अग्निशिखांची शुभ्रफुले..
“होय…! शांततापूर्वक जगण्याचा, माझाच देशातील काय जगातील सर्वच स्त्रियांना तो अधिकार असायला हवा. माझ्या देशात जगभरातील शांती सैनिकांच्या तुकड्या तैनात आहेत मात्र तरी देखील कोणत्याही क्षणाला मशीनगनने बुलेट्सचा वर्षाव होईल, कधी माझ्या घरा मध्ये बॉम्ब फुटेल हे सांगता येत नाही…” हे उद्गार आहेत फौजिया कोफी यांचे. जागतिक स्तरावर शांततेसाठी काम करणार्या व्यक्तीला देण्यात येणाऱ्या नोबेल शांतता पुरस्काराच्या अंतिम पाच नामांकन मध्ये त्यांचे नामनिर्देशन नुकतेच करण्यात आले आहे. येत्या नऊ ऑक्टोबरला या पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या संघर्षावर टाकलेला हा फोकस….
अफगाणिस्तान संसदेत पहिल्या महिला उपसभापती असलेल्या फौजिया कोफी सध्या तालिबानी संघटनांशी सुरू असलेल्या शांतता व वाटाघाटीच्या अफगाणी सरकार समिती सदस्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील निवडणुकांमध्ये अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला राष्ट्रपती देखील त्या होऊ शकतात असा जगभरातील राजनैतिक तज्ञांचा अंदाज आहे.
“सुमारे पाच दशकांपेक्षा अधिक काळ अफगाणिस्तानमध्ये प्रचंड हिंसाचार सुरू आहे. जगभरातील प्रगत देशांचे शांती सैन्य असताना, आजही असंख्य लोकांना रोज प्राण गमवावे लागत आहे. माझ्या वडिलांचा आणि भावांचा मृत्यू देखील याच हिंसाचारात झाला आहे. आम्हाला शांतता हवी आहे आणि त्याची गरज स्त्रियांनाच जास्त आहे. कारण कोणत्याही स्वरूपाच्या हिंसाचाराचा बळी प्रथम स्त्रियाच ठरीत असतात.” असे ठाम मत फौजिया व्यक्त करतात.
आपल्या व्यक्तिगत संघर्षावर त्या सांगतात ते सुन्न करणारे आहे. “माझे वडील खासदार होते. त्यांनी एका तरुण मुलीशी विवाह केला. तेव्हा मी आईच्या पोटात होते. जर मुलगा झाला तरच नवऱ्याचे प्रेम आपल्याला पुन्हा प्राप्त होऊ शकेल, अशी माझ्या आईला अपेक्षा होती. पण तिच्या दुर्दैवाने मुलगी, म्हणजे मी झाली. अत्यंत नाराज होऊन कुटुंबाच्या सात बायकांच्या मिळून एकोणिसाव्या नवजात अपत्याला म्हणजे मला, माझ्या सख्या आईने रणरणत्या उन्हात सोडून दिले.
त्या क्षणापासून धगधगत्या संघर्षाशी माझा आलेला संबंध आजवर तसाच होरपळणारा आहे. अफगाणी उष्णतेची प्रचंड धग.. भुकेने कासावीस असलेली मी तेवढीच चिवट निघाले. अखेर सायंकाळी आईला पश्चाताप झाला आणि तिने मला परत घरी आणले. त्या वेळी झालेल्या उष्णतेच्या चटक्यांचे व्रण अंगावर अनेक वर्षे, तर मनावर अजूनही आहेत. मोठी झाल्यावर जेव्हा मी आईच्या याबाबत विचारले तेव्हा ती म्हणाली, “पराकोटीचं दुःख सहन करण्यासाठी आणखी एक स्त्री आपण कशाला वाढवायची.? पण जेव्हा तुला संध्याकाळी परत आणले तेव्हाच लक्षात आले. की मला ज्याची भीती वाटते तशी अत्याचार सहन करणारी तू नाहीस.. तू त्याचा सामना करणारी आहे. एका रागाच्या, पराभवाच्या मानसिकतेतून एक दिवस माझ्या आईने जे केले ते, त्या परिस्थितीला शरण जाण्याचा भूमिकेतून होते. मात्र त्या नंतर आयुष्य भराच्या संघर्षासाठी तिनेच सातत्याने बळ पुरवले.
