दुर्गम भूपतगड
नाशिककरांची वीकएण्ड लाँगड्राईव्हसाठी सर्वात पहिली पसंती असते ती त्र्यंबकेश्वर आणि जव्हार रस्त्याची. त्र्यंबक-जव्हार रस्त्याला निसर्गदेवतेची विशेष कृपा आहे. जव्हारपासून अगदी १६ कि.मी. अंतरावर दुर्गम भागात ठिय्या मांडून बसलेला भूपतगड अस्सल भटक्यांसाठी अगदी निराळा किल्ला आहे…
पूर्वी म्हणजे पंधरा-वीस वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे अगदी दुर्गम भागातल्या जंगलातून जाणारा अवघड रस्ता असं वाटत असे. त्यावेळेस भर दिवसासुद्धा रातकिड्यांचा ‘किरर्रर’ आवाज थेट जव्हारपर्यंत साथ देत असे. आता मात्र झाडी विरळ झालेली असली तरी अजूनही वळणघाटांचा हा रस्ता ड्रायव्हिंगमध्ये रोमांच भरतो. मुंबई किंवा ठाण्याकडून येणाऱ्या मंडळींसाठीही त्या बाजूने जव्हारपर्यंत येणारे आतले रस्ते त्यांच्या धकाधकीच्या रस्त्यांच्या मानाने सुखावह ठरतात. जव्हारच्या परिसरात पसरलेला निसर्ग आणि त्यात जोपासली जाणारी आदिवासी लोकसंस्कृती सर्वांनाच परिचयाची आहे. इथला बोहाडा, होळी आदी आदिवासी सण साजरे करण्यासाठी तसंच अभ्यासण्यासाठी दूरवरच्या पर्यटकांची हजेरी असते. जव्हारपासून अगदी हाकेच्या अंतरावर गर्द झाडीत दडलेला भूपतगड हा भटक्यांसाठी एक अनोखा किल्ला. जव्हारसमीप असा दणकट आणि दुर्गम किल्ला आहे याची अनेक ट्रेकर्सना कल्पनादेखील नसते.
नाशिकहून एकदा का त्र्यंबक सोडून पुढे जव्हार रस्त्याला वळण घेत पुढे सरकतांना मागे वळून पाहत राहील्यावर त्र्यंबकरांगेतले ब्रह्मगिरी, हरिहर, फणी, भास्करगड आणि बळकट असा उतवड हे वेगवेगळ्या अॅंगलमधून निराळा आकार दाखवत असतात. पुढे मोखाडा-जव्हार-खोडाळा-घोटी असा जो परिसर आहे त्यात परसलेली डोंगररांग आणि त्यांच्या रचना या समजायला जरा क्लिष्ट आहेत. त्यात भरपूर झाडोरा असल्याने जवळ गेल्याशिवाय त्या डोंगरांचा पूर्ण आकारही लक्षात येत नाही. गाडी रस्ता असो किंवा पायवाट, ती सतत वळणं घेत असल्याने इथले डोंगर पटापट दिशा बदलत अवतीभोवती फिरतात त्यामुळेही गोंधळायला होतं.
जव्हारवरून निघणारा एक रस्ता चोथ्याचा पाडा, केळीचापाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत आपण १६ किलोमीटरवरील झाप नावाच्या गावात येऊन मिळतो. जव्हारहून झापला दर तासाभराने एसटीची देखील व्यवस्था आहे. त्यामुळे झापवरून भूपतगडाच्या पोटात जाणारा एक जीप रस्ता चिंचपाडा नावाच्या वस्तीला जाऊन मिळतो. इथे गाडी लावायची आणि थोडं वर चढत गडाच्या पहिल्या पठारावर पोहोचायचं. याठिकाणी पाषाणात कोरलेली काही पावलं आहेत. स्थानिक लोक याला ‘सीतेची पावले’ म्हणतात. दोन चौकोनी घडीव दगडांवर प्रत्येकी दोन पावलं कोरलेली आहेत. ही चार पावलं ‘राम-सीता-कुश-लव’ यांची आहे असं सांगितलं जातं.
खालच्या चिंचपाड्यातून इथपर्यंत रस्ता होतो आहे आणि पावलांपाशी झेंडा उभा करून अनेक लोक दर्शनालाही येतात त्यामुळे लवकरच इथे मंदिरही बांधलं जाणार असं दिसतंय. या पठारावरून गर्द वनराईने भरलेला भूपतगड दिसतो. त्याच्या माथ्याच्या दिशेने जाणारी पायवाटही ठसठशीत दिसते. दगड रचून आणि मातीच्या ट्रॅकसारखी बनवलेली ही वाट आपल्याला अगदी वीस मिनिटांत माथ्यावर पोहोचवते. उन्हाळ्याच्या या दिवसांतही शितलता देणारी निंब, पळस, आंबा, मोह, वड, पिंपळ, करवंद, जांभूळ, बाभूळ, निलगिरी, साग अशी मोठी वृक्ष छोट्या झुडूपांमधून मान उंच करून डोलत असतात. उर्वरीत भाग गवताने झाकलेला भूपतगड अनेक आजही वनसंपन्न आहे. किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश करतांना मुख्य प्रवेशद्वार आपलं स्वागत करतं. प्रवेशद्वाराची कमान पुर्णतः ढासळली आहे तर उरलेले दोन भव्य बुरूज त्या द्वाराच्या भव्यतेची साक्ष देत उभे आहेत. किल्ल्याच्या वर असलेल्या वास्तूंमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठीचा पन्हाळासारखा दगडी मार्ग उजवीकडच्या एका बुरूजातून बाहेर निघालेला आहे. गडमाथा विस्तृत असून संपूर्ण बाजूंना तटबंदी आणि अनेक बुरूज बांधून मजबूत केलेला दिसून येतो. दुर्दैवाने ही तटबंदी आणि बुरूज ढासळलेल्या अवस्थेत बघायला मिळतात. तटबंदी ठिकठिकाणी फुटलेली आहे. उंच सखल माथ्यावरून हिंडतांना काही कोरीव पायऱ्याही लागतात. अनेक ठिकाणी पहारेदाऱ्याच्या चौकी, जोती तसेच विखूरलेले दगडी चिरे दिसतात. पण साधारण बालेकिल्ल्यासारख्या उंचवट्यावर एक भव्य राजवाड्याचे अवशेष आहेत. चार मोठाल्या रूंद भिंती आणि चारही कोपऱ्यांत बांधीव बुरूज बघून या राजवाड्याच्या भव्यतेची कल्पना येते.
