अंदमानचा रक्षक
गेल्या महिन्यात एक व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली. ती होती समीर आचार्य. अंदमान आणि निकोबार या बेटांवरील आदिवासी जमात आणि तेथील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ते कार्यरत होते. अंदमानचे रक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याची ओळख करुन देत त्यांना केलेला हा सलाम….
अंदमान आणि निकोबार ही भारतीय महासागरात असलेली बेटे आहेत. भारत सरकारने त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आहे. आज सुद्धा ही बेटे तेथील आदिवासी बांधव आणि निसर्गरम्य (खरं तर स्वर्गच) वातावरणामुळे जगप्रसिद्ध आहेत. पर्यटनासाठी अनेकांची पावले या बेटांकडे वळतात. या बेटांवरील पर्यटनाबाबत आजवर मोठे लिखाण झाले आहे. किंबहुना त्याची त्यासाठीच चर्चा होते. मात्र, या बेटाचे महत्त्व केवळ तेवढ्यापुरता मर्यादित नाही. पर्यावरण, निसर्ग, सामरिकदृष्ट्या या बेटांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा म्हणूनही अनेकांना ही बेटे माहित आहेत. तेथील तुरुंग पाहण्यासाठी आणि सावरकरांनी भोगलेल्या यातना जाणून घेण्यासाठीही अनेक जण अंदमानला जातात. ब्रिटिशांनी या बेटांचे महत्त्व कैद्यांना ठेवण्यासाठीच केले. मात्र, या बेटावरील निसर्ग सौंदर्य हे अदभूतच आहे. तेथे जाऊन येणारा प्रत्येक पर्यटक तेच सांगतो. अनेक जण त्याचे फोटो सोशल मिडियावर टाकून अनेकांनाही येथे येण्यासाठी प्रेरित करतात. आम्ही स्वर्गातच जाऊन आलो किंवा स्वर्गच अनुभवला अशा प्रतिक्रीया ऐकून बहुतांश जणांना ही बेटे खुणावतात.त्यामुळे वर्षाकाठी तेथे पर्यटकांची मोठी मांदियाळी तेथे जमते. गेल्या महिन्यातील एका घटनेने या बेटांकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे.
अंदमान व निकोबार बेटावर राहणाऱ्या समीर आचार्य यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्रातील मोठे व्यक्तीमत्व लोप पावले आहे. आचार्य यांनी या बेटावरील जरावा या आदिवासी जमातीसाठीही मोठे योगदान दिले. गेल्या तीन ते चार दशकांपासून चाललेले त्यांचे कार्यही अतिशय लख्खपणे सर्वांसमोर आले आहे. अंदमान व निकोबार हा द्विपसमूह हा निसर्गाची मोठी खाण आहे. ती आपण जपली पाहिजे. ती अतिशय मोलाची संपत्ती आहे. मात्र हे मूल्य जाणले जात नसल्याने त्यांनी मोठा लढा उभारला होता.
