आईस बकेटचे हॉट चॅलेंज
‘…..असेल हिम्मत तर करूनच दाखवा.. बर्फाने भरलेली पाण्याची बादली डोक्यावर ओतून घ्या, नाहीतर १०० डॉलरची देणगी द्या..’ असले काही तरी भन्नाट गारेगार करणाऱ्या चॅलेंजचे व्हिडिओ सोशल मीडियावर १९१४ साली अपलोड व्हायला सुरुवात झाली. आणि बघता बघता या चॅलेंज कँपैन मुळे सोशल मीडियाच्या सकारात्मकतेचा नवा अँगल निमित्ताने जगासमोर आला. ‘एएलएस आईस बकेट चॅलेंज’ हे या उपक्रमाचे नाव. कडकडीत थंडगार होण्याचे चॅलेंज असले तरी प्रचंड सुपर हॉट ठरलेल्या या सोशल मीडिया चॅलेंजचा सहसंस्थापक पॅट क्वीन यांचे या रविवारी वयाच्या सदतीसाव्या वर्षी निधन झाले. पॅट क्वीनला श्रद्धांजली म्हणून वेगवेगळ्या चॅलेंजेसच्या भाऊगर्दीत काहीश्या विस्मरणात गेलेल्या या आईस बकेट चॅलेंजवर पुन्हा एकदा आजचा हा फोकस.
एएलएस या अत्यंत गंभीर मेंदूविकाराबद्दल जनजागृती व्हावी, या व्याधीविषयीच्या संशोधनासाठी निधी उभारला जावा आणि जगभरातील धोरणकर्त्यांचे या व्याधीने ग्रस्त असलेल्या आपल्या नागरिकांच्या वेदनांकडे लक्ष जावे, यासाठी सुरू झालेली ही अनोखी प्रचारमोहीम पाहाता पाहाता एका वादळाचे स्वरूप
धारण करून गेली. अमेरिकेतून सुरू झालेले हे च्यालेंज अख्या जगाला थंडगार अंघोळ करायला भाग पाडून गेले.
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, सत्या नाडेला, गायिका जस्टिन टिम्बरलेक, टिव्ही शो अँकर ओप्राह विन्फ्रे, सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, बराक ओबामा, फुटबॉल प्लेअर रोनाल्डो, सुप्रसिद्ध गायक लेडी गागा, जस्टिन बीबर अशा जगभरातल्या सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारले आणि आपल्यासारख्या इतर सेलिब्रिटींना दिले. हे देत असतानाच भरघोस मदत देखील आवर्जून केली. याच मुळे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय ठरलेल्या सोशल मीडिया अवेरनेस कॅम्पैन म्हणून हे चॅलेंज ओळखले जाऊ लागले.
पॅट क्वीनला आपल्या तिसावा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही दिवसात या आजाराला सामोरे जावे लागणार असल्याचे समजले. २०१३ हे वर्ष होते ते. या आजारावर कोणतेच ठोस उपचार नाही हे समजून देखील त्याने हार मात्र स्वीकारली नाही. आजाराच्या उपचारांविषयी संशोधन होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याचे त्याला समजले. बेसबॉल प्लेअर असलेल्या पेटे फ्रेटस याला देखील असाच आजार झाला होता. त्याने आईस बकेट चॅलेंजचा व्हिडिओ सोशल मीडिया वर पोस्ट केला. तो पाहून पॅट क्वीनला यावर काम करावेसे वाटायला लागले. त्या दोघांनी एकत्र येऊन या दोन आकार द्यायला सुरुवात केली. सातत्याने समाज माध्यमांमधून प्रचार आणि प्रसार सुरू केला. आणि या उपक्रमाला लोकप्रियता मिळायला लागली. याची परिणीती म्हणजे दोन कोटी पेक्षा अधिक लोकांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि आपले व्हिडिओ अपलोड केले. यातून सुमारे दोनशे वीस दशलक्ष डॉलर्स एवढी मदत निधी संशोधनासाठी अल्पावधीत उभा राहिला.
‘एएलएस’ म्हणजे अॅमिओट्रॉफिक लॅटरल स्क्लेरॉसिस या मेंदूशी संबंधित आजाराचे प्रमाण वेगाने वाढते आहे.
अमेरिकन बेसबॉल खेळाडू लो गेहरिग याचा वयाच्या ३७ व्या वर्षी १९४१ मध्ये या आजाराने मृत्यू झाला.
