आरवलीचा वेतोबा
आपल्या देशात अनेक पुरातन मंदिरे आहेत व जवळपास सर्वच मंदिरात देवाला फुले/कपडे/मिठाई आदी वस्तू अर्पण करण्याची साधारण प्रथा असते. पण कोकणात असे एक मंदिर आहे जिथे देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी चक्क चपला वाहण्याची प्रथा आहे. आज या अनोख्या पर्यटनस्थळाविषयी जाणून घेऊया…
तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगूर्लाा तालूक्यातील आरवली येथे हे आगळे वेगळे श्री देव वेतोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. आरवली गाव हे अरबी समुद्राच्या किनारी शिरोड्याजवळ वसलेलं छोटंसं गाव आहे. भरगच्च नारळ-पोफळींच्या बागा, कौलारु घरे, तांबडी माती व स्वच्छ सागर किनारा यामुळे आरवली गाव एक टिपीकल कोकणी गाव आहे असे म्हणता येईल. अशा या आरवलीच्या वेतोबाचे देऊळ इ.सन १६६० मध्ये बांधण्यात आले असल्याचा उल्लेख आढळतो. आरवलीचे श्री देव वेतोबा मंदिर मूलत: वेताळाचे आहे. “बा” हा आदरार्थी शब्द जोडल्याने वेताळाचे वेतोबा झाले असावे असे जाणकार सांगतात.
मंदिराच्या प्रथम दर्शनीच देव वेतोबाची सात फूट ऊंचीची मूर्ती आकर्षित करते. वेतोबाची मूर्ती पूर्वी फणसाच्या लाकडाची होती. अगदी अलिकडे सन १९९६ मध्ये ही मूर्ती पंचधातूत घडविण्यात आली. मात्र त्यामुळेच आजही स्थानिक लोक फणसाचे लाकूड बांधकामात व इतर कामासाठी वापरत नाहीत. आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्थानिक लोक चपला वाहण्याचा नवस बोलतात. गावात फिरण्यासाठी देवाला चपला वाहतात. देवासमोर वाहिलेल्या या चपलांचे तळ दुसर्या दिवशी झिजलेले आढळतात, असे स्थानिक गावकरी सांगतात. या नवसाच्या चपलांचे मंदिरात हजारो जोड पडून आहेत. कित्येक खोल्या फक्त या नवसाच्या चपलांनी भरुन गेल्या आहेत. तळकोकणात वेताळ देवाची सुमारे १५० मंदिरे आहेत, पण चपलांचा नवस बोलण्याची प्रथा फक्त आरवलीलाच आहे. अशा या निसर्गरम्य आरवली गावास एकदा भेट द्यायलाच हवी.
कसे पोहचाल
आरवली येथे विमानाने जायचे असेल तर फक्त ७५ किलोमीटरवर गोव्याचा विमानतळ आहे. लवकरच येथून जवळ ४५ किमीवरील चिपी विमानतळावरुन विमानसेवा सुरु होईल, असा प्रयत्न सुरु आहे. तेथून टॅक्सीने वा बसने आरवलीस सहज पोहचता येते. रेल्वेने जायचे झाल्यास कोकण रेल्वेमार्गाने प्रथम सावंतवाडी व नंतर टॅक्सीने पोहचता येईल. रस्तामार्गेही मुंबई-गोवा हायवेने सावंतवाडी मार्गे आरवलीस जाता येते. सावंतवाडी ते आरवली हे अंतर २८ किमी एवढे आहे.
काय बघाल
यात तळ कोकणातील किमान ३० लहान-मोठे सागर किनारे आहेत जे आरवली येथून सहज बघता येतील. मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला, तेरेखोल, धामापुर, रेडी गणेश, सांवतवाडी अशी असंख्य पर्यटन स्थळे बघण्यासाठी आहेत. त्यामुळे
वेळ भरपूर हवा.
कुठे रहाल
संपूर्ण कोकणात घरगुती व्यवस्था आहेत तशा येथेही असंख्य राहण्याच्या-जेवणाच्या व्यवस्था आहेत. नारळ-सुपारीच्या बागेतील समुद्रकिनारी असलेल्या या ठिकाणी कोकणी माणसांच्या घरात राहणेचे सुख पंचतारांकीत हाॅटेलमध्येही मिळणार नाही.
जेवण
कोकणातील महिलांनी बनवलेले कोंबडीवडे, सोलकढी, आंबोळी, घावणे, ताजी मासोळी, उकडीचे मोदक अशा चटकदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कोकणात जायलाच हवे.