नाशिकचे गड किल्ले कोणते? असा प्रश्न विचारला असता समोर काही ठळक नावं येतात, जसे साल्हेर, मुल्हेर, ब्रह्मगिरी, अंजनेरी, अनकाई, धोडप इ.इ.. आता हल्लीच्या काळात गिर्यारोहण-गिरिभ्रमण करणार्यांची नित्यनेमाने अशा अनेक नावाजलेल्या गडकोटांवर सारखी ये-जा सुरू असते. कुठल्याही गिरीभ्रमण विषयक पुस्तकांत किंवा गॅझेटिअर्स मध्ये उल्लेख नसणारे काही किल्ले आहेत. असाच एक ‘नवरानवरी’ किल्ला आज बघुया…
सरावाच्या मार्गांवरून थोडं आडबाजूला वापरात नसलेल्या वळणवाटांवर बरीच जिज्ञासू मंडळी फिरत असतात. अपरिचित डोंगर, पर्वत आणि घाटवाटा आपल्याला अचानक त्यांचं अनोखेपण दाखवितात. मग सुरु होतो त्या मागचा इतिहासाचा शोध.
नाशिक जिल्ह्यातल्या नामवंत किल्ल्यांच्या यादीत बिष्टा, भिलाई, अजमेरा, मेसण्या, जातेगाव, प्रेमगिरी, पिंपळागड उर्फ कंडाळा, डुबेरगड, मोरधन, शिडका उर्फ मोहनदर, सोनगड आणि नवरानवरी हे फारसे कुणाला ठाऊक नसलेले किल्ले जोडले गेले आहेत. त्यांना ‘दुर्ग’ म्हणून प्रकाशात आणण्याचं काम केलंय ते म्हणजे नाशिकचे गिरीप्रेमी आणि जेष्ठ इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी.
या यादीतल्या नवरानवरीला जायचं तर नाशिकहून मुंबई महामार्गावरील वाडीवर्हे – मुरंबी – कुशेगाव असा मार्ग आहे. कुशेगावला त्र्यंबक – पेगलवाडी मार्गेही रस्ता आहे. कुशेगाव हे तीन-चार वाड्यांमध्ये वसलेलं आहे. त्यापैकी पक्का डांबरी रस्ता जिथं आंत जातो तिथं एक हनुमानाचं छोटं मंदिर लागतं. ह्या मंदिराच्या वरच्या भागात कोथळा नावाचा एक डोंगर आहे. पण ठराविक टप्प्यानंतर प्रस्तरारोहण करावं लागतं. हनुमानाच्या मंदिरापासून नवरानवरीवर जाण्यासाठी स्थानिक लोक तयार असतात.
वरील बाजूस सपाट असा लांबवर पसरलेला नवरानवरीचा डोंगर दिसतो. खालून डोंगर जरी एकच असला तरी वरच्या बाजूस त्याचे तीन भाग झालेले आहेत. स्थानिक लोक यांना सासरा, बिडा आणि नवरानवरी असं म्हणून ओळखतात. तीनही भाग शेजारीशेजारी असले तरी एकमेकांपासून विलग आहेत. पश्चिम-पूर्व पसरलेल्या या डोंगराच्या एका बाजूला नवरानवरी, दुसर्या बाजूला सासरा तर दोहोंच्या मध्ये आहे तो बिडा. सासर्यावरही जाता येतं असं कळतं. पण बिड्यावर दोर लावावा लागतो. नवरानवरीला दोन सुळकेही आहेत. स्थानिक भाषेत या सुळक्यांची नावं सासू व बामन अशी मजेशीर आहेत.
कुशेगावातून चढाईला सुरूवात केल्यावर आपण प्रथम मातीच्या पायवाटांवरून बिड्याच्या कवेत जाऊन पोहोचतो. त्याच्या उंच कातळाखालून उजवीकडे पुन्हा थोड्या चढाईला सुरूवात होते आणि आपण नवरानवरीला स्पर्श करत कातळातल्या कोरीव अशा खिंडीत पोहोचतो. या कोरीव मार्गात एक दगडी कोनाडा आहे. त्यात आज मुर्ती नसली तरी स्थानिकांच्या सांगण्यानुसार हा डोंगरदेव आहे असं समजतं. ह्या कोरीव खिंडीच्या वरील भागात आपल्या डोक्यावर एक भलामोठा खडक तोलल्यासारखा फसलेला आहे. बाकी बरीचशी पडझड झालेली असली तरी हा मार्ग अगदी कृत्रिमरित्या व्यवस्थित पायर्या व कातळ कोरून निश्चितपणे बनविलेला दिसतो.
