द ग्रेट ग्रेटा इफेक्ट..!
हवामानातील बदल आणि त्याच्या परिणामांकडे लक्ष वेधून घेणारी ग्रेटा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. तिची तळमळ पाहून तरी आता सरकार आणि नेत्यांना जाग येईल, अशी अपेक्षा आहे. परवाच्या आंदोलनामुळे तिच्यावर सगळ्यांच्या नजरा पुन्हा खिळल्या आहेत.
– डॉ. स्वप्नील तोरणे
(लेखक जनसंवाद अभ्यासक आहेत)
“आमच्या घराला आग लागली आहे… खरे तर आपल्या सर्वांच्याच घराला आग लागली आहे… लोक पाहत आहेत… पण ती विझवण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत ते होतच नाही… सारे जग म्हणजे माझे घर आहे. या जगातील प्रत्येक किशोर आणि तरुण मुले माझ्या कुटुंबाचाच भाग आहेत. तुम्ही आमच्या भविष्याशी खेळत आहात. स्वतःच्या स्वार्थासाठी केवळ पोकळ आश्वासने देण्याव्यतिरिक्त तुम्ही काहीच केलेले नाही…’ अशा शब्दात अवघ्या सोळाव्या वर्षी जगातील बड्या बड्या नेत्यांना तोंडावर प्रश्न विचारून जगभरातल्या शाळकरी मुलांपासून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पर्यावरण रक्षणाचा वणवा पेटवणारी ग्रेटा थनबर्ग आता पुन्हा जगभरात ऑन फोकस आली आहे.
गेली दोन वर्षे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट कंट्रोल साठी दर शुक्रवारी शाळा आणि महाविद्यालय बुडवून ठीक ठिकाणी आंदोलन करून आपला आवाज जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवणारी ग्रेटाची ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ ही संकल्पना. काही दिवस कोरोनाच्या महामारीमुळे काहीशी थंडावल्यासारखी वाटत होती. जगभरात अत्यंत कडक अंमलबजावणी असलेल्या लॉकडॉउनमुळे सगळेच ठप्प झाले होते. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण देखील कमी होते. शाळा कॉलेज देखील बंद असल्याने ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ देखील थांबलेले होते. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि या आंदोलनाने पुन्हा जोर पकडला.
ग्रेटा थनबर्ग पुन्हा चर्चेत आली गेल्या शुक्रवारी म्हणजे २५ सप्टेंबरला झालेल्या आंदोलनामुळे. युगांडा पासून रशियापर्यंत आणि चीनपासून कॅनडापर्यंत जगभराच्या सुमारे ३२०० पेक्षा अधिक ठिकाणी कोरोना गाईडलाईन्सचे पालन करीत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग सांभाळत जगभरातील हजारो शाळकरी आणि तरुणांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. अगदी आर्क्टिक आणि अंटार्क्टिक ध्रुवांवर असलेल्या शास्त्रज्ञांनी देखील यात भाग घेऊन आपला पाठिंबा दर्शविला.
आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे स्वीडनच्या भूमी आणि पर्यावरण न्यायालयाने मान्यता दिलेल्या प्रीमराफ लिसेकिल या मोठ्या ऑइल रिफायनरी कंपनीच्या एका नव्या प्लॅन्टच्या विस्तारा विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाले. या कंपनीला सरकारने मान्यता दिली असताना देखील आपल्या विस्ताराचा कार्यक्रम रद्द केला. ग्रेटाच्या म्हणण्यानुसार जर हा प्लॅन्ट सुरू झाला असता तर पॅरिस पर्यावरण करारानुसार स्वीडन आपले कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्याचे ध्येय गाठू शकला नसता.
आता या कंपनीने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून आपला विस्तार करायचे ठरवले आहे. जगभरातील पर्यावरणप्रेमींसाठी हा मोठा विजय मानला जात आहे.
जेमतेम साडे सतरा वर्षाच्या या मुलीने जागतिक स्तरावर पर्यावरण रक्षण संदर्भात जे काम केले आहे ते भल्याभल्यांना चकित करणारे आहे. सोशल मीडियावर तिने केलेल्या प्रत्येक पोस्टची दखल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून जागतिक स्तरावरील सर्व मोठे नेते आणि उद्योगपती घेत असतात. प्रसंगी तिला नामोहरम करण्यासाठी तिची खिल्ली देखील उडविण्याचे प्रयत्न मोठ्या धुरिणांकडून होतात. मात्र या मुळे उलटाच परिणाम होतो आणि ग्रेटाच्या शब्दांची धार अधिकच वाढत जाते.
तिची भाषा… तिची भाषणे अचंबित करणारी तर आहेतच पण माणसाच्या विचारांची दिशा बदलून टाकणारी आहेत. ती कोणते ज्ञान पाजळत नाही की अक्कल शिकवत नाही. ती फक्त प्रश्न विचारते.. त्यात कुठलाही अभिनिवेषही नसतो. मी कोणी मोठे काम करणारी मुलगी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न नसतो. तिच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होतो केवळ मानवाच्या स्वार्थी प्रवृत्ती विरुद्धचा राग आणि कामाचा प्रामाणिकपणा.
“या वयात मुलांनी शिक्षण घ्यायचे.. शिकून मोठे व्हायचे असते, असली आंदोलने करायची नसतात..” असे जेव्हा तिला सांगितले जात होते; तेव्हा तिने दिलेले उत्तर अंतर्मुख करणारे होते.
