लायसन्स टू किल
माय नेम इज बॉण्ड..
जेम्स बॉण्ड
लायसन्स टू किल…
एनी वन.. एनी व्हेअर
एनी टाईम..
हा त्याचा परवलीचा डायलॉग..
जमैकाच्या बीचेस पासून आल्प्सच्या पर्वतरांगांपर्यंत त्याचा बिनदिक्कत वावर सर्वत्र असतो.. याहून अधिक त्याचा मुक्काम चित्रपट रसिकांच्या हृदयात असतो…. शॉन कॉनरी त्याचे नाव..
डबल ओ सेव्हन ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस एजंटचा त्याने दाखवून दिलेल्या हमरस्त्यावर इतर हिरोंनी आपले आयुष्य काढले. शॉन नव्वदाव्या वर्षी आपल्या सर्वांना गुडबाय करून गेला. जेम्स बॉण्ड कडे लायसन्स टू किल असते असे म्हणतात. शॉनने मात्र जगभरातील कोट्यावधी रसिकांना कोणतेही लायसन्स न बाळगता आपल्या अदाकारीने घायाळ करून ठेवले आहे.
कलंदर कलाकारांचे आयुष्य कसे असते, त्याच उत्कटतेने तो जगला. स्कॉटिश असलेल्या शॉनचे बालपण अत्यंत हालाखीची परिस्थितीत गेले. वडील लॉरी ड्रायव्हर आणि आई स्वच्छता कर्मचारी होती. सोळाव्या वर्षी तो रॉयल नेव्ही मध्ये नोकरीला लागला. पोटाच्या अल्सर मुळे त्याला तीन वर्षानंतर काढून टाकण्यात आले. मात्र याच दरम्यान त्याला पोहण्याची आणि व्यायामाची प्रचंड आवड निर्माण झाली. उपजिविकेसाठी काही दिवस त्याने स्विमिंग कोच म्हणून काम केले. उत्तम शरीर सौष्टव असल्याने १९५० च्या मिस्टर युनिवर्स स्पर्धेत त्याला तिसरा क्रमांक पटकाविला. याच दरम्यान त्याला मॉडेलिंग च्या ऑफर मिळाल्या..
‘डॉक्टर नो’ हा शॉनचां आणि बाँडच्या पुस्तकांचे लेखन करणाऱ्या अियान फ्लेमिंग यांचा पहिला चित्रपट. लोकप्रिय पुस्तकांची मालिका असलेल्या फ्लेमिंगला आणि निर्माता ब्रोकोली यांना थंडरबॉल या कादंबरीवर पहिला चित्रपट करायचा होता. ‘डॉक्टर नो’ ही त्यांची सहावी कादंबरी होती. मात्र चित्रपटात खूप गुंतागुंत नसावी, प्रेक्षकांना रुचेल एवढाच त्यात मसाला असावा म्हणून ‘डॉक्टर नो’ ची निवड करण्यात आली. या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी त्यांनी मिस्टर जेम्स बॉन्ड नावाची स्पर्धाच आयोजित केली होती.
शॉन या स्पर्धेत उतरला पण तो कुणालाच पसंत नव्हता. निर्मात्याची पत्नी डोना ब्रोकोलीने गळ घालून शॉनला हा रोल मिळवून दिला. जसा चित्रपट बनत गेला तशी ही निवड सार्थ असल्याचे सिद्ध होत गेले. फिल्म रिलीज झाल्यावर तर अियान फ्लेमिंग यांचे हे गुप्तहेर कॅरेक्टर अख्ख्या जगात लोकप्रिय ठरले. यात प्रामुख्याने सिंहाचा वाटा हा शॉन याचा आहे हे फ्लेमिंग ने आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.
शॉनची चालण्याची, खिशात हात घालून उभे राहण्याची स्टाईल यामुळे शॉन ने जेम्स बॉन्ड हे जिवंत कॅरेक्टर उभे केले. साधे ड्रिंक ऑर्डर करताना.. “मार्टिनी .. शेकन नॉट स्टीअर्ड..” असली साधी वाक्य ज्या सुपर डायलॉग डिल्हीवरी वर शॉन खेचून न्यायचा त्यातच या व्यक्तिरेखेची दमदार निर्मिती होत गेली. व्हीलन समोर त्याची थंड पण भेदक नजर आणि सुंदर ललने समवेत फ्लर्ट करताना त्यात असलेला खोडकरपणा ज्या नजाकतीने शॉन प्रेजेंट करतो त्याला तोड नाही.
