धोडप किल्ल्याची भ्रमणगाथा
धाडसी पर्यटनासाठी ख्यात असलेला धोडप किल्ला हा अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. धोडप किल्ल्याच्या या माथ्यावरून सातमाळा पर्वत शिखररांगेचा अद्भुत नजारा दिसतो. आज जाणून घेऊ या साहसस्थळाविषयी…
पायथ्याशी असलेल्या हट्टी गावापासून धोडप किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी साधारण २० मिनीटे लागतात. पायथ्याला असलेल्या एका झाडाखाली मारुतीची शेंदूर लावलेली मुर्ती आहे. इथून चढाईला सुरुवात केल्यावर धोडपच्या माचीवर म्हणजे पहिल्या सपाट अशा विस्तृत पठारावर चढून जायला साधारण ४५ मिनीटे लागतात. वाटेत बंधीव अशी तटबंदी दिसून येते. ही मुघल काळात बांधली गेली असावी.
माचीच्या सपाटीवर आल्यावर चार फूट उंच आणि रेखीव बांधणीची मारुतीची घुमटी आहे. हे घुमटी वजा मंदिर फार चांगल्या स्थितीत असून ते पेशवे काळात बांधली गेली आहे. इथून एक वाट समोर दिसणाऱ्या इखारा सुळक्याकडे जाते. विखारा सुळक्याकडे जाणाऱ्या वाटेवर सुव्यवस्थित असा सुंदर धाटणीचा बुरुज आहे. हा बुरुज बघून पुन्हा मारुतीच्या घुमटीकडून धोडप किल्ल्याच्या दिशेने आल्यावर पहिलं प्रवेशद्वार लागतं. हे भलं मोठं चांगल्या अवस्थेतलं प्रवेशद्वार दोन भक्कम बुरूजांसकट उभं आहे. प्रवेशद्वाराच्या एका बाजूच्या खांबावर देवनागरी लिपीतला शिलालेख आहे. प्रवेशद्वारातून सरळ आंत गेल्यावर आणखी एक मारुतीची घुमटी आहे. त्यानंतर एक सुंदर अशी बारव म्हणजेच पायऱ्यांची विहीर इथे बघायला मिळते.
उत्तम अशा विटांच्या सुबक कमानी आणि त्यातून उतरण्यासाठी केलेल्या भक्कम दगडी पायऱ्या अशी या बारवेची रचना आहे. साधारण पेशवेकालीन बांधकामाची साक्ष देणारी या बारवेमध्ये बाराही महिने पाणी आढळते. साधारण तेरा ते चौदा पायऱ्या असलेली ही बारव म्हणजे वास्तूकलेचा अत्यंत उत्तम नमुना आहे. एवढ्या उंचीवर किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी बांधलेली बारव आपल्याला त्या काळातल्या जल व्यवस्थापनेविषयी कल्पना देते. पुढे सोनारवस्ती नामक काही घरांची छोटी वाडी आहे. आजही लोक इथे राहतात.
वस्ती ओलांडून पुढे एखादी महत्त्वाची इमारत असावी असा एका मोठ्या घराचा चौथरा म्हणजेच जोतं इथे आहे. या जोत्यावरच चुन्याच्या घाणीसाठीचा गोलाकार जातं पडलेलं आहे. या पायवाटेने पश्चिमेकडे आणखी पुढे गेल्यावर डावीकडे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि उजवीकडे गणपती मंदिर आहे. पेशव्यांच्या ताब्यात असलेल्या अनेक किल्ल्यांवर शंकर आणि गणपतीचे मंदिरे आहेत. त्यामुळे त्यांच्या रचनेवरून आपल्याला पेशव्यांच्या वास्तुरचनेचा अंदाज येतो. सिद्धेश्वर मंदिरातील पिंड आणि गणपतीच्या मंदिरातील मुर्ती अतिशय सुरेख आहेत. मंदिराच्या जवळचं पाण्याचं टाकं आहे. देवपुजेसाठी आणि पिण्यासाठी या टाक्यातल्या पाण्याचा वापर केला जातो. या पायवाटेने आणखी पुढे म्हणजेच पश्चिमेकडे गेल्यावर उजवीकडे पहारेकऱ्यांची प्रशस्त देवडी आणि भक्कम बुरूज-तटबंदी बघण्यासाठी आहे. याला गवळीवाडीचं प्रवेशद्वार म्हटलं जातं.