तेव्हापासून या आजारावर संशोधन सुरू आहे. मानवी शरीराच्या हालचाली नियंत्रित करणारे मज्जातंतू मेंदूकडून मिळणार्या आज्ञा या स्नायूंपर्यंत पोहोचवतात. यामुळे शरीराची हालचाल होते. एएलएस या व्याधीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील हे मज्जातंतू वेगाने झीज पावू लागतात आणि त्यांना जोडलेले स्नायूही मग एकेक करून मंद होत काम थांबवतात. पायाच्या बोटांपासून सुरुवात होऊन साधारणत: पाच ते सात वर्षांत रुग्णाचे पूर्ण शरीरच पांगळे होऊन जाते आणि मृत्यू ओढवतो. या व्याधीवर अजून कोणतेही खात्रीशीर उपचार उपलब्ध नाहीत.
अमेरिकेतून सुरू झालेले हे लोण मान्यवर विश्लेषकांच्या दृष्टीने काहीसा टीकेचा विषय ठरलेले असले, तरी भारतातही ही आइस बकेट चॅलेंजची लाट चांगलीच लोकप्रिय ठरली होती. आपल्या पिवळ्यार्जद पगडीवर बर्फाची बादली ओतून घेतली ती दलेर मेहेंदीने! त्याच्या मागोमाग बिपाशा बासू आणि सानिया मिर्झानेही भर पावसात हा गारेगार वर्षाव झेलला.
मग भारतातील ईतर सेलिब्रिटी देखील या सगळ्या आव्हनांपासून अलिप्त कसे राहू शकतील. सोशल मीडियावर आपले खेळाडू आणि सेलिब्रिटी कलाकार असेच डोक्यावर बर्फाच्या बादल्या ओतून घेताना दिसायला लागले. या मोहिमेत अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन अशा नामांकितांनी अंगावर बर्फाचे पाणी ओतून घेतले. भारतात ‘एएलएस आईस बकेट’कडे पहिल्यांदा लक्ष वेधले गेले ते टेनिस खेळाडू रोहन बोपन्नामुळे. रोहनने हे आव्हान स्वीकारले आणि आपला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताना त्याने अभिनेता राहुल बोस आणि बंगळुरूच्या फुटबॉल क्लबकडे चॅलेंज पास ऑन केले. राहुलने पाणी अंगावर न घेता निधी देण्याचा निर्णय घेतला. तर बंगळुरूच्या फुटबॉल क्लबने पण आव्हान पूर्ण करत टेनिस खेळाडू सानिया मिर्झाला हे आव्हान दिले. सानिया मिर्झाने दोनदा बर्फाचे पाणी अंगावर घेतले आणि अभिनेता रितेश देशमुखकडे थंडगार बर्फिल्या चॅलेंजची बादली सरकवली. खऱ्या अर्थाने रितेश देशमुख मुळेच ‘आईस बकेट’ची मोहीम बॉलिवूडमध्ये वेगाने पसरली. रितेशने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिषेक बच्चन, अक्षय कुमारला आव्हान दिले होते. या तिघांनीही इतरांना त्यात सहभागी करून घेतले. सोनाक्षी सिन्हाने एकच बर्फ डोक्यावर घेऊन हे आव्हान स्वीकारले. पाणी वाया घालवण्यापेक्षा देणगी द्या..
अशा कानपिचक्या तिने दिल्या. त्यामुळे उलट सुलट चर्चा होऊन हे चॅलेंज अधिक वेगाने पसरले. भारताच्या हॉकी संघातील सगळ्या खेळाडूंनी मोहिमेत भाग घेतला होता. या सगळ्यामुळे भारतासारख्या देशात देखील सर्वसामान्य नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला होता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवरची जगातील सर्वात यशस्वी आरोग्य विषयक जन जागरूकता मोहीम असा नाव लौकीक या मोहिमेला प्राप्त झाला. यातून मिळालेल्या निधीचा विनियोग जगभरातील या विषयावर कार्यरत दोनशे पेक्षा अधिक प्रोजेक्ट्सला फंडींग देण्यासाठी वापरला गेला. अनेक अधिकृत उपचार केंद्रांना आर्थिक मदत प्राप्त झाली. अमेरिका बरोबर कॅनडा, युरोप मधील या आजारावरील संघटनांना भरघोस निधी उपलब्ध व्हायला लागला.
या गंभीर आजाराकडे जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि परिस्थितीला शरण न जाता, हिमतीने लढत देणाऱ्या झुंझार पॅट क्वीनला सलाम..