अगदी जन्मापासूनच मृत्यूशी अशी जवळीक निर्माण झाली की सगळे भय संपून गेले. केवळ स्त्री असल्यामुळे झेलावी लागणारे अवहेलना, अपमान, हल्ले आजवर होत राहिले. माझ्या नवऱ्याला भेटायला तुरुंगात गेली असताना एका तालिबानी व्यक्तीने केवळ माझ्या नखावर नेलपेंट असल्याचे बघून तिथेच मला दगडाने मारायला सुरुवात केली होती. अगदी नुकतीच दीड महिन्यापूर्वीची घटना. मी माझ्या मुलीसह एका मृत सैनिकाच्या कुटुंबियांना सांत्वना देण्यासाठी गेले होते. तेथून परततांना हल्लेखोरांनी आमच्यावर गोळीबार केला. काही सेंटिमीटर वरून बुलेट्स चाटून गेल्या. “अशी आक्रमणे होतच राहतील. याहीपेक्षा अधिक, लोक जेवढे मला थांबवायला प्रयत्न करतील तेवढेच माझे काम अधिक नेटाने मी करीत राहील. त्यांचा विरोध हिच माझ्या लढाईची प्रेरणा आहे.” असे बोलण्याचे आणि त्या प्रमाणे वागण्याचे धाडस फौजिया दाखवतात.
फौजियाचे वडील संसद सदस्य होते. त्यांना २३ अपत्य होती. त्यांची हत्या झाल्यानंतर या कुटुंबाला गरिबी आणि उपासमारीची वेळ आली. तिच्या आईने मात्र निर्धाराने असंख्य अडथळ्यांमधून नेटाने फौजियाचे शिक्षण सुरू ठेवले. तिला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी फौजियाने काबुल येथील मेडिकल स्कूलमध्ये प्रवेश देखील घेतला होता. मात्र याच वर्षी तालिबानची सत्ता आली. सर्वच स्त्रियांचे शिक्षण बंद करण्यात आले. फौजियाचे डॉक्टर व्हायचे स्वप्न भंगले, पण तिने माघार घेतली नाही.
ज्या मुलींना शिक्षण सोडावे लागले त्यांच्यासाठी तिने खास इंग्रजीचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. त्यातून आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावायला लागली. पुढे नेटाने ग्रॅज्युएशन आणि बिझनेस मॅनेजमेंट मध्ये मास्टर देखील जिद्दीने पूर्ण केले. आपल्या शिक्षणानंतर सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी युनिसेफ समवेत काम करण्यास सुरुवात केली. तालिबानच्या पाडाव झाल्यानंतर फौजिया यांनी २००१ पासून राजकीय कार्यात सक्रीय सहभाग घ्यायला सुरुवात केली. अपेक्षित बदल घडवायचा असेल तर लोकशाहीची कास धरावी लागेल या विचाराने त्या प्रेरीत होत्या. २००५ पासून आजवर त्या अफगाणिस्तानच्या खासदार म्हणून कार्य करीत आहेत.
विशेषत्वाने महिला आणि बाल समस्यांबद्दल अनेक विविध समाजसेवी संस्थांची त्यांनी स्थापना केली आहे. आज त्या तेथील महिला व बाल कल्याण आयोगाच्या अध्यक्षा आहेत.
