चॅम्पियन्स ऑफ दि अर्थ
दिल्लीचे प्रदूषण केवळ भारतातच नाही तर जगभरातच चर्चेचा विषय आहे. याच समस्येसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या विद्युत मोहनच्या कार्याची दखल संयुक्त राष्ट्रानेही घेतली आहे. त्याच्याच कार्यावर टाकलेला हा फोकस…
“. …साधारण हिवाळा सुरू झाला की दिल्ली दाट धुक्यामुळे वेढली जाते. घना कोहरा.. असे त्याचे वर्णन केले जात असले तरी ते फक्त धुक्याचे वलय नसते.. धुराच्या जाड पट्यात जाळल्या गेलेल्या कृषी उत्पादनाच्या कचऱ्यापासून निर्माण झालेले विषारी वायू आणि मोठ्या प्रमाणावर कार्बनचे कण असतात. मी वाढलो दिल्लीत, दरवर्षी अश्या धुक्यामुळे केवळ दिल्लीचं नाही तर आसपासच्या परिसरात नागरिकांमध्ये धोकादायक आजाराचे प्रमाण वाढायला लागते. अगोदरच एक्स्ट्रिम लाईनवर वायू प्रदूषण असलेल्या दिल्लीतला हा सिझन म्हणजे अस्मानी संकट वाटायला लागते. कापणी झाली की मोठ्या प्रमाणावर कृषी कचऱ्याची विल्हेवाट जाळून केली जाते. छोटा, सर्वसामान्य शेतकऱ्याला जर दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला तर नक्कीच यात काही तरी सुधारणा होऊ शकेल.. या दृष्टिकोनातून विचार सुरू केला..” हे विचार आहेत एकोणतीस वर्षीय दिल्लीच्या तरुण इंजिनिअर विद्युत मोहन याचे. भारतीय तरुण बुद्धिमत्ता सामाजिक उत्तरदायित्वाचे भान राखत साऱ्या विश्वात आपले श्रेष्ठत्व सिद्ध करू लागली आहे. हे याचेच एक मोठे उदाहरण आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दरवर्षी दिल्या जात असणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ या पुरस्कारासाठी विद्युतच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विभागातर्फे या विषयात नवनवीन कल्पना मांडून त्यादृष्टीने प्रयोग करणाऱ्या तरुणांना हे पारितोषिक दिले जाते. यंदाच्या वर्षी निवडण्यात आलेल्या सात तरुणांमध्ये विद्युतचा समावेश करण्यात आला आहे.
मेकॅनिकल इंजिनीअरिंग ची पदवी घेतल्यावर त्याने डेलफ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी या नेदरलॅंड येथील प्रसिद्ध संस्थेत टिकाऊ ऊर्जा तंत्रज्ञान या विषयात त्याने मास्टर्स केले. शिक्षण झाल्यावर विविध कंपन्यांमध्ये रिसर्चर, बायो एनर्जी कन्सल्टंट म्हणून काम केले. अभियांत्रिकी ज्ञानामधून पर्यावरण संरक्षण हा त्याचा आवडता विषय. यासाठी म्हणून त्याने केविन कुंग या तरुणा समवेत टाकाचार या कंपनीची 2016 मध्ये स्थापना केली. या कंपनी तर्फे एक मशीन विकसित करण्यात आले आहे. त्या द्वारे कणसातला भुसा, गवत, कडबा, नारळाची साले, नारळाच्या कवट्या इत्यादींवर प्रक्रिया केली जाते. आणि त्याचे रूपांतर इंधनाची, खतांची आणि वैशिष्टयपूर्ण रसायनांची निर्मिती केली जाते.
कृषी कचऱ्याची जाळण्याची प्रक्रिया केवळ आपल्याकडेच नाही तर जगभरात वर्षानुवर्ष होत आली आहे. धान्याचे उत्पादन निघाले की उरल्या सुरल्या गोष्टींना पेटवून दिले जाते. यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत असते. केंद्र शासनापासून स्थानिक पातळीवर या बाबतीत कडक कायदे करण्यात आले आहे. प्रदूषणाचा त्रास हा सर्वानाच होते असल्याने या बाबतीत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे. यामुळे हे प्रमाण कमी होत असले तरी पूर्णपणे थांबलेले नाही.
विद्युतच्या यंत्रामुळे शेतकऱ्यांना आता हे जाळण्याची गरज पडणार नाही. उलट ते त्या द्वारे निर्माण झालेले उत्पादने म्हणजे खते, कोळश्यासारखी इंधने, उपयुक्त रसायने यांचा वापर स्वतःच्या शेती साठी करू शकतील किंवा ते विकून त्यावर उत्पन्न देखील कमावू शकतील.
विकसित केलेल्या या कुठेही नेऊ शकत असणाऱ्या पोर्टेबल मशीन द्वारे तासाला दोनशे कीलोपेक्षा अधिक कृषी कचरा प्रक्रिया केला जाऊ शकतो. हे मशीन स्वतः निर्माण केलेल्या ऊर्जेवर चालते त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही इंधनाची अतिरिक्त गरज पडत नाही. दिवसभरात वीस तास हे मशीन चालवू शकतात शिवाय याची डिझाईन भारतातल्या कोणत्याही ग्रामीण भागात उपयोगी पडेल अशा स्वरूपाची विकसित करण्यात आली असल्याचे विद्युत सांगतो.
या कंपनीची स्थापना केल्या नंतर आजवर साडेचार हजार शेतकर्यांशी संबंध जोडण्यात आला असून सुमारे तीस हजार टन कृषी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे असे विद्युतने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
यामुळे कार्बन उत्सर्जन मुल्यात प्रचंड वाढ होणार असल्याचा त्याचा विश्वास आहे. याचा मोठा लाभ अविकसित आणि विकसनशील देशांतील आंतरराष्ट्रीय मांनकानुसार कार्बन उत्सर्जन प्रक्रियेत लाभदायक सिद्ध होणार आहे असा विद्युतचा आत्मविश्वास आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण संरक्षण विभागातर्फे असा गौरव करण्यात आला असल्याने याचे महत्त्व आपण साऱ्यांनीच समजून घेणे अत्यावश्यक आहे. प्रस्तुत लेखाचं फोकस हा विद्युतच्या आंतरराष्ट्रीय गौरव यापेक्षा अधिक सर्वसामान्य लोकांच्या पर्यावरण सजगतेचा आहे. आपल्या नित्य आचरणात पर्यावरणबाबत कायम जागरूकता राखल्यास विद्युत सारख्या तरुणांना नव सकारात्मक, संशोधन करण्यासाठी बळ तर मिळेल…