सलाम…!
चार महिने होऊन गेले..
सोळा लोकांच्या भेटी झाल्या.
रजनीकांत सारखा एखादा अपवाद सोडला तर, बहुतेक सर्वच फारशे परिचयातील नव्हते. आपल्याला माहिती नसलेले पण जागतिक व्यासपीठावर प्रचंड मोठे योगदान दिलेल्या व्यक्तिमत्वावर प्रकाशझोत टाकायचा.. त्यांच्या कार्याची ऊर्जा आपल्या सर्वांमध्ये सामावून घ्यायची.. त्यातून प्रेरणा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायचा हाच तर फोकसच्या मागील प्रमुख उद्देश होता. कारण हि तसेच होते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेल्या कोरोनाचे थैमान आताशी कोठे आटोक्यात आले असले तरी या आठ नऊ महिन्यांच्या कालावधीत अखिल मानव समाजाला अनेकविध अनुभव मिळाले. या सगळ्या वातावरणात मनाला उभारी देणाऱ्या लोकांशी निदान लेखाच्या माध्यमातून पडणारी गाठ भेट चैतन्याची नव पालवी फुलवणारी ठरेल अशा भूमिकेतून या सदराची जडणघडण झाली. सोळा आठवड्याच्या या प्रवासात शेकडो वाचकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रतिसाद मिळाला.. हजारो वाचकांशी ऋणानुबंध जुळले..
म्हणूनच आजचा फोकस खास तुमच्यावर..
खरं तर फोकस नाहीच..
हा तर सलाम आहे..
हा सलाम आहे..
तुमच्या सकारात्मकतेला..
तुमच्यातील अपार धैर्याला..
तुमच्या जगण्यावरील प्रेमाला..
हा सलाम आहे..
कधी वॉर्डबॉय
कधी नर्स.. कधी सिस्टर,
कधी डॉक्टरांच्या रुपात
अवतार घेणाऱ्या त्या नियंत्याला.
हा सलाम आहे..
लोकांनी घरामध्ये सुरक्षित रहावें
म्हणून दिवसरात्र स्वतः असुरक्षिततेच्या घेऱ्यात वावरणाऱ्या खाकी वर्दीतल्या लढवय्याना..
हा सलाम आहे..
अर्धवट माहिती आणि अफवांच्या बाजारात सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये यासाठी खऱ्या बातमीचा शोध घेणाऱ्या जांबाज माध्यमकर्मिंना…
हा सलाम आहे..
विद्यार्थी हिताची जपणूक करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करीत मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंदाला..
हा सलाम आहे..
सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडाव्यात म्हणून जीवाचे रान करणाऱ्या शासकीय प्रशासकीय यंत्रणेला..
हा सलाम आहे..
असंख्य अडचणींवर मात करून हसत हसत संसार सांभाळणाऱ्या गृहिणींना..
हा सलाम आहे..
आर्थिक मंदी तून रोजगार जाऊन देखील ताठ मानेने उभे राहणाऱ्या आपल्या मित्रांना..
हा सलाम आहे..
कॉस्ट कटिंग हेड खाली पगाराची वित्तीय तूट सहन करणाऱ्या सगळ्यांना..
हा सलाम आहे..
अगदी घरात, आजूबाजूला
मृत्यूचे थैमान होत असताना आपल्यातली जगण्याची ऊर्मी टिकवनाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांना.
हा सलाम आहे..
एवढं सगळ होऊन देखील परिवार आणि मित्र मंडळी जमवून तासभर वेटींग असले तरी मिसळ हादडायला जाणाऱ्या आपल्यातल्या रसिकाला..
हिच तर गम्मत आहे जगण्यातली..
गेले काही महिने आपल्याला खूप काही शिकवून गेले..
आपण नक्की जगतो कुणासाठी…
उर फुटेस्तोवर पळतो कशासाठी….
एक मात्र तेवढेच सत्य आहे की
प्रत्येकाला स्वतःचा अर्थ गवसला आहे हे नक्की..
नव्या वर्षाचे स्वागत करतांना एवढे जरी चिंतन झाले तरी येणारे वर्ष आपल्या सर्वांनाच भरभरून काहीतरी देऊन जाईल हे नक्की..
या सदर लेखनाच्या निमित्ताने चिंतन मनन आणि लेखन झाले.. ऊर्जा निर्माण करता आली.. सकारात्मकतेचा मार्ग शोधता आला.. यामुळे अनेकांच्या संघर्षाला बळ मिळाले..
म्हणूनच…
वाचकहो..
तुम्हाला सलाम…
हसरत जयपुरींच्या शब्दात सांगायचे तर..
सलाम..
आपके संग-ए-दर को सलाम..
ये जी चाहता है न जाऊँ यहाँ से
ये घर आपका कम नहीं आसमाँ से
हुआ मैं तुम्हारा और आया कहाँ से
मुझे तो मोहब्बत मिली है यहाँ से..