“बाबा का ढाबा..”
“जब से ये वीडियो चला, तब से एकही रात मे तो सारी दुनिया ही बदल गई… कल कोई साथ नाही था… तीन तीन बच्चे है, लेकीन उन्होंने भी मुंह मोड लीया था| लेकीन आज तो लग रहा है पूरा हिन्दुस्तान मेरे साथ है…!” हे वाक्य आहे कांता प्रसाद यांचे. एका रात्रीत सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालेले कांताप्रसाद आणि बदामी देवी हे दांपत्य दिल्लीच्या मालवीय नगर मध्ये एक छोटेसे बाबा का ढाबा हे टपरीवजा उपहारगृह चालवतात. हा फोकस त्या वृद्ध दाम्पत्यावर नाही तर त्यांना सेलिब्रिटी स्टेटस देणाऱ्या सामाजिक सजगतेवर आणि समाज माध्यमांच्या सामर्थ्यावर आहे.
सोशल मीडियावरील फूड ब्लॉगर असलेल्या दिल्लीच्या एका तरुणाने सहज रस्त्याने जाता जाता या टपरीवर भेट दिली. गौरव वासन हे या ब्लॉगरचे नाव. गप्पा मारता मारता त्याने जे ऐकले ते ऐकून त्याच्या अंगावर सरकन काटा आला. त्याने मग त्या वृद्ध दाम्पत्याला बोलते करून व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. आणि बघता बघता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यू ट्यूब वर टाकलेल्या या व्हिडिओ क्लिप मग ट्विटर, फेसबुक, इन्स्टा यासारख्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून वेगाने शेअर व्हायला लागल्या. वेगवेगळ्या पक्षांचे नेते, चित्रपट, टीव्ही अभिनेते, ब्लॉगर्स यांनी या व्हिडियोला पुन्हा शेअर करून मदतीचे आवाहन केले. स्वरा भास्कर, रविना टंडन यांनी तर थेट प्रेक्षकांच्या भावनांनाच हात घातला. रविनाने तर जाहीर केले, “जी व्यक्ती बाबा का ढाबाला भेट देऊन तो फोटो मला पाठवेल, तो मी माझ्याकडून शेअर करेल…” या सगळ्यांची परिणीती म्हणजे बाबा का ढाबा रातोरात सोशल मीडियावर ट्रेंडिंग व्हायला लागला.
सगळ्या माध्यमांना या करंट ट्रेंडची दखल घ्यावीच लागली. आणि प्रसिद्धीचा ग्राफ आणखीनच उंचावला. लोकांची प्रंचंड गर्दी या ठिकाणी होऊ लागली.. मालवीय नगरच्या या बाबा का ढाबाचे रूपच या दोन चार दिवसात बदलून गेले आहे.
गरीब मेहनती लोकांच्या चहा नाश्ता, पराठे आणि अगदी जेवणाची योग्य सोय अल्पदरात करणाऱ्या बाबांच्या ढाब्या बाहेर आता रांगा लागत आहे. दोन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सामानाची मदत त्यांना प्राप्त झाली आहे. निळ्या रंगाच्या त्या पत्र्याच्या साध्या टपरीला जवळपास झाकूनच टाकले जाईल इतक्या वेगळ्या रंगाचे जाहिरातीचे पोस्टर्स आणि बॅनर्सने या परिसराचे रुपडे बदलले आहे. दिवसभरात जे थोडे फार विक्री होईल त्यानंतर जे उरेल त्या वर गुजराण करणाऱ्या या दाम्पत्याला आता काहीच उरत नाही, कारण मागणीच एवढी प्रचंड वाढली आहे. या वाढत्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी त्यांना आता भरपूर मनुष्यबळ लागणार आहे. झोमाटो सारख्या फूड डिलीव्हरी कंपन्यांनी बाबा का ढाबाला आपल्याकडे खास लिस्टिंग करून घेतले आहे.
याचे सगळे सगळे श्रेय जाते ते गौरव वासन या तरुणाला. आपल्या व्हिडिओ करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना गौरव सांगतो, “अगदी सहज रस्त्यात मी त्यांच्या जवळ थांबलो आणि गप्पा मारल्या. ते जे बोलले ते ऐकून मात्र माझ्या अंगावर अगदी काटेच आले. सकाळी साडे सहा पासून हे दोघे येतात आणि रात्री नऊ दहा वाजेपर्यंत या टपरीवर असतात. त्यांनी तयार केलेले पदार्थ देखील चवीने अगदी उत्तम आणि स्वस्त असतात. त्यांचा गिऱ्हाईक वर्ग देखील आजूबाजूला काम करणारा कष्टकरी वर्ग अशाच स्वरूपाचा. दोघेही ऐंशी वर्षांपेक्षा अधिक वयाचे. लॉकडाऊन मुळे त्यांच्याकडे येणारा ग्राहक वर्ग कमी झाला आणि अगोदरच खराब असलेली परिस्थिती अधिकच बिकट झाली. अनलॉकला सुरुवात झाली असली तरी टपरीवर कोण खायला जाणार.? त्यांना गिर्हाईकाचा मिळत नसल्याने उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. माझ्या लक्षात आले की, यांच्यासाठी थोडी मार्केटिंग केली तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकेल. म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला. माझ्या फूड ब्लॉगिंगचे भरपूर फॉलोअर्स आहेत. त्यांच्या पर्यंत पोहोचलो तरी खूप. अशा विचाराने हा व्हिडिओ केला. यात ज्या पद्धतीने कांताप्रसाद आणि बदामी देवीच्या डोळ्यातले अश्रू आले, ते पाहून लोकांना वाईट वाटले असावे.” असे गौरव सांगतो.
