एन्फ्लूएंशिअल
टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जाहिर करण्यात येते. या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. एकूणच ज्यांच्या वर्षभराच्या कार्याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण होतो. त्याचे पडसाद जगभर उमटतात अश्या लोकांचा या यादीत समावेश असतो. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या यंदाच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये प्रा. डॉ. रविंद्र गुप्ता यांचाही समावेश करण्यात आला आहे. इतर सर्वांची नाव तशी परिचयाची असली तरी डॉ. गुप्ता यांचे नाव अनेकांनी पहिल्यांदाच ऐकले आहे.
कोण आहेत हे..? टाइमने त्यांच्याबद्दल काय म्हटलं आहे या विषयी आजचा हा फोकस….
प्रा. डॉ. रवींद्र गुप्ता हे त्यांनी एचआयव्ही वर केलेल्या संशोधनासाठी ओळखले जातात. डॉ. गुप्ता यांनी एचआयव्ही उपचार पद्धतीसंदर्भात केलेल्या संशोधनाच्या कामासाठी मागील वर्षी केंब्रिज विद्यापीठाने त्यांना केंब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ थेरिप्युटीक इम्युनोलॉजी अॅण्ड इन्फेक्शियस डिसिजेस विभागामध्ये क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं आहे.
युकेमध्ये एका रुग्णाच्या शरीरात स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या शरीरात एचआयव्ही व्हायरस आढळून आला नाही. रुग्णाच्या शरीरातून हा विषाणू पूर्णपणे नाहीसा होण्याची ही दुसरीच वेळ आहे. दहा वर्षांपूर्वी बर्लिनमधील एका रूग्णामध्ये बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. एचआयव्ही/एड्सवर मात करणारा टीमोथी ब्राऊन हा पहिला रुग्ण ठरला होता. त्यांच्यावर दोनदा बोनमॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर टीमोथीवर ल्युकेमियासाठी रेडिओथेरपीही केली गेली.
डॉ. रविंद्र गुप्ता सांगतात, “प्रत्यारोपणाद्वारे एचआयव्ही हद्दपार करण्यात दुसऱ्यांदा यश मिळालं आहे. बर्लिनमधील रुग्ण हा केवळ योगायोग नव्हता, हे आम्ही सिद्ध केलं आहे. योग्य उपचारांमुळेच या दोन्ही रुग्णांमधील शरीरातून एचआयव्ही नष्ट करण्यात यश मिळालं आहे. अशा प्रकारची जगभरातील ही केवळ दुसरीच घटना आहे. त्यामुळे एचआयव्हीचा सामना करत असलेल्या रुग्णांसमोर नवीन आशा निर्माण झाली आहे.”
प्रा. रवींद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील संशोधकाच्या टीमच्या रिसर्चला आता जगन्मान्यता मिळाली आहे. या रुग्णाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले होते. त्याला ‘लंडन रुग्ण’ असे संबोधण्यात येत होते. त्याला सन २००३ मध्ये एचआयव्हीची लागण झाल्याचे निदान झाले होते, तर २०१२ मध्ये त्याला पुढच्या टप्प्यातील हॉगकिन्स लिम्फोमा झाल्याचे निदान झाले होते.
एचआयव्ही रिसेप्टर सीसीआर ५ यांना रोखणाऱ्या जेनेटिक म्युटेशनची क्षमता असलेल्या व्यक्तींकडून या ‘लंडन रुग्णा’ला स्टेम सेलचे प्रत्यारोपण करण्यात आले. अँटिरिट्रोव्हायरल थेरपी (एआरव्ही) उपचार थांबवल्यानंतर १८ महिन्यांनंतरही या रुग्णामध्ये एचआयव्हीचा विषाणू आढळून आला नाही. या सगळ्या उपचाराचे नेतृत्व डॉ. गुप्ता करीत होते. त्यांनी आपल्या रिसर्च पेपर मध्ये या उपचारांबद्दल माहिती दिली आहे.
