मूर्ती लहान, पण कीर्ती महान
तामिळनाडूतील थिरुवनमलई येथील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी विनिशा उमाशंकरने सध्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. असे काय केले तिने की अनेकांना तिच्या कार्याची दखल घ्यावीशी वाटत आहे?
तशी ती अन्य विद्यार्थिनींप्रमाणेच. पण शाळेत जाताना दररोज ती एक दृष्य बघते. अनेक गरीब व रोजंदारीवरील धोबी हे रस्त्याच्या कडेला लोटगाडीवर इस्त्री करीत असतात. तसं पाहिलं तर त्यात वावगं काहीच नाही. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ते गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करतात. परिसरातील अनेक रहिवासी त्यांच्याकडे कपडे देतात. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांची उपजिवीका भागते. केवळ हे पाहून विनिशा दुःखी होते असे नाही. तर, हे सर्व धोबी कोळश्याची इस्त्री वापरतात. कपड्यांना इस्त्री केली की या इस्त्रीतील कोळशाची राख बाजूला काढतात. या राखेवर ते पाणी टाकतात. ती थंड झाली की सरळ ती कचऱ्यात टाकतात. तशी ही बाब काही वेगळी नाही. थिरुवनमलईमध्येच नाही तर संपूर्ण भारतात आणि अनेक देशांमध्येही हेच होते. पण, हीच बाब विनिशाला खटकली. अनेक दिवस ती अस्वस्थ होती. अखेर तिने हे चित्र बदलण्याचा चंग केला.
झाडांची तोड होते. लाकडे जाळली जातात. कोळसा तयार होतो. तो वापरला जातो. राख जमिनीवर किंवा पाण्यात कुठेही, कशीही टाकली जाते. यामुळे जमिनीचे आणि पाण्याचे आपण प्रचंड प्रदूषित करीत आहोत. जाणते आणि अजाणतेपणी पर्यावरणाचे मोठे नुकसान आपण करतोय, याची जाणिव तिला झाली. अवघ्या १४ वर्षांच्या विनिशाने यासंदर्भात काय आणि कसे करता येईल, यावर विचार सुरु केला. चित्र तर बदलायचे त्यासाठी आपल्याच पातळीवर आपण काय करु शकतो, यावर ती अधिक विचार करु लागली. त्याचवेळी तिला एक कल्पना सुचली. सौर ऊर्जेवरील इस्त्रीच आपण तयार केली तर? संकल्पना खुप नाविन्यपूर्ण असली तरी ती प्रत्यक्षात कशी येऊ शकेल, यावर तिला साशंकता आली. कारण, रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या त्या धोबींची आर्थिक स्थिती हलाखीची. त्यामुळे त्यांना परवडेल अशी आणि उपयुक्त ठरणारी इस्त्री तयार होईल का? या विचाराने ती जणू झपाटलीच गेली. रात्रंदिवस तिने त्याचाच ध्यास घेतला.
अखेर तिने मनातच एक चित्र तयार केले. एक सायकल असेल, त्याच्या पुढच्या भागात एक सपाट भाग (टेबलासारखा) असेल, याच सपाट भागाच्या वर असेल सौर छत. सौर पॅनल्सद्वारे वीज निर्माण होईल. ती बॅटरीमध्ये साठवली जाईल आणि हीच वीज इस्त्रीसाठी वापरली जाईल. सायकलवरील हा व्यवसाय सहजच कुठेही, केव्हाही चालवता येईल. अतिशय भन्नाट अशा या संकल्पनेने मोठे काहूर माजले. जोपर्यंत हे प्रत्यक्षात येत नाही तोवर स्वस्थ बसायचे नाही, याचा निश्चय तिने केला.
वडिलांनी पाचव्या वर्षीच तिच्या हाती विज्ञानाचे पुस्तक सोपवले. भेट म्हणून मिळालेल्या या पुस्तकाच्या वाचनातून तिला विज्ञान-तंत्रज्ञान खुप आवडायचे. याचाच एक भाग म्हणून ती सतत नवनवीन प्रयोग करायची. वैज्ञानिक पुस्तके वाचायची. पाहता पाहता ४०० पेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह तिच्याकडे जमा झाला आहे. याच उर्मीतून तिने स्मार्ट सिलिंग फॅनही साकारला. आपोआप चालणाऱ्या आणि हवा तसा वेग घेणाऱ्या या फॅनची प्रतिकृती तिने विज्ञान प्रदर्शनात ठेवली. तेथे कौतुक झाल्याने तो राज्यपातळीवर गेला आणि याच प्रकल्पाला तिला डॉ. प्रदीप थेवन्नूर इनोव्हेशन अॅवॉर्ड २०१९ मिळाला. या पुरस्काराने तिचा आत्मविश्वास वाढवला होता. म्हणूनच ती आता सौर इस्त्रीच्या प्रकल्पासाठी झटत होती.
