सर्जनशील सर्जन
वयाच्या तिसाव्या वर्षी जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या डॉ. अतुल गवांदे यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा फोकस…
एक दिवस न्यूयॉर्कर साप्ताहिकाच्या कार्यालयात एक तरुण डॉक्टर संपादकांना भेटायला जातो. तो तरुण प्रसिद्ध हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये शिकनारा इंटर्न होता. तो आपला अनुभव संपादकांना सांगतो. एक दिवस इमर्जन्सी आली. एका लठ्ठ बाईला इस्पितळात आणण्यात आले. तिचा श्वास बंद पडत होता. ईतर सर्व प्रयत्न करूनही उपयोग न झाल्याने गळ्यातून नाईफने कट घेऊन त्यातून ऑक्सिजन देणे भाग होते. केवळ चार मिनिटांत हे करणे आवश्यक होते. मी कट घेतला, तो नेमका चुकीचा.. त्यामुळे स्थिती अधिकच गंभीर झाली. तितक्यात तिथे सीनियर डॉक्टर आले. त्यांनी अनुभवाने उपचार करून रुग्णाचे प्राण वाचवले. अननुभवी डॉक्टरांकडून ज्या चुका होतात, त्या कशा टाळल्या जातील, याचा गांभीर्यपूर्वक विचार रुग्णालय प्रशासनाने केला. याच रुग्णालयात नव्हे, तर अमेरिकत सर्वत्र किंबहुना जगभर डॉक्टर काम करत करत शिकतही असतात. त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांमुळे पेशंट अधिक अत्यवस्थ होतो, शेवटी डॉक्टरकी हा प्रॅक्टिस करता करता शिकण्याचा व्यवसाय आहे. या वर बोलले पाहिजे, व्यक्त व्हायला पाहिजे असे त्या वाटायला लागले. म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो असल्याचे सांगितले. संपादकाने त्याला लेख लिहायला सांगितले. त्याने लिहिलं, मात्र संपादकांनी सातत्याने त्यात सुधारणा केल्या. त्या तरुणाने हा ४५ पानी लेख सहा वेळा लिहून काढला. लेखाचे शीर्षक होते- ‘व्हेन डॉक्टर मेक मिस्टेक’.
लेख प्रसिद्ध झाल्यावर वैद्यक विश्वात खळबळ तर माजलीच, पण ‘लॅन्सेट’ या वैद्यकविषयक प्रतिष्ठित रिसर्च जर्नलमध्ये त्याबद्दल संपादकीय लिहिले. यामुळे हा लेख मोठ्या प्रमाणावर वाचला गेला. वयाच्या तिसाव्या वर्षी जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या तरुणाचे नाव आहे डॉ. अतुल गवांदे.
अमेरिकेचे नवे राष्ट्रपती जो बायडेन यांनी अद्याप राष्ट्रपतीपदाची शपथ घेतलेली नसली तरी त्यांनी आपल्या कामकाजास अप्रत्यक्ष रीत्या प्रारंभ केला आहे. नुकतीच त्यांनी कोविड 19 टास्क फोर्सची निर्मिती केली असून त्यातील एक अध्यक्ष पद डॉ. विवेक मूर्ती यांना देण्यात आले आहे. या मध्ये एक अस्सल मराठमोळे नाव सामील करण्यात आले आहे ते म्हणजे सर्जनशील लेखक असलेले डॉ अतुल गवांदे यांचे. म्हणूनच त्यांच्या आजवरच्या प्रवासावर आजचा फोकस आहे.
डॉक्टर अतुल गवांदे अमेरिकेतील सुप्रसिद्ध शल्यविशारद म्हणून ख्यातनाम आहेत पण त्याहून अधिक सर्जनशील लेखक म्हणून जगभरात नावाजलेले आहेत. डॉक्टर पेशंट नातेसंबंध, उपचारादरम्यान त्यांच्यात निर्माण होत असणारे भावबंध यांचे अचूक विश्लेषण करणारा हा डॉक्टर. रुग्णाच्या नातेवाईकांच्या अपेक्षा, वाढत चालणारे खर्च, अत्याधुनिक साधनां मधली उपचार पद्धती आणि माणूस असलेल्या डॉक्टरांच्या मर्यादा या सगळ्यांवर विलक्षण वेगळ्या पद्धतीने विचार करून संवेदना जागृत करणारा हा लेखक फक्त व्यक्त होण्यापुरता थांबत नाही. त्या पलीकडे जाऊन तो उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही करतो.. आणि त्या साठी कार्यही करतो.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अतुल यांनी 1987 साली पदवी घेतली. नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून रोहड्स स्कॉलरशिप मिळवत पॉलिटिक्स, फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्स या संमिश्र अभ्यासक्रमांची पदवी घेतली. यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात वैद्यकीय पदवीसाठी प्रवेश घेतल. पूर्व राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासमवेत काम करण्यासाठी त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडले मात्र कालांतराने ते पूर्ण केले.सार्वजनिक आरोग्य या विषयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. दरम्यान त्यांचे लेखन सुरूच होते. त्यानंतर पब्लिक हेल्थ या विषयाला त्यांनी वाहून घेतले. सातत्याने आरोग्य विषयक अभ्यासपूर्ण लेखन करून त्यांनी अमेरिकेतील शासन व्यवस्थेला देखील दखल घ्यायला भाग पाडले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सिनेट मध्ये भाषण करताना त्यांच्या लेखांचा संदर्भ घेतला आहे. ओबामांचे निकटवर्तीय खासदार यांनी डॉ. अतुल यांचा गौरव करताना सांगितले आहे की ओबामा यांच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील योजनांवर डॉ. गवांदे यांच्या विचारांचा प्रभाव आहे.
