नाशिकच्या सातमाळा पर्वत रांगेतला मार्कंडेय हे नुसते शिखर नसून तो किल्ला म्हणूनही प्रसिद्ध आहे. मार्कंडेय पर्वत धार्मिक दृष्ट्या तर प्रसिद्ध आहेच पण किल्ला म्हणून त्याचे जुने ऐतिहासिक उल्लेख सापडतात. मार्कंडेय पर्वताच्या भल्यामोठ्या पठारावर भरपूर वनसंपदा असल्याने अनेक वन्यजीवांसाठी ते अभयरान ठरते. त्यामुळे वनस्पती शास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी हे महत्त्वाचे स्थळ आहे. उंच बेलाग कातळकडा आणि भटकंतीसाठी अनेक वाटा असल्याने गिर्यारोहक आणि साहसवीरांसाठी मार्कंडेय पर्वत खूप काही देत असतो. एकंदरीतच सर्व प्रकारच्या निसर्ग पर्यटनाच्या अंगाने ‘मार्कंडेय’ हे चपखल ठिकाण आहे…
किल्ल्याची उंची – समुद्रसपाटीपासून १३३६ मीटर (४३८३ फूट)
पायथ्याचे गाव – मुळाणे, बाबापूर खिंड, वणी
कसे जाल – नाशिकहून वणी साधारण ४५ कि.मी. अंतरावर आहे. वणी गावातून ०८ कि.मी. अंतरावर असलेल्या मुळाणे-बाबापूर खिंड या मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी पोहोचता येते.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगी गडाच्या अगदी समोर सरळसोट उभा आहे तो घनगंभिर असा मार्कंडेय पर्वत. सप्तशृंगी गडावर येणारा प्रत्येक भाविक आणि पर्यटक ‘मार्कंडेय’ कडे आकर्षित होतो. नाशिकची भूमी प्राचीन काळापासून देवभूमी म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्रातील कुंभमेळ्याच्या या स्थानावर अनेक ऋषी-मुनी-संत तपश्चर्याधिन झाले आहेत. सप्तचिरंजीवांपैकी एक असलेले ‘मार्कंडेय’ ऋषी सप्तशृंगीगडासमोरच्या पर्वतावर वास्तव्यास होते. त्यामुळेच पर्वताचे नाव ‘मार्कंडेय’ पडले. पर्वताच्या माथ्यावर बसून ऋषी मार्कंडेय देवीला स्तोत्रं आणि पुराणं ऐकवित आणि देवी ते मनःपुर्वक ऐकत असे.
आजही मार्कंडेय पर्वताच्या अगदी समोर असलेल्या देवीची मान थोडी कललेली असून तिचा एक हात कानाच्या मागे असा लक्षपूर्वक ऐकण्याच्या मुद्रेतला आहे. अत्यंत पवित्र मानली जाणारी नर्मदेची परिक्रमा प्रथमतः केली ती मार्कंडेय ऋषींनी. आजही नर्मदा परिक्रमेला जाणारे अनेक लोक मार्कंडेयाच्या दर्शनासाठी येतात.
दर सोमवती अमावास्येला मार्कंडेय पर्वतावर मोठी यात्रा भरते. हजारोंच्या संख्येने भाविकभक्तांचा मेळावा येथे भरतो. अशी पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या या तपोभूमी पर्वताचा घेरा प्रचंड मोठा असून त्यावर विपूल वनराजी आणि वन्यजीवनही आढळते.
किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक वणीतून मुळाणे-बाबापूर खिंडीतून वर जातो तर दुसरा सप्तशृंगी गडावरून मार्कंडेयच्या दिशेने खाली असलेल्या खिंडीतून वर जातो. मुळाणे-बाबापूर खिंडी ही मार्कंडेय आणि रवळ्या-जवळ्या किल्ल्यांच्या मध्ये आहे. इथून मार्कंडेयवर जाण्यासाठी पायर्यांचा मार्ग करण्यात आला आहे.