ग्रेटा म्हणते, “शाळेतच मला शिकवले गेले, जमिनीच्या खाली खोलवरून पृथ्वीच्या पोटातून कोळसा आणि तेल काढले जाते. एका मर्यादेपर्यंत ठीक होते पण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जेव्हा मनुष्याने निसर्गावरच आक्रमण करायला सुरुवात केली तर निसर्ग माणसाला धडा शिकवल्याशिवाय कसा राहील. सगळेच लोक क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग बद्दल जोरजोरात सांगत असतात, मात्र प्रत्यक्षात कोणी काहीच करत नाही. सातत्याने होणारे निसर्गाचे प्रकोप हे आमच्या अगोदरच्या पिढ्यांच्या चुकांमुळे होत आहेत.
सगळ्यांना समजते मात्र त्याबद्दल कोणीच का चांगले करीत नाही..? म्हणून मी ठरवले आपण बोलायचं आणि करूनही दाखवायचं. नाहीतरी शिकले सवरलेले लोक, भांडवलदार, असा वेडेपणा करत आहेच की. मग आम्ही शिकून उपयोग काय..? आम्ही मुलांनी करायचे काय..? जरा मला भविष्यात चांगले आयुष्य माझ्या अगोदरचे पिढीच्या लोकांच्या चुकांमुळे जगायला मिळत नसेल तर मग जगण्याला काही अर्थच उरत नाही. ज्या पद्धतीने जगभरात कार्बन एमिशन होत आहे, त्याचा वेग बघितला तर येत्या सात आठ वर्षात आपण अत्यंत भयावह परिस्थितीला सामोरे जाऊ. जेथून परतण्याचा मार्गच अशक्य आहे. मी तेव्हा तर जेमतेम पंचवीस वर्षांची झाली असेल. त्या वयात जर मला जगण्यासाठी श्वासच घेता आला नाही.. तर काय उपयोग त्या शिक्षणाचा. समजते सगळ्यांना मात्र कोणीच बदल करायला तयार होत नाही म्हणून मी ठरवले आपणच स्वतःला बदलायचे आपल्या कुटुंबीयांना आपल्या मित्रमंडळींना बदलायचे… कुठूनतरी बदल घडायला सुरुवात व्हायलाच हवी…”
सुरुवातीला बालिशपणा म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र हळू हळू तिच्या विचारातील धार सर्वांना जाणवत गेली. ऑगस्ट २०१८ पासून पंधरा वर्षाच्या ग्रेटाने दर शुक्रवारी शाळा बुडवून संसदेच्या बाहेर ग्लोबल वार्मिंग बद्दलचे बोर्ड घेऊन उभे राहायला सुरुवात केली. तिचे सातत्य पाहून माध्यमांनी तिची दखल घेतली. सोशल मीडियावर ट्रेंडिंग होऊ लागली. जगभरातून मुले या आंदोलनात सहभागी होऊ लागली. २०१८च्या युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्समध्ये तिने सहभाग घेतला. २०१९च्या युनायटेड नेशन्स क्लायमेट ॲक्शन समिट साठी ती पंधरा दिवस सौर उर्जेवर चालणाऱ्या नौकेने प्रवास करीत उत्तर अमेरिकेला गेली होती. त्यात तिने जे भाषण केले त्यात तीने जगातली मोठ्या नेत्यांना आणि उद्योगपतींना हाऊ यु डेअर..? असा प्रश्न भर सभेत विचारण्याची हिम्मत केली.
३ जानेवारी २००३चा जन्म असलेली ग्रेटा आज जगभरात लोकांची ताईत आहे. मूव्हीज, म्युझिक आणि स्पोर्टच्या पलीकडे जाऊन तरुणांना त्यांचा रियल आयकॉन मिळाला आहे. गेली दोन वर्षे सातत्याने नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीचे नामांकन झाले आहे. टाइम्स पर्सन ऑफ द ईयर, फोर्ब्जच्या यादीत नाव अशा स्वरूपाची अनेक पारितोषिके आणि फेलोशिप ग्रेटाला मिळाले आहेत.
आजोबा दिग्दर्शक, वडील अभिनेता, आई आंतरराष्ट्रीय ऑपेरा सिंगर असे कलेचे वातावरण लाभलेल्या घरात ग्रेटाचा जन्म झाला. सुरुवातीला तीचे असले वागणे न आवडणाऱ्या तिच्या कुटुंबीयांनी नंतर तिला पाठिंबा दिला. विमान प्रवास करायला लागू नये म्हणून तिच्या आईने तिची ऑपेरा सिंगरची करीयर सोडून तिच्या या कार्यात सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे.
ग्रेटाने सुरू केलेली ही चळवळ आता अधिक व्यापक होत आहे. तिच्या या चळवळीला यश मिळाले, द ग्रेटाज इफेक्ट अधिक इम्पॅक्टफुल झाले तरच आपण भविष्यात श्वास घेऊ शकू… अन्यथा आज जसे कापडी मास्क लावून फिरत आहोत तसेच ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर घेऊन पुढे फिरावे लागेल…
ग्रेटा इज ग्रेट
Greta is great .
खरे आहे अजय सर..
आभारी आहे.
छान आणि माहितीपूर्ण लेख!
मनपूर्वक आभार..
Sir,
This article is very informative.
Really youngsters need to divert themselves from ‘Flashy World’
to ‘Save Earth’.
The need of the hour.
Very True..
Thanks Sonali mam..
Great article. Dr Swapnil you have taken lot of efforts to write this informative and inspiring artcle. It will help create many Gretas in India. Thanks.
If a single person get motivated by readings this artical. It will worth for taking efforts to write artical.
Thanks Avichalji
Very insightful perspective ????
Thanks Aaradhya.. Hope people will understand the need of the hour.
Informative article…. Superb!
Thank you.