मिशिगनचा ठाणेदार
“वयाच्या २४ व्या वर्षी मी अमेरिकेत आलो. उच्च शिक्षण घेतले.. येथे छान व्यवसाय केला. चांगला जम बसला असताना मला इथल्या लोकांसाठी काही करावे असे वाटले. त्यामुळे मी व्यवसाय विकून टाकला. त्यातून आलेले बरेचसे पैसे मी माझ्या कामगारांना बोनस म्हणून दिले. आता मी राजकारणात उतरलोआहे. महत्त्वाचे म्हणजे माझे राजकारण मी माझ्या पैशांवर करतो. त्यासाठी मी कोणाकडून निधी अथवा देणगी घेत नाही. आता मला येथील नागरिकांसाठी आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण अशा अनेक गोष्टींसाठी काम करायचे आहे.” हे उद्गार आहेत नुकतेच अमेरिकेतील निवडणुकांमध्ये विक्रमी मतांनी विजयी झालेल्या श्रीनिवास ठाणेदार यांचे.
अमेरिकेत कोट्यावधी डॉलर्सची प्रॉपर्टी स्वबळावर निर्माण करणारा.. साहित्य संमेलना पासून राजकीय आखाड्यामध्ये सर्वत्र संचार असणारा.. ओबामा, क्लिंटन यासारख्या दिग्गज मंडळी सोबत वावर असताना बेळगावी कुंद्या वर तेवढेच प्रेम करणाऱ्या या व्यक्तिमत्वावर आजचा फोकस…
अमेरिकेची निवडणूक ही नक्कीच जगाला लक्ष वेधून घेणारी ठरते. महासत्ता असलेल्या देशाच्या प्रत्येक हालचालीचा आणि घडामोडींचा परिणाम हा इतर देशांवर होत असतो. आता भारतीय शेअर बाजारात जी अफलातून तेजी दिसत आहे ती अमेरिकेच्या सत्तांतरामुळेच आहे असे तज्ज्ञ मानतात. या सगळ्या बदलांमध्ये एका नव्या व्यक्तीची चर्चा होत आहे. एक असा व्यक्ती जो मुळचा अस्सल मराठी माणूस आहे.
श्रीनिवास ठाणेदार यांनी एकेचाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेत जाऊन स्वतःचे स्थान निर्माण केले. अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांना ओळखले जाते. दहावीला केवळ ५५ टक्के गुण मिळवणारा हा विद्यार्थी आज अमेरिकेच्या मिशिगन राज्यातून ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’ म्हणून प्रचंड मतांनी निवडून आला आहे. त्यांना तब्बल ९३ टक्के मते मिळाली. समोरच्या विरोधी उमेदवारांना एकूण सहा टक्के मते मिळाली. यावरूनच त्यांच्या मिशिगन मधील लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो.
श्रीनिवास ठाणेदार हे अमेरिकेतील डेमाॅक्रेटिक पक्षाचे सक्रिय सभासद आहेत. काही वर्षांपूर्वी मिशिगन प्रांताच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीला ते उभे होते. निवडणूक हरले असले तरी त्यांनी दॊन लाखांहून अधिक मते मिळवली होती. त्यावेळेपासूनच आपल्या या निवडणुकीचा प्रचार त्यांनी सुरू केला. अभ्यास, चिंतन करून पराभवाची कारणे शोधून काढली.
आपल्या त्या परभवाबद्दल ते सांगतात, ” गेली ४१ वर्ष मी अमेरिकेत रहातोय. पण, मला अजूनही बाहेरचा व्यक्ती म्हणून समजलं जात होते. मी या देशात व्यवसाय उभा केला. पण मी बोलतो वेगळा, अॅक्सेंट अमेरिकन नाही त्यामुळे मी बाहेरचा अशा नजरेने पाहिले जात त्यांना राजकारणी बाहेरचा चालत नाही. अजूनही आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा राजकारणी हवा अशी कल्पना लोकांची आहे. त्यामुळे राजकारणात फारशी बाहेरून आलेली लोक नाहीत. मी वयाच्या २४ व्या वर्षी अमेरिकेत आलो. मी दिसतो भारतीय, बोलतो भारतीयांसारखं. त्यामुळे लोकांना मी आणखी वेगळा वाटलो. कारण, बोलणं आणि भाषा फार महत्त्वाची आहे. लोकांशी बोलणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुरुवातीला मला खूप कठीण गेलं. हा आपल्यासारखा बोलू शकत नाही. हा बाहेरून आलेला आहे. आमचे प्रश्न यांना काय समजणार? असा त्यांचा सूर होता. यावर खूप विचार केला. हि मानसिकता बदलली पाहिजे हा मनाशी निश्चय केला.
यंदाच्या निवडणुकीत प्रत्येकाच्या घरी गेलो. त्यांच्या घराबाहेर उभा राहिलो. मला काय करायचं आहे हे समजावून सांगितलं. मला शिक्षण पद्धती सुधारायची आहे. गुन्ह्यांचं प्रमाण कमी करायचं आहे. केवळ आश्वासनं न देता त्यांना मी भारतात कसे गरिबीत दिवस काढले हे सांगितंल. तुमचे आणि माझे प्रश्न वेगळे नाहीत. अन्न, पाणी, वस्त्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या सर्वांच्याच मूलभूत गरजा आहेत. असं त्यांना समजावून सांगितलं.
