अपयशी झालेल्या मुलीने आपल्या आईकडून केवळ रु. ७००० भांडवल घेऊन सुरु केलेला “बॅग-इट” हा व्यवसाय आज शेकडो कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि आज ७०० हून अधिक महिलांना रोजगार देखील देत आहे. जाणून घेऊया ह्या भन्नाट स्टार्टअप बद्दल महिला दिनानिमित्त…
अपयश ही यशाची पहिली पायरी असते असा वाक्प्रचार आपण अनेकदा वापरतो पण हाच वाक्प्रचार सार्थ खरा केला आहे नीना लेखी यांनी. कॉलेजच्या पहिल्याच वर्षात नापास झालेल्या नीनाने आपल्यावर लागलेला अपयशाचा डाग पुसून टाकण्यासाठी सुरू केलेल्या व आज शेकडो कोटी रुपयांचे मुल्यांकन गाठलेल्या बॅग इट ह्या स्टार्टअप बद्दल आज जाणून घेऊयात . . .
मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वाढलेल्या व अतिशय मेहनती व अभ्यासू असलेल्या नीनाने शालेय जीवनात पहिला नंबर कधीही सोडला नाही. प्रत्येकच बाबतीत प्रामाणिक व मेहनती असल्याने घरच्यांचा व शिक्षकांचा विश्वास नीनाने संपादन केला होता. अभ्यासात तर नीना हुशार होतीच पण त्यासोबत तिला चित्रकला हस्तकला शिवणकाम अशा अनेक कलांचे वरदान देखील लाभलं होतं. आणि म्हणूनच दहावीनंतर तिने कला क्षेत्रातच आपलं करिअर घडवण्याचा निर्णय घेतला व यासाठी तिचे पालक देखील तिच्यासोबत उभे राहिले.
उत्तम गुण दहावीला मिळाल्या कारणाने सोफिया पॉलीटेक्निक कॉलेज मुंबई येथे फाउंडेशन कोर्स इन आर्ट साठी सहज प्रवेश मिळाला. पण महाविद्यालयात गेल्यानंतर ते कॉलेज पाणी आणि सवंगडी यांच्यामुळे नीना आता पहिल्या सारखी अभ्यासू मुलगी राहिली नव्हती. शाळेत पहिल्या बेंचवर बसणारी नीना आता मात्र बॅकबेंचर म्हणून प्रसिद्ध झाली. अनेक लेक्चरला तर ती वर्गात देखील नसे. कट्ट्यावर बसणे सिनेमाला जाणे मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाणे असे सर्व उद्योग तिचे पहिल्याच वर्षात सुरू झाले. आणि अखेर व्हायचे तेच झाले पहिल्या वर्षाच्या शेवटी आलेल्या परीक्षेमध्ये नापास झाली.
या अपयशामुळे मीना खडबडून जागी झाली. आलेल्या या निकालामुळे तिच्या वरती अनेक वाईट विशेषणे लावली गेली की जी तिला अमान्य होती. आता एक वर्ष घरी बसण्याची पाळी आली होती आणि त्यामुळे ती पार खचून गेली. पण आपल्या घरच्यांच्या पाठींब्याने आणि स्वतःच्या आत्मविश्वासाने तिने पुन्हा जिद्दीने लढण्याचे ठरवले. मी अपयशी नाही हे सिद्ध करण्यासाठी तिची धडपड सुरू झाली.
तिला नेहमीच रिटेल इंडस्ट्री बद्दल कुतूहल होतं आणि म्हणूनच या एका वर्षाच्या कालावधीमध्ये तिने दुकानांमध्ये नोकरी करण्याचे ठरले. नोकरीसाठी दुकान निवडताना देखील तिने आपल्या पॅशन शी संबंधित म्हणजेच फॅशन च्या वस्तूंच्या दुकानात नोकरी स्वीकारली. सर्वप्रथम मुंबई येथील माइक कृपलानी फॅशन्स या दुकानात तिला सेल्सगर्ल ची नोकरी मिळाली. दुकानातील सर्व वस्तूंची स्टॉक मेंटेन करणे व त्यासोबत विक्री करणे हे काम तिला सर्वप्रथम देण्यात आलं.