गौरव तसा पॉप्युलर फूड ब्लॉगर आहे. जरा हटके खायला कुठे मिळेल अश्या स्वरूपाचे दिल्ली आणि परिसरातील अनेक छोट्या व्यावसायिकांना त्याने जगासमोर आणले होते. या प्रकरणानंतर त्याला देखील सेलिब्रिटी स्टेटस मिळायला लागले आहे. त्याचे फॅन फोलोअर्स मोठ्या संख्येने वाढत चालले आहेत.
समाज माध्यमांची हाताळणी जर सकारात्मकरीत्या केली गेली तर कशा पद्धतीने सामाजिक क्रांती होऊ शकते याचे अनेक उदाहरणे आपण पाहतो आहोत. हे त्यातलेच एक असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दिल्लीच्या बाबा का ढाबा नंतर आग्रा येथील कांजी बडेवाले बाबा आता सोशल मीडियावर फेमस व्हायला लागले आहेत. इन्स्टाग्राम वर धनिष्ठा या फूडब्लॉगर मुलीने या बडेवाल्या बाबांना प्रकाशझोतात आणले. नव्वदीच्या आसपास असलेले ॉनारायण रेड्डी हे आग्ऱ्याच्या प्रोफेसर कॉलनी येथे सायंकाळी मांजीवडे, दहीवडे यांचा स्टॉल लावतात. पूर्वी त्यांची दिवसाला पाचशे रुपयांपर्यंत कमाई व्हायची. लॉकडाऊन नंतर आता “मुश्किल से सौ-दोसो रुपये का धंदा होता हैं |” असे सांगणाऱ्या नारायणजींचा व्हिडिओ देखील ट्रेडिंग व्हायला लागला आहे.
सेलिब्रिटीजने “दिल्ली वालोने कर दिखाया अब आग्रा वालो तुम्हारी बारी है |” असे आवाहन करायला सुरुवात केली आहे. आता हे लोण पसरत चालले आहे. ठिकठिकाणचे फूड ब्लॉगर्स आणि सोशल मीडियावर कार्यरत असणारे लोक अशा पद्धतीच्या बाबांच्या शोधात असल्याचे समोर येत आहेत.
सर्वसाधारणपणे वय वर्षे साठी नंतर मेहनतीचे काम करण्याची गरज निर्माण होऊ नये, असे निकष आहेत. रिटायरमेंटचे वय देखील अशाच प्रकारे निर्धारित करण्यात आले आहेत. मात्र तरी देखील कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्वतःचा उदरनिर्वाह पार पाडण्यासाठी ऐंशी- नव्वदी पार केलेल्या वृध्दांना कष्ट करावे लागत आहेत हे निश्चितच सामाजिक सुधारणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे.
नेहमी प्रमाणे शासन व्यवस्थेवर प्रत्येक गोष्टीचे खापर फोडून आपण सामाजिक प्रश्नांबाबत स्वतःची सुटका करून घेतो. आता तरी या गोष्टी बंद करायला हव्यात. सामाजिक प्रश्नांबाबत समाजानेच पुढाकार घ्यायला हवा आहे. आता काळ बदलत चालला आहे. समाज माध्यमांच्या उपयुक्तता सिद्ध होते आहे. समाजातील हेच प्रश्न, व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरे बनून तरुणांच्या सामाजिक जाणीवांच्या सजगतेची जाणीव करून देत आहेत. त्याच बरोबर समाज माध्यमांच्या सामर्थ्याची चुणूक देखील दाखवून देत आहेत. या उदाहरणांवरून आता गावोगावी कष्ट करणाऱ्या वयोवृध्द लोकांच्या समस्यांवर मदतीचा हात पुढे केला गेला तर ही सकारात्मकता वर्धनशील राहील….
खूपच छान…… एवढी दखल घेऊन लिखित स्वरूपात पावती देणारे दुर्मिळ असतात त्यामुळे स्वप्नील प्रथम तुझे अभिनंदन.
लेख छान च आहे….. शेवटी इथं जा चांगल मिळत असं सांगणार ही लोकांना खात्री शीर माणूस आणि मेन खवय्या कडून ऐकायचं असतं…. अशा पद्धतीने बाबाच्या गुणांना मिळालेली पावती नक्कीच अद्वितीय आहे… अशीच डोळस पण समाजात वावरून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.
एकमेकां साह्हय करू अवघे धरू सुपंथ
ना उच ना नीच
ना अमीर ना गरीब
हम सब एक है
आदर्शवत आणि प्रेरणादायी, आपल्या सामाजिक कार्याला शतशः नमन..????????