तसा कोणताही बॉण्ड पट पाहायला गेल्यावर दोन तास मेंदू बाजूला ठेऊन द्यायचं. असं कसं शक्य आहे.. असल्या टाईपचे विचार करणाऱ्यांसाठी जेम्स बॉन्ड कधीच नसतो. जो न देखे रवी अशा पद्धतीने जेम्स काहीही करू शकतो. दोन तास जबरदस्त फायटिंग, चेसिंग, उडत्या विमानात होणारी मारामारी, आलिशान चकचकीत अस्टीन मार्टिन सारख्या गाड्या, सोबतीला मदमस्त ललना असा सगळा खच्चून भरलेला मालमसाला बघायला मिळणार याची खात्री असते. हा बॉन्ड जरी काल्पनिक असला तरी तो इतक्या प्रभावीपणे सादर करण्यात आलेला असतो की, तो प्रत्यक्षात असलाच पाहिजे असे शेवटपर्यंत वाटत राहते.
कादंबरीकार इयन फ्लेमिंग यांच्या कल्पनाविश्वात निर्माण झालेला ब्रिटीश सीक्रेट एजंट बॉन्ड १९५३ साली कादंबरीच्या रुपात पहिल्यांदा अस्तित्वात आला. त्याचे ‘007’ असे टोपणनाव देखील ठेवण्यात आले. शॉन नंतर डेव्हिड निवेन, जॉर्ज लॅझेनबी, रॉजर मूर, टिमोथी डाल्टन, पीअर्स ब्रॉस्नन आणि डॅनियल क्रेग यांनी बॉन्ड साकारले. प्रत्येक अभिनेत्याने आपापल्या परीने बॉन्डला साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शॉन कॉनरी यांनी १९६२ साली पहिला बॉन्ड साकारला. त्यानंतर २०१५ ला स्पेक्ट्रामध्ये डॅनियल क्रेगने साकारलेला बॉन्ड पडद्यावर अवतरला. आज जवळपास सहा दशकांपासून या बॉण्ड पटानी रसिकांवर अधिराज्य गाजवले आहे. त्याचे निर्विवाद श्रेय जेवढे लेखक, निर्माता यांचे आहे तेवढेच प्रेक्षकांच्या मनात खऱ्या अर्थाने जेम्स बॉण्ड साकारणाऱ्या शॉनचे आहे. आणि हे सर्वच बॉण्ड साकारणाऱ्या अभिनेत्यांनी मान्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वांत लोकप्रिय बॉन्ड कोण याचा सर्व्हे घेतला गेला. त्यात निर्विवादपणे शॉन कॉनरी सर्वोत्कृष्ट ठरला.
जगभरात शॉन बॉण्ड म्हणून जरी ओळखला जात असला तरी अस्सल चित्रपट रसिक त्याला त्यापुढे जाऊन बघतात. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्याने आल्फ्रेड हिचकॉक, सिडणे ल्युमेट, जॉन ह्युस्टन, स्टीव्हन स्पीलबर्ग या सारख्या दिग्गज दिग्दर्शकां समवेत काम केले आहे. जितका दिमाखदार बॉण्ड सादर केला तशाच ईतर व्यक्तिरेखां मध्ये त्याने जान ओतली होती. दि अनटचेबल्स, दि रॉक, इंडियाना जोन्स अँड लास्ट कृसेड यातल्या भूमिका अजरामर केल्या.
एक ऑस्कर पुरस्कार, दोन बाफ्टा पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, फ्रान्स सरकारचा कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स हा सन्मान,
अमेरिकन सरकारचा यु एस केनडी सेंटर लाईफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड, ब्रिटिश सरकार तर्फे नाईट सन्मान असे अनेक पुरस्कारांनी मांदियाळी शॉन कडे आहे. पण पीपल मॅगझिन तर्फे दिला गेलेला सेक्सिएस्ट मॅन ऑफ दि सेंच्युरी हा पुरस्कार त्याच्या नव्वद वर्षाच्या आयुष्याची आणि सहा दशकांच्या चित्रपट करीयर मधील लोकप्रियतेचा उच्चांक आहे.. गुड बाय शॉन.. तू कुठंही गेलास तरी तुझ्या अभिनयानं तू अजरामर आहेस..