ते म्हणतात, “सध्याच्या घडीला एचआयव्हीवर केवळ औषधे घेण्याचा पर्याय आहे. ही औषधे एचआयव्हीच्या विषाणूचा प्रभाव कमी करतात. मात्र ही औषधे संपूर्ण आयुष्यभर घ्यावी लागतात. त्यामुळे विकसनशील, गरीब देशांच्या वैद्यकीय क्षेत्रापुढे एचआयव्ही उपचार हे मोठे आव्हान आहे. हा विषाणू पूर्णपणे नष्ट करणे हे जागतिक वैद्यकीय क्षेत्रापुढील प्राधान्याचे काम आहे.
डॉ. गुप्ता यांच्याबद्दल टाइम मॅगझिनमध्ये अॅडम्स अॅस्टील्जो यांनी लेख लिहिला आहे. अॅडम्स हे वर उल्लेखलेले लंडन पेशंट असलेले गृहस्थ आहेत. मेडिकल एथिक्स प्रमाणे त्यांची ओळख जाहीर करण्यात आली नव्हती. पण या सद्गृहस्थानी स्वतःच लेख लिहून सगळ्या गोष्टी जाहीर केल्या.
आपल्या लेखात ते म्हणतात, “फंक्शनल एचआयव्ही क्युअर असं या पद्धतीचं नाव असून हा वेगळाच प्रयोग होता. या असाध्य रोगा समवेत माझा अशक्य वाटणारा प्रवास प्रा रविंद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. माझ्या आयुष्यामध्ये अनेक संकटे येत असतानाच माझा हा प्रवास सुरु झाला होता. मात्र मी जेव्हा गुप्ता यांना पहिल्यांना भेटलो तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ते खूपच कर्तबगार आहेत. त्यांच्या मदतीमुळेच मला स्टेम सेल उपचारासाठी एका डोनर कडून मदत मिळाली.”
डॉ. गुप्ता यांच्या बद्दल भरभरून कौतुक करीत अॅडम्स म्हणतात. त्यांच्या संवेदनशील आणि दयाळू स्वभावामुळे मी प्रवासात यशस्वी ठरलो. त्यांच्या स्वभावामुळे एचआयव्हीसंदर्भात संशोधन करणाऱ्या क्षेत्रामध्ये त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि सर्वांकडून मानसन्मान मिळतो. त्यांचा आदर वाटणाऱ्यांमध्ये आता माझाही समावेश झाला आहे,” असं अॅडम्स यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.
“मागील काही वर्षांमध्ये आमच्यातील नातं आणखीन घट्ट झालं आहे. डॉ. गुप्ता हे त्यांच्याकडील ज्ञान आणि माहिती ही सर्वांसाठी परिणामकारक उपचार पद्धती शोधता यावी यासंदर्भात उत्साहाने काम करण्यासाठी वापरतात. त्यांनीच मला आत्मविश्वास मिळवून दिला. आज जगभरामध्ये एचआयव्हीशी लढणाऱ्यांसाठी माझासारखा बरा झालेला रुग्ण आदर्श आहे. आज मी डॉ. गुप्ता यांच्यामुळेच हे करु शकलो आहे,” असं अॅडम्स म्हणतात.
एचआयव्हीमुळे प्रत्येक वर्षी जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू होतो. जगभरात ३७ दशलक्ष एचआयव्ही एड्सग्रस्त रुग्ण आहे. १९८० पासून ३५ दशलक्ष लोकांचा जगभरात या आजारामुळे मृत्यू झालाय. गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाच्या व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला असताना १९८५ साली आलेल्या या एचआयव्हीच्या तावडीतून अजूनही सुटका झालेली नाही. या प्रयोगातून लगेच सुतावरून स्वर्ग गाठण्याची आवश्यकता नाही. त्यात अजूनही अनेक प्रयोग करावे लागतील, असे डॉ. गुप्ता स्वतः सांगतात.
तरीदेखील आज जगभरातील पोझिटिव्ह असलेल्या लाखो रुग्णांच्या आयुष्यात डॉ. रविंद्र गुप्ता यांच्या अभिनव प्रयोगामुळे मात्र आशेचा किरण नक्कीच निर्माण झाला आहे.