डोरिनची ब्यूटीफुल स्टोरी!
“Yes..! I am a beautiful story..!”
“हो… मि एक सुंदर कथा आहे..
जशी एखादी कथा.. आपण वाचतो किंवा कुणाला तरी सांगतो.. ती का बरे सांगतो..?
कारण ती वेगळी असते. म्हणूनच तर ती कथा असते.
मी पण वेगळीच आहे.. तुमच्यातली असली तरी एक वेगळी पण सुंदर कथा आहे… आणि का असू नये..?
आज माझे वय २८ वर्षे आहे. या वर्षांमध्ये मी अत्यंत समर्थपणे माझ्या शरीरात असलेल्या आगंतुक पाहुण्याचा पाहुणचार निभावत आहे. खरं म्हणजे याला पाहुणा तरी का म्हणावं..? मी अगदी आईच्या पोटात असल्यापासून हा एचआयव्हीचा व्हायरस माझ्या शरीरात शिरला. And yes..I am fabulously hosting HIV because I am greater than HIV.. म्हणूनच तर मी एक सुंदर कथा आहे..”
काल जगभर जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. ऐंशीच्या दशकात आलेला हा व्हायरस आजही मानवी बुद्धीच्या पलीकडे आपले अस्तित्व टिकवून आहे. म्हणूनच मी माझीच गोष्ट सगळ्यांना सांगत फिरते आहे.
मी आहे डोरिन मोराआ मोराचा.. जन्मापासूनच केनियामध्ये राहते. एका टेलिकम्युनिकेशन कंपनी मध्ये जॉब करते. जन्मापासून एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेली मुलगी ही एवढीच ओळख माझी अनेक वर्षे होती. आज मात्र मला नवी ओळख प्राप्त झाली आहे. ती म्हणजे एचआयव्ही वॉरियर्सची. आज अनेक ठिकाणी मी भाषणे द्यायला जाते. सोशल मीडियावर I am a beautiful story असे कॅम्पेन सुरू केले आहे. Tea with HIV positive असे उपक्रम हाती घेतले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध समित्यांवर काम करीत आहे. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये माझे विचार मांडत आहे. मात्र आजवरच्या माझा हा प्रवास सोपा नक्कीच नाही. माझी आई एचआयव्ही पॉझिटिव्ह होती, आणि वडील निगेटिव्ह. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर HIV Discordant Couple असलेल्या जोडप्याचे मी तिसरे अपत्य. माझे इतर दोघे भावंड एचआयव्ही निगेटिव्ह आहेत. मी आठ वर्षाची असताना माझ्या पालकांना मी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समजले. माझे हे स्टेटस मला समजले तेव्हा मी तेरा वर्षांची होते. जेव्हा माझ्यावर अँटी रिट्रोव्हायरल थेरपीचे उपचार सुरू झाले तेव्हाच समजले की मला नक्की काय झाले आहे. माझ्या इतर भावंडांना मिळणारी वागणूक आणि मला मिळणारी वागणूक यामध्ये फरक का आहे..? माझीच भांडी जेवल्यानंतर निर्जंतुक करून का ठेवली जातात..? मला जवळ का घेतले जात नाही.? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तेव्हा मिळाली. सुरुवातीला याचा खूप त्रास झाला. हा बसलेला एक मानसिक धक्काच होता. रडत बसायचे ..कुढत बसायचे..
मात्र एक दिवस ठरवले..
जे आहे.. ते आहे. जे मला मिळाले आहे त्यात माझा कोणताही दोष नाही. मी का रडत बसायचे..? मी लढायचे ठरवले. कालांतराने मी शिकत गेले..एचआयव्हीशी लढा देत गेले…
आज पंधरा वर्षांपासून अँटी रिट्रो व्हायरल थेरपीचे उपचार घेत आहे. आज मी शिक्षण घेऊन स्थिरावले आहे. छोटासा का होईना जॉब करीत माझ्या पायावर उभी आहे. पण माझ्या आजूबाजूला मात्र चित्र आकर्षक नाही. मी ज्या देशात राहते त्या केनियामध्ये पॉझिटिव्ह पेशंटचे प्रमाण खूप मोठे आहे. अगदी आजूबाजूला सहकाऱ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये एचआयव्हींचे रुग्ण मी बघत होते आणि आहे.
शरीरापेक्षा या व्हायरसने त्यांच्यावर मानसिक आघात जास्त केला आहे. परिस्थितीला तोंड देण्याऐवजी दोष देणे अधिक सोपे त्यांना वाटते. कुचंबणा, चिडचिड, राग, द्वेष, अपमान अशा असंख्य भावभावनांचा कल्लोळ उमटलेलाच पहावयास मिळत आहे. लोक शरीरापेक्षा मनाने अधिक खचत आहेत. आपण यावर काहीतरी करायला हवं… लोकांना यातून बाहेर काढायला हवं.. आपण ज्या प्रमाणे या व्हायरसला स्वीकारले त्याच प्रमाणे लोकांनीही स्वीकारायला हवे. परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा ती चांगली होण्यासाठी प्रयत्न करायला हवा अशी मानसिकता निर्माण होण्यासाठी मी कामाला लागले.
२०१५ मध्ये पहिल्यांदा मी फेसबुक वरून पोस्ट केली. आय ॲम अ ब्युटीफुल स्टोरी या नावाचे सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केले. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अशा वेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. माझ्या पालकांना डॉक्टरांनी सांगितले होते की, वयाच्या बारा वर्षापर्यंत मी जगू शकेल. आज मी आठ्ठावीस वर्षांची आहे. आणि ठणठणीत देखील.. हिच माझी गोष्ट मी सांगायला सुरुवात केली. त्यात कोणताही प्रचार प्रसार नव्हता.. फक्त एक छोटा विचार द्यायचा प्रयत्न होता. हळूहळू लक्षात यायला लागलं की आपण जे सांगतो आहे ते लोकांना आवडतं आहे. मनापासून पटत देखील आहे. मग यात वेगवेगळे विषय समाविष्ट होत गेले. व्हायरसची माहिती, अंधश्रद्धा, अफवा, गैरसमज, उपचार पद्धती आहे अनेक पैलू मी मांडत गेले. सुरुवातीला माझ्या शहरापुरता मर्यादित असलेला माझा प्रवास संपूर्ण देशभर, आफ्रिका खंडात.. एवढेच नव्हे तर परदेशात देखील होत गेला.. माध्यमांनी दखल घेतली.. चॅनल्स वर मुलाखती झळकल्या..
जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध समित्यांवर काम करायची संधी लाभली. मी आवर्जून सगळ्यांना सांगते, “हा प्रवास सोपा नाही आणि एचआयव्हीने जगण्याचे कोणतेही मार्गदर्शन मी करीत नाही. मी माझे अनुभव सांगते. आपण फक्त वेळेबरोबर जुळवून घ्या. आपल्या एआरव्हीएसचे पालन करा आणि स्वतःला आठवण करून द्या की आपण एचआयव्हीपेक्षा मोठे आहात ”. यातून खूप काही पॉझिटिव्ह घडलं.. आता असंख्य रुग्णांना मनापासून वाटते आहे की “हो… माझेही जीवन एक सुंदर कथा आहे..”