साधारण अर्ध्या तासात पहिला टप्पा लागतो तो मार्कंडेय किल्ल्याच्या विस्तिर्ण अशा पठाराचा. माचीवर पूर्व बाजूने प्रवेश करतांना आपल्याला आजही किल्ल्याच्या बुरूज आणि तटबंदीचे अवशेष दिसून येतात. या पठारावर भरपूर प्रमाणात झाडोरा आहे. पठारावर दत्त आणि इतर देवतांची मंदिरं आहेत तसेच आश्रमही आहे. त्यात काही साधू-संन्यासी निवास करून राहतात. भूगर्भातून पाण्याचा स्त्रोत असलेले असे पाण्याचे कुंडही इथे पहायला मिळतात.
डोंगरसपाटीवर दक्षिणेकडे मधल्या डोंगरउंचवट्याशेजारी असलेल्या यातल्या मुख्य कुंडाला ‘कोटी तीर्थ’ असं म्हणतात. स्थानिक लेक याला ‘रामतीर्थ किंवा रामकुंड’ असंही म्हणतात. या कुंडांजवळ उंबराची आणि रानजांभळांची काही झाडं आहेत. जवळ काही छोटी देवळं, काही शंकराच्या पिंडी व नागदेवता अशा मूर्ती आहेत. या कुंडालगतच पौराणिक काळात देवदिकांनी यज्ञ केल्याचं काही पुराणांतून लिहिलेलं आहे. सोमवती आमावास्येला भरणार्या यात्रेच्या वेळी भाविक येथे स्नान करतात आणि कुंडातले पाणी तीर्थ म्हणून बरोबर घेऊन जातात.
पठारावरून शिखरावर जाण्यासाठी पायवाट आहे. दुसर्या टप्प्याची ही चढाई करतांना वाटेत कातळात कोरलेली दोन भूयारे लागतात. ही भुयारे आतल्या बाजूस वक्राकार फिरत जाऊन एकमेकांना जोडलेली आहेत. गुहेच्या आत पाणी आहे. आतमध्ये अंधार असल्याने बरोबर टॉर्च किंवा काडीपेटी असल्यास आत जाणे सोयिस्कर होते आणि अगदी वेगळा साहसी आनंद मिळतो. इथून पुन्हा वर चढत गेल्यावर उत्तराभिमुख असलेला उद्ध्वस्त दरवाजा दिसतो.
दरवाजाच्या थोडं वर चढून गेलं की एका छोट्या खिंडीतून आपण वर पोहोचतो. वर पुन्हा प्रवेशद्वार आणि तटबंदीचे अवशेष आढळतात. एक छोटा आश्रम आणि काही पाण्याची टाकी आहेत. या टाक्यांमध्ये बारमाही पाणी असते. यातल्या एका टाक्याला ‘कमंडलू तीर्थ’ तर दुसर्याला ‘मोती टाके’ असं संबोधलं जातं. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर मार्कंडेय ऋषींचे अतिशय सुंदर मंदिर आहे. पद्मासनात ध्यानमग्न असलेले ऋषी मार्कंडेयांची मूर्ती अतिशय प्रसन्न आहे. आता ह्या मुर्तीवर तांब्याच्या पत्र्याचे कवच चढवण्यात आले आहे.
मार्कंडेय ऋषींच्या मंदिराचा दरवाजा आणि समोर सप्तशृंगी देवीचा मंदिराचा दरवाजा अगदी समोर एका रेषेत आहेत. मार्कंडेयच्या माथ्यावरून सप्तशृंगीगड आणि मंदिर परिसराचा विहंगम नजारा दिसतो. सप्तशृंगी गडाच्या पठारावर पसरलेले गाव, त्यातली घरं, रस्ते, पाण्याचे तलाव असं सर्व काही इथे बसल्याबसल्या न्याहाळता येतं. बाकी मंदिरामागून दूरवर पसरत गेलेली सातमाळा रांग नजरेत येते. लागूनच असलेले रवळ्या-जवळ्या आणि त्यांचे पठार विहंगम भासते.
मार्कंडेयांच्या दर्शनानंतर आपण आलो त्या मार्गाने खाली उतरू शकतो किंवा आलो त्या मार्गाच्या विरूद्ध बाजूने खाली उतरून सप्तशृंगी गडावर चढून जावू शकतो. गडावर जाण्यासाठी मंदिरापासून थोडं खाली उतरून आपण त्या पाण्याच्या टाक्यांपाशी येतो. तिथे थोडं पुढे खाली उतरणार्या दोन पायवाटा आहेत त्यापैकी सप्तशृंगी गडाच्या दिशेने असलेली पायवाट पकडायची.
