महाराष्ट्रातील सर्वाधिक गड-किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक गड-किल्ले बागलाणात आहेत. बागलाणात सह्याद्रीतल्या सर्वोच्च किल्ल्यांपासून ते छोट्या टेकडीसारख्या किल्ल्यांपर्यंतचे सर्व प्रकार बघायला मिळतात. अशाच आडमार्गावरच्या, फार वापरात नसलेल्या छोट्या कऱ्हा किल्ल्याची भटकंती करू या…
नाशिकहून कऱ्हा किल्ल्याकडे जायचं म्हणजे नाशिक (आग्रा महामार्गाहून) सोग्रस फाटा – देवळा – सटाणा – दोधेश्र्वर – कोळीपाडा (कऱ्हे) असा १०४ कि.मी. प्रवास करावा लागतो. बागलाण तसा सुजलाम् सुफलाम प्रदेश आहे. तो इथल्या मोसम आणि गिरणा नदीच्या खोऱ्यामुळे. डोंगर रांगांतून निघणाऱे अनेक छोटे नदी-नाले मुख्य नद्यांना जाऊन मिळतात. सटाण्यापासून अवघ्या ८ कि.मी. अंतरावर असलेले दोधेश्र्वर हे तीर्थस्थान प्रसिद्ध आहे.
दोधेश्र्वर येथे दोध्याड नदीचा उगम आहे. बांधीव पुष्करिणीत गोमुखातून निघणारी दोध्याड नदी पुढे गिरणेला जाऊन मिळते. नदीच्या उगमस्थानाचे तीर्थ असल्याने तिथे भगवान शिवशंकराचे जुने आणि प्रशस्त मंदिरही आहे. मंदिराला कोट बांधलेला असून संपूर्ण दगडी कामाचे आहे. त्यावर कोरीव शिल्पं बघायला मिळतात. हे मंदिर कोणी यादवकालीन असल्याचा उल्लेख करतात. इथे मंदिर ट्रस्ट आहे. त्यांच्यातर्फे निवासव्यवस्था देखील केलेली आहे. दोधेश्र्वर मंदिर परिसर आजूबाजूने डोंगरांनी वेढलेला आहे. या डोंगरांमध्ये एक आहे तो दुर्ग कऱ्हा.
दोधेश्र्वराला मनापासून नमस्कार करायचा आणि अगदी दोन-एक कि.मी. अंतरावरच्या कऱ्हे गावाला जायचं. कऱ्हेगावाच्या कोळीपाड्याजवळ गाडी लावायची आणि लांबून कऱ्हा किल्ल्याकडे बघायचं. किल्ला फार उंच नाही. वरच्या बाजुला सपाटी असलेल्या माथ्यावरील मंदिर आणि त्याचा झेंडा लांबूनच नजरेस पडतात. कऱ्हा किल्ला समुद्रसपाटीपासून ९३७ मी. उंच आहे.
आपल्याला कोळीपाड्यापासून सुमारे २०० ते २५० मीटर उंच चढावे लागते. कोळीपाड्याच्या थोडं पुढे असलेल्या शेतांजवळून वर जाणारी वाट आहे. शेताच्या कडेकडेने असलेल्या ठळक वाटेने चालायला सुरुवात करायची. समोर दिसणाऱ्या दांडावरून थोडी नागमोडी फिरत ही वाट माथ्यापर्यंत घेऊन जाते. खालच्या बाजूला असलेल्या वनविभागाच्या जागेवर ग्लिरिसिडीया म्हणजेच उंदीरमारी ही परदेशी झाडं फोफावलेली दिसतात. खरं तर या विषारी झाडांचा आपल्याला काहीही उपयोग नाही. आता वनविभागातर्फे नव्याने देशी झाडं लावण्यावर भर दिला जातोय हे महत्त्वाचे आहे. असो.
कऱ्हा किल्ला चढताना जाणवतं की याचा खडक मुरमाड आणि ठिसूळ आहे. फार वापरात नसल्याने अधेमधे ठळक वाट हरवून जाते. परंतु वर जाण्याची दिशा दिसत असल्यामुळे फार गोंधळ होत नाही. मधल्या टप्प्यावर एका ठिकाणी शेंदूर लावलेले देवाचे ठिकाण आहे. तिथेच एका चौकोनी स्तंभासारख्या दगडावर विरगळ कोरलेली दिसून येते. परंतु ही विरगळही झिजलेली आहे.
बारकाईने बघितल्यावर त्यावरची शिल्पं लक्षात येतात. मधल्या टप्प्यातून माथ्यावरील तटबंदी आणि बुरूज स्पष्टपणे दिसतात. त्या दिशेने चालत गेल्यावर आपल्याला काही खडक खोदीव पायऱ्या दिसतात. आता या पायऱ्या चढत तटाबुरूंजावरून माथ्यावर प्रवेश मिळतो. पायथ्यापासून चढाईला सुरुवात केल्यानंतर इथे पोहोचायला मध्यम चालीने साधारणतः एक ते सव्वा तास लागतो.
माथा गाठल्यावर समोर दिसते ते देवीचे मंदिर. चार भूजा असलेल्या देवीच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन घेऊन आपण गडमाथ्याची फेरी करायची. माथ्यावर मध्यभागी पाण्याच्या टाक्यांचा समुह आहे. त्यातले एक टाके इंग्रजी टी अक्षराच्या आकाराचे आहे. उत्तर दिशा सोडली तर गडमाथ्याला सर्व बाजूने उभा कडा आहे. त्यात पूर्व दिशेच्या कड्यात थोडं खालच्या बाजूला खोदीव पाण्याचे टाके आहे.
पश्चिमेलाही एक पाण्याचे टाके आहे. त्यात माथ्यावरून येणाऱे पाणी साचविण्याची सोय दिसते. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात ते टाके कोरडे असते. गडमाथ्यावरून साधारण वायव्येकडे गोधाडदेवाचा डोंगर आणि त्यापलीकडे हरगड, मुल्हेर, मोरा हे किल्ले दिसतात. पलीकडे अजमेरा आणि दुंधा हे किल्ले देखिल लक्ष वेधून घेतात. देवीच्या मंदिराच्या बरोबर समोर फोफीरा डोंगर त्याचा अनोखा आकार दाखवत असतो. गडमाथाफेरी करून उतार करत परतीच्या प्रवासाला लागायचं ते छोट्या आणि टुमदार कऱ्हा दुर्गाच्या आठवणी बरोबर घेऊन.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!