संक्रांत ते होळी हा साधारण दोन ते अडीच महिन्याचा कालावधी.जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवडा पासून ते मार्च पर्यंत. ऊन तापायला सुरवात झालेली असते. खर तर हा हेमंत आणि शिशिर ऋतूचा काळ. मकर संक्रांत हेमंत ऋतूत येते आणि होळी शिशिरामध्ये. वातावरणात उष्मा वाढू लागतो आणि दमटपणा दिवसेंदिवस कमी होत असतो. नेमका ह्याच दिवसात सृष्टी मध्ये बदल होत असतो. सध्या हेच दिवस आहेत म्हणून लिहितो आहे.
कवी कल्पेनेला आणि त्यामुळे पर्यटक वाचकांना वसंत ऋतू फार आवडतो. त्यामुळे वसंत ऋतुवर साहित्यही भरपूर प्रसारित आहे. पण जो खरा निसर्गाचा अभ्यासक आहे, तो सर्व ऋतूत परीक्षण करत असतो. सप्तरंगातील पहिल्या तीन रंगांची उधळण आपल्याला शिशिर ऋतूमध्ये पाहायला मिळते.
तांबडा, नारिंगी, पिवळा आणि शेवटचा रंग जांभळा सुध्दा. ह्या रंगांच्या फुलांची मुक्त उधळण आपणास मोहित करते. कुठल्याही शहरात,अगदी आपल्या नाशिक शहारामध्ये सुद्धा आणि नाशिकच्या आजूबाजूच्या प्रदेशात चक्कर मारल्यास ही निसर्ग संपदा आपल्या दृष्टीस पडते. आज अश्याच काही स्थानिक व परदेशी वेलांची, वृक्षांची आणि त्यांच्या फुलांच्या बहराची आपण माहिती घेणार आहोत.
बहावा
संक्रांत वेल (पायरोस्टेजिया व्हेनुस्टा) हा खरंतर मूळचा दक्षिण अमेरिकन असलेला वेल, आता भारतात सर्वत्र दिसतो आणि आवडतोही. जागोजागी गार्डन मध्ये याची लागवड करतात. मुख्य आकर्षण म्हणजे ,संक्रांतीच्या वेळेसच याचा नारिंगी रंगांच्या फुलांचा बहर असतो. फुले दोन ते तीन इंच लांबीची तुतारीच्या आकाराची असतात. नाशिक मध्ये कॉलेजरोड,गंगापूर रोड च्या भागात वीस ते पंचवीस घरांमधील कुंपणावर आपणास नक्की हा वेल दिसेल.
अस्सल भारतीय असणाऱ्या आंब्याला(मॅग्नीफेरा इंडिका )याच हंगामात मोहोर फुटतो आणि सर्वत्र सुगंधी वासाचा घमघमाट पसरायला सुरवात होते. नाशिक मध्ये अशी कित्येक झाडे आहेत की ज्यावर मोहोर सध्या लगडलेला आहे. दिसायला हिरवट, पिवळसर पांढरा रंगाचा हा मोहोर, आंब्याच्या विविध प्रजातीप्रमाणे दिसायला वेगवेगळा असतो.
आपल्याकडे प्रामुख्याने रायवळ किंवा गावठी आंबा जास्त दिसतो.कलमी आंब्यांची लागवड पण आजकाल शेतकरी वर्ग करताना दिसतात. नाशिक सारख्या उत्तर महाराष्ट्रात सध्या ‘केशर’ या गुजराथी आंब्यांची लागवड केलेले मळे खूप दिसायला लागलेत. भारतात आंब्याच्या जवळजवळ एक हजार जाती आहेत. पण मूळचा हा म्यानमार देशातून आलेला आहे.
शिशिर ऋतूत बहरणारे ,मला भावणारे वृक्ष म्हणजे शिवण आणि शिरीष. शिवण (ग्लेमिना अरबोरिया)चे झाड मध्यम असते आणि सदाहरित असते. फेब्रुवारी महिना सुरू झाला की ह्या झाडाला फुले यायला सुरुवात होते.
प्रत्येक शेंड्यावर पिवळट तपकिरी,ऑर्किडसारखी दिसणारी प्रचंड फुले दिसतात. मधमाश्यांचे हे आवडते झाड आहे.बोराच्या आकाराची पिवळी छोटी फळे यास येतात, गायी, म्हशी,शेळ्या साठी अत्यंत उपयोगी असतात. नाशिक मध्ये पूर्वी हे झाड क्वचितच दिसे, पण आता मात्र चार पाच झाडे ,एक किमी परिसरात दिसतात.
शिरीष, किंवा काळा शिरीष (अलबिजिया लेबबेक)हा तर फुलांच्या सुमधुर वासासाठी प्रसिद्ध वृक्ष आहे.मूळचा दक्षिणपूर्व आशिया खंडातील आहे.अख्ख झाड फुलांनी जेव्हा बहरते तेव्हा एखाद्या किमी पर्यंत याचा सुगंध पसरतो. आकाशवाणी जवळील तिरुपती टाऊनच्या चौकात एक असाच मोठा शिरीष वृक्ष मोठ्या दिमाखात उभा आहे.
मोठया बागांमध्ये किंवा नाशिक च्या बऱ्याच वॉकिंग ट्रॅक वर दिसणारा पण न नावाजलेला आणखी एक वृक्ष म्हणजे वारस (हेट्रोफ्रॅगमा क्वाड्रीलोक्युलर). गुलबस मलमली मोठया फुलांचा गुच्छ असलेले हे झाड मार्च महिन्यात बहरलेले असते. आकाशवाणी जवळील समर्थ ट्रॅक वर हे झाड सध्या बहरलेले आहे.