सोनारवस्तीतून एक ठळक पायवाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते. ही पायवाट थेट उभ्या अशा कातळकड्याला भिडते. त्या कड्यात कोरलेल्या साधारण ४०-४२ पायऱ्या आहेत. पायऱ्या अवघड नाहीत मात्र थोड्या काळजीपूर्वक चढयला लागतात. तिथून वर आलं की थोडं ढासळलेल्या अवस्थेतलं दुसरं प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या आत पहरेकऱ्यांसाठी देवडी आहे. या प्रवेशद्वारापासून पुर्वेकडे सलग अशी तटबंदी बांधलेली दिसते. या तटबंदीवर चऱ्या आहेत. दुसऱ्या प्रवेशद्वारापासून आंत गेल्यावर दरवाजाच्या वरच्या बाजूस पाण्याचं खोदीव टाकं दिसतं. या टाक्यापाशी गणपती, मारुती आणि देवीची मुर्ती कोरलेली आहे. या मुर्ती साधारण दोन फूट उंचीच्या आहेत. या पाण्याच्या टाक्यात पाणी झिरपण्यासाठी खडकात कोरून पाण्यासाठी केलेले मार्ग बघण्यासारखे आहेत.
दुसऱ्या प्रवेशद्वारातून वर जातांना डावीकडे भक्कम अशी तटबंदी सलग गेलेली दिसते. इथून वरच्या माचीवरची ह्या तटबंदीने वळसा मारत पुर्वेकडे जाणारी पायवाट एकदम वरच्या खडकाच्या दिशेने जाते. या खडकात सलग कोरून संपूर्ण पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे. या पायèयांच्या मार्गावर फारसी लिपीत कोरलेले दोन मोठे शिलालेख बघायला मिळतात. पायऱ्या चढून गेल्यावर कातळात बोगद्याप्रमाणे कोरून तयार केलेलं तिसरं प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या पायथ्याशी हेमाडपंथी मंदिरात आढळतात अशी दोन किर्तीमुखं कोरलेली आहेत. या प्रवेशद्वारावर लाकडी दरवाजा तसेच आडवा ओंडका अडकविण्यासाठी मोठ्या खोबणीही कोरलेल्या आहेत. वर किल्ल्यात प्रवेश केल्यावर थोडं वर भग्नावस्थेतील एक इमारत इतिहासाची साक्ष देत उभी आहे. या इमारतीचा बराचसा भाग जरी ढासळलेला असला तरी उरलेल्या अवशेषांतूनही तिचे रांगडेपण जाणवतं. इथेही पाण्याची दोन टाकी आहेत.
आजूबाजूला अनेक बांधकामाशेष दिसून येतात. समोरच धोडपचा उभा सुळका भक्कमपणे उभा असलेला दिसतो. हा सुळका म्हणजेच ‘व्होकॅनिक प्लग‘ची अनोखी रचना आहे. या सुळक्याच्या पायथ्याच्या थोड्या वरच्या भागात कोरीव अशा आयताकृती गुहा आहेत. यात बसून या माचीवर संपूर्ण लक्ष ठेवता येत होते. सुळक्याच्या दिशेने जाणारी पायवाट सुळक्याला उजवीकडे ठेवत पश्चिम दिशेला असलेल्या गुहांमध्ये जाते.
इथे शेवटी देवीचं मंदिर असलेली मोठी गुहा आहे. या गुहे शेजारीच स्वच्छ आणि थंडगार पाण्याचं टाकं आहे. लांबलांबून भाविक मोठ्या भक्तिभावाने या देवीच्या दर्शनासाठी धोडपवर येतात. या गुहेपासून समोर एक चिंचोळी भिंत आकाशात घुसलेली दिसते. ही नैसर्गिक qभत म्हणजेच भूस्तरीय रचनेची ‘डाइक‘ होय. या डाईकवर पडलेल्या नैसर्गिक खाचेपर्यंत जाता येते. इथे रेलींग बसवलेले आहे त्यामुळे त्यावरून चालत जातांनाचा धोका कमी झालेला आहे. धोडप किल्ल्याच्या या माथ्यावरून सातमाळा पर्वत शिखररांगेचा अद्भुत नजारा दिसतो. हा नजारा बघण्यासाठी गिर्यारोहकांबरोबरच अनेक पर्यटकांची मांदियाळी धोडपवर कायमच असते.
