आठवणीत राहावा असा… आठवा डोंगर
…..
सतत गड-किल्ल्यांवर फिरून ट्रेकर्स मंडळी अगदी तयार झालेली असतात. मग ही मुरब्बी मंडळी नवोदितांनाही बोट धरून गडमार्ग दाखवत या पंथामध्ये हळूच सामावून घेत असतात. पण आता नवनवीन वाटा शोधण्याकडे यांचा कल दिसून येतो. प्रत्येकालाच ‘व्हर्जिन प्लेस’ ची तलाश असते. इतिहासप्रसिद्ध, देवस्थानं असलेल्या आणि भौगोलिक महत्त्व असलेल्या ठिकाणी भटक्यांचा राबता हा कायमचाच. किंबहुना त्यावर चढाई करणेही तसे सोपे. पण जर धोपटमार्ग पत्करायचा असेल तर सह्याद्रीच्या रांगांमधून मुख्य शिखरं आणि प्रसिद्ध गड-किल्ले सोडले तर अनेक डोंगर आपल्यासारख्यांची वाट पाहतांना दिसतात. असाच एक भक्कम असा ‘आठवा डोंगर’ नाशिकच्या त्र्यंबक-घोटी रांगेत उभा राहून आमंत्रण देतोय…
आठवा डोंगर… हे कसं नाव आहे ? असा पहिला प्रश्न पडतो. या प्रश्नाच्या उत्तरासाठीच आठव्या डोंगराकडे मार्गस्थ व्हायचं. आठवा डोंगराच्या पायाशी शेवगेडांग हे गाव वसलेलं आहे. शेवगेडांगला जायचं तर नाशिकहून त्र्यंबक – पहिने मार्गे घोटी रस्ता आहे नाहीतर नाशिक – वाडिवऱ्हे कडून त्र्यंबक रस्ता पकडूनही जाता येतं. नाशिकहून साधारण चाळीस किमीचा हा प्रवास. रस्ताही चांगला आहे. शेवगेडांग हे वैतरणा जलाशयाच्या काठाशी येतं. गावात वळण्याच्या फाट्यावर एक छोटंस हॉटेल आहे. बस त्या हॉटेलला लागून एक ठळक पायवाट आपल्याला समोर असलेल्या डोंगराकडे जातांना दिसते. तोच आठवा डोंगर. स्थानिक नांव अनेक आहे. आठवा, अधेला, अधुली इ. कुणी म्हणतं अधुली हे पुर्वीचं एक माप जर उपडं ठेवलं तर त्यासारखा आकार या डोंगराचा आहे.
पण या डोंगराला आठवा हे नांव ब्रिटीशकाळात सर्व्हे करतांना पडलं आहे असं अनेक जण सांगतात. गंमत म्हणजे याच परिसरात पाचवा आणि सोळावा असे अंकीय नांव असलेले आणखी दोन शिलेदार आहेत. त्यांच्याविषयी आपण पुन्हा कधी जाणून घेऊ. तर असा हा हॉटेलाशेजारचा मार्ग पकडून आठव्या कडे चालायला सुरूवात करायची. अगदी काही पावलं पुढे गेलं की पाण्याचा एक नैसर्गिक स्त्रोत इथे दिसतो. चांगलं कुंडही तयार करण्यात आलंय. स्थानिक सांगतात कितीही दुष्काळ आला तरी इथून झिरपणारं हे पाणी कधीही थांबत नाही. आणि यात औषधी गुणधर्म असल्याचेही दाखले दिले जातात. हे पाणी डांग्याखोकला बरा करतं म्हणून या भागात प्रसिद्ध आहे. असो. आपण मात्र आपल्याकडे भरपूर पाणी भरून वर चढाईला निघायचं कारण आठवा डोंगराच्या वर कुठेही पाणी नाही. समोर दिसणाऱ्या गोलाकार भागाला आपल्या डावीकडे ठेवत पायवाटेने चालावं. ही वाट हळूहळू गोलाकार फिरत वर दिसणाऱ्या डोंगराच्या खाचे मध्ये घेऊन जाते. त्या खाचेच्या अलिकडून आपल्या उजव्या बाजूच्या घळीतून डोंगरमाथ्यावर प्रवेश करायचा असा हा मार्ग. अजुन दुसरा एक मार्ग म्हणजे आपण चालत आलेल्या पायवाटेने थोडं वर येऊन वरून थेट आठव्याच्या पुर्व बाजूला म्हणजे आपल्या उजव्या हाताकडच्या टोकाला जायचं आणि तिथून सोपं असा कातळ चढत डोंगरमाथ्यावर प्रवेश