२००२ मध्ये पोर्ट ब्लेअर येथे एका रस्त्याच्या कामाचा घाट घालण्यात आला. हा रस्ता असंख्य झाडांवर कुऱ्हाड पाडणारा होता. तसेच, यामुळे तेथील जैविक विविधताही नष्ट होणार होती. म्हणूनच त्यांनी या रस्त्याचा हा प्रस्ताव हाणून पाडण्यासाठी अनेक पातळ्यांवर लढा दिला. अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत साऱ्यांनाच विनंती केली. पण, काहीच झाले नाही. अखेर त्यांच्यातील पर्यावरण कार्यकर्त्याने अखेर थेट सर्वोच्च न्यायालय गाठले. तेथे त्यांनी सविस्तर मुद्दे मांडले आणि रस्त्याला कडाडून विरोध केला. अखेर न्यायालयाने त्याची योग्य दखल घेतली आणि रस्ता न बनविण्याचा निर्णय दिला. हा निकाल शिरसावंद मानत रस्ता बारगळला. हा केवळ एकच लढा झाला. पण अंदमान-निकोबार बेटावरील मासेमारी असो की अन्य प्रश्न या प्रत्येक बाबतीत ते अतिशय आग्रही होते. पर्यावरणाचे नुकसान करुन आपण तात्पुरते काही हशील करु पाहत आहोत पण ते चिरकाल टिकणार नाही. उलट पर्यावरण सांभाळले तर आपल्याला अनेक वर्षे संकटांना तोंड द्यावे लागणार नाही.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी असो की अन्य पर्यावरण संघटना या सर्वांबरोबरच ते काम करायचे. या बेटावरील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जैविक विविधतेमुळे तेथे अभ्यासाबरोबरच अन्य ‘उद्योग’ करायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ते अधिक सजग असायचे. संबंधितांना पारखून घेतल्यानंतरच ते त्यांना तेथे काम करण्यास मदत करत. वने, जैवविविधता ही अतिश अनमोल आहे. ती एकदा नष्ट झाली तर आपण कितीही ठरविले तरी ती पुन्हा निर्माण होणार नाही. शेकडो वर्षांपासून नांदणारी ही जैविक सृष्टी आपण का म्हणून धोक्यात आणायची, असा प्रश्न ते सर्वांनाच विचारायचे.
पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत ते आग्रही होते. त्यामुळेच तेथील प्रशासनाने दाद दिली नाही तर शेकडो किलोमीटर अंतरावरील भारतात येऊन आणि संबंधितांना भेटून ते त्यांचे मुद्दे परखडपणे मांडत. मग ते न्यायालय असो, सरकार, प्रशासन की अन्य कुणी. त्यांच्या या अथक कार्यानेच तेथील जैविक विविधता सध्या सकुशल आहे. २००४ मधील त्सुनामीची घटना जगप्रसिद्ध आहे. या त्सुनामीने या बेटांवरही होत्याचे नव्हते केले. मात्र, याच घटनेबाबत आचार्य यांचे अनुभव अतिशय मोलाचे होते. वन्यप्राणी आणि जैवविविधतेचे अत्यल्प झालेले नुकसान तसेच अन्य बाबी ते अगदी चपखलपणे सर्वांना सांगायचे. त्यामुळेच भारतीय सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अनेकांची पावले त्यांच्या घराकडे वळायची. पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला.
जरावा या आदिवासी जमातीसाठी त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांचे हक्क असोत की त्यांच्या अस्तित्वावरील आव्हाने परतावून लावणे असो त्यांनी प्रत्येकवेळी कणखरपणे किल्ला लढविला. हे आदिवासी बांधव हे पर्यावरणाच्या संरक्षणातील किती महत्त्वाचा घटक आहेत हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले. म्हणूनच आज या आदिवासी जमातीचे नांदणेही आचार्य यांच्या कार्याचे फलीत आहे. या बेटांवर संरक्षणाचे मोठे कार्य चालते. तसेच, विविध प्रकारची जहाजे या बेटावर येतात. मात्र, या सर्व बाबींमुळे पर्यावरणाचे कुठेही नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. समुद्री प्रवाळ असो की खारफुटी किंवा अन्य कुठली प्रजाती त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. अंदमानातील आदिवासी जमातीला तब्बल ६५ हजार वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. या जमातीला जपणे आणि त्यांच्या माध्यमातून तेथील पर्यावरणाची काळजी करणे असे चपखल कार्य ते करीत होते.
गेल्या महिन्यात त्यांचे निधन झाल्याने जगातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण या बेटांवरील एक तारा निखळला आहे. पर्यावरण क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक या सजीवसृष्टीवरुन गेला आहे. मात्र त्यांचे कार्य अजूनही अनेकांना प्रेरणा देत आहे. या बेटांवरील पर्यावरणाचे रक्षण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.