नाशिक आणि गिर्यारोहण
गिर्यारोहण हे साहसी प्रकारांमध्ये मोडते. नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक स्थान हे त्यासाठी केवळ अनुकुलच नाही तर सर्व प्रकारच्या गिर्यारोहणाचा पाया नाशिक जिल्ह्यात रोवला जाऊ शकतो. सर्व प्रकारच्या गिर्यारोहण प्रकारांचा उत्तम सराव होऊ शकतो.
सह्याद्रीची संपूर्ण पर्वतरांग म्हणजे महाराष्ट्राचा आत्माच होय. या सह्याद्री पर्वत रांगांमुळे महाराष्ट्राला उत्तम असे सांस्कृतिक वळण आहे. सह्याद्रीतील असणारे जैववैविध्य हा जागतिक अभ्यासाचा विषय ठरला आहे. आणि त्यामुळेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्राच्या सह्यपर्वत रांगेला एक स्थान मिळालं आहे. भरभरून असलेल्या निसर्गाबरोबरच राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक स्थानं हा वारसा आजही जपला गेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात साडे तीनशे हून अधिक किल्ले आहेत असे धरले तर त्यापैकी साधारण ६४ किल्ले एकट्या नाशिक जिल्ह्यात येतात. म्हणजे सह्याद्रीच्या एकूण गडकोटांपैकी वीस टक्के किल्ले नाशिक जिल्ह्यात येतात. संपूर्ण सह्याद्रीतील पर्वतरांगेच्या उंचीचा विचार केला तर ‘सर्वात उंच’ उपरांगा ह्या नाशिक जिल्ह्यात आहेत. पुढे महाराष्ट्रात दक्षिण-पश्चिमेकडे सह्याद्रीची उंची त्या मानाने कमी-कमी होत गेलेली आहे.
नाशिक जिल्ह्यात मुख्य सह्याद्री पर्वत रांगेचा सर्वाधिक लांबीचा भाग येतो. सह्याद्रीच्या या मुख्य पर्वतरांगेसोबत सातमाळा, सेलबारी आणि डोलबारी या मुख्य रांगा आहेत. त्याचबरोबर सह्याद्रीच्या उपरांगा जसे नाशिक वायव्य (रामशेज रांग), नाशिक नैऋत्य (पांडवलेणी रांग), त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, कळसुबाई उपरांग, औंढा-पट्टा, अजिंठा उपरांग (नाशिक जिल्हा), चणकापूर, दोधेश्वर, गाळणा टेकड्या अशा एकूण 14 रांगा आहेत.
सह्याद्रीतील समुद्र सपाटीपासून 4000 फूट उंचीवरील एकूण गिरीदुर्गांचा विचार केला तर एकूण 27 किल्ले आहेत. त्यापैकी 17 किल्ले एकट्या नाशिक जिल्ह्यात येतात. सह्याद्रीतील अत्युच्च शिखर कळसूबाई (‘सर्व्हे ऑफ इंडिया’ च्या नकाशानुसार) आणि ‘सह्याद्री मस्तक:’ असं ज्याचं ऐतिहासिक वर्णन आहे तो सर्वांत उंच साल्हेर किल्ला हे दोनही मानबिंदू नाशिकनेच राखून ठेवलेले आहेत. सह्याद्रीतील उंचीने पहिल्या पाच क्रमांकात येणारा ‘धोडप किल्ला’ हा भौगोलिक रचनेचा अनोखा नमुना आहे. गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध असलेले आणि सोशल मिडियामुळे अधिकच प्रसिद्धी पावलेले अलंग, मदन आणि कुलंग हे बुलंद किल्ले नाशिकच्या घोटी नजीक आहेत. शिवाय ब्रह्मगिरी, हरिहर, अंकाई-टंकाई, साल्हेर, मुल्हेर, चौल्हेर, मांगी-तुंगी, विश्रामगड, हातगड, चांदवड, गाळणा, रामशेज अशा ऐतिहासिक गडकोटांची मोठी जंत्री इथे आपापला पसारा मांडून बसलेली आहे. त्यामुळे गिर्यारोहण-गिरीभ्रमणास नाशिकला सर्वाधिक पसंती मिळते हे वेगळं सांगायला नको.