नवरानवरी हा किल्ला आहे असं लक्षात येतं. आता काळाच्या ओघात आणि फारसा वापरात नसल्याने बरीचशी झीज झाल्याचं मात्र लक्षात येतं. या मार्गातून आपण थेट नवरानवरीच्या पठारावर प्रवेश करतो. पठारावर पूर्वेच्या दिशेने म्हणजेच उजवीकडे काही अंतरावर एक पाण्याचं तळं दिसतं. हे तळं नैसर्गिक पाणवठ्याचा उपयोग करून अगदी तयार केलेल्या अवस्थेतलं आहे. ते थोडं खणलं किंवा साफ केलं तरी आपणास त्याची रचना कळू शकते. पुढे जातांनाच एका झाडाखाली बांधकामाचे काहीसे अवशेष आढळतात. या पठारावर उंचसखल असे चढउतार तयार झालेत. त्यातल्या पहिल्या व दुसर्या भागाच्या मध्ये एकाबाजूच्या बेचक्यात पाण्याचं एक घडीव टाकं आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार या टाक्यात बाराही महिने पाणी मिळतं. बेचक्यात असल्यानं जनावरं यात तोंड घालू शकत नाहीत त्यामुळे पाणी पिण्यायोग्य आहे. टाक्यात कुठल्या प्रकारचं शेवाळ दिसत नसलं तरीही पाणी पितांना गाळून किंवा क्लोरीनचे थेंब टाकून घेतलं पाहिजे. हे टाकं, त्याआधी बघितलेलं तळं आणि बांधकामावशेष यांवरून नवरानवरी हा पुर्वी किल्ला म्हणून वापरात असावा. या टाक्यापासून संपूर्ण पठारावर चढउताराचा क्रम सुरू ठेवत दुसर्या बाजूला पूर्वेपर्यंतच्या टोकावर पोहोचण्यास साधारण दोन तास लागतात. यावरून आपल्याला गडविस्ताराची कल्पना येते.
पठारावर गावातल्या म्हशी साधारण ३/४ महिने चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या दिसतात कारण पाणी व चाराही मुबलक प्रमाणात मिळत असतो. गावातली काही स्त्री-पुरुष मंडळी पावसाळ्याच्या दिवसांत खेकडे पकडण्यासाठी फिरतांना दिसून येतात. गावातील काही जुनी मंडळी सांगते की पुर्वी येथे ब्रिटीश सैनिकांचा राबता असायचा.
शेजारी असलेल्या अंजनेरी किल्ल्यावरील ब्रिटीशांचे वास्तव्य या गोष्टीला पुष्टी देऊन जाते.
नवरानवरीची उंची साधारण ४००० फूट आहे आणि त्याचं वरील पठार २५० ते ३०० मीटर रूंद असलं तरी ते चांगलं ३ ते ४ किलोमीटर लांबलचक आहे. यावरून त्याची भव्यता आणि विस्तार याची कल्पना आपणांस येईल. पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना सतत ब्रह्मगिरीचे दर्शन होत राहते. उत्तरेकडे ब्रह्मगिरीला लागून मध्ये वैतरणेचं खोरं दिसतं. मधल्या खोर्यात पेगलवाडी व पहिने ही गावं येतात. बाकी तर मग दूरवरचे नजारे बघायला मिळतात.
नवरा आणि नवरी नावाचे सुळके संपूर्ण सह्याद्रीत विविध ठिकाणी आहेत. प्रस्तुत नवरानवरी किल्ल्याला लागूनच असलेल्या अंजिनेरीवरही नवरा – नवरी नामक सुळके गिर्यारोहकांत प्रसिद्ध आहेत. पण त्याच नावाचा हा अलग किल्ला आपणास दिसतो. आपल्यातील जिज्ञासू गिरीप्रेमी मंडळींनी वळणवाट करून दुर्ग नवरानवरीकडे मार्गक्रमणा केली पाहिजे. आणि या किल्ल्याविषयी अधिक माहिती जमा करून त्याचा इतिहास आणि दुसर्या कुठल्या नावाचा उल्लेख असला तर तो नक्कीच शोधून काढला पाहिजे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!