समृद्ध वन
तामिळनाडूतील डी सरवानन यांनी १०० एकर उजाड जमीन ही समृद्ध जंगलाने हिरवीगार केली आहे. भारतीय वृक्षांनी नटलेल्या या परिसरात आता मोठी जैविक विविधता नांदते आहे. त्यामुळेच अनेक परदेशातील संशोधकांची पावले या जंगलाकडे वळत आहेत. कसं झालं हे सगळं?
हे काही एका दिवसात घडलेले नाही. किंवा योगायोग नाही. गेल्या अडीच दशकांची ती तपश्चर्या आहे. आज जे काही दिसते आहे तो कळस आहे. पण, तो कसा निर्माण झाला याची मोठी कहाणी आहे. अथक परिश्रम आणि जिद्दीच्या कसोटीवर उतरल्यानंतरच आजचे हे हिरवेकंच वैभव दृष्टीस पडत आहे. खरं तर हे असे काही होणार आहे याची कल्पनाही सरवानन यांनी केली नाही. श्रीकृष्णाने सांगितले आहे ना, कर्म कर फळाची अपेक्षा करु नको, अगदी तसंच.
सरवानन तेव्हा १४ वर्षांचे होते. त्यावेळी एक मोठे आंदोलन सुरू होते ‘पश्चिम घाट बचाव’. या आंदोलनात ते एक-दोन दिवस नाही तर तब्बल १०० दिवस सहभागी झाले. या आंदोलनानेच त्यांच्यावर मोठा संस्कार झाला. त्यांच्या घरातच तसे वातावरण होते. आई आणि वडिल पर्यावरणावर नितांत प्रेम करणारी होते. बहुविध विकासासाठी, पायाभूत सुविधांसाठी झाडांचा बळी दिला जातो. यातून तेथील जैविक विविधता संकटात येते. ही बाब त्यांना खटकली. त्यामुळेच पर्यावरणासाठी, जैविक विविधतेसाठी काही तरी करण्याचा मनोदय त्यांनी तेव्हाच निश्चित केला होता. केवळ एका संधीचे ते वाट पाहत होते, असे म्हणता येईल.
१९९४ मध्ये ऑस्ट्रेलियन पर्यावरण तज्ज्ञ जॉस ब्रुक्स याने सरवानन यांना आमंत्रित केले. पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या औरेविले ग्रीन वर्क रिसोर्स सेंटरमध्ये शिक्षक म्हणून. तेथे त्यांची शिकविण्याची आणि प्रॅक्टीकल विचारांची पद्धत लक्षात घेऊन रौफ अली आणि नेवी हे दोन जण प्रभावित झाले. हे दोघे या सेंटरचे सदस्य होते. आणि हेच दोघे अरण्य नावाचे अनोखे जंगल तामिळनाडूतील पुथुराई गावात साकारत होते. त्यांनी सरवानन यांचे काम पाहून त्यांना या प्रकल्पाची जबाबदारी दिली. सरवानन यांनी त्यांच्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली. भारतीय प्रजातींच्या झाडांचे रोपण करणे आणि त्यांचे संगोपन करण्यास प्रारंभ केला. पण मोठी अडचण होती ती भारतीय प्रजातीच्या वृक्षांचे रोप उपलब्ध करण्याची. तामिळनाडूतील अनेक गावांमध्ये, भागांमध्ये फिरले. तेथून रोपे गोळा केली आणि त्यांची लागवड अरण्यमध्ये केली. पाहता पाहता तब्बल ९०० प्रजातीच्या रोपांनी तेथे बाळसे धरले. या झाडांना पाणी हवे. तेथे जैविक विविधता बहरावी म्हणून सहा छोटे तलावही साकारण्यात आले.
आज २५ वर्षांनंतर अरण्य जंगल आणि अभयारण्य म्हणून नावारुपाला आले आहे. याठिकाणी पक्ष्यांच्या २४०हून अधिक प्रजाती, फुलपाखरांच्या ५४ प्रजाती आणि सापाच्या २० पेक्षा अधिक प्रजातीचे साप तेथे सकुशल नांदत आहेत. त्यांचा आजवरचा प्रवास अतिशय विलक्षण आहे. प्रसिद्धी आणि प्रकाश झोतात राहणे त्यांना आवडत नाही. त्यामुळेच ते झाडांमध्ये आणि अरण्यमध्ये रमतात. गेल्या काही वर्षात अरण्यला भेट देणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यात परदेशी पर्यटक, अभ्यासक, संशोधक, तज्ज्ञ आदींचा समावेश आहे. याच अरण्य मध्ये त्यांनी रोपांची नर्सरीही सुरू केली आहे. ज्यात भारतीय प्रजातीच्या झाडांच्या रोपांची निर्मिती केली जाते. त्यात दुर्मिळ प्रजातींचाही समावेश आहे. म्हणजेच, याठिकाणी दुर्मिळ वनस्पतींचे जतन करण्याचा मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. लहान मुलांसह अनेकांसाठी ते विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम, माहितीपर उपक्रम राबवित असतात. स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, सरकार आदींचे सहकार्य त्यांना लाभते आहे. त्यामुळेच ही चळवळ दिवसेंदिवस वाढते आहे.