डंजो (DUNZO)
पूर्वीच्या काळी, पडेल ते काम करणारा असा एक गडी माणूस प्रत्येकाच्या घरी असायचा. पण आजच्या युगामध्ये देखील तुम्ही हवं ते काम – अगदी दूध आणून देणे असेल, कपडे इस्त्री करून लॉन्ड्री मधून परत घेऊन येणे असेल, दळण दळून आणणे असेल, एखादं पत्र कुठेतरी पोहोचवणे असेल किंवा अगदी घरचा डबा ऑफिस पर्यंत नेऊन देणे असेल. हे सर्व कामं तुम्ही या ऑनलाईन गड्याला सांगू शकता. आणि या कामांमधून देखील आज अनेक कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केलाय कबीर बिस्वासने. जाणून घेऊयात ‘डंजो’ DUNZO या भन्नाट स्टार्टअप बद्दल.
मुंबई विद्यापीठातून कम्प्युटर इंजिनीअरिंगमधील पदवी संपादन केल्यानंतर प्रतिष्ठीत अशा नरसी मुंजे इन्स्टिट्यूट मधून एमबीएची डिग्री २००७ मध्ये संपादन केली. इन्स्टिट्यूट मधूनच कॅम्पस प्लेसमेंट घेऊन भारतीय एअरटेल या कंपनीमध्ये प्रॉडक्ट आणि सेल्स मॅनेजर म्हणून त्याने तीन वर्ष काम पाहिलं. इथून अवघ्या काही महिन्यांसाठी व्हिडीओकॉन टेलिकम्युनिकेशन्स जॉईन केल्यानंतर वाय सी टू एफ या डिजिटल मिडिया कंपनीमध्ये एक उत्तम संधी चालून आली. डिजिटल मीडिया मधील या कंपनीत तीन वर्ष काम करत असताना हॉपर नावाची स्वतःचीच एक कुपन सर्व्हिस कंपनी सुरू केली. ही कंपनी चांगलं उत्पन्न काम व्हायला लागली आहे असे लक्षात येताच गेमिंग क्षेत्रातील हाईक नावाच्या मोठ्या कंपनीने कबीर ची हॉपर २०१४ मध्ये विकत घेतली.
भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात कबीर पुढील नवीन प्रोजेक्ट बद्दल विचार करत होता. आणि हे करत असताना तो एका रूमवर राहत होता. अर्थातच तिथे आपलं स्वतःचं घर नसल्यामुळे आणि घरातील कोणीही व्यक्ती नसल्यामुळे सर्वच कामं त्याला स्वतःला करावी लागत होती. प्रत्येक लहानसहान गोष्टींसाठी त्याला स्वतःलाच उठून घराबाहेर जावे लागत होते. अगदी टूथपेस्ट आणणे असेल किंवा भाजीपाला खरेदी करणे असेल, प्रत्येक गोष्टीसाठी त्याला स्वतःला आपले हातातले काम सोडून बंगलोरच्या भयंकर ट्राफिक मधून रस्ता काढत बाहेर पडावं लागत होतं.
सहज त्याच्या मनात असा विचार आला की जर कोणी माझ्या हाताशी असतं की त्याला मी हवं ते काम हवं तेव्हा सांगू शकलो असतो तर किती छान झालं असतं. आणि विचारा बरोबरच त्याच्या डोक्यातील उद्योजकाचे विचार चक्र सुरु झालं. माझ्यासारखे असे अनेक तरुण असतील अनेक कुटुंब या शहरांमध्ये असतील की ज्यांच्याकडे छोटी मोठी काम करण्यासाठी बिलकुल वेळ उपलब्ध नाही. मी जर ह्या सगळ्या मंडळीची अडचण सोडू शकलो तर नक्कीच यातून एक मोठा व्यवसाय निर्माण होऊ शकतो. आणि लगेच या कल्पनेची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. चटदिशी त्याने एक व्हाट्सअप वरची इमेज ड्राफ्ट केली. “हवं ते काम, हवं तेव्हा सांगा, केवळ व्हाट्सअपवर मेसेज करा आणि पुढील काही तासातच तुमचं काम पूर्ण झालेले असेल” अशी जाहिरात त्याने सुरू केली.
अवघ्या काही तासातच त्याला पहिली ऑर्डर आली होती. तो लगेच घराबाहेर निघाला आणि ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी स्वतःच पुढे सरसावला. पहिली ऑर्डर पूर्ण केल्यानंतर त्याच्या मनात एक विलक्षण पॉझिटिव्हिटी निर्माण झाली होती आणि तो व्यवसायकडे अगदी बारकाईने लक्ष देऊ लागला. आता मात्र त्याला भूक-तहान झोप कसलीही तमा राहिली नव्हती. केवळ संपूर्ण लक्ष ल व्हाट्सअॅप कडे असायचं. व्हाट्सअॅप चा मेसेज आला की त्याने चटकन आपल्या बाईकची चावी उचलावी, गाडीला किक मारावी आणि हवं ते काम अगदी एका गड्या प्रमाणे करत सुटावं. कुणी कुरिअर करायला सांगत, कुणी दळून आणून द्यायला सांगत, कुणी मेडिकलमधील औषध आणायला सांगत तर कुणी मॉलमधून एक विशिष्ट टी-शर्ट आणून देण्यासाठी सांगत.
दिवसागणिक येणाऱ्या ऑर्डर्स ची संख्या वाढत होती आणि आता कबीरला एकट्याने सर्व ऑर्डर पूर्ण करणे अवघड ठरत होतं. म्हणून कबीरने एका एनजीओ मधील काही मुलं पार्टटाईम घेण्याचं ठरवलं. या मुलांच्या जोरावर आता कबीरचं काम गती घेऊ लागलं होतं. जुलै-२०१४ मध्ये कबीरने आपल्या कंपनीचं नाव ‘डंजो’ असे रजिस्टर केले होते. अवघ्या एका वर्षांमध्ये म्हणजेच जून २०१५ मध्ये दिवसाला ७० ऑर्डर पूर्ण करण्याचा रेकॉर्ड डंजो ने केला होता.