केवळ चारशे रुपये मासिक वेतनावर ती वयाच्या सतराव्या वर्षी नीनाने पहिली नोकरी स्वीकारली. पण या ठिकाणी अशा प्रकारचे जॉब करताना तिला सर्वात मोठा फायदा हा झाला की तिला फॅशन रिलेटेड सर्वच वस्तूंची बारकाईने माहिती झाली. हा जॉब तिचा पार्ट टाइम जॉब होता. आणि त्यामुळे यानंतर देखील अर्धा दिवस तिच्याकडे शिल्लक उरत होता. म्हणून तिने उर्वरित अर्ध्या दिवसासाठी देखील श्याम अहुजा नावाच्या कार्पेट विकणाऱ्या दुकानांमध्ये नोकरी करायचं ठरवलं.
इथलं मासिक वेतन होतं सहाशे रुपये. या दोन्ही दुकानांमध्ये काम करताना नीनाला ग्राहकांच्या अपेक्षा, ग्राहकांशी बोलणे व त्यांना पटवण्याचा कसब शिकायला मिळाला. स्वीकारलेले दोन्ही जॉब्स हे केवळ पैशासाठी करत नसून महत्त्वाचं म्हणजे त्यातून नवे कौशल्य व मॅच्युरिटी निर्माण होत होती.
नीना चे अनेक मित्र मैत्रिणी हे व्यापारी कुटुंबामधून असल्याने व या दोन दुकानांमध्ये चालत असलेल्या उलाढालीमुळे प्रेरित झाल्याने स्वतःचं काहीतरी करावं अशी इच्छा नीनाला निर्माण होऊ लागली. मीनाचे विचारचक्र सुरू झाले आणि नेमका कुठल्या वस्तूचा व्यापार आपण करु शकतो यावर तिचे विचार मंथन अनेक मित्र-मैत्रिणींसोबत करत. आणि अशाच एका चर्चेतून कोणीतरी नीना बद्दलच बोलू लागलं.
नीनाला विविध प्रकारच्या बॅग्स वापरण्याची फारच हाऊस प्रत्येक ठिकाणी जाताना नीना कडे वेगळ्या प्रकारची बाग असे. म्हणजेच नीनाला बॅग्स मध्ये तर इंटरेस्ट होताच पण त्यासोबतच बॅग्स मध्ये कुठला रंग कुठली स्टाईल कुठला पॅटर्न शोभून कुठल्या प्रसंगासाठी उत्तम असतो हे देखील नीनाला चांगलंच कळत होतं. तेव्हा नीनाने बॅगचा व्यवसाय करावा असे एकंदरीत मत सर्वांचं झालं.
नीनाने स्वतः बॅग तयार करण्याचा निर्णय घेतला. पण बॅग्स बनवण्यासाठी सुरुवातीला लागणार होतं ते भांडवल. पगारातून जमा झालेलं भांडवल पुरेसं नव्हतं म्हणून नीनाने आपल्या आईकडे भांडवलासाठी मागणी केली. तेव्हा आईने आपल्या जवळील असलेल्या सेविंग मधून सात हजार रुपये भांडवल स्वरूपात नीनाला दिले.
भांडवल प्राप्त झालं पण बॅग बनवण्यासाठी लागणारे साहित्य व कुठल्या बाजारपेठेत मिळेल याची कल्पना निनाला अजिबातच नव्हती. आज वर अतिशय संरक्षणात राहिलेल्या आणि फारसं जग माहीत नसलेल्या नीनाला व्यवसायासाठी मात्र एकटेच अनेक बाजारपेठांमध्ये फिरावं लागलं. बाजारपेठांमधील गर्दी, तिथे चालणारे हजारो व्यापार, भाव ठरवतांना होणारी फसवणूक व विकत घेतलेल्या मालाचा दर्जा या सर्वच गोष्टींबद्दल अनभिज्ञ असलेल्या नीनाला खूप काही शिकायला मिळालं.
येणारा प्रत्येक अनुभव कटू किंवा गोड काही ना काही नवीन धडा देऊन जात होता. या सर्व अनुभवातून तिने आपल्या काही बॅग्स घरीच तयार केल्या. आता या बॅग्स विकण्याची वेळ आली. विक्रीसाठी पुन्हा बाजारपेठ शोधा, कोण आपल्या बॅग विकायला ठेवतील याबद्दल भीती नीनाच्या मनात होती. म्हणून तिने सुरुवातीला आपण काम करत असलेल्या दुकानातच या बॅग विकण्यासाठी ठेवाव्यात असा प्रस्ताव दुकानाच्या मालका समोर मांडला. मालकाने देखील बॅगची क्वालिटी पाहून होकार दिला.
