून दिलेली माहिती यावरून ३ हजार, ५ हजार किंवा १० हजारापर्यंतचा ऍडव्हान्स काही तासात तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जातो. आणि हो विशेष म्हणजे ही रक्कम बिनव्याजी तुम्हाला दिली जाते. पुढील महिन्यात ज्या वेळेला त्या व्यक्तीचा पगार प्राप्त होतो त्या वेळेला त्यांनी सर्वप्रथम ही परतफेड करायची असते. आणि ही परतफेड करत असताना जर त्या व्यक्तीला वाटलं तरच त्याने स्वतःहून स्वेच्छेने वाटेल तितकी रक्कम कंपनीला व्याज म्हणून द्यावी. जर ही रक्कम दिली नाही तरी देखील कंपनीकडून कुठलीही मागणी केली जात नाही.
यासाठी कंपनीने अनेक कंपन्यांसोबत टाय अप केले असून ॲडव्हान्स मागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पडताळणी या कंपन्यांकडून केली जाते. या पगाराच्या ॲडव्हान्स सोबतच कारवा कडून अनेक प्रकारचे लहान-मोठे कर्ज हे मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यमवर्गीय नोकरदारान करता उपलब्ध आहेत व त्यावर मात्र एक विशिष्ट व्याजदर आकारला जातो. ज्या लहान प्रोडक्स मध्ये वाहन कर्ज, दुय्यम व्यवसाय कर्ज, आरोग्य संबंधित कर्ज, शिक्षण संबंधित कर्ज असे अनेक प्रकारचे कर्ज अतिशय माफक दरात दिले जातात. यासोबतच नोकरदार वर्गाला सेविंग ची सवय लावावी व त्यातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं या दृष्टीने काही सेविंग आणि गुंतवणुकीचे प्रोडक्स देखील कारवा कडे उपलब्ध आहेत . अशाप्रकारे पगाराचा ॲडव्हान्स देण्यामध्ये जरी कंपनीला काहीही नफा नसला तरी देखील यामुळे कंपनी बद्दलची विश्वासार्हता वाढत आहे. आणि याचा परिणाम कंपनीच्या इतर प्रोडक्टस च्या विक्री वर होतो.
कारवा ची सुरुवात आयआयएम अहमदाबाद येथील उद्योजकता विकास केंद्रामध्ये झाली. नवउद्योजकांच्या स्पर्धेमध्ये कारवा ने तब्बल २० लाख रूपयांचे बक्षीस पटकावून आपला व्यवसाय सुरु केला होता. २०१९ मध्ये काही एंजल इन्वेस्टर ने आणि २०२० मध्ये काही बड्या गुंतवणूकदारांनी कारवा मध्ये मोठी गुंतवणूक केली. आणि या गुंतवणूकीच्या जोरावर आज कारवाचे स्वतःचे बेंगलुर येथे ऑफिस असून अनेक शहरांमधील मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यमवर्गीय नोकरदार लोकांना आज ते पगार ॲडव्हान्स देत आहेत. सरासरी दर महिन्याला १० हजार जण कारवा च्या माध्यमातून आपला पगार ऍडव्हान्स मध्ये प्राप्त करत आहेत.
कोविड महामारीच्या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षभरात कारवा कडे पगाराच्या ऍडव्हान्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण अनेक कंपन्यांमध्ये पगारातील कपात व पगाराची तारीख विलंबित होणे यामुळे पैशाची परतफेड होण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असली तरी अडचणीच्या काळात लोकांच्या सोबत उभी असलेली कारवा या कंपनीची वाटचाल अविरत सुरू आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!