- आरे ते अंजनेरी
मुंबईतील आरे जंगलासाठीचा लढा यशस्वी झाला. आता त्याच धर्तीवर नाशिक व त्र्यंबकवासियांनी अंजनेरी बचावसाठी पुढाकार घेतला आहे. तो सुद्धा निश्चितच यशस्वी होणार आहे.
आल्हाददायक हवामानासाठी नाशिक आणि निसर्गसंपन्न म्हणून त्र्यंबकेश्वरची ओळख जगभरातच आहे. उलटे धबधबे असो की निसर्गसृष्टीचा अनोखा आविष्कार यामुळे त्र्यंबकेश्वरचा परिसर नेहमीच चर्चेत असतो. वेलनेस, आध्यात्म, पर्यटन, ट्रेकिंग यासह विविध प्रकारच्या क्षेत्रांमुळे त्र्यंबक तालुक्यात आपोआपच पावले वळतात. तेथे गेल्यानंतर मिळणारे सुख आणि समाधान याचे मूल्य कल्पनातीतच आहे. सद्यस्थितीत अंजनेरी गाजते आहे ते प्रस्तावित रस्त्यामुळे. केवळ पर्यावरण प्रेमीच नाही तर जवळपास सारेच एकवटले आहेत आणि त्यांनी सेव्ह अंजनेरी ही मोहिमच हाती घेतली आहे. ती यशस्वी होणार याच्या पाऊलखुणा सध्या दिसत आहेत.
मुळात अंजनेरी हे नक्की काय आहे, त्याचे नैसर्गिक, जैविक आणि पर्यावरणीय महत्त्व जाणून घेतले तर आपल्याला लक्षात येईल की या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणाला आपण किती जपायला हवे आणि त्यासंदर्भात कुठलाही प्रस्ताव आणताना किती वेळा विचार करायला हवा.
पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या, लेखिका आणि इकॉलॉजिकल रिसर्चर जुई पेठे यांचे अंजनेरीवर नितांत प्रेम आहे. विश्वातील अतिशय दुर्मिळ वनस्पती समजली जाणारी सेरोपेजिया अंजनेरीका हिचा शोधही पेठे यांनी लावला आहे. अंजनेरीबद्दल त्यांना विचारले असता त्या सांगतात की, अंजनेरी हा अतिशय महत्त्वाचा इकॉलॉजिकल स्पॉट आहे. तळवाडे हे गाव अंजनेरी व ब्रम्हगिरी या दोन्ही अजस्त्र पर्वतांच्या नजिक वसलेले आहे. अंजनेरी-कारवीचा डोंगर-ब्रम्हगिरी हे पर्वत पूर्व-पश्चिम दिशेने तर अंजनेरी-सत्शिरा (सासरा)- सोनगड ही रांग उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. या सर्वच पर्वतांना उंच ताशीव कडे लाभलेले आहेत. हे कडे ससाणे, घारी, गरुड, घुबडे, यासारख्या शिकारी पक्ष्यांसाठी सुरक्षित वस्तीस्थाने आणि योग्य शिकारस्थाने आहेत. या कड्यांजवळील गरम हवेच्या प्रवाहांमुळे या पक्ष्यांना चांगली उंची गाठता येते व शिकार करणे सोपे जाते. हे महत्त्व अद्यापही अत्यंत मोजक्या जणांना ठाऊक आहे, याबाबत पेठे यांना वाईट वाटते.
त्या म्हणतात की, गिधाडे हे स्वच्छता दूत आहेत. ते मृत प्राण्यांच्या मांसाचे भक्षण करून परिसर स्वच्छ व निरोगी ठेवतात. दुर्दैवाने या अतिशय उपयुक्त पक्षाचे अस्तित्वच मानवी हस्तक्षेपांमुळे धोक्यात आलेले आहे. त्यांचे संवर्धन केले नाही तर मानवी आरोग्यावर सरळ सरळ परिणाम होईल असे मत अनेक शास्त्रज्ञ मांडत असतात. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली लांब चोचींची गिधाडे अंजनेरी आणि परिसरातील डोंगरांच्या कड्यांवर आपली घरटी बांधतात व पिल्लांना मोठे करतात. हा अधिवासच आपण विविध कारणांमुळे धोक्यात आणत आहोत. पूर्वी येथे हेलिपॅडचा प्रस्ताव होता आणि आता रस्त्याचा. हे नक्की काय चाललंय, असा प्रश्नही पेठे विचारतात.