राजवाड्याच्या उत्तर दरवाज्यात एक मोठ्या विहिरीसारखे टाके असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आणि कमानीयुक्त दरवाजा आहे. बाकी माथ्यावर पाच-सहा पाणटाक्यांचा समुह असून त्यातून खाली जाणारे पाणी आडवून त्यावर बंधाऱ्यासारखी भिंत बांधलेली आहे. या बंधाऱ्याने अडविलेले पाणी आटले की त्या तलावात अरूंद तोंडाच्या दोन विहिर तयार केलेल्या दिसतात. बाकी किल्ल्याचे आराध्य दैवत ‘हनुमंत’ आणि रक्षक देवता ‘म्हसोबा’ आपल्याला दर्शन देऊन आशीर्वाद देतात. गडमाथ्यावरून शेजारी असलेल्या सूर्यमाळ परिसरातल्या डोंगरांगेबरोबरच लांबवर उंचावलेले त्र्यंबकरांगेतील शिलेदार खूणावत असतात. खालच्या बाजूला पिंजाळ नदीचे खोरे अतिशय रम्य भासते. पिंजाळ नदी खडकाळ दऱ्यांमधून अनेक गोलकार वळणं घेत तिथल्या प्रत्येक डोंगराला स्पर्श करते. तिच्या काठावर छोटछोटे कौलारू वस्तीपाडे शांततेत पहूडलेले दिसतात.
सह्याद्रीच्या निर्मितीत तयार झालेल्या ‘ट्रॅप’ च्या रचनेत ‘बसाल्ट’ आणि ‘अमिग्डालॉईड’ यां थरांची क्लिष्ट अशी रचना दिसते. ‘बसाल्ट’ म्हणजे सूक्ष्म कणांचा सघन अग्निजन्य मॅग्मा खडक तर ‘अमिग्डालॉईड’ म्हणजे विरळ, ठिसूळ अग्निजन्य खडक होय. भूपतगडमाथ्यावर दोन्ही खडकांचे प्रकार एकाच ठिकाणी बघायला मिळतात. काही वास्तूंमध्ये विशेषतः काही टाक्यांमध्ये ‘अमिग्डालॉईडचा’ सच्छिद्र लालसर असा थर बघायला मिळतो.
भूपतगडावर येण्यासाठी तसं पलिकडच्या कुर्लोट गावातूनही वाट आहे. मात्र ही वाट खडी चढाईची समजली जाते. आम्ही मात्र मोखाडा-देवबांध-पेठ रस्त्याकडे लागणाऱ्या पेठेची वाडी या गावातून वर चढलो. हा मार्ग भूपतगडाला नजीक दिसत असला तरी सर्वात जास्त खड्या चढाईचा आहे. ऋतु बदलतात तसे डोंगररांगा रंग बदलतात. आजही दुर्गमतेत ठिय्या मांडून बसलेला भूपतगड प्रत्येक भेटीत त्यांचं नाविन्य दाखवितो.
कसे जाणार
नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे मोखाडा – जव्हार किंवा इगतपूरी- कसाराघाटामार्गे जव्हार
ठाण्यातून कल्याण – भिवंडी – वाडा – विक्रमगड – जव्हार
मुंबईहुन पश्चिम द्रुतगती मार्गाने बोरीवली -मनोर -विक्रमगड – जव्हार
भौगोलिक स्थान
भूपतगडाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. जव्हार ते त्र्यंबक या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भूपतगडाची निर्मिती करण्यात आली. प्राचिनकाळी डहाणू, (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा घाट तसेच थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्र किनार्यावर डहाणूचा किल्ला तसंच तांदूळवाडी, कोहोज सारखे किल्ले आहेत. तिथून घाटमाथा सुरु होण्याच्या मार्गावर भूपतगड आणि अगदी वरच्या अंगाला त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत बसगड (भास्करगड), हरिहर, त्र्यंबक, त्रिंगलवाडी हे गड बांधण्यात आले.
इतिहास
इ.स. १७७४ साली तालुके वसईची मामलत विसाजी केशव यांनी किले भोपतगड, वज्रगड, इंद्रगड, अजुर्नगड, असावा, काळदूर्ग, बल्लाळगड, सेगवा या किल्ल्यांचा बंदोबस्त करायचा आहे असा उल्लेख आढळतो. या किल्ल्यांच्या जोडीने मांडवी, केळवे, माहीम, शिरगाव, तारापूर, डहाणू, वसई आणि अर्नाळा या कोटांचीही नावे बंदोबस्ताच्या यादीत दिसून येतात.