सह्याद्री मस्तक : ‘साल्हेर’
राकट आणि कणखर सह्याद्रीतला सर्वांत उंच गिरीदुर्ग आणि उंचीने दुसर्या क्रमांकाचे शिखर असा दुहेरी मान नाशिक जिल्ह्याने राखून ठेवला आहे. तो म्हणजे ‘साल्हेर’. आज्ञापत्रामध्ये ‘…सालेरी अहिवन्तापासोन कावेरीतीरापर्यंत निष्कंटक राज्य…’ अशा शिवराज्याची सीमा दर्शविताना मानाचा उल्लेख असलेला दुर्ग साल्हेर! जयराम पिंडये लिखित ‘पर्णालपर्वतग्रहणाख्यान’ या ग्रंथात साल्हेरचा ‘सह्याद्री मस्तकः’ असा गौरवास्पद उल्लेख आलेला आहे. अस्सल गिर्यारोहकाबरोबरच नवख्या भटक्यांनाही साल्हेर नेहमीच साद घालत असतो.

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
समुद्रसपाटीपासून १५६८ मीटर (५१४४ फूट) उंच असलेला हा सर्वोच्च किल्ला नाशिकच्या बागलाणात येतो. डोलबारीच्या रांगेत ताठ मानेने उभा असलेला साल्हेरच्या पायथ्याशी एकाबाजूला साल्हेरवाडी, माळदर आणि दुसर्या बाजूस वाघांबे गाव वसलेलं आहे. साल्हेरला लागूनच त्याचा जोडीदार सालोटा उभा आहे. वाघांब्याकडून चढा किंवा माळदरकडून आपल्याला साल्हेर आणि सालोट्याच्या मधल्या खिंडीत यावं लागतं. साल्हेरवाडी कडून मात्र साल्हेरच्या दक्षिणेकडून चढण्याचा मार्ग आहे.
साल्हेरचा राकटपणा बघायचा असेल तर वाघांबेकडून पहावा तर उभ्या कणखर अशा शैलकड्यासकट त्याचं रूप पहायचं तर ते साल्हेरवाडीकडून. पायथ्यापासून ते माथ्यावर चढण्यासाठी साधारणतः साडेतीन तास लागतात. साल्हेर-सालोट्याच्या खिंडीतून साल्हेर किल्ल्याला लगटायचं. तोच समोर उभा असलेला कातळ कडा पाहून रोमांच उभे राहते. त्या कातळातल्या कोरीव पायर्यांवरून आपण सपाट अशा साल्हेरमाचीवर जाऊन पोहोचतो.
इथे पुर्वी चांगली वस्ती असल्याचे अनेक अवशेष दिसून येतात. इथे पोहोचतांना आपल्याला साधारण चार मुख्य प्रवेशद्वारांमधून जावं लागतं. साल्हेरवाडीकडून चढलो तरी असे पाच प्रवेशद्वारं आपल्याला भेटतात. या द्वारांवरचे शिलालेख, गणपती, बुरूज, कमलपुष्पं ह्या आभुषणांना निरखत माचीवर पाय मोकळे करायला निघायचं. माचीवर काही गुहा, मुर्ती, मंदिर आणि यज्ञवेदी दिसून येते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे गंगासागर हा भला मोठा पाण्याचा बांधीव तलाव. याच्या मध्यभागी स्तंभ आहे. इथूनच वरच्या बाजूला मजर फिरविल्यास माथ्यावरचं भगवान परशुरामाचं टुमदार मंदिर नजरेत येतं.
तिरक्या रेषेने शेवटची चढाई करत आपण सह्याद्रीतल्या सर्वोच्च दुर्गमाथ्यावर आलेलो असतो. परशुरामाने इथून बाण मारला आणि निसर्गरम्य कोकणप्रांताची निर्मिती झाली असं सांगितलं जातं. परशुरामाला मनोभावे नमन करून दूर दूरवरचा नजारा बघायचा. सेलबारी आणि डोलबारी रांगेतले मुल्हेर, हरगड, न्हावी, मांगी-तुंगी आणि बर्याचशा मनोरम घाटवाटा असा भुगोल बघता बघता आपल्याला इतिहासातही आठवायला लागतो.
साल्हेर हा किल्ला यादवपूर्वकालीन आहे. इ.स. १३४० मध्ये राजा मानदेव इथे राज्य करत असल्याचा उल्लेख आहे. इ.स. १६३९ मध्ये मुघलांकडे आल्यावर या किल्ल्याचे ‘सुलतानगड’ असं नामकरण झालं. त्यानंतर इ.स. १६७१ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला घेतला. इ.स. १६७१. शिवाजी महाराजांनी बागलाणची मोहिम हाती घेतली होती. मोरोपंतांनी मुल्हेर लुटल्यानंतर महाराज व मोरोपंतांनी २० हजार सैन्यासह साल्हेरला वेढा घातला.
पहिल्याच झटापटीत साल्हेरचा मुघल किल्लेदार फतुल्लाखान मारला गेला. त्याच्या मेहुण्याशी वाटाघाटी करून महाराजांनी त्याच दिवशी ५ जानेवारी १६७१ ला साल्हेर ताब्यात घेतला. चवताळलेल्या औरंगजेबाने चार-पाच मातब्बर सरदारांना अफाट फौज देऊन स्वारीचा हुकूम दिला. पावसाळा संपताच जवळपास चाळीस हजार मुघल सैन्याने साल्हेरला वेढा घातला. पण त्यांना मराठे दाद देईनात.