हळूहळू नीनाने बनवलेल्या बॅग विकल्या जाऊ लागल्यात. त्यामुळे नीनाचा आत्मविश्वास अधिकच बळकट होत गेला. आता तिने इतर दुकानांमध्ये देखील आपला माल विक्रीस ठेवण्यास सुरुवात केली. दुकानांमध्ये मालविक्री ठेवण्यास सोबतच तिने अनेक प्रदर्शनांमध्ये देखील स्टॉल मांडायला सुरुवात केली.
अनेक प्रदर्शनांमध्ये व दुकानांमध्ये तीचा माल झपाट्याने विकला जाऊ लागला. सतत तीन वर्ष बाजारपेठांमधून साहित्य घरी आणावं, त्यावर रात्रभर बसून काम करावं आणि तयार झालेल्या बॅग्स विविध दुकानांमध्ये सप्लाय कराव्या असा उत्तम दिनक्रम नीनाचा सुरू झाला होता.
नीनाच्या बॅग्स बद्दल विशेष सांगायचे झाले तर या सर्व बॅग वेगन आहेत, म्हणजेच या बॅग तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्राण्यांच्या अवयव जसे चामडे, केस, दात इत्यादी वापरलेले नाहीत. आणि ह्याच वैशिष्ट्या पायी नीनाच्या बॅगची लोकप्रियता अतिशय झपाट्याने वाढत होती.
मिळत असलेले यश व त्यातून वृद्धिंगत होत असलेला आत्मविश्वास या जोरावर नीनाने आता आपण स्वतः आपलं दुकान थाटावं असा विचार केला. आपल्या भावाच्या सहाय्याने मुंबई येथील केम्स कॉर्नर येथे एक जागा नीनाने भाडेतत्वावर मिळवली. हे दुकान मांडतांना ती अतिशय विचारपूर्वक रंगसंगती, आतील फर्निचर व प्रकाशयोजना याची काळजी घेतली. वस्तू चांगल्या प्रतीचे असल्याने विक्री सहज रित्या होत होती.
हे होत असताना निनाने काही तत्व पाळले होते. आलेला नफा हा पुन्हा व्यवसायाच्या वृद्धि करताच वापरायचा. वैयक्तिक खर्चासाठी व्यवसायातील पैसे काढायचे नाहीत. आणि आपला व्यवसाय दिवसेंदिवस मोठा होत आहे अशी कल्पना सतत करत राहायची. नीनाच्या मते व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपला व्यवसाय मोठा होता हे, अनेक ग्राहकांची पसंती आपल्या व्यवसायाला मिळत आहे असे नियमितपणे स्वतःला सांगणे या कृतीचा तिला फार फायदा झाला.
बदलत्या ट्रेंड सोबत लोकांच्या गरजा यांचा अंदाज घेऊन आपल्या प्रॉडक्ट मध्ये देखील चटकन बदल करण्याच्या क्षमतेमुळेच नीनाच्या ह्या बॅग्स बाजारात अनेक वर्षांपासून टिकून आहेत. फॅशनला व प्रसंगांना साजेशी रंगसंगती नावीन्यपूर्ण डिझाईन्स आणि माफक दर यामुळे या बॅग्स तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच पसंतीला खऱ्या उतरल्या आहेत.
आपला व्यवसाय मोठा करत असताना अनेक अडचणीना नीनाला तोंड द्यावे लागले. त्यात महिला उद्योजक असल्याने इतर उद्योजकांकडून फारशी चांगली वागणूक मिळत नसे पण तरीही तिने आपले विश्व स्वतः उभे करत असताना इतर महिलांना देखील उभे केले.
कंपनीचे नाव काय असावे यावरून नीना आपल्या मैत्रिणीसोबत चर्चा करत असताना मायकल जॅक्सन यांचे बीट इट या गाण्याच्या ओळी वरून त्यांना “बॅग-इट” असे नाव सुचले. सहज सुचलेल्या या नावाचा आज 125 कोटी रुपयांचा ब्रँड निर्माण झाला आहे. आज 90 हून अधिक शहरांमध्ये बॅग इट चे 1000 हून अधिक औटलेट्स भारतात व भारताबाहेर आहेत. आज ७०० हुन अधिक कामगारांना रोजगार ह्या कंपनीने दिला असून त्यातील बहुतांश महिलाच आहेत. अहिंसा, महिला सक्षमीकरण व मेड इन इंडिया ह्या तरी सुत्रीवर आज हा व्यवसाय दिवसागणिक अनेक नवी यशाची शिखरं पादाक्रांत करत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!