शेवाळांचे उद्यान
पाण्यात तरंगणारे किंवा पाणथळ ठिकाणी दिसणाऱ्या शेवाळांचे उद्यान असू शकते का, असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडेल. पण, हे सत्य आहे. नैनिताल जवळ देशातील पहिले शेवाळ उद्यान (Moss Garden) साकारण्यात आले आहे. त्याचे वैशिष्ट्य काय, ते का साकारण्यात आले, या गार्डनमुळे नक्की काय होणार यासह इतर बाबींचा वेध घेणारा हा लेख….
घराच्या परिसरात साठलेल्या पाण्यात शेवाळ निर्माण होते. त्यामुळे एकप्रकारे ते डोकेदुखीच वाटते. पण, हेच शेवाळ पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हो, वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते शेवाळाचे मूल्य अतिशय मोठे आहे. पण, अद्यापही आपण ते जाणलेले नाही. हे महत्त्व जाणले आहे ते उत्तराखंडच्या वनविभागाने. म्हणूनच त्यांनी नैनिताल जिल्ह्यातील खुरपटल या गावात देशातील पहिले वहिले शेवाळ उद्यान विकसित केले आहे. तशी ही संकल्पनाच अत्यंत नाविन्यपूर्ण आहे.
हिरव्या आणि निळ्या रंगाचे शेवाळ हे निरुपद्रवी असल्याचे बहुतांश जणांना वाटते. मात्र, त्यात कुठलेही तथ्य नाही. उलट हे शेवाळ अतिशय महत्त्वाचे आहे कारण त्याची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता. ओलसर ठिकाणी असणारे आणि झपाट्याने वाढणारे शेवाळ ही एक पेशीय पाण वनस्पती आहे. शिवाय लांब आणि तंतुमय स्वरुपाची ही वनस्पती असते. शेवाळाच्या पेशींमध्ये हरितद्रव्य असते. सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून हे हरितद्रव्य अन्न तयार करीत असते. हवेत मुक्त स्वरुपात असलेले नत्र हे शेवाळ शोषून घेते, असे वनस्पती तज्ज्ञ सचिन ब्राह्मणकर सांगतात. गेल्या काही वर्षात शेवाळाची शेती करण्याचाही ट्रेंडही सेट झाला आहे. खासकरुन भाताच्या शेतीत शेवाळ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. हवेतील नत्र भात पिकाला मिळवून देते.
रासायनिक खतांमधून मिळणारे नत्र आणि नैसर्गिकरित्या मिळणारे नत्र यात मोठा फरक आहे. पिकांना न वापरता येणारे हवेतील ७८ टक्के नत्र हे शेवाळाच्या माध्यमातून पिकांना मिळू शकते. हवेतील मुक्त नत्र स्थिर करणे, जमिनीच्या सेंद्रीय पदार्थांमध्ये वाढ करणे, जमिनीचा पोत सुधारणे, स्फुरदसारख्या जीवाणूंची वाढ जमिनीमध्ये करणे, जमिनीची धूप घटविणे असे अनेक फायदे शेवाळाचे आहेत.
मात्र, गेल्या काही वर्षात आपले त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणूनच उत्तराखंडच्या वनविभागाने अनोखी शक्कल लढवित शेवाळांचे उद्यान साकारले आहे. पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरण (कॅम्पा) अंतर्गत मिळालेल्या निधीतून हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे उद्यान सेवेत आणताना आम्हाला मोठा आनंद होत असल्याचे मुख्य वनसंरक्षक संजीव चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. शेवाळाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीच हे उद्यान साकारल्याचे चतुर्वेदी सांगतात. पर्यावरणातील एखाद्या घटकाचे महत्त्व किती मोठे आहे हे या उद्यानातून सांगायचे आहे. शेवाळवर्गीय (bryophytes) वनस्पती या पर्यावरणात अतिशय मोलाची भूमिका बजवतात. या उद्यानात पर्यटकांसाठी करमणूक तर होईलच शिवाय हे अनोखे ज्ञानही मिळेल, असा विश्वास चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे.
सद्यस्थितीत या गार्डनमध्ये शेवाळाच्या जवळपास ३० विविध जाती आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर्स (आययुसीएन)ने धोक्यातील काही वनस्पती प्रजातींची यादी तयार केली आहे. त्यातील काही प्रजाती या गार्डनमध्ये आहेत. यामुळे या प्रजातींच्या संरक्षणाला चालना मिळणार आहे. गार्डनमध्ये १.२ किलोमीटरचा एक मोठा भागच शेवाळांसाठी आहे जिथे या सर्व प्रकारच्या प्रजाती आहेत. या सर्व शेवाळांची विस्तृत माहिती, नाव, त्यांचे शास्त्रीय वैशिष्ट्य आदींची माहिती तेथे देण्यात आली आहे.
असे एक शेवाळ आहे जे जखमा बरे करते. हो. पहिल्या महायुद्धात Sphagnum moss या शेवाळाचा सर्वाधिक वापर करण्यात आला. कापसाऐवजी अतिशय मऊ आणि गुणकारी हे शेवाळ जावानांच्या जखमा भरण्यासाठी वापरले गेले. हे शेवाळही या गार्डनमध्ये आहे. ज्युरासिक काळात म्हणजे जेव्हा डायनासॉर होते तेव्हाही शेवाळ होते. म्हणजेच, शेवाळांचा इतिहास हा असा एवढा समृद्ध आहे. म्हणूनच या गार्डनमध्ये डायनॉसॉरची प्रतिकृती असून शेवाळाचा इतिहास तेथे देण्यात आला आहे. जपानमधील जगप्रसिद्ध शेवाळही येथे आहे. हे शेवाळ तपमानावर परिणाम करणारे आणि जंतू आणि जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध घालणारे (अँटी बॅक्टेरिअल) आहे. ते सुद्धा उद्यानात आहे. शेवाळाशी निगडीत विविध कविता आणि व्यंगचित्रही उद्यानात लावण्यात आले आहेत.
पृथ्वीवरील सजीव सृष्टी वाढण्यात शेवाळांचा वाटा मोलाचा आहे. कारण, उजाड ठिकाणी आणि डोंगर तसेच खडकांवर शेवाळ वाढते. शिवाय मोठ्या खडकांना छेद देऊन वनस्पतींची वाढ करण्यात शेवाळ महत्वाची भूमिका बजावते, असे वनस्पती तज्ज्ञ सांगतात. शिवाय ज्वालामुखीतून निघालेल्या राखेमुळे उजाड झालेला प्रदेशही हरित होण्यात शेवाळ महत्त्वाचे ठरल्याच्या नोंदी आहेत.
विविध आजारांवर आणि शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या शेवाळाची शेती करण्याचा प्रघातही आता विकसित झाला आहे. शेवाळाचे हे अनन्यसाधारण महत्व ओळखून उत्तराखंड वनविभागाने घेतलेला पुढाकार नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यानिमित्ताने शेवाळाचा प्रचार आणि प्रसारही होणार आहे.