जॅकेरांडा (निलमोहर), टॅबुबिया (पिवळा आणि गुलाबी), हे वृक्ष खरेतर दक्षिण अमेरिकेतील आहेत. पण आता भारतात, त्यांच्या ठळक असलेल्या रंगामूळे सर्वत्र आढळतात. किंबहुना त्यांची संख्या वाढत चालली आहे आणि त्यामुळे शहरांचे सौंदर्य नक्कीच वाढलेले आहे. आनंदवल्ली नंतर दुतर्फा गुलाबी टॅबुबियाची झाडे आपले लक्ष वेधून घेतात.
जॅकेरांडाचे फुल गडद निळसर जांभळ्या रंगाचे असते तर पिवळ्या आणि गुलाबी टॅबुबिया च्या फुलांचा बहर म्हणजे पूर्ण झाड तुतारीच्या आकाराच्या फुलांनी बहरलेले असते. पिवळ्या फुलांमधील अजून एक झाड म्हणजे सोनमोहर (पेलटोफोरम टेरोकार्पम). हा वृक्ष पण दक्षिण आशिया मधून आलेला आहे.
तांबडी शेंग आणि पिवळी छोटी फुले असा दिसणारा हा वृक्ष आहे.पण पिवळ्या फुलांची खरी मजा येते ती बहावाच्या (कॅशिया फीस्टुला) लोंबकाळणाऱ्या फुलोऱ्यामुळे. अमलतास हे ह्याचे हिंदी नाव. एखाद्या मोठ्या बंगल्याच्या आवारात हे झाड हमखास दिसते.थायलंड देशाचा हा राष्ट्रीय वृक्ष आहे.
यासारखे आणि आपल्या परिचयाचे अजून एक झाड म्हणजे गुलमोहर ( डेलोनिक्स रेजिया). याचा रंग तांबडा भडक आणि मोठ्या पाकळ्या असतात. मूळचा मादागास्करचा असलेल्या या वृक्षांनी शहरात कित्येक ठिकाणी हजेरी लावलेली आहे.
अजून एक रस्त्यांच्या कडेस आणि द्विभाजकांवर भरपूर प्रमाणात वृक्षारोपण केलेला वृक्ष म्हणजे पिचकारी (स्पॅथोडीया कंपानुलाता) .झाडाच्या शेंड्यावर शेंदरी रंगाची आभाळाकडे तोंड केलेली पिचकारी सारखी याची फुले लक्ष वेधक असतात. मूळच्या आफ्रिकन वृक्षाला तेथे आफ्रिकन ट्युलिप ट्री असे संबोधतात.
शहराच्या बाहेर माळरानावर किंवा डोंगर पायथ्याशी एकही पान नसलेले, लालबुंद वाटीच्या आकाराची फुले असलेली दोन प्रकारची झाडे आपले मन प्रसन्न करतात. एक म्हणजे काटेसावर (बॉम्बॅक्स सेईबा) आणि दुसरे म्हणजे कैलासपती (कौरौपीटा गियानॅनिसिस) दोन्ही फुले दिसायला एक सारखी असतात,आणि खूप मधाळ असतात. त्यामुळे छोट्या मोठ्या पक्ष्यांसाठी ही मेजवानी असते.
काटेसावरला संस्कृत मध्ये शाल्मली म्हणतात. याच्या फळातून रेशीम कापूस बाहेर पडतो,त्याला शिवरीचा कापूस म्हणतात. ह्या वृक्षाचे मूळ दक्षिण आशिया आहे. यासारखेच साधर्म्य दिसणारे कैलासपती चे झाड आणि फुले असतात. काटेसावरीच्या फुलांना पाच पाकळ्या असतात,तर कैलास्पतीच्या फुलांना सहा पाकळ्या असतात.हा वृक्ष दक्षिण अमेरिकेतून भारतात आलेला आहे .दोन्ही वृक्षांना भारतात धार्मिक व सांस्कृतिक महत्व आहे.
होळीचे खरेखुरे नैसर्गिक महत्व सांगणारे ,अतिशय रंगतदार लाल केशरी रंगांनी माळराने फुलवणारे दोन वृक्ष म्हणजे पळस (बुटीया मोनोस्पर्मा)आणि पांगारा (एरिथ्रिना व्हेरिगेटा).दोन्ही वृक्ष दक्षिणपूर्व आशिया मधून आले आहेत.
कवींनी आणि साहित्यिकांनी वर्णन केलेले हे दोन वृक्ष आपणास नाशिकच्या चोहोबाजूंनी दिसतात,ह्या बद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. प्राचीनकाळी ह्या फुलांपासूनच रंग बनवला जायचा आणि रंगपंचमी आणि होळीत वापरला जात असे.
तर मित्रांनो, रासायनिक पदार्थांच्या ,शरीराला अपायकारक पदार्थांच्या वापरापेक्षा, नैसर्गिक होळी मनाला,डोळ्यांना आणि कॅमेंरांना नक्कीच सुखावह ठरते. रसिकांनी ह्यावेळेस निसर्गाची होळी पहावी असे वाटते,त्यामुळे आपोआपच Social Distancing साध्य होईल.
(नाशिक शहर परिसरातील फुलांची छायाचित्रे उपलब्ध करुन दिले आहेत सतीश कुलकर्णी यांनी)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!