अंजनेरी-त्र्यंबकेश्वर परिसरात अनेक पक्षी हे प्रतिवर्षी स्थलांतर करून, मिलनासाठी किंवा अन्न मिळवण्यासाठी येतात. असंख्य पक्षी, याच हवाई मार्गाने, त्यांच्या वस्तीस्थानांपर्यंत किंवा मिलनस्थानांपर्यंत उडत जातात. म्हणजेच, अंजनेरी हा या पक्ष्यांचा एक प्रकारचा हवाई कॉरिडॉर आहे. पक्षी हे कमी उंचीवर उडत असल्याने वाहनांसह विविध प्रकारच्या हस्तक्षेपांमुळे त्यांचा हा कॉरिडॉर अडचणीत येणार आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण हे येथील जैविक संस्थेवर मोठा आघातच करणार आहे.
केदारनाथ अभयारण्याच्या ठिकाणी हेलिपॅड साकारल्याने त्याचा तेथील जैविक विविधतेवर जो परिणाम होतो त्याचा अभ्यास वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (WII) केला. त्यात असे आढळून आले की, या अभयारण्यातील अनेक प्राण्यांमध्ये मानसिक स्वास्थ्य व शांततेची कमतरता (म्हणजेच distress) दर्शवणाऱ्या संप्रेरकांची पातळी इतर संरक्षित क्षेत्रांच्या मानाने खूप जास्त आढळल्या. मानवामध्ये सततच्या distress मुळे हृद्य व मानसिक विकार, प्रजनन क्षमतेतील घट, संप्रेराकांमधील असमतोल, एक ना अनेक व्याधींना सुरुवात होते. या अभ्यासाची दखल घेऊन न्यायालयानेही विविध प्रकारचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्याचे तंतोतंत पालन होत नाही, हे दुर्देव आहे.
तीव्र आवाजांमुळे ध्वनी लहरींच्या सहाय्याने आहार, विहार व शिकार करणाऱ्या प्राण्यांचे (जसे वाटवाघळांचे) नुकसान होते. सापांसारखे सरीसृप जमिनीमधील कंपनांचा वापर करून आपली शिकार शोधतात किंवा सुरक्षिततेसाठी पळ काढतात. अशाच प्रकारचे दृष्य आणि अदृष्य परिणाम मोठे आहेत. मात्र, त्याचा विचार कोण आणि कसा करणार?
श्रीराम भक्त हनुमानाचे जन्मस्थान म्हणूनही अंजनेरी परिसराची ओळख आहे. हा परिसर औषधी वनस्पतींची मोठी खाण आहे. अंजनेरी परिसराचे महत्त्व लक्षात घेऊनच राज्य सरकारने याला संरक्षित क्षेत्राचा दर्जा दिला आहे. अंजनेरीच्या परिसरात दशमुळारिष्ट, टेटू, मूरडशेंग, अश्वगंधा, कळलावी, सालवण, पिटवण, बेल, शिवण, कोरफड यासारख्या मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून याठिकाणी औषधी वनस्पतींची वनविभागाने लागवड केली आहे.