भौगोलिक स्थान आणि महत्त्व
धोडप किल्ला हा सातमाळा पर्वत रांगेच्या साधारण मध्यावर उभा आहे. तसेच नाशिक जिल्ह्याच्या नकाशावरही त्याचं स्थान अगदी मध्यावर येतं. चांदवड आणि कळवण अशा दोन तालुक्यांना विभागणाऱ्या बरोबर सीमेवर धोडप किल्ला उभा आहे. त्यामुळे आज धोडप किल्ल्याचे भौगोलिक स्थान लक्षवेधी आहे.
पुर्वीच्या काळी किल्ले बांधतांना सर्वप्रथम त्या किल्ल्याच्या भौगोलिक ठिकाणाचं महत्त्व लक्षात घेतलं जायचं. सातमाळा पर्वतरांगेच्या पुर्वेकडे चांदवड भागात खान्देशाकडून आणि बागलाण प्रांताकडून येणारे प्रमुख रस्ते होते. तसे ते घाटरस्ते आजही वापरले जात आहेत. त्याचप्रमाणे या रांगेच्या पश्चिमेकडे असणाऱ्या हातगड किल्ल्याकडून कांचनघाट नावाचा प्रमुख मार्ग गुजरातेतून येत असे. सातमाळेच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशांचे हे घाटमार्ग प्राचीन काळापासून मुख्य व्यापारी मार्ग म्हणून वापरले जात असत. धोडप हा त्या दोन्ही कडच्या व्यापारी मार्गांच्या मध्यावर असल्याने इथून आजूबाजूच्या परिसरावर वचक ठेवण्यासाठी म्हणून किल्ला बनविण्यात आला असावा.
धोडपवर जर शिबंदी ठेवली तर ती या घाटमार्गांवर काही गरज पडल्यास पटकन पोहोचवता येत होती. धोडप जर ताब्यात असला तर साधारण सातमाळेतले अचला, अहिवंतापासून ते इंद्राईपर्यंतचे किल्ले सहज ताब्यात येत असत. मुघल काळात अल्लाहवर्दीखान याने राबवलेल्या मोहिमेदरम्यान धोडप किल्ल्यापाठोपाठ सातमाळेतले प्रमुख किल्ले लगेच त्याच्या अधिपत्याखाली आले. या अर्थाचा शिलालेखही धोडपवर आज बघायला मिळतो. म्हणूनच धोडप किल्ल्याचे भौगोलिक स्थान किल्ला बनविण्याच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचे होते.
धोडप किल्ल्याच्या वरच्या भागात कड्याच्या पोटात ज्या गुहा आणि गुहांमधील पाण्याची टाकी खोदून बनवलेली दिसतात ती बांधणी साधारण सातवाहन कालिन आहे. चढाई मार्गावर असलेल्या कोरून तयार केलेल्या मार्गावर तिसèया प्रवेशद्वारावर खालच्या बाजूस कोरलेली किर्तीमुखं ही पण सातवाहन कालीनच असावीत. वरील भागातली मुख्य तटबंदी, बुरूज आणि मोठ्या इमारतींच्या धाटणीवरून ते मुघल काळात बांधले गेल्याच्या खुणा दिसतात. तर खालच्या पहिल्या टप्प्याच्या माचीवरचे मंदिरे, विहिरी, घुमटी आणि विटांनी बांधलेले बुरूज हे मराठ्यांच्या म्हणजेच पेशवेकाळाच्या खूणा सांगतात. यावरून हे स्पष्ट होते की, धोडप किल्ल्याच्या भौगोलिक स्थानामुळे सातवाहन काळापासून ते थेट पेशवाईपर्यंत त्याचे विशेष महत्त्व होते.
खाली असलेले धोडांबेगाव, हट्टी गाव, किल्ल्यावरील सोनारवाडी आणि मधल्या नामशेष झालेल्या वस्ती यांवरून फार प्राचीन काळापासून धोडपच्या आश्रयाला लोक राहत होते. साधारण दक्षिणेकडे असणाèया हट्टी गावातून आणि पलिकडे असलेल्या ओतूर मधून धोडपवर येणाèया मुख्य वाटांबरोबरच चढाईसाठी आणखीही वाटा आहेत. धोडपच्या भौगोलिक स्थानावरून ह्यावरून साधारण पन्नास कि.मी. च्या विस्तृत परिसरावर वचक आणि दरारा ठेवला जात होता आणि त्यातून इथे असणाèया राजवटींना महसूल मिळत असावा.