आज आपण नाशिक जिल्ह्यातील दोन माळरानांची माहिती घेणार आहोत. हरीण व काळवीटांसाठी ख्यात असलेले ममदापूर-राजापूर आणि माळढोकसाठी एकेकाळी ओळखले जाणारे ओझर येथील माळरान. चला तर वेळ न दवडता या दोन्ही ठिकाणांची सफर करु या…
नाशिक जिल्ह्यातील पूर्व आणि दक्षिणेकडील भागात गोदावरी खोऱ्यातील पठारी प्रदेश आहे. हा भाग दख्खनच्या पठारी प्रदेशात समाविष्ट होतो. टिपिकल माळराने ही पठारी प्रदेशात आपणास दिसतात. या माळरानांचे क्षेत्रफळ विस्तृत असते. विखुरलेली झाडे आणि भरपूर गवत ही माळरानावरची संपत्ती. आपल्यासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशात, गवताचे जवळ जवळ ४०० प्रकार आढळतात.
माळरानावर गावत हीच खरी रानसंपत्ती असते. पावसाळ्यात गवत वाढते आणि उन्हाळ्यात जवळपास नष्ट होते, असे आपणास वाटते. पण जमिनीत असलेली मुळे पुन्हा एकदा फुटतात आणि गवत वाढते. या दरवर्षीच्या चक्रात कीटक, उभयचर, प्राणी, पक्षी यांची एक अन्नसाखळी तयार होते आणि माळरानावरील परिसंस्था आकारास येते.
मित्रांनो, आपण मागील काही लेखात नाशिक जिल्ह्यातील पाणथळ भागांची विस्तृत माहिती घेतली. त्यामानाने संख्येने माळराने मात्र कमी आहेत. एकतर पठारी प्रदेशावरील मानवी आक्रमणे वाढली आहेत, तसेच माळराने हा दुर्लक्षित भाग असल्याने त्यांची म्हणावी अशी वाढ, निगा राखली जात नाही. तसे म्हणायला नाशिकमध्ये राजापूर-ममदापुर काळवीट संरक्षित क्षेत्र असल्याने नाशिकचे नाव माळरानासाठीही महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले.
गवतावर जगणारे असंख्य जीव जंतू असतात. अगदी बारकाईने निरीक्षण केल्यास आपणास हे जाणवेल की, गवतातून चालताना कितीतरी छोटे छोटे किडे, कीटक उडताना दिसतात. नाकतोडे, रातकिडे, पतंग, मुंग्या, मुंगळे, बिटल, अळ्या, माश्या, भुंगे यांचे विविध प्रकार आपणास दिसतात. त्यांना खायला टपलेले सरडे, शामेलिऑन, सापसुरळी, बेडके हे दिसतात.
गवतावरील धान्याला खाणारे मुनिया, गप्पीदास, सुगरण, चिमण्या, फिंच, चिरक, दयाळ यासारखे पक्षी चित्त वेधून घेतात. त्याच बरोबरीने नाकतोडे, माश्या, किटकांसारखे भक्ष्य हडपणारे कोतवाल, वेडा राघू, चास, नीलकंठ, धोबी, चंडोल, तिरचिमणी, टिटवी, विविध प्रकारचे माश्यामार ( Flycatcher) या सारखे रंगतदार पक्षीपण आपले लक्ष वेधून घेतात.
सरडे आणि नाकतोडे हे खूप पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. उंदीर, ससे, उदमांजर, घोरपड हे बऱ्याच शिकारी पक्ष्यांचे आणि मांजर जातीतील प्राण्यांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस घार, गरुडाचे विविध प्रकार, घुबडांचे विविध प्रकार, धामण, नाग, घोणस यासारखे सरपटणारे प्राणी यांचे पण दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. अश्या प्रकारे माळरानावर अन्न साखळी फुलताना दिसते.
राजापूर, ममदापूरचे खरे आकर्षण हे काळवीट आणि विविध हरणांचे कळप. हे सारे येथे मुक्तपणे बागडताना दिसतात. या प्राण्यांसाठीचा अगदी योग्य असा अधिवास येथे मिळाला आहे. त्यामुळे पर्यटक येवल्याला पैठणीची खरेदी करून झाल्यावर निसर्ग प्रेमापोटी राजापूरला नक्की फेरफटका मारताना अलीकडे दिसतात.
आबालवृद्धांना हरणांचे कळप आकर्षित करतात. मनसोक्त छायाचित्रण, भरपूर मोठे माळरान यामुळे अल्पावधीतच हे ठिकाण खूप प्रसिद्ध होत आहे यात शंकाच नाही. वाइल्ड लाईफ अभ्यासू व्यक्तींनी या भागाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. काही प्राण्यांची शिकार करणारे पारधी लोकांना मात्र साम, दाम, दंड, भेद यांची गरज भासते. हे काम वन विभागातील अधिकारी वर्ग प्रभावीपणे करताना दिसत आहेत.
नाशिकपासून जवळच असलेल्या ओझर येथे, एअर फोर्सचे मोठे माळरान संरक्षित करून ठेवलेले आहे. साधारणपणे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी येथे माळढोक पक्ष्यांचा वावर होता. त्याकाळी १४ माळढोक पक्षी अधिवासात होते. दुर्दैवाने मानवी उपद्रवाने म्हणा किंवा कोल्हे, लांडगे यामुळे म्हणा, त्यांचा येथील अधिवास नष्ट झाला व नाशिकला गालबोट लागले. असो निसर्गचक्र सतत बदलत असते. आपणही त्याचे निरीक्षण करताना निसर्ग जपणुकीसाठी बदलले पाहिजे, असे मला वाटते.
अशा या दोन नाशिक जिल्ह्यातील माळरानांबद्दल आपण माहिती घेतली. अजूनही काही गवती माळराने हुडकण्याची आणि जपण्याची गरज आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने इको टुरिझमला चालना मिळेल.
(सर्व फोटो – मनोज जोशी आणि संदीप रणदिवे)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!