व्यापाराची व्याप्ती वाढते आहे असे लक्षात येताच कबीरने आपल्यासोबत आणखी काही लोकांना घेण्याचा निर्णय घेतला. आणि या प्रक्रियेतच त्याला त्याचे तीन सहसंस्थापक मिळाले. अंकुर अग्रवाल आणि मुकुंद झा हे दोघेजण गुगल कंपनीमध्ये आयटी इंजिनीअर्स म्हणून कार्यरत होते. या दोघांना आपली फिल्टर नावाची स्टार्टअप कंपनी चालवण्याचा अनुभव देखील होता. यांच्यासोबतच यांना चौथा पार्टनर लाभलेला दलवीर सुरी हा देखील मुंबई विद्यापीठातील पदवीधर असून आयबीएन या आयटी कंपनीमध्ये नोकरीला होता. त्यासोबतच सायब्रीला टेक्नॉलॉजीस नावाच्या स्टार्टअपचा ऑपरेशन्स हेड म्हणून देखील त्याचा अनुभव होता. असे हे चौघेजण आधीचा परिचय विशेष नसलेले असून देखील एका यशस्वी कंपनीचे यशस्वी फाउंडर म्हणून आज ओळखले जातात.
आयटी क्षेत्रातील चांगले फाउंडर सोबत येण्याचा फायदा डंजोला उत्तम रीतीने झाला. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी व्हाट्सअप पुरेसे नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच आपल्या कंपनीचे ॲप सुरू केले. आजचे डंजोचे रूप हे कंपनीचे ॲप व वेबसाईटवर आधारित आहे. डंजो चा व्यवसाय बंगळुरु, दिल्ली, गुरगाव, चेन्नई, जयपूर, पुणे, हैदराबाद व मुंबई या प्रमुख शहरांमध्ये विस्तारलेला आहे. आज कंपनीकडे १५०० हून अधिक डिलिव्हरी बॉईज कार्यरत आहेत. कुठल्याही ग्राहकांनी या ॲप वर जावं, आपल्या नजिकच्या डिलिव्हरी बॉय शी संपर्क साधावा. या ॲप मध्ये चॅटिंग सोबतच फोटो पाठवणे अगर व्हिडिओ पाठवणे याची देखील सुविधा आहे. म्हणजे कुठली वस्तू आणायची किंवा दुकानात कुठली वस्तू मिळते आहे याबद्दल ग्राहक व डिलिव्हरी बॉय हे दोघेही एकमेकांना उपलब्ध माहिती पाठवू शकता. ज्यामुळे दिलेल्या कामामध्ये अचूकता निर्माण होते. या ॲप मध्ये डिलिव्हरी बॉयची लोकेशन ट्रॅक करणे देखील ग्राहकाला शक्य आहे. ज्यामुळे तुम्ही सांगितलेलं काम किती वेळात पूर्ण होईल याचा अचूक अंदाज ग्राहक लावू शकतात.
डंजो आपल्या प्रत्येक डिलिव्हरी करता अंतरावर आधारित चार्ज ग्राहकाकडून घेत असतो. पहिल्या ४ किलोमीटर पर्यंत ४० रुपये, ८ किलोमीटर पर्यंत ८० रुपये व त्यापुढील अंतरासाठी १२० रुपये प्रति डिलिव्हरी चार्ज केले जातात. कंपनीच्या वाढत्या यशाचे परिमाण हे त्यांच्या वार्षिक उत्पन्न वरूनच आपण जाऊ शकतो. २०१९ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न हे १७ कोटी रुपयांपर्यंत होते. आणि हेच उत्पन्न २०२० मध्ये ७२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे यावरूनच आपण कंपनीच्या प्रगतीची गती मोजू शकतो.
या प्रवासामध्ये कंपनीला वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून चांगल्या प्रमाणात भांडवल प्राप्त झाले. गुगल एक मोठे निवेशक या कंपनीला लाभले आहे. यासोबतच कॉग्निझंट कंपनीचे माजी सीईओ लक्ष्मीनारायण पटनी वेल्थ ॲडव्हायझर, गरवारे पॉलिस्टरच्या एमडी मोनिका गरवारे या सर्व दिग्गजांनी डंजो मध्ये गुंतवणूक केली आहे. आजवर कंपनीमध्ये १६ गुंतवणूकदारांनी १२ राऊंड मध्ये ६५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. कंपनीचे गुंतवणूकदारांमध्ये मोठी आणि विश्वसनीय नावं असल्याकारणाने कंपनीचे भविष्य उज्ज्वल आहे हे नक्कीच म्हणता येईल.
आज कंपनीचे अनेक मॉल्स ब्रॅण्डेड शोरूम्सशी टायअप झाले असून ग्राहकाला आवश्यक असलेल्या वस्तू डिस्काउंट मध्ये कशा उपलब्ध करून देता येईल याकरता आता कंपनी काम करत आहे. स्विगी, उबर इट्स यासोबतच फार्म इझी, जिओ मार्ट, फ्रेश टू होम अशा अनेक कंपन्या स्पर्धक म्हणून येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढत असतांना देखील डंजो अनेक अडचणींवर मात करून प्रगतीपथावर आगेकूच सतत करत आहे. अनेक बड्या शहरांमध्ये तर डंजो हा अनेक लोकांच्या व्यस्त जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनला आहे.