अंजनेरीच्या ठिकाणी खास व्हल्चर रेस्टॉरंट विकसीत करण्यात आले आहे. साधारण एक एकर जागेवर तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. ही जागा गिधाडांसाठी राखीव आहे. या जागेत परिसरातील मृत जनावरे टाकण्यात येतात. मृत जनावरे हेच गिधाडांचे खाद्य असते. या रेस्टॉरेंटच्या माध्यमातून ते गिधाडांना उपलब्ध होतानाच जनावरांच्या मृतदेहाची योग्यरितीने विल्हेवाट लावण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने या रेस्टॉरंटद्वारे गिधाडांचे मोठ्या प्रमाणात संरक्षणाला चालना मिळाली आहे. याठिकाणी शंभराहून अधिक गिधाडांची नोंद वनविभागाकडे झाली आहे.
जगभरात पर्यावरण आणि जैविक विविधतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मोजक्या हॉटस्पॉटमध्ये पश्चिम घाटाचा समावेश होतो. आणि अंजनेरी याच पश्चिम घाटात येते. मुळात अंजनेरीचे जैविक मूल्य जाणून घेणारा शास्त्रोक्त अभ्यास किंवा संशोधन अद्याप झालेले नाही तसे होऊही शकत नाही. अशाप्रकारच्या अत्यंत संवेदनशील अंजनेरीकडे डोळेझाक करणे म्हणजे पर्यावरणाचे आतोनात नुकसान करण्यासारखे आहे. याच अंजनेरी परिसरात अनेक धनदांडग्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचे मूल्य वाढावे यासाठी काही मूखंड सक्रीय झाले आहेत. त्यात लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. म्हणूनच अंजनेरी परिसरात रस्त्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. रस्ता झाला तर त्या लगतच्या जमिनींचे दर कित्येक पटीने वाढतील, असा कावा आहे. मुळात संरक्षित क्षेत्रात जी विकासकामे किंवा पायाभूत सुविधा करायच्या असतात त्यासाठी नियम घालून देण्यात आले आहेत. ते डावलून काहींनी आग्रह धरला आहे. म्हणूनच हे सारे हाणून पडण्यासाठी आता नाशिककरांनीच पुढाकार घेतला आहे.
सोशल मिडियाद्वारे सेव्ह अंजनेरी, अंजनेरी वाचवा अशा प्रकारची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईतील आरे जंगलाच्या संरक्षणासाठीही तरुणांनीच पुढाकार घेतला होता. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता महाविकास आघाडीच्या सरकारने आरेतील कारशेडचा प्रस्ताव रद्द केला. आणि महानगरातील सर्वात मोठे जंगल म्हणून आरे घोषित करण्यात आले आहे. सांगलीतील ४०० वर्षांच्या जुन्या वडाच्या झाडाला वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने पुढाकार घेतला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आग्रही असल्याचे आजवरचे तरी चित्र आहे. त्यांच्या पुढाकारामुळेच या विभागाचे नावही आता पर्यावरण आणि वातावरणीय बदल असे करण्यात आले आहे. विदर्भातील वाघांना अडचणीच्या ठरणाऱ्या विकास प्रकल्पांबाबत उद्धव ठाकरे यांनी ठोस भूमिका घेतली आहे. तसे स्पष्टपणे केंद्राला कळविले आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेता आता अंजनेरीच्या बाबतीत राज्य सरकार विरोधाची भूमिका घेणार नाही, अशी खात्री अंजनेरी प्रेमींना आहे. सोशल माध्यमाच्या चळवळीनंतर थेट सरकारकडे दाद मागण्याची रणनिती आखण्यात आली आहे. वाढत्या जनरेट्यापुढे अंजनेरीच्या रस्त्यासाठी सरसावलेले मुखंड बचावात्मक पवित्रा घेतील, अशी चिन्हे आहेत. मात्र मागच्या दाराने कारस्थान करुन हालचाली होण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत अंजनेरीला वाचविण्याचा निश्चय झाला आहे. अंजनेरी वाचले तर त्र्यंबकेश्वर तालुक्याचे जैविक वैविध्यही कायम राहणार आहे. अन्यथा मोठ्या ऱ्हासाची ही सुरुवात असेल याचे भान लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सरकार यांना ठेवावे लागेल.