नाशिक जिल्ह्यातल्या गिरीडोंगरात आपल्याला अगदी सपाट टेकड्यांपासून ते उत्तुंग शिखरांपर्यंत सर्व उंचीचे पर्वत पहायला मिळतात. अगदी मुरमाड व घसरड्या वाटा असलेले तसंच राकट उभे दगडी कडे-सुळके असलेले असे दोन्हीही प्रकार नाशिक जिल्ह्यातल्या डोंगराच्या बाबतीत दिसून येतात. कैक किलोमिटरचा घेरा असलेले तसंच अगदी अरुंद घेर्यात जागेवरच उठावलेले, उभे-आडवे अनेक वैशिष्ट्यपूर्ण आकार, दाट झाडीचे तर अगदीच उघडेबोडके असे किती प्रकार सांगावे असा विविधांगी गिरीठेवा नाशिककडे आहे. त्यामुळेच अनेक गिर्यारोहकांचा नाशिककडे विशेष ओढा असल्याचं दिसतं.
शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात स्वराज्याची कावेरी-जिंजी पर्यंतची सीमा दर्शवताना सुरुवातीला साल्हेर सोबत नाव येणारा अहिवंत दुर्गही नाशिकच्या सातमाळा पर्वत रांगेत विराजमान आहे. सातमाळा ही संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव अनोखी पर्वरांग आहे जिच्यावर सलग रांगेत एकाशेजारी एक असे तब्बल 14 किल्ले आणि काही व्यापारी मार्ग आहेत. महाराष्ट्रातील तमाम गिर्यारोहक एका किल्ल्यापासून ते संपूर्ण रेंज ट्रेकपर्यंतचे विविध पर्याय शोधत नाशिकमध्ये येत-जात असतात. बरं गिरीदुर्गांवरील एकदिवसीय साधी भटकंती असो किंवा कातळभिंती-सुळक्यांचे आरोहण असो, नाशिक सर्वच पुरवतो. हळबिची शेंडी, इखारा, मांगीतुंगी, डांग्या, स्कॉटीश कडा असे ‘सोपे ते अत्यंत अवघड’ असलेली आरोहण स्थळं नाशिकच्या आकाशात उठावलेली आहे.
गिरीदुर्गावर असलेली सर्वाधिक लेणी, सर्वाधिक डाईक रचना (अरूंद, उंच प्रस्तरभिंती), सर्वाधिक नेढे (डोंगराला नैसर्गिक असलेले आरपार छिद्र), सर्वात मोठे हनुमानाचे शिल्प, सर्वाधिक शिलालेख, गडकोटांवरील देवनागरी संस्कृतमधील सर्वात मोठा शिलालेख, सर्वाधिक पाण्याची टाकी, भारतातील सर्वात लांब असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या नदीचे उगमस्थान, गड-कोटांवरील सर्वाधिक पाण्याची टाकी, गिरीदुर्गांवरील सर्वात मोठी तोफ, इतिहासातील सर्वाधिक काळ वेढा पडलेला दुर्ग असं बरंच काही नाशिक जिल्हा बाळगून आहे.
कुणी हिमालयात ट्रेकिंगसाठी जातो तर कुणी ईशान्य भारतातील साहसी पर्यटनासाठी जात असतात. बरेच लोक भारताभरातील विविध वातावरणात पर्यटनास जातात तर अनेक भारताबाहेर साहस आजमावयाला जात असतात. अशा साहस आणि पर्यटन प्रेमी लोकांना त्यांच्या यात्रेच्या आधी काही दिवस सराव करावा लागतो. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीत अशा सर्व प्रकारच्या सरावासाठी पोषक वातावरण आहे. जेणे करून सायकलिंग, स्विमिंग, गिर्यारोहण, रनिंग, मॅरॅथॉन अशा कुठल्याही प्रकारच्या खेळासाठी नाशिक जिल्ह्यातील भुगोल आपल्याला पुरक ठरतो हे विशेष आहे.
नाशिकमधील सह्याद्री गिर्यारोहण, गिरीभ्रमण, भटकंती, इतिहास, भुगोल, स्थापत्यशास्त्र, जैववैविध्य या बाबतीत खूप समृद्ध आहे. आजपासून सुरु होणाऱ्या ‘भटकू आनंदे’ या सदरातून आपण नाशिक आणि आजुबाजूच्या परिसरातील गिर्यारोहण, गिरीभ्रमण, भटकंती, गड-किल्ले, महत्त्वाचे पर्वत, पर्यटनाची ठिकाणे याबाबतीत माहिती घेणार आहोत.
(लेखक वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेचे विश्वस्त तर नाशिक जिल्हा गिर्यारोहण संघाचे सचिव आहेत)
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22