उतरत्या घळीतून छोट्यामोठ्या विखूरलेल्या दगडांवरून थोडं सांभाळत उतरावं लागतं. हा मार्ग दाट वनराईतून खालच्या सपाट पठारावर येवून मिळतो. सपाटीवरून पुन्हा खाली जाणार्या प्रमुख खिंडीतून थोडं खाली गेलं की डोंगरकड्याला चिटकून जाणारी एक वाट गोलाकार ‘टॅव्हर्स’ घेत फिरावी लागते. एकाबाजूला उंच कडा तर दुसर्या बाजूस दरी असा हा मार्ग रोमांचकारी आहे, ही वाट संपल्यावर डोंगरधारेवरून घसरडी अशी पायवाट पार करून आपण मार्कंडेय आणि सप्तशृंगीच्या मधल्या खिंडीच्या तळाशी आलेलो असतो.
या दरीतून साधारण चढाई असलेला ठळक पायवाटेचा मार्ग आपल्याला सप्तशृंगी गडावर घेऊन जातो. पण या मार्गांत दोन ठिकाणी उभे ‘रॉक पॅचेस्’ आहेत. पण त्यावर पाय ठेवण्यासाठी आणि हाताने पक्की पकड घेण्यासाठी खोबणी कोरलेल्या असल्याने हे पॅचेस् फार अवघड नाही. नागमोडी वळणं घेत आपण थेट सप्तशृंगी गडाच्या सपाट पठारावर आलेलो असतो. इथून मागे वळून उत्तूंग मार्कंडेयाकडे पाहिलं तर, “आपण त्या मार्कंडेयच्या टोकावर जाऊन आलो!!” असा आश्चर्यकारक प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही.
ऐतिहासिक संदर्भ
राष्ट्रकूट वंशीय राजा तिसरा गोविंद याने इ.स. ८०८ मध्ये सातमाळा पर्वतात वसलेल्या मार्कंड गडावरून ताम्रपट प्रसिद्ध केला. त्यात या किल्ल्याचा ‘मयुरखंडी’ असा उल्लेख आलेला आहे. शहाजीराजांना समकालीन असलेला कवी जयराम पिण्ड्ये याने लिहिलेल्या ‘राधामाधवविलासचंपू’ या काव्यग्रंथात मार्कंडेय संदर्भात खालील ओळी आलेल्या आहेत.
॥ मार्कंडेयाअहिवंतादिसप्तपर्वताध्यक्षतां अविरतं वितन्यमाना
गंभरराय इत्यभिधाप्रसिद्धः स्वाभिमिर्नयनपथं नीतः भविष्यती ॥
॥ चंडिपर्वतपुरता मार्कंडेयास्तिअ पर्वता विपुलः तत्राद्मदवेन जयरामेण ॥
अर्थात, माझ्या वडिलांचे नाव गंभिरराव आणि आईचे नाव गंगाबिका असून तो जामदग्नीवत्स, गात्रिय, पिण्ड्ये आडनावाचा देशस्थ ब्राह्मण आहे. मार्कंडेय पर्वत ते अहिवंतगडापर्यंत जे सात किल्ले आहेत त्यांची किल्लेदारी गंभिररावाकडे होती.
यावरून असं लक्षात येतं की, कवी जयराम पिण्ड्ये हा मार्कंडेय पर्वताच्या खालच्या गावात वास्तव्यास होता. आणि त्याचे वडिल गंभिरराव यांच्याकडे मार्कंडेय किल्ल्यासकट सातमाळेतल्या इतर सात किल्ल्यांची किल्लेदारी होती. मात्र यात नेमके साल तसेच कुठल्या राजवटीखाली किल्लेदारी मिळाली होती याचा उल्लेख नाही. परंतु कवी जयराम पिण्ड्ये याचा कालावधी इ.स. १६०० च्या सुमाराचा होता.
पेशवाईच्या काळातील मार्कंडेय किल्ल्यावर धान्य तसेच दारूगोळा साठविल्याच्या नोंदींचे कागदपत्र सापडतात. इ.स. १८१८ मध्ये ब्रिटिश कॅ. ब्रिग्ज् याने मार्कंडेयला भेट देऊन त्याविषयीचे वर्णन आणि नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!