विश्वशांतीच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या नामांकन बद्दल तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न जेव्हा माध्यमांनी विचारला तेव्हा उत्तर खरोखरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची असामान्य उंची दाखवणारी आहे. “हे नामांकन म्हणजे आजवरच्या अफगाण आणि जगभरातील स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा.. त्यांच्या संघर्षाचा.. आणि त्यागाचा केलेला सन्मान आहे. तालिबानच्या कारकीर्दित शिक्षण, नोकरी याच बरोबर स्वतःच मानसन्मान गमावलेल्या महिलांच्या न्याय हक्काच्या लढाईचा हा विजय आहे. ज्या तालिबानी प्रवृत्तीची दहशत आजही साऱ्या जगावर आहे त्यांच्या नेतृत्वाशी मी माझ्या देशात शांतता निर्माण व्हावी म्हणून चर्चा करीत आहे, असे त्या सांगतात.
आमच्या देशात ५५ टक्के महिलांना त्यांच्या शिक्षण, आरोग्य, व्यवसाय यासाठी आजही मोठा संघर्ष करावा लागतो आहे. त्याची प्रतिनिधी म्हणून मी तालिबानी नेतृत्वाकडे माझे म्हणणे मांडले आहे. त्यांना देखील एक वेळ नक्की समजेल की सत्ता प्राप्त करायची असेल तर लोकांना गोळ्या घालून नव्हे तर त्यांना प्रगतीची संधी देऊन.. त्यांच्या जखमांवर फुंकर घालूनच.. ती मिळवावी लागेल.”
येत्या शुक्रवारी नोबेल कमिटीद्वारे हा शांतता पुरस्कार जाहीर होणार आहे. गत सप्ताहात फोकस केलेली ग्रेटा थनबर्ग देखील या पुरस्कारासाठी नामांकीत आहे. हा पुरस्कार कोणालाही मिळो. त्यांचे कार्य आणि त्यांचा संघर्ष जगातील समस्त स्त्रियांना ऊर्जा, उमेद आणि बळ देणारा आहे..
धगधगत्या ज्वालांमधून निर्मिलेल्या या अग्निशिखाच… शांततेच्या शुभ्र फुलांच्या पाकळ्यांचे आच्छादन साऱ्या विश्वावर त्या करतील हे नक्की…
फौजिया कौफी यांचा डॉ स्वप्नील तोरणे यांनी लिहिलेल्या परिचय आवडला. डॉ स्वप्नील याची शैली ओघवती व रसाळ आहे. वाचायला सुरुवात केली की वाचक गुंतून जातो. सर्व माहिती ते सहज शब्दात मांडतात. त्यांना धन्यवाद. त्यान्च्या मुळे एका महान व्यक्तीमत्वाला परिचय झाला. नवनवीन व्यक्तिंचा परिचय देण्याचा इंडिया दर्पण चा उपक्रम प्रशंसनीय आहे. संपादकांना पण धन्यवाद ????
धन्यवाद साहेब, आपण स्वतः एक सिद्धहस्त लेखक आहात.
अत्युत्कृष्ठ.
वास्तववादी लिखाण.
खूप खूप आभार. मॅडम आपण इतक्या व्यस्त कार्यक्रमातून आवर्जून वेळ काढून वाचतात. आणि त्यावर अभिप्राय देतात. हेच सर्वात मोठे प्रोत्साहन आहे.
खूप खूप आभार मॅडम . तुम्ही आवर्जून वेळ काढून वाचतात.
सुंदर, सोपं शब्दांतून
नव नवीन माहिती उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद.
Keep it up ????
Thanks Deepa Mam..
The story behind the struggle.
The honour of Womanhood.
Informative article by author and publishers.
Thank you Sonali mam.
डॉ स्वप्नील,,,, आज महान व्यक्तिमत्वाचा परिचय झाला,,छानच
Dhanyawad Dr Aaher Sir..
अंगावर शहारे आणणारा फौजिया कोपी यांचा जीवन प्रवास आपण परिचित करून दिलात स्वप्निल सर खूप आभार