लहानगा शिलेदार डुबेरगड
अगदी रमतगमत, हलकीशी चढाई करत, कुटूंबातील बाळगोपाळांसकट सर्वांना लहानगा ट्रेक करायचा असेल तर डुबेरगड अगदी योग्य ठिकाण ठरते. अगदी तासाभरात संपूर्ण किल्ला बघून आपण परतीच्या मार्गावर लागू शकतो. पायथ्याशी असलेल्या प्राचीन डुबेरे गावातही काही अनोख्या गोष्टी दडलेल्या असल्याने डुबेरगडाच्या भटकंतीसोबत त्या बोनस म्हणून मिळतात.
नाशिकच्या सिन्नरपासून अगदी १३ कि.मी. अंतरावर लहानसे डुबेरे गाव वसलेले आहे. सिन्नरहून दर अर्ध्या तासाला डुबेरेला जायला एस. टी. बसेस् मिळतात. सिन्नर भागातल्या किल्ल्यांच्या रांगेच्या सुरुवातीचे पहिले ठिकाण म्हणजे डुबेरगड होय. डुबेरे गावाला लागूनच डुबेरगड उभा आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची ७९५ मीटर (२६०७ फूट) असली तरी पायथ्यापासून फार उंच नाही. गावातून थेट पायथ्याशी जाण्यासाठी रस्ता आहे. डुबेरगडाच्या पायथ्याशी एक मोठा आश्रम बांधलेला आहे. या आश्रमात शंकराचे मंदिर असून इतरही देवीदेवता स्थापन केलेल्या आहेत. आश्रमाला लागूनच मागच्या बाजूने वर जाण्यासाठी पायर्या दिसतात. पायर्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी रेलिंग्ज् बसविलेल्या आहेत.
अगदी सोप्या आणि ठेंगण्या पायर्यांनी रमतगमत गडमाथा गाठण्यासाठी २०-२५ मिनिटे पुरेशी आहेत. डुबेरगडाचा माथा तसा भला मोठा नसला तरी सपाट आणि विस्तृत आहे. माथ्यावर पाण्याची दोन मोठी कातळकोरीव टाकी आहेत. तसेच पावसाळी पाण्याने भरणारा एक मोठा तलाव आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र हा तलाव कोरडा असतो. बाकी गवताळ माळामध्ये गायीगुरं चरायला येत असतात. माथ्यावर एक पडकी इमारत आहे. पोलिस यंत्रणेच्या कामासाठी ही इमारत उभी केली गेली पण वापरात नसल्याने खंडर झालेली आहे. त्याच्या पुढेच सप्तशृंगी देवीचे टूमदार मंदिर आहे. देवीची मुर्ती प्रसन्न असून हुबेहूब गडावरच्या देवीची प्रतिकृती आहे. इतर दिवसांत तुरळक लोक दर्शनासाठी येत असतात पण अश्विन नवरात्रीच्या दिवसांत दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी होते.
बाकी माथ्यावर काही नाही पण इथून म्हाळुंगी नदीचं खोरं उत्तम रित्या न्याहाळता येतं. अनेक वळणं घेत फिरणारी ही म्हाळुंगी हा परिसर ओला करत हिंडते. माथ्यावरून दिसणारा आड किल्ला अगदी नखशिखांत नजरेच्या टप्प्यात येतो.
आता आपल्याला प्रश्न पडतो की, ‘डुबेर्याच्या या डोंगराला किल्ला का म्हणायचं?’ तर, आपण ज्या बांधीव पायर्यांनी चढाई केली त्या पायर्यांच्या खाली पूर्वीच्या कोरीव पायर्या दाबल्या गेल्या आहेत. तसेच पाण्याची टाकी आणि दबले गेलेले काही बांधकामावशेष गतकाळी वापरात असलेल्या किल्ल्याची साक्ष देतात. पुढचा प्रश्नही तयारच असतो, ‘ मोक्याचे ठिकाण नाही तरी डुबेर्यावर किल्ला का बनविला असावा?’ तर, एक संरक्षक ठाणे म्हणून त्यावर किल्ला असावा. सिन्नर शहराला प्राचीन काळापासून महत्त्व होते.