हळू हळू जेव्हा मी कष्टात काढलेले दिवस आणि त्यांचे दिवस यांच्यात फार जास्त फरक नाही हे त्यांना कळलं. तेव्हा त्यांनी मला आपला मानलं. आणि त्याची परिणीती यंदाच्या निवडणुकीतील विजयात झाली असल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे.
श्रीनिवास ठाणेदार यांचा जीवन प्रवास हा नुसताच प्रेरणादायी नाही तर एखाद्या चित्रपटा प्रमाणे वेगवान आहे. बेळगाव येथील शहापूरमधील मिरापूर येथे जन्म घेतलेल्या या मुलाने आपले शालेय शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण केले. अतिशय सर्व सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या डॉ. श्रीनिवास यांनी १९७७ मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर्स डिग्री मिळवली. १९७९ ला ते अमेरिकेत आले इथे त्यांनी पॉलिमर केमिस्ट्रीत त्यांनी ऍक्रॉन विद्यापीठातून आपली पीएचडी पूर्ण केली. सेंट लुईसमधील पेट्रोलाईट कॉर्पोरेशनमध्ये पॉलिमर सिंथेसिस केमिस्ट आणि प्रकल्पप्रमुख म्हणून काम केले.
नोकरी सोडून स्वतः रसायन व औषधनिर्मितीचा उद्योग स्थापन केला. त्यांनी केमरी नावाची कंपनी विकत घेतली. छोट्या तीन लोकांवरून अतिशय दूरदृष्टीचे निर्णय घेत ठाणेदार यांनी ४०० जणांना अबाधित रोजगार मिळेल असा उद्योग उभा केला. बंद पडलेल्या कंपन्या विकत घेऊन त्या नफ्यात आणण्यात त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. त्यांची ओळख एक यशस्वी उद्योजक म्हणून निर्माण झाली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अमेरिकेतील तरुण उद्योजक म्हणून तीनदा त्यांना सन्मानीतही करण्यात आले.
औषध निर्मिती तज्ज्ञ, यशस्वी उद्योजक, राजकीय व्यक्तिमत्व अशा अनेक ओळख असलेल्या या अनोख्या माणसाची प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय लेखक अशी देखील ओळख आहे. आपल्या लेखन प्रवासाबद्दल ठाणेदार सांगतात, “मी एक मराठी माणूस. वडील कारकून होते. असे असताना मी अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक आहे. ५०० लोकांना मी रोजगार देतो. मी खूप मोठे काम केले असे नाही. परंतु जीवनात जे काही मिळविले ते केवळ स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवले आहे. त्यामुळेच मी माझी आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली. हा सर्व व्यवसाय सुखात सुरू होता. सर्व काही सेटल होते. अशावेळी अमेरिकेत जागतिक मंदी आली आणि क्षणात २०० मिलियन डॉलरचा उभा केलेला व्यवसाय बुडाला. परंतु मी हार मानली नाही. वयाच्या ५५ व्या वर्षी पुन्हा कामाला लागलो आणि पुन्हा व्यवसाय उभा केला. या अनुभवावर आधारित मी ‘पुन्हा श्री गणेशा’ हे दुसरे पुस्तक लिहिले. या दोन्ही पुस्तकांमध्ये माझ्या कर्तबगारीपेक्षा आलेल्या अपयशाचीच जास्त चर्चा आहे. त्यामुळे अपयश आले की खचू नका. हार मानू नका, त्याचा सामना करा, मार्ग नक्कीच निघेल. लेखकाची शैली अतिशय ओघवती आहे. शब्दांकन शोभा बोन्द्रे यांचं आहे. पुस्तकात महत्वाचे कटुप्रसंग नक्कीच सांगितले आहेत पण त्याचा वापर वाचकांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला नाही. अजिबात पाल्हाळ न लावताही त्यांचं गांभीर्य अधोरेखित होतं.
हे पुस्तक प्रेरणादायी आणि आश्वासक आहे. स्वतःवर विश्वास ठेवून, जिद्दीने आणि मेहनतीने काम करत राहिलं तर आयुष्याचा कायापालट घडवण्याची खूप मोठी क्षमता प्रत्येकात आहे हा विश्वासाचा अंकुर जागवणारं आहे.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा माणूस आयुष्यात खूप मोठी उंची गाठतो, परंतु त्याच वेळी वैयक्तिक आयुष्यात मात्र काही काळ त्याला खूप कठीण जातो. व्यवसायात विविध समस्येची लीलया उकल करणारा, आपल्या वैवाहिक आयुष्यातील उकल करण्यास असमर्थ ठरतो. बायकोने आत्महत्या केल्यानंतर त्यामागील नेमके कारण उलगडते. त्यावेळी त्याची दोनीही मुले लहान असतात. आईच्या मायेने त्यांना तो मोठे करतो. व्यवसायाकडे थोडे दुर्लक्ष होते. परंतु परत एकदा नवी सुरुवात करतो आणि त्यानंतर व्यवसायात नवीन उंची गाठतो.
गरिबी आणि प्रतिकूलतेशी झगडून काही जण आपली परिस्थिती सुधारतात. काहीजण फक्त या सुधारणेवर थांबत नाहीत तर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचा प्रयत्न करतात. अशांपैकी एक असलेल्या या मिशीगनच्या श्रीनिवास ठाणेदार यांचा आजवरचा प्रवास… जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट यांचे प्रतिक आहे.