बीबीसीची प्रतिष्ठेची रेथ लेक्चर्स ही भारतातली भाषणमालिका गुंफणारे अतुल गवांदे यांची अनेक पुस्तके जगभर गाजलेली आहेत. त्याची सुरुवात कशी झाली हे अतुल यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. या लेखाच्या प्रारंभी जो किस्सा आहे तिथूनच हि सुरुवात झाली. हा प्रवास प्रतिष्ठेच्या ‘टाइम’ मॅगझिनने जाहीर केलेल्या अमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात मोलाचे परिवर्तन घडवून आणणाऱ्या ५० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत डॉ. अतुल गवांदे यांचा नावाच्या समावेश आज झाला आहे.
गुंतागुंतीच्या आणि धोक्याचे खाचखळगे असलेल्या वैद्यकीय व्यवसायत यश कसं मिळवता येईल, याबद्दलचं प्रकट चिंतन म्हणजे त्यांचे ‘बेटर’ हे पुस्तक. वैद्यकीय व्यवसायात अत्यंत काळजीपूर्वक सर्व गोष्टींची खातरजमा करून घेणं, कल्पक क्लृप्त्या शोधणं कसं आवश्यक आहे, हे लेखक आपल्याला सांगतो.
`जीव जिथे गुंतलेला…’ हे डॉ. अतुल गवांदे यांचे मूळ इंग्रजी अनुभवकथन. त्याचा मराठीत अनुवाद नीला चांदोरकर यांनी केला आहे. वैद्यकीय व्यवसायात तंत्रज्ञानाचा कितीही शिरकाव झाला असला, तरी त्याचा पाया अजूनही अधांतरीच आहे. वैद्यकीय क्षेत्रात अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी सातत्याने घडत असतात. यांनीही त्यांच्या आजवरच्या प्रवासात अशा गुंतागुंतीच्या गोष्टी अनुभवल्या. त्यांचेच कथन म्हणजे हे पुस्तक.
डॉ. अतुल यांचे ‘कॉम्प्लिकेशंस’ हे पुस्तक
म्हणजे लेखसंग्रह आहे. त्यांची शैलीही खूप वेगळी आहे. हळूहळू उलगडत जाणारी. घटनेचा गूढ बाज न सोडणारी, पण विज्ञानाला घट्ट धरून राहाणारी. हे त्यांचे अनुभव असले तरीही त्यांचं आत्मचरीत्र नकीच नाही. कारण कोणत्याही प्रकरणाचा केंद्रबिंदू ते स्वतः नाहीत.
अतुल यांचे आई-वडील डॉ. आत्माराम आणि डॉ. सुशीला गवांदे दोघेही यवतमाळ मधील. प्रगत शिक्षणासाठी दोघे 1960 च्या सुमारास अमेरिकेतील आले व कालांतराने इथेच स्थायिक झाले. अतुल यांनी लिहिलेल्या ‘बिईंग मोर्ट्ल’ या पुस्तकात ते वृद्धकाल, जरता, असाध्य रोग आणि मृत्यू या सर्वांशी वैद्यकीय उपचार, प्रयत्न आणि कर्तव्य यांची गुंतागुंत याबाबत मांडणी केली आहे. ते स्वतः आपल्या वडिलांचे उदाहरण देतात.
त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता तरीही त्यांचे वडील शेवटपर्यंत काम करीत राहिले त्यांनी आपल्या घरातच मुले नातवंडं यांच्यासमवेत मृत्यू स्वीकारला. आपण आता औषधउपचाराने ग्रासलेल्या वार्धक्याकडे आणि मृत्यूकडे जात आहोत, त्यावर आपण अश्या पध्दतीने उपचार करतो जणूकाही तो काही आजार आहे. एक गोष्ट खरी आहे की या सरत्या वर्षासाठी केवळ औषधोपचारच गरजेचे नाहीत तर या परिस्थितीही आयुष्य अर्थपूर्ण शक्य तेवढे संपन्न आणि परिपूर्ण असणेही तितकेच गरजेचे आहे. हे पुस्तक त्या दिशेच्या प्रवासाचे केवळ सखोल चिंतन नसून एक आवश्यक आणि सुक्ष्म दृष्टीने केलेले अवलोकन आहे. ते आयुष्याच्या अंतीम काळात स्वतःच्या मर्जीने, प्रतिष्ठेने आणि आनंदाने कसे जगावे याचे मार्गदर्शन करते. यावरचे अत्यंत संवेदनशील भाष्य डॉ. अतुल गवांदे करून देतात.
तत्त्वज्ञानाची बैठक असलेला.. अर्थकारणाचे ज्ञान असलेला..आणि राजकीय अपरिहार्यता समजाऊन घेत सार्वजनिक आरोग्यावर प्रत्यक्ष कार्य करणारा.. संवेदनशील लेखक आता पुन्हा मैदानात उतरला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या अमेरिकेला या महामारी पासून वाचवण्यासाठी. अतुल यांचे हे योगदान मराठी आणि भारतीय माणसाचे आरोग्य शास्त्रातील जागतिक पातळीवर असलेले कार्य अधिक ठसठशीतपणे अधोरेखित करणारे ठरणार आहे.