करायचा. पण एका मार्गाने चढून दुसऱ्या मार्गाने आपण उतरू शकतो. आता स्थानिकांशिवाय सहसा कोणी वर जात नाही. ते लोकही फार तर गुरं चरवण्यासाठी जातात. या चढण मार्गावर जी घळ दिसते त्यात बऱ्यापैकी झाडी-झुडूपं माजलेली आहेत. जर अगदी संथ गतीने आपण चढत असू तर त्या दगडादगडांच्या घळीतून बरोबर जाणारी ही वाट साधारणतः तासाभरात आपल्याला वर घेऊन जाते. आपण आठव्याच्या माथ्यावर आलेलो असतो. माथ्यावर मस्त गवताचं कुरण पसरलेलं आहे. मध्यभागी काहीतरी वास्तू बांधकामासारखे एक अवशेष आहे. बाकी एकही मोठं झाड नाही. पावसाळ्यात मात्र भरपूर पाण्याची तळी आणि सह्याद्रीतील अल्पायुषी रानफुलं इथे दिसून येतात. काहीही नाही तरी पण इथं तर आठव्याडोंगराचं अनोखेपण या माथ्यावर सुरु होतं. आठवा डोंगर हा वर संपुर्ण सपाट असून त्याचा पसारा फारच पसरलेला दिसून येतो. मग काय डोंगरमाथा फेरी करायची आणि हे अनोखेपण शोधून काढायचं.
असं काय आहे की आपण आठवा डोंगरावर यावं…? त्याचं उत्तर आहे की इथून दिसणारा नजारा. आपल्या नाशिक परिसरातल्या अनेक डोंगररांगा, गड-किल्ले यांचं एकाच वेळेस होणारं दर्शन. दोन-चार नाहीत तर तब्बल चाळीस ते पन्नास प्रमुख शिखरं इथल्या एकाच भेटीतून दृष्टीपथात सामावण्यासाठी आठवा डोंगरावर यावं. माथ्यावरून शेवगेडांगच्या बाजूला म्हणजे साधारण दक्षिण दिशेकडे वैतरणेच्या पाण्याच्या पलिकडे सह्याद्रीचे बळकट असे कुलंग, मदन, अलंग, किर्डा, कळसूबाई ही बलाढ्य रांग तर त्याच्या खाली कावनई, बुधला, ढोऱ्या, इगतपूरीची डोंगररांग, त्रिंगलवाडी असे सर्व काही एकाच वेळी एकाच फ्रेममध्ये सामावून जातात. साधारण पुर्वेकडे कोथळाडोंगर अतिशय जवळ दिसतो. त्याच्या पाठीशी आहे तो डांग्यासुळका, तळेगावचे डोंगर, रांजणगिरी, बेळगाव ढग्याकडचे डोंगर, देवळाली कडील रायगड, बहुला आणि त्या पाठीमागे अवंढा आणि विश्रामगड ही सर्व नावं लिहितांनाही दमछाक होते आहे. पांडवलेणी सुद्ध दिसतो बरं इथून. डोंगराच्या मागच्या बाजूला म्हणजे उत्तरेकडे अगदी लागून नवरानवरी हा संपूर्ण दिसतो. त्याचे सुळके, सासेर, बीडा ही अनोखी आणि वेगळ्या धाटणीची डोंगरं, त्याच्या बरोबर पाठिमागे असलेला ब्रम्हगिरी पंचलिंग, त्याशेजारी संपुर्ण अंजनेरी तर वेगळ्या कोनातून बघायला वेगळीच मजा येते. ब्रह्मा, हरिहर, फणीचा डोंगर, भास्करगड आणि उतवड अशी सर्वच्या सर्व त्र्यंबक उपरांग एकाच वेळी आपल्याला खुणावते. आणि जलाशयांचं तर राहीलंच. वैतरणा, अळवण, दारणा, मुकणे असे सर्व जलाशय आपल्या निळ्या शेपट्या पसरवून शेतजमिनी ओल्या करतांना दिसून येतात.
बुद्धिबळाच्या पटावर प्याद्यांपासून ते राजापर्यंत, काळ्या आणि गोऱ्या जशा सर्व सोंगट्या मांडून ठेवलेल्या असतात ना तसंच इथूनही दिसणारे हे सर्व पर्वत शिखर भासतात. मग आपल्या बुद्धिच्या बळाने ओळखायची त्यांची नांवं… सर्वच्या सर्व. खरं सांगायचं तर हाडाच्या भटक्यांसाठी असे डोंगर म्हणजे त्यांच्या स्वप्नात असतो तसा आडमार्ग… अनटच आणि अनवट ठिकाण.