अखेर तिने हा कल्पनातीत प्रकल्प साकारलाच. मोबाईल (कुठेही घेऊन जाता येणारी) इस्त्रीची सौर गाडी तिने तयार केली. १०० Ah बॅटरी तिने या प्रकल्पात वापरली आहे. १२०० वॉट क्षमतेच्या वीजेने ही बॅटरी चार्ज होते. दर तासाला २५० वॉट वीज सौर पॅनल्समधून मिळते. पाच तासानंतर ही बॅटरी पूर्ण चार्ज होते. याद्वारे सहा तास इस्त्री चालते. जर, आणखी गरज भासली तर या बॅटरीला अन्य वीजेचे कनेक्शन जोडता येते. अशा प्रकारचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग तिने आपल्या शिक्षकांच्या सहकार्याने प्रत्यक्ष साकारलाच. दोन महिन्यांचे अथक परीश्रम तिने घेतले. गुजरातच्या नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशननेही तिला या कामात मोठी मदत केली. अखेर हा प्रयोग यशस्वी झाल्याने तिने पेटंटसाठीही अर्ज केला आहे. तिच्या या कार्याची दखल घेऊनच डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नाईट अॅवॉर्ड २०१९ देऊन तिचा सन्मान करण्यात आला आहे. आता तिची निवड पंतप्रधान राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार २०२१ साठी झाली आहे. १८ वर्षांखालील मुलांना दिला जाणारा हा भारतातील सर्वोच्च सन्मान आहे.
विनिशाची भरारी केवळ इथपर्यंतच थांबलेली नाही. तर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अतिशय प्रतिष्ठेचा असलेला चिल्ड्रन्स क्लायमेट प्राईज तिला घोषित झाला. पारंपरिक कोळशाच्या इस्त्रीला सौर इस्त्रीचा सक्षम पर्याय तिने जगासमोर आणला आहे. स्विडनच्या चिल्ड्रन्स क्लायमेट फाऊंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. त्यापोटी तब्बल १ लाख स्विडीश क्रोना (अंदाजे ८ लाख ६४ हजार रुपये) विनिशाला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ऑनलाईन समारंभात स्विडनचे उपपंतप्रधान आणि पर्यावरण मंत्री इसाबेला लोविन यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले. तरुण संशोधकांना दिला जाणारा हा जगातील मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
भारतात वर्षाकाठी १० दशलक्ष इस्त्रीच्या गाड्या चालतात. या प्रत्येक गाडीवर प्रत्येकी पाच किलो कोळसा दररोज वापरला जातो, असे गृहित धरले तरी दररोज ५ कोटी किलो कोळसा जाळला जातो. यापोटी किती प्रचंड प्रदूषण होते, हे आपण जाणायला हवे, असे विनिशा सांगते. पुरस्कारातून मिळालेल्या रकमेतून मी आता पुढील संशोधन करणार आहे, कोरोनाच्या संकटामुळे टचलेस उत्पादने कशी तयार करता येतील, यावर माझा भर आहे, असे विनिशा सांगते.
पर्यावरणाच्या समस्या कितीही मोठ्या असल्या तरी त्यासाठीचे पर्याय आणि उत्तरे आपण शोधली पाहिजेत, ती मिळतात हे विनिशाच्या कृतीतून स्पष्ट झाले आहे. तिच्या या कार्याने संपूर्ण जगालाच एक मोठी दिशा दिली आहे. केवळ चिंता करण्यापेक्षा आपण समर्थपणे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक पर्याय निर्माण करु शकतो, असाच संदेश ती देते आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महानचा प्रत्यय देणारी विनिशा ही खऱ्या अर्थाने दीपस्तंभच म्हणावी लागेल.