सिन्नर हे भल्यामोठ्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे वेशीच्या आतमध्ये वसलेलं गाव होतं. सिन्नरहून जवळच असलेल्या पट्टागड उर्फ विश्रामगडाचे ऐतिहासिक महत्त्वही फार आहे. सिन्नर ते पट्टागडच्या मार्गावर आडव्या येणार्या डुबेरवर संरक्षक किल्ला बांधणे स्वाभाविक वाटते.
आटोपशीर भ्रमंती करून पायथ्याशी असलेल्या डुबेरगावात फेरफटका मारायला मात्र विसरायचं नाही. कारण, मराठ्यांची विजयी ध्वजा आपल्या प्रकांड शौर्याने अटकेपार पोहोचविणार्या थोरल्या बाजीरावाचे हे जन्मस्थान होय. बाजीरावांच्या आजोळीचे आडनाव बर्वे होय. डुबेरवाडीतल्या बर्वेंच्या कन्या राधाबाई यांचा बाळाजी विश्वनाथांबरोबर विवाह झाला. त्यांचे पहिले बाळांतपण माहेरी झाले आणि त्यांनी तेजरत्न पहिल्या बाजीरावास जन्म दिला. आजही बर्वेंचे वंशज त्यांच्या भुईकोट किल्ल्यासारख्या वाड्यात मानाने राहतात.
जिज्ञासेपोटी गेलेल्या प्रत्येकाला बाजीरावाच्या जन्माची खोली, त्यातला पलंग आणि काही शस्त्रास्त्र आपुलकीने दाखवितात. बर्वे वाडा वास्तुशास्त्रिय दृष्टिकोनातून बघण्यासारखा आहे. ढोक नदीच्या काठावर उभारलेल्या या वाड्याचे बाहेरच्या बाजूला बुरूज, त्यावर तटबंदी, जुन्या धाटणीच्या विटांनी बांधलेल्या भिंती, आतील बाजूला असलेले लाकडी काम हे सर्व बघून आपण थक्क होतो. वाड्याच्या पाठीमागे कोरड्या नदीपात्रात एक मोठा गोलाकार तोफगोळाही पहायला मिळतो. आता बर्वेंच्या एवढ्या साम्राज्याला संरक्षण म्हणूनही डुबेरगडाचा चौकीसारखा वापर होत असावा असा निष्कर्ष काढता येतात.
अजून दोन अनोख्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे सटुआई देवीचे मंदिर. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या कपाळी प्राक्तन (भविष्य) लिहिणार्या सटवाई देवीचे हे एकमेव मंदिर येथे आहे. ‘सटीचा लेखाजोखा न चुके ब्रह्मादिका’ असं म्हटलं जातं. या मंदिरात तांदळा सारखी जूनी मूर्ती असून नव्याने पंचधातूची अत्यंत देखणी मूर्तीही स्थापन करण्यात आली आहे. नवस बोललेले लोक लांबलांबून दर्शनासाठी येथे येतात.
दुसरी गोष्ट म्हणजे डुबेर गावात असलेले ‘भोपळ्याचे झाड’. आपण भोपळ्याचा वेल ऐकलेला आणि बघितलेला असतो पण भोपळ्याचे झाड बघायचं असेल तर ते फक्त डुबेरवाडीतच. कुतुहलापोटी अनेक वृक्षप्रेमी आणि जिज्ञासू लोक हे झाड बघण्यास येतात. आताशा याला अनेक भोपळे लटकलेले दिसून येतात. अधिक संशोधनातून असं समोर आलंय की, हे मुळचे दक्षीण अमेरीकेतील विषुववृत्ती प्रदेशातील झाड आहे. इंग्रजीतून ‘कॅलॅबश ट्री’ (Calbash tree) असं नाव असलेले हे झाड शास्त्रीय भाषेत ‘बिग्नेनिएसी’ कुळातील ‘क्रिसेन्शीया कजेटा’ (Cresentia Cyjeta) या नावाने ओळखले जाते. हिंदीतून कोणी याला विलायती बेल असं संबोधतात. या झाडाखाली एका पीरबाबाची समाधी आहे. स्थानिक लोक सांगतात की, या पीराने हा वृक्ष येथे रूजवला. आपण मात्र भोपळ्याच्या या झाडासोबत मस्त सेल्फी काढून आपल्या मित्रांना हे आश्चर्य दाखवू शकतात.